Thursday, October 4, 2018

सोमनाथपुरा


म्हैसूर पासून ३५ किलोमीटर अंतरावर कावेरी नदीच्या काठावर वसलेलं एक गांव. ते फारसं प्रसिद्ध नसलं तरी अवश्य भेट द्यावं असं गावं आहे . ज्यांनी वेरूळ , खजुराहो , बेलूर आणि हाळेबिडू बघितले असेल त्यांनी अवश्य बघावं इतकं सुंदर गांव.

मी अलीकडेच इटलीमधील फ्लॉरेन्सला मायकेल एन्जेलोची शिल्पकला बघून आलो होतो. तेंव्हा आश्चर्य चकित झालो होतो. त्यावेळी मला खजुराहो , वेरूळ आणि हाळेबिडूची राहून राहून आठवण होत होती. काल म्हैसूरला गेलो तेंव्हा परतताना माझा जावई रणजित ह्याने गाडी सोमनाथपुराकडे वळवली आणि एका अप्रतिम अशा चेन्नकेशवा मंदिराचे दर्शन झाले. 


पहिल्यांदा हाळेबिडूच्या मंदिरांची आठवण झाली . कर्नाटकात सर्वात प्रसिद्ध आहे ते हंपी . विजयनगरच्या वैभवी साम्राज्याची आठवण करून देणारे हंपी म्हणजे हिंदू संस्कृतीचा मानबिंदू . ते अवशेष आपल्या पुरातन संस्कृतीचे वैशिष्ट्य सांगतात .हाळेबिडूतील शिल्पकला तर अप्रतिम. ७५० वर्षापूर्वीच्या होयसाला राजघराण्याची निर्मिती म्हणजे सोमनाथपूरचे हे विष्णू मंदिर . दंडनायक ( होयसाला राजा नरसिंहा -२ ह्याचा सेनाधिकारी ) सोमनाथाने १२६८ साली हे विष्णू मंदिर बांधायला सुरुवात केली. त्यावेळच्या वास्तुकला आणि शिल्पकला ह्यांचा सुंदर संगम ह्या मंदिरात पहावयास मिळतो आणि आपण आश्चर्य चकित होऊन wow !!! असे ऊद्गार काढतो. 

हिंदू संस्कृतीत ब्रम्हा-विष्णू-महेश ह्या त्रिमूर्तीचे स्थान सर्वोच्च आहे. वेरूळचे कैलास लेणे शिवाचे आहे तर सोमनाथपुराचे हे मंदिर विष्णूचे आहे. विष्णूची तीन रूपे : केशवा- जनार्दना- वेणूगोपाला . ह्या त्रिकुटाचे हे मंदिर म्हणून त्याला त्रिकुटचला असे म्हणतात . तीन देवांच्या तीन मूर्ती , तीन शिखरे असलेल्या तीन देवळांचा एक समूह म्हणजे हे मंदिर. ह्या तीन विष्णूच्या रूपातील केशवाची मूळ मूर्ती मात्र हरवली आहे. चोरीला गेली आहे. मुसलमानी आक्रमकांनी मूर्तिभंजन केलेले दिसून येते . त्या सुंदर शिल्पकलेचे भग्न अवशेष पहाताना मन खिन्न होते .
मंदिराच्या बाहेरील भागातील चारही बाजूच्या भिंतीवर अतिशय सुंदर कोरीव काम आहे. अनेक हिंदू देव देवतांच्या शिल्पाकृती पहावयास मिळतात. पुराणातील अनेक कथा त्यात शिल्पित केल्या आहेत. 


दक्षिण बाजूच्या भिंतीवर रामायण तर उत्तर बाजूच्या भिंतीवर महाभारतातील अनेक प्रसंग शिल्पित केले आहेत. युद्धाचे प्रसंग, घोडेस्वार , हत्ती, उंट , नृत्यांगना , गायक, शिकारी, धनुष्य बाण चालविणारे सैनिक , अशी सुंदर आखीव - रेखीव शिल्पे आहेत. अतिशय नाजूक असलेले हे कोरीव काम मन वेधून घेते . स्त्री - पुरुषांनी / देव- देवतांनी घातलेले दागदागिने इतके सुंदर दिसतात की इतके कोरीव काम कसे केले असेल हे पाहून आपण थक्क होऊन जातो . निरनिराळे पेन्डन्ट्स , नेकलेस, वेस्टबॅंड्स , रिंग्स , विविध प्रकारचे दागिने , स्त्रियांच्या विविध प्रकारच्या केश रचना म्हणजे आधुनिक काळातील फॅशनचे नमुने वाटतात . 


रुवारी मॉलिथ म्मा हा मुख्य शिल्पकार . चेमिया, रामैया, चौडेया , नानजेया हे इतर सहकारी शिल्पकार. पल्लवाचारी आणि चोलावचारी हे दोन शिल्पकार तामिळ भागातले होते. हे प्रचंड शिल्प सोपस्टोन ह्या दगडातून तयार केले आहे. आखीव दगडी खांब, रेखीव छत, सुंदर मूर्ती, समोरचे लक्ष वेधणारे प्रवेश द्वार , शिकारा पद्धतीचे उंच मनोरे - देवळाची शिखरे, छोट्या मोठ्या मूर्तीनी शिल्पित केलेल्या भिंती , सुंदर मंडप आणि त्याचे कोरीव छत - सर्व मोहित करणारे अप्रतिम शिल्प सौन्दर्य . 


हिंदू संस्कृतीची गौरव गाथा ह्या असंख्य दगडी शिल्पातून व्यक्त होते. Awesome ,Amazing ,Fantastic , WOW !!! Wonderful !!असेच शब्द तोंडातून बाहेर पडतात . हे अप्रतिम असलेले आणि कासावीस करणारे शिल्पसौन्दर्य पहाण्यासाठी सोमनाथपूरला अवश्य जा.

















No comments:

Post a Comment