Monday, November 11, 2013

सरदार पटेल हिंदुत्ववादी होते का?

सरदार पटेल हिंदुत्ववादी होते का?

कॉंग्रेसला हिंदू कॉंग्रेस असेच जीना संबोधित असत. सर्वधर्मसमभावाच्या गोष्टी सांगूनही मुसलमानांनी गांधीजींना खऱ्या अर्थाने निधर्मीवादी ( Secular ) असे मानलेच नाही. मुस्लीम लीगच्या लोकांनी गांधीजींना हिंदूंचेच नेते म्हणूनच मानले. गांधीजींची दैनंदिन जीवनातील आचारसरणी एका हिंदू संताची होती. ह्या उलट सरदार पटेलाना नेहमीच कडवे हिंदुत्ववादी समजले गेले. ते हिंदुत्ववादी होते कां? आजच्या हिंदुत्ववाद्यांना ते एवढे जवळचे कां वाटतात ?ह्या प्रश्नाचे उत्तर शोधणे आवश्यक आहे.
सरदार पटेल 

मीरतच्या कॉंग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते आचार्य कृपलानी. पंडीत नेहरू , सरदार पटेल आणि मौलाना आझाद व्यासपीठावर बसलेले होते. एका समाजवादी महिलेने सरदाराना हिंदुत्ववादी विचारांचा प्रभाव असलेले असल्यामुळे आम्हाला ते नको आहेत असे त्यांना उद्देशून भाषण केले. तेंव्हा प्रत्युत्तर देताना सरदारांनी ठासून सांगितले , “ Yes, sword will be met by the sword if the Muslim League so desires. About Hindu communalist language, I do not think my language was unparliamentary.  But even if it is thought to be so, I will not change it one bit when I have to deal with those rank communalist actions do not seem to bother our young friends even half as much as my language  does …….” जर  मुस्लीम लीगला “ तलवारीला तलवारीची भाषा समजत असेल तर मी त्याचा वापर करीन “ असे सरदारांनी ठणकावून सांगितले तेंव्हा लोकांनी सरदाराना उचलून धरले. नेहरू मात्र अस्वस्थ झाले. गांधीजींना हे जेंव्हा कळले तेंव्हा फारसे आवडले नाही  गांधीजींना मृदुलाबेन ह्यांनी वरील तपशील सांगितला असावा. नेहरू आणि गांधीना वरील विचार हिंदुत्ववादीच वाटत असावा. गांधीजीनी सरदाराना आपली नापसंती दर्शविणारे पत्र लिहिले. सरदारांनी गांधीजींना जे उत्तर दिले होते ते इतके रोखटोक होते की सरदार हिंदुत्ववादी आहेत असा समज व्हावा. सरदार लिहितात ,” मला स्पष्टपणे बोलण्याची  व कटू सत्य सांगण्याची सवय आहे . सगळीच सत्ये सहज पचू शकत नाहीत. माझ्या बोलण्याचा खरा मतितार्थ समजून नं घेता माझ्यावर टीका होत आहे . हे लक्षात असू द्यावे.. बहुधा मृदुलाने तुमच्याकडे माझ्यासंबंधी तक्रार केलेली दिसते.कारण जवाहरच्या विरोधी भूमिका घेतलेली तिला आवडत नसते हे मला माहीत आहे .... “
सरदार व्हाईसराय वेव्हेल ह्याच्याबरोबर जेवणाच्यावेळी बातचीत करताना वेव्हेल ह्यांनी सरदारांच्या पुढे अल्पसंख्य मुसलमानांना वाटणारी भीती व्यक्त केली. तेंव्हा सरदार स्पष्टपणे सांगतात , “ भारताचा इतिहास बघितला तर अल्पसंख्य असलेल्या मुसलमानांनी हिंदुवरच असंख्य अत्याचार केले आहेत. हिंदुनी ते सहनही केले आहेत. हिंदुनी सहिष्णुता दाखविली आहे. त्यांना आपल्यात सामावून घेतले आहे. त्यांच्या सांस्कृतिक गोष्टीही मान्य केल्या आहेत. तेंव्हा अल्पसंख्य मुसलमानांना बहुसंख्य हिंदूंच्याकडून कोणताही धोका नाही.” सरदारांचा हा दृष्टीकोन वेगळा होता  त्यामुळे ते हिंदुत्ववादी आहेत असा भास निर्माण करतो. परंतु त्यांना हे स्पष्टपणे सांगावयाचे आहे की अल्पसंख्य मुसलमानांना हिंदुपासून कसलाच धोका नाही. तेच त्यांनी वेव्हेल ह्यांना स्पष्ट शब्दात सांगितले होते. मुस्लीम लीग बरोबर सहकार्याची कल्पना सरदाराना पसंत पडणे कधीच शक्य नव्हते. क्याबिनेट मिशनला स्पष्टपणे सांगण्याची हिम्मत फक्त सरदारानीच दाखविली, हे वेव्हेल ह्यांच्या बरोबर झालेल्या संवादावरून सहज दिसून येते. जीना आणि वेव्हेल ह्यांच्या कटकारस्थानाला शह दिला तो सरदारानीच..  .
पंडित नेहरू आणि  मौलाना आझाद ह्यांचे काही पाठीराखे सरदाराना मुस्लीम विरोधी  व हिंदुत्ववादी समजत असत.ते सर्वस्वी चुकीचे होते. ५ जून १९४७ रोजी बी एम बिर्ला ह्यांनी सरदाराना असे सुचविले की त्यांनी भारताला हिंदुराष्ट्र म्हणून जाहीर करावे आणि हिंदू धर्म राष्ट्रधर्म म्हणून जाहीर करावा. सरदारांनी ह्या सूचनेला तीव्र विरोध केला. भारत हे निधर्मी राज्य असेल आणि अल्पसंख्य मुसलमानांना त्यांत दुय्यम स्थान नसेल . ते त्यांचेही तितकेच राष्ट्र असेल. त्यांचा मुस्लीम लीगच्या कारवायांना विरोध होता. परंतु भारतीय मुसलमानांना त्यांनी आपलेच मानले.

सरदार पटेल पंतप्रधान झाले असते कां ?.

स्वातंत्र्य दृष्टीपथात होते .कॉंग्रेसचा जो अध्यक्ष असेल तोच  भारताचा पंतप्रधान असावा असे गांधीजींना वाटत होते. गांधीजीनी नेहृरुना कॉंग्रेसचा अध्यक्ष होण्याचे सुचविले. प्रांतिक कॉंग्रेस समित्यांचा सरदार पटेलांच्या नावाला पाठिंबा होता. एक नव्हे तेरा प्रांतिक समित्यांनी सरदारांचे नांव सुचविले होते. नेहरूंचे नांव एकाही प्रांतिक समितीकडून सुचविले गेले नव्हते. गांधीजींना ह्याची पूर्ण कल्पना होती. त्यांना नेहरुच हवे होते. सरदार नको होते. गांधीजीनी स्पष्ट शब्दात नेहरुना आपले वारस म्हणून जाहीर केले. हा गांधीजीनी सरदारांच्यावर केलेला सगळ्यात मोठा अन्याय होता. त्यांनी ज्या पद्धतीने सरदाराना डावलले ते निश्चितच योग्य नव्हते.
नेहरू गांधीना म्हणाले , “ तुम्ही माझे नांव सुचविता , परंतु सरदारांना काय वाटेल ? “
गांधी म्हणाले , “ त्यांना वाईट वाटू दे. माझी इच्छा म्हणून तो मान्यता देईल . तू काळजी करू नकोस. “
सरदार आपले ऐकतील ह्यावर त्यांचा विश्वास होता. सरदारही पंतप्रधानपदासाठी हपापलेले नव्हते.
नंतर काहीं वर्षांनी ले. ज. थोरांताच्याबरोबर गप्पा मारीत असताना सरदारांनी आपले मन उघडे करून दाखविले.
थोरांतानी त्यांना प्रश्न केला . “ पंतप्रधान होण्याची संधी मिळत असताना तुम्ही ती संधी कां घालविली ? “
सरदार म्हणाले , “ मी पंतप्रधान झालो असतो तर नेहरूंना मरण आले असते. ( He would have died ) .
थोरात म्हणाले , “ त्यांत काय ? तुम्ही पंतप्रधान झाला असता ?”
सरदार म्हणाले, “ नेहरू गेले असते तर पंतप्रधानपद मिळवून मी काय केले असते. ?
सरदाराना नेहृरुबद्द्ल  काय वाटत होते हे सांगणारा हा संवाद खूप बोलका आहे आणि सरदारांच्या व्यक्तिमत्वाची उंचीच सांगतो.

 “पंतप्रधान कोण होणार हे भारतामध्ये अल्पसंख्यांक मतदार ठरवतात.

अलिकडेच “महाराष्ट्र टाईम्स” मध्ये खालील बातमी वाचली .
. “पंतप्रधान कोण होणार हे भारतामध्ये अल्पसंख्यांक मतदार ठरवतात.” भारतात अल्पसंख्यांक असलेल्या मुस्लिमांना खूष करणारे वक्तव्य काँग्रेस नेते मणीशंकर अय्यर यांनी दुबईमध्ये केले.
हे वक्तव्य काहीसे खरे आहे. त्यांत आश्च्यर्य वाटण्यासारखे काहींच  नाही.कॉंग्रसचे नेतेच अशी वक्तव्ये करू शकतात.
कॉंग्रसच्या लोकांना सरदार पटेल हिंदुत्वादी कां वाटतात,  हे खालील गोष्टीवरून सहज कळेल.
जेंव्हा गांधीजीनी माउंटब्याटनकडे जीनांनाच पंतप्रधान करा पण देशाची फाळणी करु  नका असा प्रस्ताव मांडला तेंव्हा सरदार पटेल गांधीजींना भेटण्यासाठी गेले आणि त्यांनी गांधीजींचा हा सल्ला कॉंग्रस कार्यकारिणीस मान्य नाही हे स्पष्ट शब्दात सांगितले. तेंव्हा सरदार गांधीजींना जे बोलले ते लक्षात घेणे फार म्हत्वाचे आहे .
सरदार म्हणतात , “ बापू , तुम्ही तुम्हीच आहात आणि तुम्हीच ह्या प्रश्नाला अशी उत्तरे शोधून काढू शकतात. जीनांना प्रधानमंत्रीपद द्यावे हे कार्यकारिणीला मान्य नाही. आम्ही सामान्य व साध्या व्यक्ती आहोत. आम्ही आमच्या देशाचे प्रधानमंत्रीपद मुस्लीम लीगला किंवा जीनांना देण्याचा विचारही करू शकत नाही. आम्हाला त्यांचा खूप अनुभव आहे. आम्ही त्यांना पुरते ओळखतो. आम्ही असे होऊ देणार नाही. “
एवढ्या स्पष्ट शब्दात गांधीजींना सांगणारे सरदार हे विलक्षण व्यक्तिमत्व आहे. त्यावर गांधीजी जे बोलले ते महत्वाचे आहे. “ तुम्ही देशाचा कारभार हाकित असतां त्यामुळे तुम्हाला जे दिसते ते मला दिसत नाही. कदाचित मी जर तुमच्या जागी असतो तर असाच विचार केला असतां . आपले मतभेद आहेत . तुम्हीच काय ते ठरवा. मी पाटण्याला निघालो आहे .”
गांधीजींची त्यावेळची भारताची फाळणी होऊ नं देण्याची भूमिका समजण्यासारखी आहे. पण कॉंग्रेस नेत्यांची आजची भूमिका ही समजण्याच्या पलिकडील आहे. कारण त्यांना अल्पसंख्याकाच्या मतावर लोकसभेत बहुमत मिळवायचे आहे आणि त्यानां हाच एक सोपा मार्ग दिसतो आहे. 

( संदर्भ :१. “ सरदार “ – विजय तेंडूलकर / प्रस्तावना : मधु लिमये - २.  " सरदार " हा चित्रपट  )




No comments:

Post a Comment