Saturday, October 13, 2018

औरंगाबादच्या आठवणी - २

औरंगाबादच्या आठवणी -  

हीच ती आमची शाळा -न्यु मिडल स्कूल . आज तेथे जिल्हा परिषदेचे कार्यालय आहे . सुरुवातीला ह्याच इमारतीत मराठवाडा विदयापीठ सुरु झाले होते . मी एम .एससी. ला असताना येथेच आमची प्रयोगशाळा होती.आज औरंगाबाद खूपच बदलले आहे. १९५७ साली ही आमची शाळा होती हे अनेकांना माहित नसेल . 

औरंगपुऱ्यातून खडकेश्वरकडे जाणारा रस्ता . माझ्या अनेक आठवणींचा एक धबधबा. १९५७ ते १९६८ पर्यंतचा तो काळ . माझे शालेय जीवन आठवले की मला हा परिसर आठवतो
आज जिथे जिल्हा परिषदेचे कार्यालय आहे त्या इमारतीत आमची शाळा होती. न्यू मिडल स्कूल , औरंगाबाद . त्यावेळची एक दिमाखदार इमारत . चित्रात जी इमारत दिसते आहे , त्याच्या उजव्या बाजूला एक छोटी इमारत आहे . तेथे आमचा वीचा वर्ग भरत असे . प्रत्येक वर्गाच्या किंवा तुकड्या होत्या . मी वी ( ) मध्ये होतो. प्रवेश देतांना हुशार मुलांना निरनिराळ्या तुकड्यात प्रवेश देत असत . एकाच वर्गात हुशार मुले नसत . त्यामुळे तुकड्यामध्ये स्पर्धा असे. ६वी ( )मध्ये सतीश गोटे, वी ( ) मध्ये मधुकर दंडारे तर वी ( )मध्ये मी होतो . आमच्यात चांगली स्पर्धा असे. लेंभे सर आमचे मुख्याध्यापक होते . ते एक आदर्श शिक्षक होते  . 
आजही त्यांची ती मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. निवृत्त झाल्यावर ते देवगिरी महाविद्यालयाच्या शिक्षण संस्थेत प्रशासनात होते. त्या संस्थेने  मराठवाड्यात इतरत्र महाविद्यालये सुरु केली होती. मी एम. एस सी. झालो . प्राध्यापकीच्या शोधात मुलाखतीला जात होतो. एका मुलाखतीला लेंभे सर समोरच्या  निवड करणाऱ्या मंडळात बसलेले होते . माझी मुलाखत चांगलीच झाली. मी मराठवाडा विद्यापीठात दुसरा आलो होतो. मला त्या संस्थेत प्राध्यापकी मिळाली नाही . कारण मी होतो ब्राह्मण. आमच्याच बॅचचा रा आलेला व मराठा असलेला विद्यार्थी निवडला गेला . त्यानंतर लेंभे सर एकदा मला औरंगपुऱ्यात भेटले . ते म्हणाले , ‘ खरं म्हणजे , तुलाच ती पोस्ट मिळायला पाहिजे होतं . मी काहीही करू शकलो नाही. नरेंद्र ,हे असेच आहे. तुला सर्व कल्पना आलेलीच असेलच’. मी त्यांना काय बोलणार ? मला परभणीच्या कृषी महाविद्यालयात प्राध्यापकी मिळाली होती, हे ऐकून त्यांना आनंद झाला. मी तेथे दीड महिनाच होतो . नंतर मुंबईला भाभा अणू संशोधन केंद्रात एका ट्रेनिंगसाठी माझी निवड झाली . माझे औरंगाबाद सुटले ते सुटले . 
लेंभे सरांनी आम्हाला खूप प्रोत्साहन दिले होते . वादविवाद स्पर्धा असो की नाट्यस्पर्धा .शाळा सर्व स्पर्धात भाग घेत असे . ‘ नवे पाऊलहे साक्षरतेवर आधारलेले  नाटक आम्ही सादर केल्याचे आठवते . रानडे वादविवाद स्पर्धेतही भाग घेऊन मी बक्षिसे मिळविली होती. न्यू मिडल स्कूल ही एक आदर्श शाळा होती. सुरुवातीला आमची फीस फक्त चार आणे होती . हुशार विद्यार्थ्यांना महिना ६० रु शिष्यवृत्ती होती. म्हणजे मला शिकण्यासाठी पैसे मिळत होते . शाळेचा परिसर सुंदर होता .शाळेसमोर गोलाकार बाग होतीमागच्या बाजूला मोठे मैदान होते. शेजारीच मुलींचे सरकारी हायस्कूल होते . आमच्या शाळेच्या इमारतीतच पुढे मराठवाडा विद्यापीठ सुरु झाले . माझे एम. एससी.चे पहिले वर्ष त्याच इमारतीत झाले. समोरच्या इमारतीच्या मागे शेड्स बांधल्या होत्या. तेथेच आमची फिजिक्स लॅब होती. त्यामुळे ही इमारत माझ्याकरिता विद्येचे मंदिरच होते . अशा अनेक आठवणी ह्या इमारतींशी जोडलेल्या आहेत
एकेकाळचे न्यू मिडल स्कूल  आणि सुरुवातीचे मराठवाडा विद्यापीठ ह्याच इमारतीत होते. माझा त्या इमारतींशी आणि परिसराशी जवळचा संबंध होता म्हणून ही इमारत मला आजही खूप आवडते

भडकल दरवाजाजवळील हेच ते Government Multipurpose High School. आज तेथे महाराष्ट्र शासनाचे एक कार्यालय दिसते . आमच्या शाळेच्या पूर्वी येथे निझामाच्या काळात Intermediate College होते . पदवीपूर्व शिक्षण मिळत असे . पदवी शिक्षणासाठी हैद्राबादला जावे लागत असे . आमची शाळा ही एक देखणी इमारत होती . शाळेच्या मागे प्रचंड मोठे मैदान होते . तेथे आता क्रिडासंकुल उभारण्यात आले आहे .

औरंगपुऱ्याचा रस्ता खडकेश्वरकडे जातो . खडकेश्वर येण्यापूर्वी उजव्या बाजूला नाला ओलांडून गेलं की एक प्रचंड मोठे मैदान लागते. तेथे आतां भले मोठे क्रीडा संकुल उभे आहे. त्याच्या मागे जी इमारत उभी आहे ती म्हणजे आमचे त्यावेळचे सरकारी मल्टीपर्पज हायस्कूल . एकेकाळी निझामाच्या राज्यात ते सिटी कॉलेज होते. पदवीपूर्व शिक्षण तेथे मिळत असे. त्यानंतर पदवी शिक्षणासाठी हैद्राबादला जावे लागत असेआमचे मल्टीपर्पज हायस्कुल ते हेच .११ वी पर्यंत ह्या शाळेत शिकलो. आम्हाला नवा अभ्यासक्रम सुरु झाला होता . एस. एस. सी.( दहावी matric) पेक्षा वेगळा . एच .एस.( एम पी) एस.सी . ११वी नंतर सरळ पदवीच्या पहिल्या वर्षात प्रवेश असे . नो पीयूसी . आठवीलाच  ऐच्छिक विषय ठरवायचे. पीसीएम , पीसीबी , आर्ट्स किंवा टेक्निकल . मी टेक्निकल ऐच्छिक निवडले होते . ह्या विषयात सिव्हिल - मेकॅनिकल - इलेक्ट्रिकल - workshop - इंजिनिअरिंग ड्रॉईंग हे ऐच्छिक विषय होते. शाळेच्या मुख्य इमारतीच्या मागे आमचा वेगळा विभाग होता. भोळे सर आमच्या विभागाचे प्रमुख होते. आम्ही जे शिकत होतो ते पाहून आम्ही इंजिनिअर झालो असेच आम्हाला वाटू लागले. पुढे आमचा स्वप्नभंग झाला. ‘ आहे मल्टीपर्पज पण एकही पर्पज पूर्ण करणारा हा अभ्यासक्रम बंद कराअसा एक लेख मी मराठवाडा साप्ताहिकात लिहिला होतानंतर तो अभ्यासक्रम बंद झाला. दोनचार बॅचचे नुकसान झाले ते झाले. तेंव्हाच्या मुदलियार कमिशनने शिफारस केलेला तो अभ्यासक्रम नंतर बंद झाला. आम्ही मात्र इंजिनिअर होण्याचे राहिले . अभ्यासक्रम चांगला होता पण पुढील शिक्षणासाठी त्याची जोड जमली नव्हती . एकमात्र झाले. मी थोडासा टर्नर, फिटर, इलेक्ट्रीशीअन, ब्लॅक स्मिथ , ड्रॉईंग काढणारा झालो. ते काम आजही मला छान जमते
ह्या शाळेत शिक्षक फार चांगले होते . इंग्रजी - मराठी - हिंदी हे त्रिभाषा सूत्र . प्रत्येक भाषा विषय २०० मार्काचे. चार पुस्तके एका भाषेची. गद्य-पद्य- कथा- कादंबरी - व्याकरण ह्याची पुस्तकेहरी  नारायण आपटे ह्यांचीमीकादंबरी आमच्या अभ्यासक्रमात होती. त्यामुळे आम्ही थोडेसेसमीक्षकझालो. उजळंबकर सर आम्हाला  इंग्रजी शिकवीत . त्यांचा इंग्रजी क्लास जोरात चाले . मला ते काही फीस घेता शिकवीत. नव्हे त्यांनी मला त्यांच्या क्लासला आमंत्रित केले होते  .आज जे थोडेफार इंग्रजी येते ते त्यांच्यामुळेच . अफजलखान नावाचे दुसरे एक इंग्रजी शिक्षक होते. खूप जाडे. ते छान शिकवीत असत . वली महंमद आमचे मुख्याध्यापक होते . गोरेपान . शेरवानी घालून येत . जिना टोपी घातलेली असे. दरारा होता त्यांचा. ते ऐटीत शाळेत  फेरी मारीत असत. निझामी राजवटीतला त्यांचा तोरा होता .

आज आमच्या शाळेच्या इमारतीत महाराष्ट्र शासनाचे दुसरेच एक  कार्यालय सुरु झाले आहे असे दिसते . ती शाळा सुद्धा राहिली नाही . भडकल गेटच्या जवळील ती  देखणी इमारत पाहिली की जुन्या आठवणी जाग्या होतात . आयष्याला एक पर्पज देणारी आमची मल्टिपर्पज शाळा. टेक्निकल शिक्षण देतानाही भाषा विषयात विलक्षण गोडी निर्माण करणारी ती शाळा आणि त्यावेळचे शिक्षक . सगळेच विलक्षण . ते शाळेचे दिवस जीवनात खूप काही शिकवून गेले . 

Thursday, October 4, 2018

सोमनाथपुरा


म्हैसूर पासून ३५ किलोमीटर अंतरावर कावेरी नदीच्या काठावर वसलेलं एक गांव. ते फारसं प्रसिद्ध नसलं तरी अवश्य भेट द्यावं असं गावं आहे . ज्यांनी वेरूळ , खजुराहो , बेलूर आणि हाळेबिडू बघितले असेल त्यांनी अवश्य बघावं इतकं सुंदर गांव.

मी अलीकडेच इटलीमधील फ्लॉरेन्सला मायकेल एन्जेलोची शिल्पकला बघून आलो होतो. तेंव्हा आश्चर्य चकित झालो होतो. त्यावेळी मला खजुराहो , वेरूळ आणि हाळेबिडूची राहून राहून आठवण होत होती. काल म्हैसूरला गेलो तेंव्हा परतताना माझा जावई रणजित ह्याने गाडी सोमनाथपुराकडे वळवली आणि एका अप्रतिम अशा चेन्नकेशवा मंदिराचे दर्शन झाले. 


पहिल्यांदा हाळेबिडूच्या मंदिरांची आठवण झाली . कर्नाटकात सर्वात प्रसिद्ध आहे ते हंपी . विजयनगरच्या वैभवी साम्राज्याची आठवण करून देणारे हंपी म्हणजे हिंदू संस्कृतीचा मानबिंदू . ते अवशेष आपल्या पुरातन संस्कृतीचे वैशिष्ट्य सांगतात .हाळेबिडूतील शिल्पकला तर अप्रतिम. ७५० वर्षापूर्वीच्या होयसाला राजघराण्याची निर्मिती म्हणजे सोमनाथपूरचे हे विष्णू मंदिर . दंडनायक ( होयसाला राजा नरसिंहा -२ ह्याचा सेनाधिकारी ) सोमनाथाने १२६८ साली हे विष्णू मंदिर बांधायला सुरुवात केली. त्यावेळच्या वास्तुकला आणि शिल्पकला ह्यांचा सुंदर संगम ह्या मंदिरात पहावयास मिळतो आणि आपण आश्चर्य चकित होऊन wow !!! असे ऊद्गार काढतो. 

हिंदू संस्कृतीत ब्रम्हा-विष्णू-महेश ह्या त्रिमूर्तीचे स्थान सर्वोच्च आहे. वेरूळचे कैलास लेणे शिवाचे आहे तर सोमनाथपुराचे हे मंदिर विष्णूचे आहे. विष्णूची तीन रूपे : केशवा- जनार्दना- वेणूगोपाला . ह्या त्रिकुटाचे हे मंदिर म्हणून त्याला त्रिकुटचला असे म्हणतात . तीन देवांच्या तीन मूर्ती , तीन शिखरे असलेल्या तीन देवळांचा एक समूह म्हणजे हे मंदिर. ह्या तीन विष्णूच्या रूपातील केशवाची मूळ मूर्ती मात्र हरवली आहे. चोरीला गेली आहे. मुसलमानी आक्रमकांनी मूर्तिभंजन केलेले दिसून येते . त्या सुंदर शिल्पकलेचे भग्न अवशेष पहाताना मन खिन्न होते .
मंदिराच्या बाहेरील भागातील चारही बाजूच्या भिंतीवर अतिशय सुंदर कोरीव काम आहे. अनेक हिंदू देव देवतांच्या शिल्पाकृती पहावयास मिळतात. पुराणातील अनेक कथा त्यात शिल्पित केल्या आहेत. 


दक्षिण बाजूच्या भिंतीवर रामायण तर उत्तर बाजूच्या भिंतीवर महाभारतातील अनेक प्रसंग शिल्पित केले आहेत. युद्धाचे प्रसंग, घोडेस्वार , हत्ती, उंट , नृत्यांगना , गायक, शिकारी, धनुष्य बाण चालविणारे सैनिक , अशी सुंदर आखीव - रेखीव शिल्पे आहेत. अतिशय नाजूक असलेले हे कोरीव काम मन वेधून घेते . स्त्री - पुरुषांनी / देव- देवतांनी घातलेले दागदागिने इतके सुंदर दिसतात की इतके कोरीव काम कसे केले असेल हे पाहून आपण थक्क होऊन जातो . निरनिराळे पेन्डन्ट्स , नेकलेस, वेस्टबॅंड्स , रिंग्स , विविध प्रकारचे दागिने , स्त्रियांच्या विविध प्रकारच्या केश रचना म्हणजे आधुनिक काळातील फॅशनचे नमुने वाटतात . 


रुवारी मॉलिथ म्मा हा मुख्य शिल्पकार . चेमिया, रामैया, चौडेया , नानजेया हे इतर सहकारी शिल्पकार. पल्लवाचारी आणि चोलावचारी हे दोन शिल्पकार तामिळ भागातले होते. हे प्रचंड शिल्प सोपस्टोन ह्या दगडातून तयार केले आहे. आखीव दगडी खांब, रेखीव छत, सुंदर मूर्ती, समोरचे लक्ष वेधणारे प्रवेश द्वार , शिकारा पद्धतीचे उंच मनोरे - देवळाची शिखरे, छोट्या मोठ्या मूर्तीनी शिल्पित केलेल्या भिंती , सुंदर मंडप आणि त्याचे कोरीव छत - सर्व मोहित करणारे अप्रतिम शिल्प सौन्दर्य . 


हिंदू संस्कृतीची गौरव गाथा ह्या असंख्य दगडी शिल्पातून व्यक्त होते. Awesome ,Amazing ,Fantastic , WOW !!! Wonderful !!असेच शब्द तोंडातून बाहेर पडतात . हे अप्रतिम असलेले आणि कासावीस करणारे शिल्पसौन्दर्य पहाण्यासाठी सोमनाथपूरला अवश्य जा.

















Monday, October 1, 2018

बा आणि बापू

बा आणि बापू

आज २ ऑक्टोबर . गांधी जयंती . गांधीजी म्हंटलं की आठवते ‘ गांधी विरुद्ध गांधी’ हे नाटक , ‘ गांधी’ हा चित्रपट आणि ‘जगदंबा’ हे कस्तुरबावरील नाटक. अहमदाबादला जेंव्हा जेंव्हा  गेलो तेंव्हा साबरमती आश्रमाला दिलेल्या भेटी आणि अलीकडेच  पोरबंदरला गांधीजींच्या जन्मस्थानाला दिलेली भेट . गांधीनगरचे दांडी कुटीर’ हे गांधीजींचे सर्वात भव्य आणि अप्रतिम असे स्मारक अलीकडेच पाहिलं आणि लक्षात आलं की गेल्या ७० वर्षात ह्या महामानवाकरिता भारतात उभारण्यात आलेले हे सर्वात देखणे आणि भव्य स्मारक आहे .

दांडी कुटीर , गांधीनगर ,गांधीजींचे भव्य स्मारक 

‘गांधी’ हा चित्रपट सुंदर आहेच ह्यात वादच नाही. माणूस हा कितीही मोठा असला तरी तो अनेकदा चुका करणाऱ्या एखाद्या सामान्य माणसासारखाच असतो. महामानव असला तरी त्याने केलेला आपल्या कुटुंबीयावरचा ( बायको – मुलगा ) अन्याय , त्यांच्या जीवनाची झालेली परवड हे त्याचे मोठे अपयश . 

गांधीजींचे यश खूप मोठे आहे पण त्यांचे अपयशही कुटुंबावर आघात करणारे आहे  . हरीलाल ह्या त्यांच्या मुलाची दारूण शोकांतिका तर आहेच  पण हरीलालच्या  भणंग आयुष्याला कोण जबाबदार?, असा प्रश्न मनांत नेहमी घोळत राहतो  आणि त्याच्या बेवारसी प्रेताला उचलण्यासाठी कोणीच असू नये हा नियतीने केलेला क्रूर अन्याय आहे असे वाटू लागते . ‘गांधी विरुद्ध गांधी’ ह्या नाटकाचा हाच विषय आहे . महात्मा गांधी विरुद्ध हिरालाल गांधी  .नाटककाराने / दिग्दर्शकाने  नाटकातील संघर्ष शोधला आहे तो खालील संवादात :
( बा आणि बापू ह्यांच्यातील हा संवाद )

कस्तुरबा गांधी 

बापू: मी काय करावं हरीसाठी असं वाटतं तुला ?
बा: शक्य असेल ते सारं ..
बापू : तो कसाही वागला तरीही ?
बा : हो तरीही .
बापू : कुणी दिला त्याला हा अधिकार ?
बा : त्याच्या जन्मानं . तो मुलगा आहे तुमचा . तुम्हाला अनेक मुलं आहेत . पण त्याला एकच पिता आहे !
महामानव कुठे चुकला ? हे सांगितलं आहे त्याच्या जीवनसाथीदराने .
आणि ह्याच कस्तुरबांचे मनोगत व्यक्त केलं आहे ते रामदास भटकळ ह्यांच्या ‘ जगदंबा ‘ ह्या नाट्यकृतीने . अविष्कारने पार्ल्याच्या साठे कॉलेजमध्ये सादर केलेला तो प्रयोग आजही मला आठवतो आहे . कस्तुरबाची भूमिका केली होती ती रोहिणी हटगंडी ह्यांनी. कस्तुरबाचे मनोगत व्यक्त करणारा तो मोठा मोनोलॉग आजही आठवतो आहे . त्या आपले जीवन ह्या स्वगतातून उलगडत जातात . महामानवांच्या बरोबरचे वैयक्तिक आयुष्य सांगत जातात . त्यांच्या आयुष्यातील घटना , अनंत अडचणी आणि झालेले मन:स्ताप सांगत जातात .स्वतःच्या आयुष्याला – इच्छा आकांक्षांना पडलेली मुरड आणि त्याचा झालेला चुराडा सांगत जातात . एका महामानवाच्या स्त्रीचे- जीवनसाथीचे हे कठीण जीवन उलगडत जाते . त्यांचे वैयक्तिक आणि कौटुंबिक जगणे किती कठीण असते . ह्याचा चित्रपट आपल्या डोळ्यासमोर येत राहतो. असे हे कठीणतम जगणे महामानवाचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे.

महामानव 


आपल्या मुलाचे भणंग आयुष्य कुणाही मातेला असह्य्य करणारच. कस्तुरबा ही स्त्री गांधीजींच्या मागे मागे जाणारी अशिक्षित स्त्री नव्हती . ती त्यांच्या बरोबरीने त्यांना साथ देत जाणारी स्त्री होती . म्हणूनच ती एक वेगळी जीवनसाथी होती.
हिरालालचे भणंग आयुष्य आणि कस्तुरबाच्या आयुष्याची परवड ह्या दोन कारणासाठी गांधीजी कमी पडले. हा नियतीने त्यांना दिलेला शाप होता .
साबरमती आश्रमात अनेकदा गेलो. त्यांचे तेथील वास्तव्य . तो परिसर . तेथील विनोबांची कुटीर . सर्वच भारावून टाकणारे .

साबरमती आश्रम 


अलीकडेच पोरबंदरला गेलो . त्यांचा तो जुना वाडा , त्यांचे ते जन्मस्थान – ती खोली , त्यांची ती अभ्यासिका . तो काळ डोळ्यासमोर उभा राहिला . ते पोरबंदर सोडून गेले ते परत आलेच नाहीत . त्या काळात शिक्षणासाठी इंग्लंडला गेलेले बापू आणि दक्षिण आफ्रिकेत पोटापाण्यासाठी निघून गेलेले बापू हे वेगळेच होते . ते सारे एका सामान्य माणसाच्या आयुष्यासारखेच होते .

गांधीजींचे जन्मस्थान 

गांधीजंचे घर , पोरबंदर 


नंतरचा त्यांचा राजकीय जीवनपट लक्षवेधीच होता . गांधी – रानडे , गांधी –गोपाल कृष्ण गोखले , गांधीजी – नेताजी सुभाष, गांधी –नेहरू , गांधी – सरदार पटेल ह्यांच्यातील मैत्री – संघर्ष सगळेच मोठे राजकीय नाट्य समजल्यावर आपल्याला त्यांचे मोठेपण जाणवत जाते .

सत्याग्रह 
राष्ट्रपिता देशाला संबोधन करीत असताना ...


अशा ह्या महामानवाला अभिवादन .

दांडी कुटीर , गांधीनगर 
साबरमती आश्रमात ....