Monday, October 1, 2018

बा आणि बापू

बा आणि बापू

आज २ ऑक्टोबर . गांधी जयंती . गांधीजी म्हंटलं की आठवते ‘ गांधी विरुद्ध गांधी’ हे नाटक , ‘ गांधी’ हा चित्रपट आणि ‘जगदंबा’ हे कस्तुरबावरील नाटक. अहमदाबादला जेंव्हा जेंव्हा  गेलो तेंव्हा साबरमती आश्रमाला दिलेल्या भेटी आणि अलीकडेच  पोरबंदरला गांधीजींच्या जन्मस्थानाला दिलेली भेट . गांधीनगरचे दांडी कुटीर’ हे गांधीजींचे सर्वात भव्य आणि अप्रतिम असे स्मारक अलीकडेच पाहिलं आणि लक्षात आलं की गेल्या ७० वर्षात ह्या महामानवाकरिता भारतात उभारण्यात आलेले हे सर्वात देखणे आणि भव्य स्मारक आहे .

दांडी कुटीर , गांधीनगर ,गांधीजींचे भव्य स्मारक 

‘गांधी’ हा चित्रपट सुंदर आहेच ह्यात वादच नाही. माणूस हा कितीही मोठा असला तरी तो अनेकदा चुका करणाऱ्या एखाद्या सामान्य माणसासारखाच असतो. महामानव असला तरी त्याने केलेला आपल्या कुटुंबीयावरचा ( बायको – मुलगा ) अन्याय , त्यांच्या जीवनाची झालेली परवड हे त्याचे मोठे अपयश . 

गांधीजींचे यश खूप मोठे आहे पण त्यांचे अपयशही कुटुंबावर आघात करणारे आहे  . हरीलाल ह्या त्यांच्या मुलाची दारूण शोकांतिका तर आहेच  पण हरीलालच्या  भणंग आयुष्याला कोण जबाबदार?, असा प्रश्न मनांत नेहमी घोळत राहतो  आणि त्याच्या बेवारसी प्रेताला उचलण्यासाठी कोणीच असू नये हा नियतीने केलेला क्रूर अन्याय आहे असे वाटू लागते . ‘गांधी विरुद्ध गांधी’ ह्या नाटकाचा हाच विषय आहे . महात्मा गांधी विरुद्ध हिरालाल गांधी  .नाटककाराने / दिग्दर्शकाने  नाटकातील संघर्ष शोधला आहे तो खालील संवादात :
( बा आणि बापू ह्यांच्यातील हा संवाद )

कस्तुरबा गांधी 

बापू: मी काय करावं हरीसाठी असं वाटतं तुला ?
बा: शक्य असेल ते सारं ..
बापू : तो कसाही वागला तरीही ?
बा : हो तरीही .
बापू : कुणी दिला त्याला हा अधिकार ?
बा : त्याच्या जन्मानं . तो मुलगा आहे तुमचा . तुम्हाला अनेक मुलं आहेत . पण त्याला एकच पिता आहे !
महामानव कुठे चुकला ? हे सांगितलं आहे त्याच्या जीवनसाथीदराने .
आणि ह्याच कस्तुरबांचे मनोगत व्यक्त केलं आहे ते रामदास भटकळ ह्यांच्या ‘ जगदंबा ‘ ह्या नाट्यकृतीने . अविष्कारने पार्ल्याच्या साठे कॉलेजमध्ये सादर केलेला तो प्रयोग आजही मला आठवतो आहे . कस्तुरबाची भूमिका केली होती ती रोहिणी हटगंडी ह्यांनी. कस्तुरबाचे मनोगत व्यक्त करणारा तो मोठा मोनोलॉग आजही आठवतो आहे . त्या आपले जीवन ह्या स्वगतातून उलगडत जातात . महामानवांच्या बरोबरचे वैयक्तिक आयुष्य सांगत जातात . त्यांच्या आयुष्यातील घटना , अनंत अडचणी आणि झालेले मन:स्ताप सांगत जातात .स्वतःच्या आयुष्याला – इच्छा आकांक्षांना पडलेली मुरड आणि त्याचा झालेला चुराडा सांगत जातात . एका महामानवाच्या स्त्रीचे- जीवनसाथीचे हे कठीण जीवन उलगडत जाते . त्यांचे वैयक्तिक आणि कौटुंबिक जगणे किती कठीण असते . ह्याचा चित्रपट आपल्या डोळ्यासमोर येत राहतो. असे हे कठीणतम जगणे महामानवाचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे.

महामानव 


आपल्या मुलाचे भणंग आयुष्य कुणाही मातेला असह्य्य करणारच. कस्तुरबा ही स्त्री गांधीजींच्या मागे मागे जाणारी अशिक्षित स्त्री नव्हती . ती त्यांच्या बरोबरीने त्यांना साथ देत जाणारी स्त्री होती . म्हणूनच ती एक वेगळी जीवनसाथी होती.
हिरालालचे भणंग आयुष्य आणि कस्तुरबाच्या आयुष्याची परवड ह्या दोन कारणासाठी गांधीजी कमी पडले. हा नियतीने त्यांना दिलेला शाप होता .
साबरमती आश्रमात अनेकदा गेलो. त्यांचे तेथील वास्तव्य . तो परिसर . तेथील विनोबांची कुटीर . सर्वच भारावून टाकणारे .

साबरमती आश्रम 


अलीकडेच पोरबंदरला गेलो . त्यांचा तो जुना वाडा , त्यांचे ते जन्मस्थान – ती खोली , त्यांची ती अभ्यासिका . तो काळ डोळ्यासमोर उभा राहिला . ते पोरबंदर सोडून गेले ते परत आलेच नाहीत . त्या काळात शिक्षणासाठी इंग्लंडला गेलेले बापू आणि दक्षिण आफ्रिकेत पोटापाण्यासाठी निघून गेलेले बापू हे वेगळेच होते . ते सारे एका सामान्य माणसाच्या आयुष्यासारखेच होते .

गांधीजींचे जन्मस्थान 

गांधीजंचे घर , पोरबंदर 


नंतरचा त्यांचा राजकीय जीवनपट लक्षवेधीच होता . गांधी – रानडे , गांधी –गोपाल कृष्ण गोखले , गांधीजी – नेताजी सुभाष, गांधी –नेहरू , गांधी – सरदार पटेल ह्यांच्यातील मैत्री – संघर्ष सगळेच मोठे राजकीय नाट्य समजल्यावर आपल्याला त्यांचे मोठेपण जाणवत जाते .

सत्याग्रह 
राष्ट्रपिता देशाला संबोधन करीत असताना ...


अशा ह्या महामानवाला अभिवादन .

दांडी कुटीर , गांधीनगर 
साबरमती आश्रमात ....




No comments:

Post a Comment