Sunday, December 1, 2013

आनंदाचे झाड

चित्रकाराला काढलेल्या चित्रातून मिळणारा आनंद, शिल्पकाराला शिल्पकृती पूर्ण झाल्याचा आनंद, वैज्ञानिकाला नवे शोधून काढल्याचा आनंद, ही सारी आनंदाची रूपे. आपण सामान्य माणसे कलाकार किंवा वैज्ञानिक नसतो. तरीही आपण आनंदाच्या शोधात असतो. प्रत्येकाला आनंदी असावे असेच वाटते. कोणालाही दु:ख नकोच असते. दु:ख हे आयुष्याच्या म्हणजे जगण्याच्या अवस्थेशी निगडीत असते. दु:ख आणि त्रास हा जगण्याचा अविभाज्य भाग आहे. आशा – आकांक्षा हे दु:खाचे मूळ आहे असे गौतम बुद्ध म्हणाले होते. जगातला कोणताही माणूस मरेपर्यंत आनंदी असू शकत नाही. असे म्हणतात की माणूस हा आनंद आपल्या स्मशान यात्रेलाच घेऊन जातो.
माणूस दु:खी कां असतो? त्याची कारणे अनेक असतात. प्रेम आहे पण लग्न नाही म्हणून. लग्न आहे पण प्रेम नाही म्हणून. संसार आहे पण सुख नाही म्हणून. मुले आहेत पण त्यांच्यापासून त्रास आहे म्हणून. मुल नाही म्हणून एकटेपणा आहे म्हणून. पैसा आहे पण अनेक विवंचना आहेत म्हणून. सत्ता आहे पण लोकप्रियता नाही म्हणून. लोक मागे आहेत पण सत्ता नाही म्हणून. घर आहे पण घरपण नाही म्हणून. अशा ह्या अनेक कारणामुळे माणूस सुखी नसतो. आनंद हरवून बसतो. जगणं म्हणजे जन्मल्यापासून वेदनेला घेऊन राहणे. आपण आशेपासून दूर जाणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण भौतिक सुखापासून निवृत्त व्हावयास हवे. त्यासाठी जगण्याच्या हव्यासातून बाहेर येणे आवश्यक आहे.

आपण जेंव्हा तरुण असतो तेंव्हा आयुष्याला कवेत घेतो. आपल्याला असे वाटते की आपल्यात सर्व क्षमता आहे. आपण सर्व बदल घडवून आणू शकतो. आपल्याला जे पाहिजे ते आपण मिळवणारच. मग आपले लग्न होते. आणि आपण एक कौटुंबिक मार्ग स्विकारतो. आपल्याला आपल्या सह्चरीला म्हणजे बायकोला आनंदी करावयाचे असते. त्यासाठी आपण झटत असतो. कारण आपले तिच्यावर अतोनात प्रेम असते. मग आपल्याला मुलं होतात. आणि आपण त्यांच्यात गुंतत जातो. त्यांच्यासाठीच जगत राहतो. धडपडत असतो. त्यांचे जीवन सुखकर व्हावे म्हणून झटत राहतो. आणि मग मुलं मोठी होतात. पंख फुटलेल्या पाखरासारखी उडून जातात. त्यांना त्यांच्या आयुष्याच्या नव्या वाटा शोधायच्या असतात. आपण दु:खी कष्टी होतो. ते आपलं घर सोडून जातात आणि आपल्या हे लक्षात येते की पुन्हा हे सारे तसेच घडत राहणार आहे. आपणास नवीन काहीं अनुभव येणार नाही. आणि आपण भौतिक सुखाचा मार्ग सोडून अध्यात्माचा मार्ग शोधू लागतो.

आपण वर्तमान काळात नं जगतां भूतकाळात काय केलं ह्याचाच विचार करीत बसतो. आपण अधिक चांगलं कसं केलं असतं ह्याचाच विचार करू लागतो. आपल्या केलेल्या चुकांचा आणि कृतींचा काय परिणाम झाला ह्याचाच विचार आपल्या डोक्यात घोळत असतो. आपण "आज" विसरून जगत असतो. तेच एक दु:खाचे मूळ कारण असते. आपण जसजसे वयाने मोठे होत जातो म्हणजे वृद्ध होऊ लागतो तसतसे आपण भूतकाळातील आठवणी जगत जीवन जगतो. आपण आपल्या लहानपणीच्या आठवणी जागवत राहतो. ह्या भूतकाळातील जागविलेल्या आठवणी आपल्या दु:खाचे कारण असतात हेच आपल्याला कळत नाही.

आपण जीवनपूर्तता कशी प्राप्त होईल ह्याचाच विचार करीत जगत असतो. मग मन कसे समाधानी असेल? ज्यांच्याजवळ खूप काहीं आहे त्यांच्याकडे न बघता आपल्यापेक्षा ज्यांच्याकडे खूप काहीं नाही व आपल्याकडे त्यांच्यापेक्षा खूप जास्त आहे असा विचार केला तरच आपण समाधानी होऊ शकू. एका ख्रिस्त धर्मगुरूने म्हंटले आहे की “मी पायातल्या बुटासाठी रडत असे पण जेंव्हा एका जवळून जाणाऱ्या व्यक्तीला पायच नाहीत हे दिसले तेंव्हा मी बुटासाठी रडणे सोडून दिले". त्यानंतर मी आनंदी झालो.
मोर हे आनंदाचे रूप. तो जेंव्हा नाचतो तेंव्हा बघणारयाला आनंद होतो. मोर हवा असेल तर आपणच मोर व्हायला पाहिजे, असे एका मराठी कथाकाराने लिहिले होते, ते आठवले. किती समर्पक. आनंद हा असा शोधायचा  असतो.  आपल्याला अनेक गोष्टी हव्याहव्याशा वाटतात व त्या मिळवण्यासाठी आपण जीवापाड कष्ट करून त्या मिळवितो. पण त्या मिळवलेल्या गोष्टीच अनेक दु:खे निर्माण करतात हेच आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे आनंदाच्या ऐवजी दु:खच निर्माण होते . जगण्याला आनंदाचा स्पर्श न झालेली माणसे मोर होऊ शकत नाहीत. कुणाला असा मोर दिसला तर तो दुसर्याला दाखवावा म्हणजे तो आनंदून जातो. म्हणजे आनंद वाटायचा असतो. ही वृत्ती अंगी बाळगली पाहिजे. 

कित्येक लोकांना जगण्यासाठी आवश्यक असलेल्या किमान गरजाच उपलब्ध नसतात. तरीही ही मंडळी सुखी-समाधानी कशी? ह्याचा अर्थ आनंद ही एक मनाची अवस्था आहे. ही अवस्था आपण कशी प्राप्त करून घ्यावयाची हे आपणच ठरविले पाहिजे. आपण आत्मकेंद्रित असतो. त्यामुळे आपल्यात आत्मप्रौढी असते . ती दूर करतां आली पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीमुळे आपले मन दुभंगणे थांबले पाहिजे. तरच आपण बौद्धिक व आत्मिक आनंद मिळवू शकू. भौतिक सुखे व पारमार्थिक सुखे जशी महत्वाची आहेत तसेच आत्मिक सुखही महत्वाचे आहे. नुसती भौतिक सुखे मिळाली तरी मन पूर्णपणे समाधानी होईलच ह्याची शक्यता नाही.

आपण फार छोट्या छोट्या कारणामुळे आनंद गमावून बसतो. एखाद्या नातेवाईकाने आपणास जेवणाचे आमंत्रण दिले नाही म्हणून किंवा एखाद्या सहकार्याला जास्त पगाराची बढती मिळाली म्हणून किंवा आपला सहकारी परदेश प्रवासाला गेला म्हणून . आपल्या मनात नकळत असूया निर्माण होते व आपण दुसर्याच्या आनंदात सहभागी होऊ शकत नाही.

एक लक्षात ठेवणे आवश्यक आहे की जगातील सगळीच माणसे खूप छान किंवा खूप वाईट असू शकत नाहीत. माणसे सारखी नसतात. काहीं जण एका टोकांची असतात.आपण अनेक वेळा दुसर्याची इतकी काळजी करतो की त्यामुळेच आपल्याला त्रास व्हायला लागतो. आपण सर्वांच्या आनंदात सहभागी झालो तरच आनंदी होऊ शकू. आपला जवळचा मित्र किंवा सहकारी किंवा नातलग ह्यांना एखाद्या मिळालेल्या यशामुळे आनंद झाला असेल तर आपणही त्यात सहभागी व्हावयास हवे. हे जमले पाहिजे.

आपण आपल्यातील तणाव कमी केला पाहिजे. त्यासाठी संगीत हे प्रभावी साधन आहे. संगीताप्रमाणेच नृत्य हा प्रकार तणाव कमी करण्यासाठी फार उपयुक्त आहे. आपण जेंव्हा तालावर किंवा ठेक्यावर नाचायला लागतो तेंव्हा आपण फार खुशीत असतो. मजेत असतो. ताणविरहीत असतो. जेंव्हा संगीताच्या तालावर आपण थोडावेळ वेडे वाकडे पाय हलविले तरीही आपले शरीर आणि मान ताणविरहीत होते. मनाला आनंद देणारे नृत्य आपल्या जीवनातील ताणतणाव हलके करतात. किंवा काहीं क्षणाकरता तरी तणाव नाहीसे करतात. लहान मुले त्यामुळेच संगीतावर ताल धरून नाचत असतात.असा आनंद मिळवायचा असतो. एखादे निखळ विनोदी नाटक किंवा सिनेमा पाहिल्यास आपला तणाव कमी होतो. लहान मुलांच्या बरोबर थोडा वेळ घालविला तर आपण आनंदी होतो. निसर्गामध्ये भटकंती केली म्हणजे आपण ताजेतवाने होतो. पक्षी निरीक्षण करतानाही वेगळा आनंद मिळतो. हे आनंदाचे क्षण फार महत्वाचे असतात.

आपण आपल्या माणसात गुंतणे स्वाभाविक आहे. परंतू आपण नं गुंततां अलिप्त रहायला शिकले पाहिजे. (Detached Attachment) आपण एकरूप असूनही वेगळे असायला हवं. कोणत्याही सुखदु:खाच्या वेळी आपण हे लक्षात ठेवायला हवं की “हे ही दिवस जातील". नेहमीच सुखाचे किंवा दु:खाचे दिवस नसतात. ते येतात आणि जातात. रात्र आणि दिवस ह्यांचा फेरा चालू असतो तसाच सुखदु:खाचा फेरा चालू असतो. "रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उष:काल", हे जसे खरे तसेच "उष:काल होता होता काळ रात्र झाली", हे ही तितकेच खरे.
आपला आत्मानंद हेच खरे आनंदाचे स्वरूप आहे. मन:शांती (Inward peace) फार महत्वाची गोष्ट असते. आपण आनंदयात्री असावयास हवे. समाधानी व्यक्तीच आनंदयात्री होऊ शकतात. समाधान शोधणे आपल्याच हातात असते. त्यासाठी आपण समरसून जगलं पाहिजे. संगीतामध्ये सूर आणि ताल असतात हे खरं आहे पण संगीत म्हणजे ध्वनी आणि शांतता ह्यांच्यामध्ये सुरांची होणारी हालचाल आहे. तसंच आनंद  आणि दु;ख ह्यांचे जगण्याशी नातं आहे. हे लक्षात ठेवावयास हवं की जेंव्हा आपण दूरवरचा प्रवास केल्यानंतरच जवळ काय आहे हे आपल्या लक्षात येते तसेच आपल्याजवळ असलेला आनंद शोधण्यासाठी दूरवर जाण्याचे कारण नाही. ते आनंदाचे झाड आपल्याजवळच असतं. दु:खाच्या अस्ताव्यस्त वाढलेल्या गवतामध्येच एक आनंदाचे झाड असतं.

प्रतिक्रिया
 माझ्या मते % आनंद म्हणजे " अपेक्षांच्या आपूर्तीची ताकद भागिले अपेक्षा गुणिले १००.. आपला आनंद हा, एकीकडे आपूर्तीची ताकद[क्षमता] वाढवणे व दुसरीकडे अपेक्षा कमी करण्याचा प्रयत्न करणे यावर अवलंबून असावा. हे कौशल्य ज्याला जमते तोच आनंदी राहू शकतो.म्हणूनच गरीब माणसेहि आनंदी राहतात. त्यांनी अपेक्षांचे ओझे थोडे सैल केलेले असते व जिद्दीने क्षमता वाढवीत अपेक्षा फलद्रूप
व्हाव्यात म्हणून प्रयत्नवादहि सोडलेला नसतो.क्षमता वाढवून अपेक्षांना मूर्त रूप देत ते आनंद टिकवत असतात.
शरद मान्नीकर    

No comments:

Post a Comment