Friday, March 27, 2015

“What Should I Do With My Life?


माणसाला दोन गोष्टी हुशार बनवतात. एक : वाचलेली पुस्तके . दोन: भेटलेली माणसे. अशाच काही वाचलेल्या पुस्तकाबद्दल. एक पत्रकार लेखक ९०० च्यावर लोकांना भेटतो. त्यांचे जीवन समजून घेतो. त्याला सामान्य माणसातील असामान्यत्व दिसून येते. त्यांची विलक्षण जिद्द दिसून येते. तो ही माणसे पुस्तकासारखी वाचतो. आणि त्यांच्यावर लिहितो. आपल्यालाही अशी माणसे रोजच्या जीवनात भेटत असतात.ती आपल्याच आजूबाजूला असतात. आपल्यासारखीच. आणि मग लक्षात येते की आपण माणसे पुस्तकासारखी वाचली पाहिजेत. त्यांना समजून घेतलं पाहिजे. 
“What Should I Do With My Life?” हे P O Bronson  ह्या लेखकाचे पुस्तक सहज हातात आले. थोडेसे चाळले. आणि वाचण्यात मन रमून गेले. मग पुस्तक खाली ठेवावे असे वाटलेच नाही. “ आयुष्यावर बोलू काही “ हा संदीप खरे आणि सलील कुलकर्णी ह्यांचा काव्यगायनाचा सुंदर कार्यक्रम काही वर्षापूर्वी पाहिला होता.तसाच विषय. आपण आपल्या आयुष्याच्या यशापयशावर बोलत असतो. कधीकधी स्वतःशीच. आपल्याला काय मिळाले किंवा काय मिळाले नाही ह्याचा विचार करीत असतो. परंतु नुसता विचार करणे नव्हे तर आपले जगणे किती आनंदी करू शकतो ह्यावर बोलणे आवश्यक आहे. आपल्या आयुष्याला अर्थपूर्ण करण्यासाठी आपण सारेच जण झटत असतो. जगण्याचा अर्थ शोधत असतो. रोजच्या जगण्याला अधिक सुंदर करण्याचा व आपल्या जीवनात अधिक आनंद निर्माण करण्याचा आपला प्रयत्न असतो.
हे पुस्तक म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या सर्व सामान्य माणसाच्या धडपडण्याचा शोध घेणारे सुंदर पुस्तक. आयुष्यात काय हवे? ते कसं मिळवायचे ? कसं आनंदी व्हायचे? त्यासाठी कसा प्रयत्न करायचा. हे सारं ९०० निवडक व्यक्तींच्या जीवनाचा शोध घेणारे पुस्तक. 
ह्या व्यक्तींचे आयुष्य कसं सुंदर होत गेले आणि आयुष्यात आनंद कसा मिळविला. त्यांनी काय मिळविले आणि काय गमावलं?  हे खूप काहीं सांगणारे अप्रतिम पुस्तक. हा लेखक माणूस कसा शोधतो ह्याचा प्रत्यय येतो.तुम्ही-आम्ही अशी माणसे रोजच पहात असतो पण असा शोध घेत नाही. ह्या पुस्तकातून दिसणारी ही इंद्रधनुष्याचे विविध रंग असणारी मानवी आयुष्ये समजून घेतली तर आपण नक्कीच म्हणू .. “ ह्या जन्मावर शतदा प्रेम करावे ...” जगण्याला नवी उभारी देणारे हे पुस्तक.

ह्या पुस्तकात काय आहे? सामान्य माणसातील असामान्य माणसे. नियतीचे भान असलेली माणसे आहेत तसेच जे ठरविले ते दुर्लक्ष करणारी माणसे आहेत. कठीण काळापासून खूप काहीं शिकणारी व धडपडणारी माणसे आहेत. आत्मविश्वासाला अर्थ प्राप्त करून देणारी  माणसे आहे. असलेले जगताना नसलेले शक्य करून दाखविणारी माणसे आहेत.विचारातील पारदर्शिकता असलेली पण त्यासाठी थांबणारी आणि धडपडणारी माणसे आहेत. मी कुणाचा आहे ? असा प्रश्न पडलेली पण मला जे हवय त्या आनंदासाठीच मी जगणार ,धडपडणार असा विचार असलेली माणसे आहेत. मेंदूला उत्तेजित करणारी स्त्री- पुरुष मंडळी आहेत. प्यारासाईट  उद्योगशीलता असलेली माणसे आहेत. 

जगण्यासाठी माणसाजवळ एक off switch असावे असे सांगणारा माणूस आहे. स्वतंत्रतेची छत्री असावी म्हणणारी माणसे आहेत. कर्तव्य विसरणारी माणसे आहेत. कामगार वर्ग विरुद्ध सुशिक्षित मध्यमवर्ग ह्यांच्यात  भांडण पेटवणारी माणसे आहेत. त्यांचे जगणे आहे. शिक्षणाची आंस असलेला सामान्य ड्रायव्हर आहे तर स्वप्न पाहणारा , चर्च बांधणारा आगळा - वेगळा माणूस आहे. क्यासिनोचे अर्थ शास्त्र समजून घेणारा उत्साही माणूस आहे. बातमी देणारी स्त्री बातमीदार आहे. पैसे न स्विकारणारी माणसे आहेत. मानसिक व्यंगावर मात करणारा माणूस आहे. श्रीमंती माणसाला कशी बदलवत असते हे सांगणारा माणूस आहे. 'हे नंतर , ते आधी', असे म्हणून स्वतःवर प्रयोग करणारी माणसे आहेत. आई होणे हे भरवण्यापेक्षा अधिक काही आहे हे समजावून सांगणारी आई आहे.
P O Bronson 

उपदेश , मार्गदर्शन आणि अधिकार ह्याचे महत्त्व सांगणारी माणसे आहेत. बदल हाच आपल्याला जिवंत ठेवतो असे सांगणारी प्रभावी माणसे आहेत. 'स्वतःला ऐकून घेत चला , स्वतःच स्वतःचे श्रोते व्हा. वास्तव समजून घ्या. पूर्वानुभव आड येऊ देऊ नका', असा न कळत सल्ला देणारी माणसे आहेत. 'मी आणि बदलणारा मी ह्याचा शोध घेत चला', असं सांगणारा माणूस आहे. यशाच्या नव्या गाथा आहेत. प्रश्नाचे उत्तर न देता प्रश्नाचे महत्वच कसे कमी  करावे असे सांगणारा वेगळा माणूस आहे. समविचारी लोकांच्या सहवासात आनंद शोधणारी माणसे आहेत. यशाचा पिच्छा न सोडणारा विलक्षण माणूस आहे. परदेशात अनुभवासाठी जाणारी माणसे आहेत. एकाचवेळी अनेक करिअरचा विचार करणारी आणि धडपडणारी विलक्षण माणसे आहेत.  असा हा माणसांचा शोध घेणारे हे पुस्तक.
स्वप्ने, भीती , आत्मविश्वास, अपयश ,अनुभव असणे आणि नसणे , Passion , जगण्याचे प्रयोजन, नोकरी आणि  वळणावरच्या वाटा , पैसा मिळवणे , स्वप्नातील नोकरी , आयुष्याचा हेतू, विवाह ,मुलं आणि आयुष्य , स्वातंत्र्य ,ध्येयपूर्ती, बदल ,जगण्याचे नाट्य,आपला आंतला आवाज ,जिद्द, "स्व"चा शोध, आपल्या गरजांची भूक ,व्यवसाय आणि त्यांत मिळवायचा आनंद, शहरी  जीवनशैली, निसर्ग आणि विज्ञान ,निराशा आणि अलिप्तता, ठेविले अनंते वृत्ती, वेगळेपणाचा ठसा, न्यूनगंड, डोके आणि हृदय,इत्यादी इत्यादी.....ह्या सर्वावर प्रत्येकाचे वेगवेगळे बघणे ...
असा हा माणूस शोध खूप  काही सांगून जातो. ही माणसे मनापासून आवडतात आणि खूप काहीं शिकवून जातात.

 शेक्सपिअरसंबंधी
 ( पाश्चिमात्य तत्वज्ञानाची कहाणी सानेगुरुजी, पृष्ठ १६३ )
“शेक्सपिअरपाशी पांडित्य व तत्वज्ञान नव्हते. शेक्सपिअरजवळ प्रत्येक शास्त्राचे तोकडे व कामचलाऊ ज्ञान होते परंतु तो एकाही शास्त्रात प्रवीण नव्हता.मात्र तो सर्व क्षेत्रात रुबाबदारपणे, वक्तृत्वाने ,एखाद्या नवशिक्याप्रमाणे बोलतो. शेक्सपिअरचा ग्रहज्योतिष्यावर विश्वास आहे. तो म्हणतो , " ज्यावर तारे आपल्या गुप्त सामर्थ्याने अभिप्राय व्यक्त करतात .... ते हे प्रचंड राज्य." 
शेक्सपिअरच्या सदैव अशा या चुका होतात की ज्या पंडित बेकन कधीही करता ना. शेक्सपिअरचा हेक्टर Aristotal चे उतारे बोलतो व कॉरिओलिनस केटोचा उल्लेख करतो. शेक्सपिअर ल्यूपरक्यालिया टेकडी आहे असे मानतो. आणि एच. जी. वेल्सला सीझर जितपत समजतो तितपतच शेक्सपिअर सीझरविषयी जाणतो.
शेक्सपिअर स्वतःच्या आरंभीच्या जीवनासंबंधी अगणित उल्लेख करतो आणि आपल्या वैवाहिक जीवनातील दु:खे सांगतो .
तो बाष्कळपणा अश्लीलपणा शब्दावर कोट्या इतक्या करतो की तो  एखाद्या गंमतबाजी करणार्याला शोभावा. तो बेकनसारखा शांत व धीमा तत्वज्ञानी नाही. कारलाइल म्हणतो की, 'शेक्सपिअर  हा एक अत्यंत थोर बुध्दिमान आहेपरंतु खरे म्हणायचे झाले तर तो प्रतिभावंताचा राजा आहे. त्याची कल्पनाशक्ती निरुपम आहेत्याची दृष्टी सूक्ष्मतम आहे.तो एक महान व अविस्मरणीय मानसशास्त्रज्ञ आहेतुमचे मन तुम्ही त्याच्या पासून लपवू शकणार नाही; परंतू काहीही असले तरी तो तत्वज्ञानी मात्र नाहीएखाद्या हेतुने बांधलेली व सुबुद्ध अशी विचारसरणी त्याच्याजवळ नाहीस्वतःच्या जीवनाच्या किंवा मानवजातीच्या जीवनाच्या अमुक एका निश्र्चित ध्येयासाठी त्याने आपल्या विचारांना एकत्र गुंफले नाही'. शेक्सपिअर प्रेम आणि प्रेमाचे प्रश्न यांत बुडून गेलेला आहे आणि मोन्तेनच्या शब्दात सांगायचे झाल्यास जेव्हा त्याचे हृदय भग्न झालेले असते तेव्हाच त्याला तत्वज्ञान सुचते . परंतु एरव्ही एकंदरीत शेक्सपिअर जगाचा आनंदाने व खेळकर वृत्तीने स्वीकार करतो.
त्याला जग म्हणजे गंमत व मौज वाटते . शेक्स्पिअरजवळ प्लेटो किंवा निश्ते ह्यांच्यासारखी दृष्टी किंवा कळकळ नव्हती. शेक्सपिअरजवळ काही नव्हते . त्याला हे जगच छानदार वाटत होते.”
शेक्सपिअरचा ह्या जगप्रसिद्ध माणसाचा हा शोध खूप बोलका आहे. शेवटी तोही एक माणूस.

वि. स. खांडेकर वाचले होते म्हणून ........
अरुण साधू ह्यांचा लोकसत्तेतील लेख वाचला. त्यात ते लिहितात .....
वि.स. खांडेकर 
“ मी तारुण्यात खांडेकर थोडेफार वाचले . फडकेही वाचण्याचा प्रयत्न केला पण मला ते वाचता आले नाही. खांडेकर मला फार निरागस आणि विसविशीत वाटले . हे मी आता सांगतोय. हे सांगणं हा खरं म्हणजे मोठा अपराध आहे. ते मराठीतले पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक आहेत. त्यामुळे त्यांच्या विषयी असे बोलणे चांगलं नाही. खांडेकरांनी भाषा दिली. भाषेचे वळण दिलं. मध्यमवर्गाला खूप घोळवलं.”
साधुनी जे लिहिले , ते एकदम बरोबर आहे. साधू माझ्याच वयाचे असतील. मला माझ्या शालेय जीवनाची आठवण झाली. त्यावेळी वर्गशिक्षक आम्हा मुलांना फळ्यावर सुविचार लिहिण्यास सांगत असत. रोज एक सुविचार लिहावा लागे. तेंव्हा वाचनालयातील पुस्तकातील वि, स. खांडेकर मदतीला धावून येत असत. आजही त्यावेळी फळ्यावर लिहिलेले त्यांचे ते सुविचार पाठ आहेत.
खांडेकरांनी भाषा दिली. सौंदर्य दिले. शब्दांचा फुलोरा दाखविला.
“अति उच्च ध्येय डोळ्यासमोर ठेवून पतित होण्यापेक्षा मर्यादित उंचीवर भक्कम पावले उचलीत जाणेच योग्य.” हा पाठ केलेला सुविचार जीवनात खूप वेळा उपयोगी पडला.
“ यशाचे सुमधुर चांदणे हवे असेल तर प्रयत्नांचा चंद्र तेजोमय ठेवला पाहिजे.”
गेल्या आठवड्यात “यलो” हा मराठी सिनेमा पाहिला. “You can do it” हे ‘आजचे मराठी’ नेहमीच ऐकतो. खांडेकरांची मराठी भाषा अवगत केली असती तर अधिक सुंदर मराठी भाषा नव्या पिढीला आली असती. आपण लोकमान्य टिळक , गोपाळ गणेश आगरकर , विष्णू शास्त्री चिपळूणकर, ह ना आपटे, वि द घाटे , वि स खांडेकर ह्यांची मराठी भाषा विसरलो म्हणूनच आपणास मराठी शब्द आठवत नाहीत. त्यामुळे इंग्रजी मिश्रित मराठी भाषा आपण बोलत असतो. हे लक्षात आलं. जय मराठी.

मराठी कादंबरी संबंधी .....
मराठी कादंबऱ्या कोणी वाचत नाही.विकत घेऊन वाचणारे तर त्याहून कमी. अगदी नावाजलेल्या लेखकाच्या कादंबऱ्या ३०- ४० वर्षात खपतात त्या फक्त २००० ते ३०००. लेखक खूप चिंतेत आहेत. मला प्रश्न पडतो की प्रकाशक किती कफल्लक होत असेल
मी पुस्तके विकत घेऊन वाचणारा आहे. त्यामुळे कादंबरी आवडली नाही की पैसे वाया गेल्याचे दु:ख अधिक होते आणि वेळही जातो.
डॉ नरेंद्र गंगाखेडकर
drnsg@rediffmail.com      
  

1 comment:

  1. अप्रतिम लेख, शेक्सपियरबद्दल वाचून बर वाटलं.
    वरील पुस्तक नक्की वाचेन, पुस्तकाचा परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete