Tuesday, October 15, 2013

उद्योजक व्हायचे असेल तर .....

एका महाविद्यालयात व्यावसायिक मार्गदर्शनाच्या चर्चासत्रात भाग घेण्यासाठी गेलो असतां मुलांनी काही प्रश्न विचारले. उद्याची स्वप्ने पाहणारी ही तरुण पिढी. "उद्योजक कसा होता येईल"? असा एक प्रश्न होता. त्यावेळी त्यांच्याशी झालेल्या संवादाचे हे संकलन.
Steve Jobs

आपण जेंव्हा एखादे काम स्विकारतो किंवा एखादी नोकरी स्विकारतो तेंव्हा आपणास त्या कामाचे जे पैसे मिळतात ते हवे असतात म्हणून आपण ते काम किंवा नोकरी स्विकारतो. पण त्यामुळे आनंदी होतोच असे नाही. केवळ जगण्यासाठी आवश्यक असणारया पैशासाठी आपण ती नोकरी स्विकारतो. आणि आपले त्या कामात लक्ष लागत नसल्यामुळे दु:खी कष्टी होतो. तसेच एखादा व्यवसाय किंवा उद्योग  करावयाचा असेल तर आपल्याला तो व्यवसाय/उद्योग  आवडतो का? ह्या प्रश्नाचा विचार सुरुवातीला करणे आवश्यक आहे. " I am the Boss of Myself " असे ज्याला वाटते तोच उद्योजक होऊ शकतो. ९ ते ५ काम करणारी मंडळी , त्यांची मानसिकता अगदी वेगळी असते. ते धाडसी निर्णय घेऊ शकत नाहीत. ते उद्योगात यशस्वी होऊ शकत नाहीत.

व्यवसाय करण्यासाठी सिद्ध असलेल्या व्यावसायिकाने  हे लक्षात घ्यावयास हवे की त्याला मार्केटिंग येणे आवश्यक आहे. मार्केटिंग हे शास्त्र नव्हे. त्यासाठी उपजत शहाणपण आणि अनुभव गाठीशी असावा लागतो. आपल्या सबंधी लोकांना माहिती हवी.आपण विकणाऱ्या वस्तूची चांगली माहिती हवी. तुम्ही स्वतःचे व्यक्तिमत्व विकले पाहिजे .तुम्हाला लोकांनी सहज ओळखले पाहिजे . इतरांच्या तुलनेत तुम्ही तुमची चमक दाखविली पाहिजे .तुम्हाला एस्कीमोलाही फ्रीज विकता आले पाहिजे . आपण जी वस्तू विकणार आहोत त्यांत नाविन्य हवे.त्यासारखी दुसरी वस्तू बाजारात नसावी. नाविन्य आणि वेगळेपणा फार महत्वाचा आहे. तोच खरा व्यावसायिक/ उद्योजक  जो नाविन्यपूर्ण वस्तूंची निर्मिती करून त्या साठी बाजार निर्माण करतो. उदाहरणार्थ स्टीव्ह जॉब्स. I-POD बाजारात आणला . लोकांना त्याची आवश्यकता होती का ? मुळीच नव्हती. तरीही लोकांना ती वस्तू हवी हवीशी वाटते . आणि त्यातून पैसा कमविता येतो . नवीन ग्राहक निर्माण करणे व त्यासाठी बाजारपेठ निर्माण करणे  हे फार महत्वाचे असते. स्टीव्ह जॉब्स यशस्वी झाले त्याचे कारण त्यांनी नव्या वस्तू बाजारात आणल्या. लोकांना त्या हव्या हव्याशा वाटल्या . तुमची सेवा, ह्याबद्दल लोकांना विश्वास वाटायला हवा .जो हे करतो तो खरा व्यावसायिक/ निर्माता. त्या वस्तूची नुसती विक्रीच झाली पाहिजे असे नाही तर त्यामुळे समाज जीवनावर त्याचा प्रभाव पडला पाहिजे. त्यामुळे सामान्य माणसाचे आयुष्य बदलले पाहिजे.
Bill Gates

तुम्ही तुमची बाजारपेठ तयार केली पाहिजे . टिकवून ठेवली पाहिजे .तुमच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा तुम्ही उठून दिसणे आवश्यक आहे  बिल गेट हे उत्तम विक्रेते आहेत. .स्पर्धा ही महत्वाची असतेच. पण स्पर्धेत तुमचे लक्षणीय असणे महत्वाचे असते. स्पर्धा ही असणारच. स्पर्धेला टक्कर देत पुढे गेले पाहिजे. जे खूप लढाऊ असतात त्यांच्या मागेच यश धावत येते.  

कोणतीही पार्श्वभूमी नसणाऱ्या नव्या पिढीच्या व्यावसायिकाकडे पाहिले असता हे सहज लक्षात येते की त्यांच्याकडे योग्य ते भांडवल नसते. त्यांच्याकडे नव्या नव्या कल्पना असतात , इच्छाशक्ती असते ,उत्साह असतो. ह्या नव्या कल्पनाश्क्तीमुळेच ते वेगळे दिसून येतात. आपल्या डोक्यात एकाच वेळी अनेक कल्पना असतात. अनेक कल्पनांची गिरणी चालू असते. जेंव्हा वेळ योग्य असते ,जमीन सुपीक असते तेंव्हा कल्पनेला उगवण्याची म्हणजे फुलण्याची संधी मिळते. आपले मन स्वप्नाळू हवे. विचारक्षमता तीव्र हवी.आणि कामाचे योग्य नियोजन हवे. तरच  कल्पना प्रत्यक्षात उतरू शकते .आर गोपीनाथ ह्यांनी सर्वात स्वस्त हवाई प्रवास ही कल्पना पुढे आणली व एक नवा प्रयोग यशस्वी करून दाखविला . आज सामान्य माणसाना हवाई प्रवास शक्य झाला आहे .
R Gopinath - Simply Fly 


बहुतेक व्यवसाय अयशस्वी होतात त्याचे प्रमुख कारण म्हणजे व्यावसायिकांचा अहंगंड. दोन सहकारी व्यावसायिकांचा अहंगंड त्यांना अयशस्वी करतो. आयुष्यातील जगण्याचा अनुभव महत्वाचा असतो. 
सर्वच माणसे स्वप्ने बघतात. सगळ्यांची स्वप्ने सारखी नसतात. काहीं व्यक्ती फक्त रात्री झोपेत असतानाच स्वप्ने बघतात व सकाळी त्या स्वप्नाना  आठवून त्यांचा विचार करतात किंवा विसरून जातात. पण ज्या व्यकी फक्त दिवसाच  स्वप्ने बघतात त्या खूप वेगळ्या असतात. त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीचा पाठलाग करावयाचा असतो. ते त्यासाठी दिवस- रात्र प्रयत्न करतात. मेहनत घेतात . ही ध्यास असलेली माणसेच  खरया अर्थाने यशस्वी होताना दिसतात. अशी स्वप्ने बघणे आणि प्रयत्नशील राहणे हे खऱ्या व्यावसायिकालच जमते.पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणाऱ्या माणसाचे काम करणारा  धिरुभाई अम्बानीसारखा साधा माणूस पुढे जगातील मोठ्या पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीचा मालक कसा झाला हे समजून घेतले  पाहिजे . महाविद्यालयीन शिक्षण  सोडून स्वतःचे  छोटे  उद्योग उभे  करणारे  बिल गेट्स किंवा स्टीव्ह जॉब्स स्वतःचे औद्योगिक साम्राज्य कसे उभे करू शकले हे शिकले पाहिजे ,समजून घेतले पाहिजे. THINK BIG AND START SMALL , हे सूत्र महत्वाचे.
Narayn Murthy

तुम्ही तुमच्यापेक्षा हुशार व्यक्तींना तुमच्या व्यवसायात सहकारी म्हणून घेतले पाहिजे. तुमच्यापेक्षा कमी हुशार व्यक्तींना घ्याल तर तुम्ही ज्यांचे नेतृत्व करणार आहात ते खुजे असल्यामुळे तुमचे नेतृत्व खुजेच असेल. तुमच्या कंपनीत जर जास्त कर्तृत्ववन माणसे असतील तर तुमची कंपनी उंचावर जाईल. नारायण मूर्तींना हे सहज जमले म्हणून त्यांचे नेतृत्व वादातीत आहे . तुमचे नेतृत्व निगर्वी हवे. त्यामुळेच  रतन टाटा यशस्वी झाले. त्यांनी Nano कारचे स्वप्न पाहिले. ते प्रत्यक्षात उतरवून दाखविले. त्यामुळे सगळ्या कंपन्यांनी छोट्या कार बाजारात आणल्या. हा बदल घडून आणला तो Nano कारने. वेगळी अशी नवी वस्तू बाजारात आणणे हे महत्वाचे असते. नवी वस्तू पण सर्वात स्वस्त असा विचार त्यांनी दिला आणि सारे कार उद्योजक त्याच्या मागे धावत गेले कारण त्यांना नव्या बाजाराची जाणीव झाली.
Ratan Tata - NANO 


तुमची इच्छाशक्ती ,तुमची आत्यंतिक आवड ,तुमची निर्मिती क्षमता ,तुमची ध्येयपूर्ती किंवा स्वप्नपूर्ती यासाठी चाललेली धडपड , त्यासाठी तुमचे झोकून देणे ,हेच तुमच्या यशस्वी होण्याचे खरे भांडवल आहे. तुमची विचार क्षमता व कल्पनाशक्ती हे महत्वाचे भांडवल आहे. निवडलेला व्यवसाय हे माध्यम आणि तुमचे कर्म हाच खरा मार्ग आहे . ज्या व्यक्ती ह्याचा सतत पाठलाग करतात त्यांच्यासाठी परमेश्वरही त्यांच्या पाठीशी उभा राहतो. जे नैसर्गिक दृष्ट्या अनुचित व  पर्यावरणाच्या दृष्टीने घातक आहे ते आर्थिक दृष्ट्या फार नुकसानीचे असते हे ही त्यांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे .

तुम्ही उडप्याचे हॉटेल पाहिले आहे काय ? ते चालविणे महाकठीण काम  आहे,  हे माहित आहे का ? ते हॉटेल चालविणे म्हणजे रोज तुमच्या मुलीचा लग्न समारंभ घडवून आणण्याइतके  कठीण आहे. उद्योजक होणे असेच कठीण आहे असे गोपीनाथ ह्यांचे मत पटण्यासारखे आहे.  
Henry Ford

नुसते ध्येय समोर ठेऊन जगणे किंवा मार्ग क्रमणे महत्वाचे नाही. त्यासाठी आपणास दूरदृष्टी असावयास हवी. खरी दूरदृष्टी असते तीच माणसे व्यवसायात यशस्वी होतात . हेन्री फोर्ड , वॉलट डिस्ने, स्टीव्ह जॉब्स, बिल गेट्स ह्यानी उद्योगाला सुरुवात केली पण अनेकदा ते अयशस्वी झाले . पण त्यांना दूरदृष्टी होती. काय करावयचे की ज्यामुळे क्रांतीकारक बदल घडून येतील ह्याची त्यांना स्पष्ट जाणीव होती. अशीच मंडळी  काहीतरी भव्य दिव्य करून दाखवितात . उद्योजकाला उद्योग उभारण्यासाठी दूरदृष्टी असावी लागते, नजीकच्या काळापेक्षा भावी काळात उद्योग कसा वाढेल ह्याचा विचार महत्वाचा असतो  . नजीकच्या काळातील समस्या सोडवताना दूरच्या काळातील विचार तेवढाच महत्वाचा असतो.हे ज्यांना जमते तेच यशस्वी होतात .

व्यावसायिक म्हणजे तो माणूस ,जो संपत्तीची निर्मिती करतो . नवी वस्तू , नवा गिर्हाईक ,नवी सेवा ,नवा ग्राहक. नवे असणे ,उपयुक्त असणे व ग्राहकाला हवेहवेसे वाटणे , हे ज्याला सहज जमते तो खरा व्यावसायिक.  नवी कल्पना , नवी वस्तू पण  कमी पैशात निर्मिती ,नवी सहज उपलब्ध होणारी सेवा ह्या त्रि- सूत्रीवर व्यवसाय अवलंबून असतो. स्टीव्ह जॉब्सने I-POD ची निर्मिती करून क्रांतीकारक बदल घडवून आणला. बिल गेटस्ने नवी क्रांती घडवून आणली .अर्थात त्यासाठीचे आवश्यक असलेले मनुष्यबळ त्यांनी उभे केले .
 THOMAS Edison ने विद्युत दिव्याचा नुसता शोधच लावला नाही तर निर्मिती करून जगाला विद्युत्मय केले . Sam Walton चे उदाहरण घ्या . " प्रत्येक दिवशी कमी किमतीत " ह्या संकल्पनेवर त्यांनी नवी बाजारपेठ उभी केली आणि खूप संपत्ती उभी केली. आपल्या अंबानींनी " सारी दुनिया मुठ्ठीमे" अशी घोषणा देऊन सामान्य माणसाना मोबाईल विकला.ही सर्व  उदाहरणे हे दर्शवितात की उद्योजक हा महाविद्यालयात व्यवस्थापकीय शिक्षण घेऊन तयार होत नाही. त्यासाठी त्याला तशी आतून उर्मी असावी लागते . त्यासाठी आपण खूप बुद्धिमान असले पाहिजे असे नाही. परंतु आजूबाजूचे सर्व जाणून घेण्यासाठी उत्सुक असले पाहिजे . तेच महत्वाचे ज्ञान आत्मसात करता आले पाहिजे .

बहुतेक धंदे किंवा व्यवसाय अगदी सुरुवातीच्या काळातच बंद पडतात . जेंव्हा सहकारी एकमेकाला पूरक नसतात किंवा त्यांची विचार करण्याची पद्धती सारखी नसते व काम करण्याचे  मार्ग भिन्न असतात तेंव्हा व्यवसाय बंद पडतात. पूरक सहकारी  निवडणे  फार महत्वाचे असते . तरच तणाव मुक्त व्यवसाय करता येतो. दोन किंवा दोन पेक्षा अधिक पार्टनर असतील तर कोणातरी एकाचे नेतृत्व मान्य करून व्यवसाय करता आला पाहिजे. दोन दोन नेतृत्व असतील तर व्यवसाय चालू शकत नाही.एका जहाजाला दोन कप्तान असू शकत नाहीत. 
बरेच  जण व्यवसाय / उद्योग सुरु करतांना म्हण्तात , " मला नवा व्यवसाय सुरु करावयाचा आहे . माझ्या वरिष्ठांना त्याची काहींच कल्पना नाही . जर व्यवसाय यशस्वी होण्याची चिन्हे दिसली तरच  मी नोकरीचा राजीनामा देईल ." असा विचार करणारे लोक उद्योजक होऊ शकत नाहीत .तुम्हाला जर खरे उद्योजक व्हायचे असेल तर हे लक्षात ठेवा की तुम्हाला स्वतःला झोकून देता आले पाहिजे . अर्थात त्यासाठी हालअपेष्टा सहन करण्याची तयारी हवी. तुम्ही तुमच्या जागेचे भाडे वेळेवर देऊ शकणार नाहीत . कर्मचार्यांना पगार देताना तुमची तारांबळ होईल. बायकोला साडी घेण्यासाठी तुमच्याजवळ पैसे नसतील. मुलांची महागडी शिक्षण फी भरण्यासाठी त्रास होईल. अशा असंख्य अडचणीना तोंड द्यावे लागेल. ह्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी नवे मार्ग शोधावे लागतील. ते सहज जमते . प्रयत्न करावे लागतात . पण त्यासाठी तुमची झोप उडालेली असेल , असे जेंव्हा घडेल तेंव्हाच तुम्ही तावूनसुलाखून निघाल. निसर्ग जसा अडचणी निर्माण करतो तसाच अडचणीवर मात करण्यासाठी मेंदूला चालनाशक्ती देतो. त्या शक्तीचा उपयोग करता आला पाहिजे. 

नवा उद्योग किंवा व्यवसाय उभा करतांना अडचणीचा डोंगर उभा राहणारच. त्या अडचणीवर मात करतानाच तुम्ही घडत जाल. नदीचा गुणधर्म वाहणे आणि समुद्राकडे धावणे . तुम्ही नदीसारखे असाल तर दगड धोंड्यावर मात करून वाहत राहणार व शेवटी समुद्राला मिळणार म्हणजेच यशस्वी होणार. यशाचा समुद्र तुमची वाट पाहत असेल हे लक्षात ठेवा. तुमच्यामध्ये दुर्दम्य इच्छाशक्ती हवी . प्रचंड उत्साह हवा. मग यशाची शिखरे तुमचीच. 

सगळ्या लढाया ह्या प्रथम मनाच्या अवकाशात लढल्या जातात. हे लक्षात असू देणे महत्वाचे आहे. आपल्याला आजूबाजूच्या सिमीत अवकाशाची कल्पना असलेली बरी.  जेंव्हा आपण निर्णय घेत नाही तेंव्हाच आपण अपयशाच्या दिशेने वाटचाल करतो.हे ही लक्षात असू द्यावे. 

धंदा करावयाचा असतो तो " नफा " मिळवण्यासाठी. "नफा" हा धंदा करणार्यासाठी पवित्र मंत्र आहे . ते मान्य नसेल तर ह्यात पडू नका. नफा असेल तरच धंदा जगेल. तोटा कमी करणे ही धंद्याची पहिली पायरी. सतत तोटाच होत असेल तर धंदा बंद करणे ही महत्वाची दुसरी पायरी.
आपल्याला यश मिळू लागले की लोक आपल्याला जेवायला या असे आमंत्रण देतात. तेंव्हा हे लक्षात असू द्यावे की कोणीही ,कधीही फुकट जेवायला बोलवित नसते.लोकांना ओळखता आले पाहिजे. 

कोणतीही गोष्ट पूर्ण करावयाची  असेल तर सर्वात प्रथम त्यासाठी कोणत्या दिवसापर्यंत पूर्ण करावयाची हेच प्रथम निश्चित करा. मनामध्ये तो दिवस पक्का करा. हा निर्णय अतिशय महत्वाचा आहे. Dead Line महत्वाची असते . तरच गोष्टी साध्य होतील.  
व्यवस्थापकीय शिक्षण ठीक. पण जे शिकवले जाते ते सारेच उपयोगी पडते असे  नाही. प्रत्यक्ष व्यावसायिक जीवनात वेगळेच  मार्ग निवडावे लागतो. नुसत्या पुस्तकी शिक्षणाचा फारसा उपयोग होत नाही.
अंटारटीका मोहिमेसाठी एक जाहिरात देण्यात आली होती . ती अशी ....
" अतिशय धोकादायक मोहिमेसाठी माणसे हवीत . अर्ज करा . खूप कमी पगार , मरणाची थंडी असलेला प्रदेश ,सहा सहा महिने रात्रीचे काम , सतत अडचणीशी सामना ,निसर्गाशी युद्ध , जिवंत परत येण्याची कमी शक्यता परंतु यशस्वी झालात तर जागतिक सन्मान नक्कीच ." 
HAZARDOUS JOURNEY : ANTARCTICA

अशी जोखीम घेणारी माणसे किती असतात ?  उद्योगात किंवा व्यवसायात अशीच जोखीम असते . तशी जोखीम घेणार असाल तरच उद्योजक होता येईल. बघा जमते का ?  

( Based on Life and Works of Steve Jobs, Bill Gates, Sam Walton , Capt. G R Gopinath, Narayan Murti and many more people )
Contact : drnsg@rediffmail.com  

3 comments:

  1. Dear sir,

    Its really good writeup. I like it very much. Shall I also post it on my blog mh-marathi.com? Requesting you to provide me permission for sharing your articles on mh-marathi.com with your name and blog link.

    ReplyDelete
  2. Yes I like 👍 this success full business man 👨 introduction

    ReplyDelete