Tuesday, June 25, 2013

केदारनाथ : देव नाही देव्हाऱ्यात

केदारनाथ 

उत्तराखंडात झालेल्या जलप्रलयामुळे तीर्थक्षेत्र असलेल्या केदारनाथाचे रूपांतर अक्षरशः स्मशानात झाले आहे.मंदिराचा बाह्यभाग सुरक्षित दिसत असला, तरी प्रवेशद्वारापुढे पार्थिवांची जणू रांग लागली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरामागे असलेल्या डोंगरावरून आलेल्या पाण्याने सोबत प्रचंड आकाराचे दगड वाहून आणले आणि त्यांच्या मार्गात येणारी प्रत्येक वस्तू उद्‌ध्वस्त झाली.
हे परमेश्वराचे प्रतिक असणार्या केदारनाथा , तुझ्या गाभार्यात आणि देवालयाच्या परिसरात असंख्य भक्तांच्या प्रेतांचा सडा पडलेले दृश्य पाहून मन विषण्ण झाले. हे कसे झाले? " देव तरी त्याला कोण मारी ?" असे म्हणतात. तुझ्यावर असीम भक्ती असणारी ही मंडळी तुला भेटण्यासाठी देशातून निरनिराळ्या ठिकाणाहून हालअपेष्टा सहन करत तेथे आली आणि नाहीशी झाली.  हे असे कसे झाले ? तुझा त्यांच्यावर एवढा राग का? तेंव्हा तू ह्या ठिकाणाहून कुठे निघून गेलास ? तुझे अस्तित्व आहे का? ह्यावरच लोकांचा विश्वास उडाला आहे. तुला भेटायला येणारी असंख्य माणसे  ह्यापूर्वी ही नाहीशी झाली आहेत . ती घरी परतली नाही. असे अनेकदा ऐकले होते. जे सुखरूप परत येत ते केदारनाथाची  कृपाच समजत असत . पण तो काळ वेगळा होता. त्यावेळी प्रवास अधिक कठीण होता. आज तो थोडासा सुखकर तरी आहे.रस्ते आहेत. चांगली वाहने आहेत . ही माणसे तुझ्या मंदिराच्या परिसरातच  गेली. तेंव्हा तूच त्या ठिकाणाहून निघून कसा गेलास? तुझे निवास तसेच उभे आहे."देव नाही देव्हार्यात" असे कसे झाले? आजूबाजूचे सर्वच  नाहीसे झालेले दिसते.
जे देव नाही असे मानतात ते म्हणतात "तुमचा देव कुठे गेला?ह्या देव भक्तांना देव दिसला कां ?,असे विचा रतात ."जे देव आहे असे मानतात ते तर गेले. पण त्यांचे जवळचे नातेवाईक विचारतात ," देवा , असे कां केलेस ? त्यांना आमच्यापासून कां हिरावून नेलेस? तुझ्या वरची असीम भक्ती फारशी उपयोगी पडली नाही ?".
आता प्रश्न पडतो देवा, तुझे अस्तित्व आहे कां ? असेल तर तू कुठे आणि कसा  आहेस? ह्या प्रश्नाचा जेंव्हा विचार करू लागतो तेंव्हा " निसर्ग हाच देवाचे रूप आहे ,असे म्हणतात ते खरे आहे पण हा निसर्ग ही फार लहरी आहे आणि रौद्र रूप धारण करून अनेकांचा विनाश करतो.त्यालाच लोक देवाचा कोप म्हणतात. 
" पृथ्वी आप तसे तेज वायू आकाश पाचवे" असे म्हणून आम्ही निसर्गाला म्हणजे ह्या पंचमहाभूताना  देव मानतो. अशा निसर्गाची आम्ही प्रतीकात्मक पूजा करतो.ह्या विश्वाचा निर्माता म्हणून तुझ्याकडे पहातो.आता तर विज्ञानाने ह्या विश्वाच्या पलिकडेही अनेक विश्वे आहेत असे शोधून काढले आहे. मग ह्या विश्वातील होणार्या घडामोडीस कोण जबाबदार आहे? ब्रम्हा,विष्णू आणि  महेश ह्या त्रि-मूर्ती पैकी तू एक  म्हणून केदारनाथला  महेशा. तुझ्या दर्शनासाठी  ही भक्त मंडळी  आली आणि तुझ्याच प्रांगणात नाहीशी झाली. हे असे कसे झाले? ह्याचेच उत्तर शोधायचे आहे.
पंचमहाभूतांची महायुती झाली की महाप्रलय होतो हे ह्या घटनेवरून सिद्ध होते. हिमालयाच्या रांगा( पृथ्वी ) , बर्फाच्छादित हिमशिखरे आणि ओसंडून वाहणाऱ्या नद्या ( आप) , सूर्याची उष्णता ( तेज ), सोसाट्याचा वारा ( वायू )आणि ढगफुटी मुळे ( आकाश ) येणारा पाऊस ह्या पंचमहाभूतानीच हा प्रलय घडवून आणला हे खरे आहे .दरडी र्कोसळणे , नद्यांना पूर येणे , रस्ते वाहून जाणे हे हिमालयात नवीन नाहीच. हा निसर्ग तसाच आहे .
 हा निसर्ग विविध रूपे घेतो. तो अतिशय सुंदर आहे . शांत आहे. प्रसन्न आहे. मनाला विलक्षण शांती देतो. हिमालयाचा हा परिसर ही देव भूमीच आहे. त्यामुळेच आदी शंकराचार्य येथे  आले. १००० वर्षापूर्वी त्यांनीच येथे तुझी प्रतिष्ठापना केली. गुरु गोविद सिंगजिना इथेच यावेसे वाटले. जवळच असलेल्या हेमकुंड येथे त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झाली. हिमालयाचे हे अध्यात्मिक वेड बर्याच जणांना लागले. सर्वच मोठ्या विभूती हिमालयात जावून दिव्य दृष्टी प्राप्त करून घेतात. वानप्रस्थाश्रमात गेलेले आमच्यासारखे सारेच सामान्य लोक चारधाम यात्रा करून आनंद आणि समाधान मिळवत घरी परततात. मानसिक समाधान आणि अध्यात्मिक आनंद मिळवण्यासाठी ही सारी मंडळी चारधाम यात्रा करतात .ते चारधाम आज मृत्यूधाम झाले. चारधामचा  हा निसर्ग मन:शांती देतो. जेंव्हा निसर्ग शांत असतो तेंव्हाच ते येथे येण्याची हिम्मत करतात. निसर्गाचे अक्राळविक्राळ रूप त्यांना माहीत नसते असे नाही . त्यांनी फक्त ऐकलेले असते. असा हा अक्राळविक्राळ निसर्गही  तुझेच एक रूप आहे  "शंकराचा रुद्रावतार काय असतो? हे आम्ही डोळ्यांनी पाहिले, पन्नास फूट उंच उसळणाऱ्या लाटा, काड्या आणि डब्याप्रमाणे वाहणारे लोक आणि त्यांची वाहने. जणू महादेवाने आपला तिसरा डोळाच उघडला असावा. ज्यांना सामावून घ्यायचे होते , त्यांना सामावून घेतले, मात्र आम्ही शंकराच्या इच्छेमुळेच वर जाऊ शकलो नाही. केदारनाथला गेलो असतो तर आज आम्ही जिवंत राहिलो नसतो," अशा शब्दांत या केदारनाथ यात्रेतील संकटातून सुखरुप परतलेल्या यात्रेकरूंनी आपल्या भावनांना वाट करून दिली.
"केदारनाथ दर्शनासाठी आलो, मात्र मंदिरावर गेलो नाही. घोडेवाल्यांनी जाण्यास ‌नकार दिला. तेवढ्यातच जोरात आवाज आला. अन् पाण्याचा प्रचंड प्रवाह येत असल्याचे काही लोकांनी सांगितले. आम्ही लॉजमध्ये थांबलो होतो. पाण्याचा डॅम फुटला की काय असे वाटले , पाण्याचा प्रवाह वाढलयाने आम्ही लॉजच्या तिसऱ्या मजल्यावर चढलो. आम्ही आणि आमचा ग्रुप वर चढण्यात यशस्वी झाला, मात्र जे  लोक तिसऱ्या मजल्यावर चढू शकले नाहीत. ते पाणी आणि गाळाच्या प्रवाहात हरवून गेले. हे दृष्य आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले." असे वर्णन तुझ्या भक्तांनी केले. तुझ्या प्रांगणातच जन्म आणि मृत्यू यामध्ये किती सूक्ष्म सीमारेषा आहे त्याचं भयाण दर्शन मन सुन्न करून टाकत होतं. असं हे यात्रेकरू सांगत होते." मृत्यू आमचा पाठलाग करीत होता. आम्ही केदारनाथ सोडले व काही वेळातच महाप्रलयाला सुरुवात झाली. हा प्रलय आमचा पाठलाग करीत होता व आम्ही पुढे-पुढे पळत होतो. पाण्याने रौद्ररूप घेतले होते. वाटेत येणारी घरे, झाडे, टेकडय़ा सर्वकाही बाजूला सारून पाणी पुढे जात होते. जाताना आम्ही तेथील निसर्गाचा आनंद घेतला, पण परतताना त्याच निसर्गाचे भयावह रूप पाहिले." ढगफुटी हेच प्रमुख कारण असले तरी येथील निसर्ग असाच आहे. केदारनाथ मंदिर हे बर्फाच्छादित हिमालयात आहे.फक्त चार महिने त्या ठिकाणी जाता येते. मंदिराच्या मागे ज्या हिमालयाच्या रांगा आहेत त्यामध्ये तीन ग्लेसिअर आहेत. ह्या पैकी एखादी ग्लेसिअर फुटली की प्रंचंड वेगाने पाण्याचा प्रवाह सुरु होतो , नद्या दुथड्या भरून वाहू लागतात. पाण्याने झिजलेला डोंगर कोसळू लागतो आणि असा महाप्रलय होतो. अशा ह्या निसर्गाचा तू निर्माता , संरक्षण कर्ता आणि विनाश कर्ता. बद्रीनाथचा संरक्षक देव विष्णूही हताश झालेला दिसला. गन्गौत्रीची गंगा माय ही अशीच रुसली. भागीरथी आणि अलकनंदा ह्यांनी रौद्र रूप धारण केले. अभूतपूर्व महाप्रलयाने अनेकांचे जीव घेतले. मृत्यू सातत्याने पाठलाग करीत असताना त्याच्या दाढेतून काही जण सुखरूप परतले, त्यामुळे त्यांचा नवा जन्मच झाला , अशी भावना उत्तराखंडमधून परतलेल्या अनेक यात्रेकरूंनी व्यक्त केली. तू सुखकर्ता,दुखहर्ता असूनही विघ्नकर्ता कसा झालास ? त्यामुळेच तुझे अस्तित्व आहे का? असा  प्रश्न काही जण  विचारतात तेंव्हा तू नसावास असेच काही जणांना वाटते ते स्वाभाविकच आहे.
श्रीकृष्णाने अर्जुनाला तुझी निरनिराळी रूपे समजावून सांगितली. नव्हे तुझे अक्राळविक्राळ रूपच प्रत्यक्ष अर्जुनास दाखविले. विनोबांनी "गीताई" मध्ये तुझ्या त्या भयानक रूपाचे जे  वर्णन केले तेच आज माझ्या डोळ्यासमोर उभे राहते आणि हे पटते की तू विश्वनिर्माता असल्यामुळेच ही वेगळी वेगळी रूपे घेतो.
आज जे केदारनाथच्या आणि हिमालयाच्या ह्या परिसरात घडले आहे ते घडविणारा तूच आहे. तूच निर्माता आणि तूच नष्ट करणारा.
"गीताई"तील तुझे वर्णन असे आहे ……
'उत्पत्ती-नाश भूतांचे ऐकले मी " नाश करण्याचा हा तुझाच महिमा विलक्षण विषण्ण करून गेला 
"पहा दिव्य तशी माझी रूपे शत- सहत्र तू"  हे  खरे असले तरी " पहा अनेक आश्चर्ये कधी कोणी नं पाहीली ".असे हे अघटीत घडले तुझ्या दारी असे म्हणण्याची वेळ आली.
हिमालयाच्या परिसरातील हा  निसर्ग म्हणजे ,"
 दिव्य वस्त्रे फुले गंध लेउनी सर्वतोपरी ,
 आश्चर्ये भरला देव विश्व-व्यापी अनंत तो "
म्हणूनच सारेजण चारधाम यात्रा करतात. 
जिथे जिथे तू चि अनंत-रूपे ", म्हणूनच सारे तुझी विविध रूपे ह्या निसर्गात बघत असतात...
 भागीरथी , मंदाकिनी , पुष्पावती , अलकनंदा. गंगा, यमुना ह्या सर्व नद्यांचे प्रवाह नुसते अवखळ झाले नाही तर त्यांनी आजूबाजूच्या परिसरातील अनेकांना मुखात घेतले. एवढेच काय शिवाची प्रचंड मूर्ती ही वाहून गेली.
तुझ्या समोर तर अनेकांनी जीव सोडला. मंदाकिनीने सर्वाना गिळंकृत केले.
तसे चि लोक तुझ्या मुखात 
घेती उद्या वेग-भरे माराया 
दाही दिशा विस्तृत अंतराळ 
व्यापुनी तू एक चि राहिलासी
पाहुनी हे अद्भुत उग्र रूप 
तिन्हीजगे व्याकुळली उदारा
असे हे तुझे उग्र आणि अक्राळविक्राळ रूप पाहून मन विषण्ण आणि दिग्मूढ  होते आणि तुझ्यावरचा विश्वास उडू लागतो. तुझे हे उग्र आणि रौद्र रूप फार भयानक असे दिसून आले. पर्जन्य ही सुद्धा देवता म्हणून पूजिली जाते त्या पर्जन्याने ही हा  हाहा:कार केला. आणि मग असा प्रश पडतो की 
सांगा असा कोण तुम्ही भयाण 
नमूं तुम्हां देव-वर न कोपा 
जाणाव्या उत्सुक आदि देवा 
ध्यानी न ये की करणी कशी ही 
मनाने सर्वस्वी तुझा ध्यास असलेले , बुद्धीने तुझे श्रेष्ठत्व मान्य केलेले आणि आपला अहंकार गुंडाळून तुझ्यापुढे नतमस्तक होण्यासाठी  हे सारे भक्तगण तुझ्या दर्शनासाठी शारीरिक पीडा सहन करीत मोठा दीर्घ प्रवास करून तुझ्या मंदिरात प्रवेश करण्यासाठी आले आणि तेथेच हे जग सोडून गेले हे पाहून तुझ्या अस्तित्वाची शंका येणार नाहीतर काय?  तुझ्या देखत हे घडलेच कसे असा प्रश्न मनाला भेडसावीत रहातो." देव नाही देव्हार्यात" असेच वाटू लागते.

महाप्रलयानंतरचे  केदारनाथ  


डॉ नरेंद्र गंगाखेडकर 
drnsg@rediffmail.com






















Thursday, June 13, 2013

दुसर्या महायुद्धाच्या खुणा ::कोहिमा आणि इम्फाळ


Second World War Memorial, Kohima

दुसर्या महायुद्धात प्रत्यक्ष ज्या भारतीय प्रदेशांना झळ बसली ते प्रदेश म्हणजे आजचा नागाल्यान्ड आणि मणिपूरचा भाग.कोहिमा आणि इम्फाळ ह्या ठिकाणी प्रत्यक्ष युद्धभूमी होती. शेजारी ब्रम्हदेश. जपानी सैन्य ह्या भागात येउन पोहोंचले होते. ब्रिटिशानीं जपानी सैन्याला थोपवून धरले होते. नेताजी सुभाष ह्यांची आझाद हिंद सेना येथेच कार्यरत होती. त्यांचे प्रमुख कार्यालय इम्फाळ पासून ३० कि. मी. अंतरावरील मोइरांग येथेच होते. त्यामुळे ह्या दोन्ही ठिकाणांना भेट देण्याचे ठरविले होते. ह्या दोन्ही ठिकाणीं दुसऱ्या महायुध्दाच्या खुणा आजही बघावयास मिळतात.
INA WAR Memorial
 पूर्वांचलचा दौरा अरुणाचलमधील तवांगपासून सुरु केला. त्याचे प्रमुख कारण म्हणजे १९६२ चे चीन बरोबर जे युद्ध झाले होते ती युद्ध भूमी पहावयाची होती. हिमालयाचा तो दुर्गम प्रदेश पहावयाचा तर होताच पण अरुणाचलचे आगळे वेगळे सौन्दर्य आणि संस्कृती जवळून पहावयाची होती. तवांगहून परतलो. काझीरंगाचा रोमांचकारक अनुभव घेतल्यानंतर आम्ही निघालो कोहिमाकडे. कोहिमा ही नागाल्यान्डची राजधानी. रस्ते तसे बरे होते. सर्वत्र हिरवाई. डोंगराळ भाग. सुखद प्रवास. तसा दुर्गम प्रदेश.
आय एन ए स्मारक 
कोहिमा हे अनगामी नागा आदिवासीचे गांव. नागा ही ह्या भागातील मुख्य आदिवासी जमात. त्यांच्यावर कोणाही राजाचे राज्य नव्हते. केवहिमाचा अपभ्रंश म्हणजे कोहिमा. एक लाख वस्तीचा हा नागा प्रदेश. १०,००० चौ.की.मी क्षेत्रफळ .ब्रिटिशानां हा प्रदेश ताब्यात घेण्यासाठी खूप वर्षे लागली . शेजारीच थोड्या अंतरावर ब्रम्हदेश.१८४० मध्ये ब्रिटीशानीं कोहीमावर पहिली स्वारी केली. त्यानंतर तब्बल ५० वर्षांनी त्यांनी कोहीमावर कबजा मिळविला.
नागा संस्कृती वेगळीच आहे. त्यांची राहणी वेगळी. खाणे-पिणेही वेगळे. चालीरीती आणि पेहराव वेगळे. त्यांच्यात अनेक पोटजाती. त्यांची बांबूची घरे फारच आकर्षक. वास्तुकलेचा उत्तम नमुना. प्रत्येक घरावर एक विशिष्ट खूण असलेले हत्यार. त्यावरून त्यांची जमात ही ओळखता येते असे म्हणतात. त्यांचे नृत्य ही विलोभनीय. नागा पेंटिंग , नागा खेळ, नागांची लाकूडकामाची कलाकुसर, त्यांची शिल्पकला, त्यांचे संगीत ,लोकनृत्य सारेच वेगळे.
नागा संस्कृतीचा इतर भारतीय संस्कृतीशी फारसा जवळचा संबंध दिसत नाही. मिशनरी प्रभाव दिसून येतो . अलीकडे साक्षरता ७० टक्क्या पर्यंत वाढली आहे . कोहिमामधील तरुण मुले- मुली जीनमध्ये आणि आधुनिक ड्रेस मध्ये फिरताना दिसतात. त्यांचा आधुनिक पेहराव म्हणजे नव्या युगाकडे वाटचाल. ब्रिटिशानीं आणि मिशनरी लोकांनी ह्या भागात बरीच वर्षे वसाहत केल्यामुळे त्यांचा प्रभाव निश्चितपणे पडला आहे हे सहज दिसून येते.
दुसर्या महायुद्धात ब्रिटीश सैन्याला जपानी सैन्याशी लढा द्यावा लागला ते कोहिमाच्या ग्यारीसन हिलवर. युमनम ह्या इतिहासकाराच्या मते ब्रिटिशानीं जपानी लोकांच्या बरोबर केलेली ही सर्वात मोठी लढाई. १९४४ चे कोहिमा आणि इम्फाळचे युद्ध हे सर्वात मोठे युद्ध असे ब्रिटीशानीं अलीकडेच जाहीर केले आहे. ह्या युद्धामुळेच खरी कलाटणी मिळाली आणि ब्रिटिशानां भारत सोडून जाण्याचा निर्णय घ्यावा लागला हे खरे सत्य आहे. ह्या युद्धात जपानचा विजय झाला असता तर सारे चित्रच  वेगळेच झाले असते. पण हे झाले जर तर. जपानची आक्रमकता संपुष्टात आली असली तरी ब्रिटीश साम्राज्य मात्र खिळखिळे झाले ते ह्या एका युद्धामुळे. " लढा किंवा मरा (Do or Die)" ह्या घोषणेला समोर ठेऊन ब्रिटीश सैन्य लढले. ३ एप्रिल१९४४ ला कोहीमाचे युद्ध सुरु झाले.१५०० ब्रिटीश सैनिक आणि १०००० जपानी सैनिक ह्यांच्यातील हे तुंबळ युद्ध. ह्या युद्ध भूमीला भेट देणे हेच कोहीमाचे प्रमुख आकर्षण. ब्रिटिशाना अभिमान वाटावा असा पराक्रम त्यांनी ह्या रणभूमीवर केला. असंख्य ब्रिटीश सैनिक ह्यात मारले गेले. त्यांत भारतीय सैनिकही होते. ते ब्रिटिशासाठी लढत होते. दोन आठवडे चाललेले हे धमासान युद्ध. त्या युद्ध भूमीवर जे सैनिक धारातीर्थी पडले त्यांचे युद्ध स्मारक म्हणजे तेथील दफनभूमी. कॉमन वेल्थ वार ग्रेव्ह कमिशन ह्या दफनभूमीची देखभाल करते. असंख्य ब्रिटीश नागरिक त्यांच्या मृत नातेवाईकाना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुद्दाम येथे येतात. ही सिमेट्री शहराच्या मध्यभागीच आहे. कोहिमा ब्याटल ऑफ टेनिस कोर्ट म्हणून ह्या ठिकाणाचा उल्लेख केला जातो. त्या ठिकाणी खालील दिलेल्या काव्यपंक्ती कोरल्या आहेत:


WHEN YOU GO HOME,
TELL THEM OF US AND SAY,
FOR YOUR TOMORROW,
WE GAVE OUR TODAY

जॉन म्याक्स एड्मोंड ह्यांच्या ह्या  काव्यपंक्ती कोहिमा काव्य म्हणून प्रसिद्ध आहेत.
नागा नृत्य
कोहीमाला नागा संस्कृतीची झलक पहावयाची असेल तर तेथील नागा मुझीयम बघितले पाहिजे. फार सुंदर पद्धतीने मांडणी केली आहे. तसेच दर डिसेम्बर मध्ये नागा व्हिलेज मध्ये होणारे होर्न बिल महोत्सव पहाण्यासारखा असतो. आम्ही तेथे गेलो तेंव्हा त्या महोत्सवाची जोरदार तयारी चालू होती. फुटीरतावादी चळवळ हाच येथील प्रमुख सामाजिक - राजकीय प्रश्न. देशातील प्रमुख राजकीय पक्ष येथे प्रभावीत नाहीत .प्रादेशिक अस्मिता हे महत्वाचे प्रमुख कारण. ते तर आपल्या सर्व प्रांतातून दिसून येतेच.
कोहिमा सोडले आणि इम्फाळकडे निघालो. आठ तासाच्या प्रवासासाठी बारा तास लागले. रस्ते फारच वाईट. ह्या सर्व राज्यामधून प्रवास  करावयाचा तर दुसरे काहींच दळणवळणाचे मार्ग नाहीत. त्यामुळे पर्यटक येत नाहीत.
नागा योद्धा
मणिपूर मधील महत्वाचे ऐतिहासिक ठिकाण म्हणजे मोइरांग. इंफाळ पासून ३० कि. मी. अंतरावर. आझाद हिंद सेनेचे प्रमुख कार्यालय ह्या  ठिकाणीच होते . त्या ठिकाणी जायचे होतेच. पण त्यापूर्वी इंफाळ ह्या राजधानी असलेल्या शहराचा फेरफटका केला.१८९१ ते १९४७ पर्यंत राज घराण्यांनी मणिपूरवर राज्य केले. १९५६ पर्यंत केंद्र शासित असलेल्या मणिपूरला १९७२ मध्ये संपूर्ण राज्याचा दर्जा मिळाला. फुटीरतावादी संघटनेच्या कारवाया येथेही चालूच असतात .श्री श्री गोविंदाजी देऊळ हे सर्वात जुने मंदिर. येथील राजाचे पुजास्थान. येथील प्राचीन संस्कृतीचे एक प्रतिक. मणिपुरी नृत्य ही जुनी लोककला. त्यातील रासलीला सर्वात प्रसिद्ध. मणिपूरमध्ये संपूर्णपणे स्त्रियांनी चालविलेले लिमा मार्केट प्रसिद्ध आहे. सर्व व्यवहार फक्त स्त्रियाच बघतात. स्त्री-प्रधान संस्कृतीचे प्रतिक. लोकताक हे लेक बघण्यासारखे आहे. प्रचंड. जणू काही समुद्रच. ब्रम्हदेशाची सीमा फक्त ६९ कि. मी. अंतरावर आहे. इंडो- बर्मा रोडवर थोड्याशा उंचावर गेलेकी ब्रम्हदेश दिसतो.
नेताजी सुभाष चंद्र बोस ह्यांनी मोरीयांगहून आझाद हिंद सेनेची सूत्रे हलविली होती  त्या ठिकाणास भेट दिली.१९४३ मध्ये जेंव्हा जपानी लष्कराने मलय पेनिन्सुला ब्रिटीश लोकांच्या ताब्यातून घेतला तेंव्हा ब्रिटीश सैन्यात असलेले हजारो भारतीय सैनिक त्यांचे युद्धबंदी होते. नेताजींनी जपानी सरकार बरोबर करार केला आणि त्या भारतीय युद्ध कैद्यांना सोडविले आणि आझाद हिंद सैन्यात सामील करून घेतले. त्यावेळी सिंगापूर मध्ये स्वतंत्र भारताची घोषणा केली. त्या पूर्वी म्हणजे १९४२ मध्ये मोईरांगला आझाद हिंद सेनेचे प्रमुख कार्यालय होते. नेताजी सुभाष ह्यांनी ह्याच ठिकाणी म्हणजे १४ एप्रिल १९४४ ला भारताचा तिरंगा फडकावून स्वतंत्र भारताची घोषणा केली. आज त्या ठिकाणी INA म्युझियम उभे आहे. १९६७ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्याचे उद्घाटन केले होते.
नेताजी सुभाष ह्यांनी येथे स्वातंत्र्याची घोषणा केली
 इंफाळ आणि कोहिमा ह्या ठिकाणी जे युद्ध झाले त्यावेळी जपानी लष्कराला आझाद हिंद सेनेने बरीच मदत केली. आपण अहिंसक मार्गाने स्वातंत्र्य मिळविले असा आपला एक समज. पण दुसर्या महायुद्धात कोहिमा आणि इंफाळच्या लढायामुळेच इंग्रजांनी भारत सोडण्याचा निर्णय घेतला असे इतिहासकारांना आजही  वाटते त्यात बरेच तथ्य आहे. " दिल्लीला चला" " अशीच घोषणा नेताजींनी केली होती. आझाद हिंद सेनेने ह्या भूमीवर रक्त सांडले आणि इंग्रजांचे धाबे दणाणले होते हे एक सत्य आहे. रॉयल इंडिया नेव्ही मधील नाविकांचे बंड आणि ब्रिटीश सैन्यात असलेल्या भारतीय सैनिकावरील उडालेला विश्वास ह्या दोन प्रमुख कारणामुळे इंग्रजांनी भारत सोडून जाण्याचा निर्णय घेतला हे आझाद हिंद सेनेचे यश. गांधीजींच्या अहिंसक चळवळीपेक्षा हा दबाव अधिक होता हे त्यावेळच्या ब्रिटीश पंतप्रधानांनी मान्य केले होते हे एक सत्य. ब्रिटीश सरकारने अजूनही काही कागदपत्रे गुप्त ठेवली आहेत. बी बी सी न्यूजने असे स्पष्टपणे सांगितले आहे की कोहीमाचे युद्ध आणि नाविकांचे बंड ह्यांच्यामूळेच भारत सोडण्याचा निर्णय घेण्याचे ठरले होते. 
गांधीजींच्या अहिंसक मार्गाने इंग्रज जातील असा विश्वास नेताजी सुभाष ह्यांना नव्हता. १९३१ चा गांधी - आयर्विन करार त्यान मान्य नव्हता. म्हणूनच त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. "शत्रूचा जो शत्रू तो आपला मित्र" ह्या युद्धनीती प्रमाणे जपानी सरकार बरोबर त्यांनी  हात मिळवणी केली. भारतीय सैनिक जे जपानचे युद्ध कैदी होते त्यांना आझाद हिंद सेनेत सामील करून घेतले. लढा तीव्र केला." तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो" ही नेताजींची घोषणा, त्यासाठी त्यांनी उभे केलेली आझाद हिंद सेना , जपान बरोबर केलेला करार, युद्धबंदी भारतीय सैनिकांची सुटका आणि त्यांचे आझाद हिंद सेनेत सामील होणे ह्या सर्व बाबींचा विचार केला आणि ही युद्धभूमी बघितलिकी त्यांच्या लढण्याच्या वृत्तीचे दर्शन होते. अशा ह्या दुर्गम भागात राहून त्यांनी हे सर्व कसे उभे केले असेल ह्याचेच आश्चर्य वाटू लागते. मोइरांगचे INA WAR मेमोरिअल बघीतले की स्वातंत्र्य लढ्याचे ते सोनेरी पान समोर येते आणि आपण नतमस्तक होतो. कोहिमा आणि इंफाळ ह्यांना भेट दिली की दुसर्या महायुद्धाच्या ह्या खुणा तर दिसतातच पण आझाद हिंद सेनेचे कार्य अचंबित करून टाकते.
आजही हा सगळा पूर्वांचल अस्थिर आहे. अशांत आहे. प्रादेशिक अस्मितेचा जसा प्रश्न आहे तसाच आदिवासी आणि आदिवासी नसलेल्यातील संघर्ष आहे.
गोविंदजी मंदिर , इम्फाळ
उत्तर पूर्व प्रांतातील अनेक तरुण आणि तरुणी दिल्ली, बंगलोर ह्या ठिकाणी शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी वास्तव्य करतात.त्यांना इतर भारतीय लोकांचा फारसा चांगला अनुभव येत नाही.त्यांचे दिसणे थोडेसे निराळे आहे. चपटे नाक आणि बारीक किलकिले डोळे.इतर भारतीय लोक उंच नाकाचे आणि मोठ्या डोळ्यांचे असतात.त्यामुळे हे थोडे वेगळे दिसतात. मंगोल वंशीय असे दिसणे इतर भारतीय लोकांना वेगळे वाटते. त्यांच्या अशा दिसण्यावरून ते भेदभाव करतात,ह्याचा पूर्वांचलाच्या मुलामुलीना फार राग येतो. त्यात चूक काहीच नाही. आपण ह्या दिसण्यावरून टीका करणे योग्य नव्हे. हे इतर भारतीयांनी समजून घेतले पाहिजे. तसेच पुर्वांचलातील ट्रायबल जमातींना मानाने वागविले पाहिजे.
लोकताक  लेक ,इंफाळ
भारतीय एकात्मतेसाठी अजून खूप प्रयत्न करावयास पाहिजेत. भारताची ही उत्तर- पूर्व सीमा सुरक्षित राहिली पाहिजे व पूर्वांचलातील लोकांना" भारत हा माझा देश आहे"  हे मनापासून वाटले पाहिजे व इतर भारतीयांनी त्यांच्याशी कसलाही भेदभाव करता कामा नये.
अविकसित भागातील ह्या जमातींना योग्य ती विकासाची संधी देणे फार महत्वाचे आहे. त्यांची संस्कृती आणि राहणीमान थोडे वेगळे आहे पण त्यांना सामावून घेणे फार महत्वाचे आहे. इतर भारतीय लोकांचे हे काम आहे हे ह्या प्रवासात विशेष जाणवले.एकात्म भारतासाठी हे करणे अत्यंत आवश्यक आहे.



डॉ नरेंद्र गंगाखेडकर
drnsg@rediffmail.com



Sunday, May 26, 2013

यशाचे रहस्य - तडजोड वृत्ती


तडजोड करणे हेच यशाचे रहस्य आहे असे काहींना वाटत असते. ते काहीं अंशी खरे आहे असे वाटते. नेहमीच ते बरोबर असते असे नाही. तडजोड वृत्ती ( compromising attitude ) असावी कां नसावी? , असा प्रश्न मला नेहमीच पडतो. ह्या वरून मला माझ्या संशोधन गुरूंची आठवण झाली. माझे सर डॉ एन के चौधरी हे पदार्थविज्ञान शास्त्रात डॉक्टर ऑफ सायन्स ( D.Sc,) होते.पदवी मिळवण्यापूर्वीच त्यांचे १८ पेपर्स जगातल्या ख्यातनाम संशोधन मासिकातून प्रसिद्ध झाले होते. त्यांचे नाव सर्वत्र झाले होते. मी त्यांच्या मार्गदर्शनाखालीच संशोधन केले आणि त्यानंतर मला पदवी मिळाली. ते निवृत्त झाले तेंव्हा त्यांच्या करिता आम्ही एक निरोप समारंभ आयोजित केला होता .त्या समारंभात त्यांच्या विषयी बोलतांना एक जेष्ठ प्राध्यापक म्हणाले," डॉ . चौधरींचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यात नसलेली तडजोड वृत्ती.संशोधकाजवळ तडजोड वृत्ती नसावी. NON - COMPROMISING  ATTITUDE  हा संशोधकाचा मोठा गुण असतो ".माझ्या हे चटकण लक्षात आले. विज्ञानात प्रयोग करताना तो वारंवार करावा लागतो. अनेक वेळा पडताळूण पहावा लागतो .मी सात आठ वेळा प्रयोग करून तोच निष्कर्ष काढला तरी त्यांचे समाधान होत नसे .ते स्वतः प्रयोग करताना समोर उभे रहात असत आणि त्यांची खात्री झाली तरच ते मान्यता देत असत. त्यावेळी मला असे वाटत असे की त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास नाही. पण ते खरे नव्हते .अचूकता आणि परिपूर्णता हवी असेल तर तडजोड करता कामा नये हे मी त्यांच्याकडूनच शिकलो.
विज्ञानाचा विद्यार्थी असल्यामुळे आणि गुरूंच्या हाताखालीच संशोधन केल्यामुळे माझी तडजोड नं करण्याची वृत्ती होत गेली. तो माझ्या स्वभावाचा एक अंगभूत गुण होत गेला. त्यामुळे माझे बरेचसे नुकसान होत आहे हे मला समजत होते. ते होणारच असे ही माहित होते. पण माणसाचा तो पिंड एकदा तयार झाला की त्याला त्याचे काहीही वाटत नाही . माझेही तसेच झाले .
त्यानंतर मी एका मोठ्या कंपनी मध्ये संशोधन आणि व्यवस्थापन ह्या दोन्ही विभागात काम करू लागलो.मला दोन बॉस होते. एक तंत्रशास्त्र प्रमुख तर दुसरे गणकशास्त्र विभाग प्रमुख.दुसरे बॉस व्यवस्थापन शास्त्रातील विशेष तज्ञ म्हणजे एम .बी ए. होते आणि त्यांचा कोणत्याही प्रश्नाकडे किंव्हा समस्येकडे बघण्याचा दृष्टीकोन सर्वस्वी वेगळा होता. व्यवस्थापन शास्त्र हे तसे विज्ञान नाही .ती एक कलाच आहे असे मला वाटत असे. त्यामुळे आमचे अनेक वेळा वाद होत असत. नंतर मला कळले की शास्त्र किंवा तंत्र ह्या मध्ये जे तज्ञ असतात त्यांना व्यवस्थापन तितकेसे जमत नाही. माझेही तसे होऊ लागले, हे माझ्या लक्षात येऊ लागले.तेंव्हा मी व्यवस्थापन तज्ञ बॉस कडून बरेच काहीं शिकण्याचा प्रयत्न करू लागलो आणि थोडा शिकलोही. त्यांनी मला तडजोड का आणि कशी करावी लागते हे अनेक वेळा सांगितले.व्यवस्थापनामध्ये तडजोड करावीच लागते.ते चांगले जमले पाहिजे.त्यामुळे व्यवस्थापनामध्ये अनेक समस्या समोर येतात तेंव्हा तडजोडीनेच मार्ग काढावा लागतो हे माझ्या लक्षात येऊ लागले.

पुढे स्वतःच्या हाय टेक टेक्नोलोजीच्या  विक्री व्यवसायात काम करताना विली कॉर्नेलीअस ह्या जर्मन व्यक्ती बरोबर अनेक वर्ष काम करण्याची संधी मला मिळाली .त्याची सेल्समन म्हणून इतकी ख्याती होती की एस्किमोलाही फ्रीज किती आवश्यक आहे ,हे तो नुसते पटवून देणार नाही तर विकून येईल इतके त्याचे व्यक्तिमत्व प्रभावी होते. हाय टेक्नो वस्तू कशी विकावी हे त्याला चांगलेच अवगत होते .एकदा असेच भारताच्या दौर्यावर असताना तो मला म्हणाला," मला माहित आहे की आपल्या स्पर्धकापेक्षा आपली टेक्नोलॉजी थोडी कमी आहे परंतु आपण तरीही ती विकली पाहिजे .जगतविख्यात गणकयंत्र बनविणाऱ्या कंपनीचेचे गणक यंत्र सुरवातीला दुय्यम दर्जाचे होते पण त्यांनी खूप विक्री करून भरपूर पैसा कमविला आणि नंतर नवी वेगळी टेक्नोलॉजी बाजारात आणली. आपणही असेच करणार आहोत. विक्री व्यवसायात असेच करावे लागते .थोडे अधिक तिखट मीठ लावून सांगावेच लागते .हा काहीं शोध निबंध नाही की गहण चर्चा नाही". त्यावेळी मला हे पटले नाही .माझी वृत्ती वेगळी होती . मी तंत्रज्ञ होतो. माझी शास्त्रीय वृत्ती होती. आहे हे असे आहे . आमचे तंत्रज्ञान असे आहे .त्याची किमंत ही आहे. घ्यायचे असेल तर घ्या.त्यावर कोणताही डिस्काऊन्ट मिळणार नाही .त्यावर विलीचे उत्तर असे ," तुम्ही कितीही मोठे तंत्रज्ञ असाल ते फारसे महत्वाचे नाही तर ग्राहक आणि विक्रेता ह्यांच्यात संवाद चालू असताना दोघांनाही Win- Win असे वाटले पाहिजे व शेवटचा सौदा पटवता आला पाहिजे. माणसाने प्रथम स्वतःचे व्यक्तिमत्व विकले पाहिजे. First, you must sell yourself. ह्याचा अर्थ तुम्ही विकले जाऊ नका पण स्वतःचे व्यक्तिमत्व विका असा आहे.हे लक्षात घेणे म्हत्वाचे आहे. एकदा तुमच्याबद्दल चांगले मत झाले की पुढचा मार्ग सुकर होत जातो.म्हणजे तडजोड कशी असावी तर दोघांनाही विन- विन ( Win-Win) असे वाटणारी .
जगण्यामध्ये उठतां बसतां तडजोड ही करावीच लागते. वैवाहिक जीवन सुखी करावयाचे असेल तर नवरा-बायकोला तडजोड करणे आवश्यक आहे,  हे सर्वांनाच माहित आहे.कौटुंबिक जीवनात कलह नको असेल तर इतर कुटुंबियांचे म्हणणे ऐकणे भागच असते. म्हणजे तडजोड ही आलीच .
राजकारणाचे तर सोडाच. ते तर तडजोडीचे राजकारण असते.राजकारणातील काहीं उदाहरणे सहज देता येतील. इंदिरा गांधींनी युद्ध जिंकले पण भुत्तो ह्यांच्या बरोबर सिमला करार करून युद्धात जे मिळवले ते घालवले."आम्ही जिंकलो, आम्ही हरलो" अशी आपली अवस्था झाली. आज ही पाकिस्तानची भूमिका फारशी बदललेली नाही. वाजपेयी- मुशर्र्फ बोलणी फिसकटली कारण वाजपेयी ठाम होते म्हणून.पण त्या वेळी सर्वाना,विशेषतः मिडियातील मंडळीना मुशर्रफ ह्यांनी प्रभावित केले होते.मिडियाने वेगळेच चित्र उभे केले होते. राजकारणात असे नेहमीच प्रभावित करावे लागते. बिल क्लिंटन आणि ओबामा हे दोन्ही अमेरिकन राष्ट्राध्यक्ष सर्वाना असेच प्रभावित करून त्यांना हवे ते करून घेतात.
१ ९ ६ २ चे चीनशी झालेले युद्ध घ्या. पंडितजींनी चीनशी झालेल्या बोलणींमध्ये "पंचशील" तत्वाचा जयघोष केला तर चीनने पाठीत खंजीर खुपसला आणि आपला प्रदेश बळकावून बसले.पंडितजींना मात्र घाव जिव्हारी बसला. तडजोड ही  विन- विन असावी लागते. "तुम्ही जिंकला, मी हरलो" अशी नसावी, हेच ह्यावरून सिद्ध होते. समाजकारणात ही तसेच असते. संस्था चालवायची असेल तर अनेक तडजोडी कराव्या लागतात. अनेकांशी तडजोड करावीच लागते.ज्या व्यक्तींना तडजोड करावयाची नसते त्या व्यक्ती " हा मार्ग माझा एकला " असे धोरण अवलंबताना दिसतात. कधी कधी ते यशस्वी होतानां दिसतात. पण त्यांचा मार्ग कठीण असतो.काहीं व्यक्तींना सर्वाना समाविष्ट करून घेण्याची कला अवगत असते आणि त्यात ते यशस्वी होतात. अशी माणसे फार थोडी असतात.
म्हणजे काही गोष्टी मिळवण्यासाठी तडजोडीला पर्याय नसतो. तडजोड करावी पण ज्याच्याशी ही तडजोड करीत असतो त्याला आपण जिंकलो असे वाटले पाहिजे व आपल्याला आपण हरलो नाही असे वाटले पाहिजे. जो अशा तडजोडी करण्यात यशस्वी होतो त्याला जगणे कळले असे समजावयास हरकत नाही .
शास्त्रज्ञ , तंत्रज्ञ असलेली माणसे uncompromising attitude असलेल्या वृत्तीची असतात त्यामुळे ती व्यवस्थापनात कमी पडतात हे बहुतांशी खरे आहे. त्यांनी इतर क्षेत्रात ही वृत्ती नं ठेवता वावरले पाहिजे तरच ते यशस्वी होतील. व्यवस्थापन अभ्यासक्रमात हे शिकवले जाते म्हणूनच ती मंडळी यशस्वी होतांना दिसतात.
मी व्यवसायात पार्टनरशिपचा प्रयोग करून बघितला.पार्टनर अतिशय हुशार असा तंत्रज्ञ होता. परंतु औद्योगिक ग्राहक त्वरीत सेवा मागतात हे त्याला कितीही सांगितले तरी पटत नसे व तो त्याच्या तंत्र पद्धतीनेच काम करीत असे. त्यामुळे नुकसान तर होतच होते पण ग्राहक ही नाराज होऊ लागले. कसली तडजोड करणार.पार्टनरशिप गुंडाळावी लागली.
मध्यम मार्ग अवलंबणे सगळ्यांनाच जमते असे नाही.पण असेच करावे लागते . ,
तडजोड हवी पण कोणीही हरू नये अशी ."मी जिंकलो , तुम्हीही जिंकलात."हे तत्व समोर ठेवोन केलेली. हे रोजच्या जीवनात लागू आहे पण शास्त्रीय आणि तांत्रिक क्षेत्रात काम करतांना मात्र अशी तडजोड चालत नाही. जेंव्हा सत्य आणि अचूकतेचा शोध घ्यावयाचा असतो तेंव्हा कोणतीही तडजोड करता येत नाही.व्यवस्थापन तज्ञ असलेल्या आणि संशोधक.असलेल्या दोन व्यक्तीमध्ये मुलभूत हा फरक असतो की एकजण तडजोडीचा मार्ग मान्य करून व्यवसायात यश मिळवतो त्याला Negotiating skill असे म्हंटले जाते  तर दुसरा कसलाही तडजोडीचा मार्ग मान्य नं करता आपले काम करीत असतो. त्यात यश नाही मिळाले तरी चालेल पण अचूकता आणि परिपूर्णता फार महत्वाची असते. त्यामुळेच फारच थोडे शास्त्रज्ञ किंवा तंत्रज्ञ हे चांगले व्यवस्थापक होतात. अगदी अलिकडले उदाहरण द्यावयाचे झाले तर स्टीव जॉबचे देता येईल. तो चांगला तंत्रज्ञ होता पण उत्तम व्यवस्थापक नव्हता.अचूकता आणि परिपूर्णतेचा त्याला ध्यास होता,पण तो आपल्या काहीं सहकार्याशी फार चांगल्या पद्धतीने वागत नसे. कारण एक तर त्याला कसलीही तडजोड करणे जमत नसे आणि त्याचा स्वभावही तसा कारणीभूत होता. ह्याउलट डॉ होमी भाभा हे शास्त्रज्ञ उत्तम व्यवस्थापक होते.त्यांनी संशोधन संस्था उभी करण्यासाठी शासनाबरोबर काहीं तडजोडी केल्या असतील पण विज्ञानाच्या संशोधनात कसलीही तडजोड केली नाही. ह्याउलट प्रो. मेघनाद सहा. त्यांचे केंद्रीय नेत्यांशी पटले नाही म्हणून त्यांनी स्वताचा वेगळा मार्ग स्वीकारला आणि आपली स्वतःची संस्था उभी केली.
काहीं क्षेत्रे अशी असतात की तडजोड करताच येत नाही. तर काही क्षेत्रात कोणतीही तडजोड चालतच नाही. त्यामुळे तुमचा पिंड तडजोड करण्याचा नसेल तर तुम्ही अस्वस्थ होणारच. रोजच्या जीवनात मात्र आपल्याला मान्य नसतानाही तडजोड करावीच लागते. तेंव्हा "मी जिंकलो, तुम्हीही जिंकलात" असे सूत्र समोर ठेवून निर्णय घेणे अधिक शहाणपणाचे ठरते.


Sunday, April 21, 2013

काझीरंगाचा रोमांचक फेरफटका


असाम मध्ये बघण्यासारखी तीन महत्वाची ठिकाणे.१)सागरासारखी दिसणारी ब्रम्हपुत्रा , २.)चहाचे मळे आणि ३) काझीरंगा राष्ट्रीय उद्यान . अरुणाचलहून तेजपूरमार्गे परत निघालो.रात्री भालूकपांगला मुक्काम केला.प्रशांती कॉटेज मध्ये विश्रांती घेतली. एक सुंदर ठिकाण. काझीरंगा तेजपूरहून ७५ कि. मी. भालुकपांगहून थोडे कमी अन्तर. रस्ता थोडासा चांगला. दोन्ही बाजूला चहाचे मळे. हिरवागार परिसर.
काझीरंगा राष्ट्रीय उद्यान

दूरवर हिमालयाच्या रांगा . ब्रम्हपुत्रेच्या उपनद्या. मध्येच दाट जंगल. काहीसा भाग दलदलीचा. ब्रम्ह्पुत्रेमुळे तयार झालेली छोटी मोठी तळी.प्रवास एकदम सुन्दर. निसर्गाच्या सानिध्यात. मी निसर्ग प्रेमी आहे. पण पक्षी प्रेमी , वनस्पती प्रेमी किंवा वन्य प्राणी प्रेमी होऊ शकलो नाही. ह्याचे प्रमुख कारण म्हणजे वनस्पती शास्त्र आणि जीवशास्त्राचे अत्यंत अल्पज्ञान. त्यामुळे ह्या विषयाचे आकलन तसे कमीच. परंतु जेंव्हा मी एखाद्या पक्षी प्रेमी किंवा वन्य प्राणी प्रेमी तज्ञाबरोबर प्रवास करतो तेंव्हा मला त्याचा खूप हेवा वाटतो. त्यांना ह्या विषयाची प्रचंड माहिती असते. ते पक्षी सहज शोधून काढतात. त्यांचे आवाज ओळखतात. त्यांच्या आवाजावरून ते झाडाच्या कोणत्या फांदीवर बसले आहेत हे अचूक ओळखतात. मी मात्र शोधूनही ते पक्षी दिसत नाहीत. फक्त पक्षी तज्ञांच्या मदतीने  जेंव्हा ते दिसतात तेंव्हा वेगळा आनंद मिळतो. अशा पर्यटनामध्ये असे तज्ञ बरोबर असणे फार गरजेचे आहे.काझीरंगा गुवाहाटीपासून  २१७ कि. मी. तर जोरहाट पासून ९८ कि. मी. तेजपूर पासून तसे अंतर जवळ. गोलाघाट आणि नागोन जिल्हयात पसरलेले हे राष्ट्रीय उद्यान ४३० चौ. कि . मी. क्षेत्रफळ असलेले.. ( ४ ० कि . मी . लांब आणि १ ३ कि. मी. रुंद ) . जैविक विविधतेसाठी (बायोडायव्हरसीटीसाठी) जगप्रसिद्ध. ४२ प्रकारचे मासे२ ७ प्रकारचे सरपटणारे प्राणी ४ ९ १ प्रकारचे पक्षी३ ५ प्रकारचे सस्तन प्राणी वाघ ( ८ ६ - १ वाघ प्रती कि . मी.) १ ० ४ ८ हत्ती २ ० ४ ८ Rhinoceros , १ ४ ३ १ वाटर बफेलोज ४ ८ ६ स्वाम्प हरीण ७ प्रकारची गिधाडेदोन प्रकारचे सर्वात मोठ्या लांबीचे अजगर आणि अनेक प्रकारचे विषारी सर्प ,  १५ प्रकारची कासवे५ ४ ६ प्रकारची वनस्पती  , हत्तीभर उंचीचे गवतह्या सर्वांचे वसतीस्थान म्हणजे काझीरंगा.
काझी हा कर्बी जमातीचा तरूण आणि रंगा ही ह्या भागातील तरुणी. त्यांचे एकमेकावरती ,खूप प्रेम. स्थानिक लोकांचा लग्नाला खूप विरोध. हे प्रेमी युगुल ह्या जंगलात गायब होतात आणि परत येतच नाहीत. नंतर ते स्थानिक लोकांना सापडतच नाहीत त्यामुळे ह्या जंगलाला काझीरंगा हे नाव दिले गेले आहे अशी एक दंत कथा.

Land of Red Goat
सहाव्या शतकातील श्रीमंत संकरदेव ह्या वैष्णव संताने काझी आणि रंगाई ह्या अपत्यहीन दांपत्यास अपत्य प्राप्तीसाठी आशीर्वाद दिला आणि ह्या भागात खूप मोठे तळे निर्माण करण्यासाठी खोदकाम करावयास सांगितले म्हणून ह्या भागाला काझीरंगा असे नाव पडले अशी दुसरी कथा सांगण्यात येते.
काझीरंगा म्हणजे Land of red goats ( Deer ) असा ही एक प्रवाद. कर्बी भाषेत काझी म्हणजे Goat , तर रंगाई म्हणजे RED .
काझीरंगा -दूरवर दिसणाऱ्या हिमालयाच्या पर्वत रांगा -४३० चौ कि.मी.
KAJIR -a - RANG म्हणजे The village of KAJIR असे ही सांगतात .
काझी हे नाव येथील मुलीना देण्यात येणारे  आवडते नाव.  काझी नावाची स्त्री ह्या भागावर अनेक वर्ष राज्य करीत होती म्हणून ह्या भागाला काझीरंगा असेही म्हणतात .
असा हा ह्या नावाचा मनोरंजक इतिहास .
काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान झाले ह्याचे सारे श्रेय द्यावे लागते ते मेरी व्हिक्टोरिया लायटर कर्झन ह्या व्होईसरॉय लॉर्ड कर्झन ह्यांच्या पत्नीला.मेरी विक्टोरिया ह्यांना Rhinoceros  बघायचे होते. त्यासाठी त्यांनी ह्या भागाचा दौरा केला. त्या फ़ेरफटक्यात त्यांना एकही Rhino बघावयास मिळाला नाही. त्यामुळे त्यांची खूप निराशा झाली. त्यांनी आपल्या नवऱ्याकडे म्हणजे लॉर्ड कर्झन ह्यांच्याकडे हट्ट धरला की लवकरच एक कायदा करा आणि हा भाग वन्यप्राणी संरक्षित म्हणून जाहीर करा आणि कोणत्याही प्रकारच्या प्राण्याची शिकार करण्यास बंदी घाला .
Real Star of Kaziranga - RHINO

 १ ९ ० ५ मध्ये हा भाग वन्यप्राणी संरक्षित म्हणून घोषित करण्याचा आदेश लॉर्ड कर्झन ह्यांनी काढला. लॉर्ड कर्झन ह्यांची कारकीर्द फारशी नावं घेण्यासारखी नव्ह्ती .पण हे एव्हढे चांगले काम मात्र त्यानी केले. १ ९ ३ ८ पासून प्राण्यांची शिकार करण्यास ह्या भागात बंदी आहे त्यामुळे आज आपण Rhinos  आणि हत्तीचे कळप सहज बघू शकतो . त्यासाठी तरी आपण इंग्रजांचे आभार मानले पाहिजेत.
१ ९ ५ ४ मध्ये त्यावेळच्या असाम सरकारने नवा कायदा केला. १ ९ ६ ८ मध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले तर 
१ ९ ८ ५ मध्ये युनेस्कोने वर्ल्ड हेरीटेज साईटचा विशेष दर्जा दिला.
हिमालयाच्या पूर्वेकडील रांगा , ब्रम्ह्पुत्रेच्या आसपासचा भाग  ह्यामुळे हा परिसर खूप  हिरवागार आहे. विविध वनस्पतींनी नटलेला आहे. बराचसा भाग दलदलीचा आहे. हत्तीभर उंचीचे दाट गवत सर्वत्र असल्यामुळे हत्तीकरिता हे मोकळे रान आहे. त्यांच्या खाण्यासाठी हे खूप मोठे कुरण आहे. येथे छोटी मोठी तळी ( Beels) दिसून येतात. आजूबाजूचा  भाग खूप दलदलीचा असतो. ब्रम्ह्पुत्रेला पूर आला की ही तळी भरून जातात.
काझीरंगा - जंगल - दलदलीचा भाग - छोटी मोठी तळी 

Bird's Paradise म्हणता येईल असा हा परिसर सुंदर आहे. ब्रम्ह्पुत्रेला पूर आला की ह्या भागाचे खुप नुकसान होते. ह्या वर्षी आलेल्या पुरात शेकडो Rhino वाहून गेले. तसा हा खूपच दुर्लक्षित भाग आहे. सर्व जगातील पर्यटकांना आकर्षित करण्यासारखे हे सुंदर राष्ट्रीय उद्यान आहे. पर्यटकासाठी विशेष सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी चांगल्या सोयीची खूपच कमतरता आहे.
भालूकपांगहून सकाळी निघालो आणि दुपारी जेवणाच्या वेळेपर्यंत मुक्कामाच्या हॉटेल वर पोहोचलो. अरण्य लॉज हे ए टी डी सी चे हॉटेल होते . हॉटेल शासकीय होते म्हणजे आपल्या एम टी डी सी सारखे. ह्यापेक्षा चांगले हॉटेल कोहोरा  येथे  नव्ह्तेच.  सरकारी असल्यामुळे काझीरंगा पार्क मध्येच असलेले हे लॉज तसे बरे  होते. दुपारचे जेवण करून थोडी विश्रांती घेतली.
Bird's Paradise
सेव्हन सिस्टरचा दौरा असल्यामुळे तसा वेळ कमीच होता.त्यामुळे लगेच दुपारी ३ वाजता जीप सफारी वर निघालो. काझीरंगाची दोन मुख्य आकर्षणे. १) जीप सफारी आणि २) हत्तीवरून रपेट. प्रत्येकी एकदीड तासाच्या ह्या सफारीत आपण हत्ती आणि Rhinos  अगदी जवळून बघू शकतो. आपली जीप अगदी जवळ जाते व आपण ह्या प्राण्यांना थोड्याशा अंतरावरून पाहू शकतो. हत्ती सफारीत तर आपण उंच अंबारीत बसलेलो असतो आणि प्राणी विशेषतः Rhinos जास्त जवळून पहावयास मिळतात . हत्ती आपली वाट दाट आणि उंच अशा वाढलेल्या गवतातून काढत पुढे जात असतो आणि त्यामुळे गवतात लपलेले वन्यप्राणी आपल्याला सहज दिसतात . हरीण आणि सांबार ही पहावयास मिळतात. वेगवेगळे पक्षीही दिसतात . आपण सारखे शोधत राहायचे. पक्षी तज्ञांना ते सहज सापडतात. आपल्याजवळ तशी दृष्टी नसते. त्यांची मदत घ्यावी लागते.
जीप सफारी 
जीप सफारीचा अनुभव घेऊन संध्याकाळी हॉटेलवर परतलो. थोडीशी विश्रांती घेतली. रात्रीच्या जेवणापूर्वी हॉटेलच्या कर्मचार्यानी हॉटेलच्याच हिरवळीवर असामचे लोकनृत्य म्हणजे " बिहू " डान्स सादर केला. पाऊस झाल्यानंतर पीकपाणी आल्यावर सर्वलोक आनंदात असतात तेंव्हा जे सामुहिक नृत्य करतात ते त्यांनी सादर केले. हा तेथील लोकनृत्याचा आणि गाण्याचा सुंदर कार्यक्रम पहावयास मिळाला. असामचे लोकसंगीत अत्यंत गोड  आणि श्रवणीय. बंगाली संगीताशी  थोडेसे साधर्म्य. भूपेन हजारिका ह्यांची सहज आठवण झाली . त्यांना मुंबईत असाम मित्र मंडळामध्ये एका कार्यक्रमात अगदी जवळून पाहिले होते. माझ्या असामी मित्राचे ते ओळखीचे आणि जवळचे होते.  कार्यक्रम सादर करणारे हॉटेलचे कामगार  हे  मन लावून कला सादर  करणारे स्थानिक कलाकार  होते.  त्यामुळे हा कार्यक्रम बघून दिवसभराचा प्रवासाचा शीण तर गेलाच पण खूप उत्साही वाटू लागले.
हत्तीवरून रोमांचक रपेट
दुसऱ्या दिवशी हत्ती सफारीतून काझीरंगाचा पुनः  फेरफटका केला. हत्तीवरून रपेट हा एक रोमांचकारी अनुभव म्हणावा लागेल. तो ही जंगलातून. हत्ती एवढ्या उंच अशा दाट गवतातून.  सकाळीच उठून त्यासाठी नंबर लावावा लागतो.बरीच गर्दी असते. बुकिंग आधीच करावे लागते . एलिफंट सफारीचा अनुभव हा एक आगळा -वेगळा अनुभव आहे. दाट आणि उंचच उंच गवतातून आपण हत्तीवरून फिरत असतो. आणि इतर वन्यप्राणी अगदी जवळून बघू शकतो. उद्यानात एका उंच अशा मचानावर चढून आपण अनेक किलोमीटर दूरवर पसरलेले पार्क पाहतो आणि आपल्याला दूरवर असलेले हत्तीचे कळप , हरणे ,सांबर आणि असंख्य पक्षी दिसू लागतात. बराच वेळ आपण तेथून हलतच नाहीं ,तेथेच रेंगाळतो.
 दोन दिवसात फक्त एवढेच पाहता येते. ज्यांना पक्षी निरीक्षण करावयाचे आहे व दाट जंगलात जाऊन पशु जीवन जवळून पहावयाचे आहे त्यांना काही दिवस मुक्काम करणे आवश्यक आहे व त्यासाठी स्पेशल परमिट घेणे आवश्यक आहे.

हत्तीवरून रपेट
काझीरंगाची ही छोटीशी सफर फक्त एक  झलक आहे. प्रत्येकाने ह्या  भारतीय राष्ट्रीय उद्यान भेटीचा अनुभव घेण्यासारखा आहे. दुपारी जेवणानंतर नागाल्यान्डला जाण्यासाठी निघालो तेंव्हा काझीरंगाच्या आठवणी बरोबर सोबत करीत होत्या. पुन्हा तेथे जाणे जमेल असे आज तरी वाटत नाही. काझीरंगाच्या आठवणी काढलेले  फोटो आणि केलेले  चित्रीकरण बरोबर आहेतच .
डॉ नरेंद्र गंगाखेडकर


काझीरांगाचे प्रमुक आकर्षण : एसिअन हत्तीचे कळप
हत्तीवरून रपेट चालू असताना हत्तीचे खाणे चालूच असते. त्याकरीताच हा राखीव भाग. हत्ती पोसणे फार खर्चिक