मंगेश पाडगावकरांनी एके ठिकाणी म्हंटलं आहे ...
ज्यांची हृदये झाडाची असतात ,
त्यांनाच फक्त फुले येतात ,
तेच वाढतात , प्रकाश पितात
सारे ऋतू झेलून घेतात ......
तेच फक्त गुच्छासारखा ,
पावसाळा हुंगून घेतात ....
ह्या काव्यपंक्ती मनांत सारख्या घोळत असतानाच रवींद्रनाथ टागोरांच्या काही कथा वाचण्यात आल्या. मराठीत अनुवादित केलेल्या ह्या कथांचे पुस्तक वाचत असतांना मनाला सारखं असं वाटत होतं की आपण ह्या कथांचा खरा आस्वाद आणि कलानंद घ्यायचा असेल तर मूळ बंगाली कथाच वाचल्या पाहिजेत..रवींद्रनाथ हे खरे भाववेडे कवी.परंतु त्यांच्या पुस्तकातील प्रत्येक कथा ही एक भावरम्य कविताच होती.ह्या कथा वाचत असतांना मनाला असं सारखं वाटत होतं की ह्या भाववेड्या कवीचं भावविश्व कसं असेल! आणि एकदम लक्षात आलं की मंगेश पाडगावकरांच्या वरील काव्यपंक्तीच रवींद्रनाथांचे चित्र डोळ्यासमोर उभे करतात . काही दिवसापूर्वी 'उपहार ' हा रवींद्रांच्या कथेवर आधारित एक नितांत सुंदर चित्रपट पाहिल्याचे स्मरते. त्याचवेळी 'मृण्मयी 'ही उपहारची सुंदर कथा मुद्दाम वाचून काढली . त्या कथेचं वेगळेपण लगेच लक्षात आलं आणि हे ही जाणवलं की रवींद्रनाथांच्या कलाकृतीवर आधारलेली दुसरी एक कलाकृती निर्माण करणं हे एवढं सोपं काम नव्हे .
विजय तेंडुलकरांनी समीक्षा करतांना एका ठिकाणी म्हंटलं होतं ,' जी कलाकृती पाहिल्यानंतर घरी घेऊन जावीशी वाटते ती सुंदर कलाकृती '.ही समीक्षा मनाला पटतेही . 'सारा आकाश ' , ' भुवनशोम ', 'एक अधुरी कहाणी ', 'प्रतिद्वंदी ', 'पथेर पांचाली ', 'अपराजितो ' आणि अगदी अलीकडचा 'अनुभव ' आणि 'उपहार ', ह्या साऱ्याच कलाकृती मनाला विलक्षण तजेला देतात. तेंडुलकरांना ह्या कलाकृती घरीच घेऊन जाव्या असे वाटते .. खरं म्हणजे ह्या कलाकृती आपल्या मनांत कायमच्या घर करून बसतात.त्या सतत तुमचा पाठलाग करतात . हे झालं कलाकृतीसंबंधी . पण विशेष जाणवतं ते कलावंतासंबंधी . मनांत त्या कलावंता संबंधी कुतुहूल आणि जवळीक निर्माण होते . रवींद्रनाथांची 'उपहार 'ची मृण्मयी 'ही कथा वाचल्यानंतर त्यांच्यातील भाववैड्या मनोवृत्तीचे एक कुतुहूल माझ्या मनात निर्माण झालं .
हा हळुवार , तरल आणि कोमल प्रवृत्तीचा कवी कसा असेल ? मोठ्या कलावंताचे भावविश्व समजून घेणं फारच अवघड आहे.हे भावविश्व् समजून घेण्याचा एकाच मार्ग आणि तो म्हणजे त्याचे आत्मचरित्र उपलब्ध असेल तर ते वाचणे ... ते प्रांजळपणे लिहिलेलं आत्मचरित्र असावे किंवा त्याचा पत्रव्यवहार उपलब्ध असावा . रवींद्रनाथांच्या भावविश्वाचा शोध घेत असतांना एकदम आठवलं की रवींद्रनाथांच्या महाराष्ट्रीय प्रेयसींसंबंधी काही वर्षांपूर्वी 'अमृत ' मासिकात थोडीशी माहिती आली होती आणि त्यावेळपासून रवींद्रनाथांच्या त्या महाराष्ट्रीय रेशमी बंधाविषयी विशेष औत्सुक्य निर्माण झालं होतं . आणि हेच औत्सुक्य मनांत असताना ह. वि .मोटे यांचा पत्रव्यवहार -संग्रहाचा ग्रंथ "विश्रब्ध शारदा " वाचण्यात आला .१३० वर्षाचा महाराष्टाचा समाज आणि इतिहास डोळ्यासमोर उभा करणारा हा ग्रंथ मराठी साहित्यातील एक कोरीव लेणं आहे . ह्या पुस्तकासंबंधी खूपच लिहिण्यासारखे आहे . रवींद्रनाथांची ती महाराष्ट्रीय प्रेयसी मला ह्या पत्रसंग्रहातून भेटली आणि तिचे लोभसवाणे व्यक्तिमत्व ह्या " विश्रब्ध शारदे" तून पूर्णपणे लक्षात आलं .
तशा ह्या कंटाळवाण्या आणि अर्थहीन आयुष्यात "प्रेमानुभव" हाच काय तो अर्थपूर्ण तुकडा असतो जपून ठेवण्यासारखा.... पुस्तकातल्या मोरपिसासारखा . आणि रवींद्रनाथांच्या तारुण्यातील तो प्रेमानुभव अगदी असाच होता.रवींद्रांची प्रेयसी होती अन्नपूर्णा तर्खड . एक सुविद्य मराठी तरुणी - तारुण्य हे जीवनाला पडलेलं सुंदर स्वप्न आहे . रवींद्रनाथांच्या जीवनाला पडलेलं ते एक असंच भावरम्य स्वप्न होतं ....
अनाच्या ( अन्नपूर्णा तर्खड ) तरल व तेजस्वी व्यक्तिमत्वाची छाप रवींद्रनाथावर पडली होती आणि त्यांच्या नाजूक पण दुर्दैवी स्नेहबंधनाची आठवण "विश्रब्ध शारदे "तील एक पत्र वाचून लक्षात येते .
अन्नपूर्णा तर्खड ही विलायतेला शिक्षणासाठी जाणारी पहिली महाराष्ट्रीय महिला . डॉ आत्माराम पांडुरंग तर्खड ह्यांची ही सुकन्या. डॉ आत्माराम तर्खड हे प्रार्थना समाजचे नावाजलेले पुढारी.प्रसिद्ध व्याकरणकार दादोबा पांडुरंग हे त्यांचे बंधू .. अशा कृतीनिष्ठ समाजसुधारकाची अन्नपूर्णा ही मुलगी असल्यामुळे त्या काळात शिक्षण घेणे तिला सहज शक्य झाले.कोणत्याही इतर भारतीय मुलीपेक्षा ती सर्वार्थाने शिक्षित अशी सुविद्य हिंदू मुलगी होती.लोकांच्या टीकेकडे बिलकुल लक्ष न देता दुर्गा, अन्नपूर्णा,आणि माणिक ह्या आत्माराम ह्यांच्या तीन मुलींचे शिक्षण मिसेस मिचेल ह्या मिशनरी बाईकडे झाले. त्या काळी पांढरपेशा वर्गातील मुली आणि तरुण स्त्रिया ह्यांना पाश्चात्य पद्धतीचे शिक्षण " अलेक्झांडरा गर्ल्स इंग्लिश इन्स्टिट्यूशन " ह्या संस्थेत मिळत असे. डॉ आत्माराम ह्यांनी आपल्या मिळकतीचा सारा भाग आपल्या मुलींना उच्य शिक्षणासाठी परदेशात पाठविण्यासाठी खर्च केला होता .
डॉ आत्माराम यांनी आपली मुलगी अना हिला १८७६च्या सुमारास विलायतेस पाठविले होते. १८७८ च्या सुमारास ती भारतात परत आली. अना ही दिसावयास अतिशय सुंदर होती.आणि रूपसौन्दर्याबरोबर तिला विलक्षण बुद्धिमत्तेची दैवी देणगी मिळाली होती. साहित्य , संगीत आणि वादनकला या विविध क्षेत्रात ती पारंगत होती.तिचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते.ह्याशिवाय तिला फ्रेंच ,जर्मन आणि पोर्तुगीज ह्या भाषा अवगत होत्या आणि विशेष म्हणजे तिच्या दिसण्याप्रमाणेच तिचे बोलणे हे ही अतिशय कोमल होते . कोमल , तरल , स्वप्नमयी प्रवृत्तीची ही मुलगी बालकवींच्या " फुलराणी "सारखीच असावी. तिच्या सहवासात एखादी व्यक्ती अगदी अल्पक्षण का असेना , आल्यानंतर आल्हादून जाई .त्यामुळे तिचा सहवास मिळालेल्या व्यक्तींना ती "आल्हादिका "वाटत असे. १८७८ साली उच्च शिक्षणानंतर ती विलायतेहून परत आली त्यावेळी तिचे वय २२ होते.. ती त्या वेळी अनुरूप अशा सहचराच्या चिरसहवासाच्या सुखासाठी आसुसलेली होती. कोणत्याही तरुण मुलीच्या मनात येणाऱ्या " स्वप्नामधील राजकुमारा "चे तरल स्वप्न तिच्याही डोळ्यात दिसत होते. तिनेच एके ठिकाणी लिहिले आहे की " I used to long and long for a friend in those days " आणि अशा ह्या " स्वप्नील " अवस्थेत असतानाच एके दिवशी १८ वर्षाचा एक कोवळ्या वयाचा , भाववेडा कवी अर्थात रवीबाबू तिच्या जीवनात प्रवेश करता झाला .
रवीबाबू विलायतेला जाण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते . रवीबाबूंचे बंधू सत्येंद्रनाथ ठाकूर हे तर्खड कुटुंबाशी अगदी जवळचे . त्यांच्यात असलेल्या स्नेहसंबंधामुळे त्यांनी रवीबाबूंना तर्खड कुटुंबात काही दिवस राहण्यासाठी ठेवले होते. विलायती शिष्टाचार व शैलीदार इंग्रजी संभाषण शिकण्यासाठी त्यांनी तर्खड कुटुंबाची निवड केली.
रवीबाबू हा एक लाजाळू युवक होता. बराचसा अबोल, संकोची प्रवृत्तीचा , काहीसा एककल्ली .आपल्याच विश्वात रमणारा. खोलीचे दार बंद करून एकटाच कसला तरी शोध घेत बसणारा . असा हा भाववेडा तरुण अगदीच अबोल होता .महाराष्ट्रीय कौटुंबिक वातावरणात तो थोडासा बुजला होता. अना ही तर पाश्चिमात्य संस्काराच्या प्रभावामुळे व शिक्षणामुळे "आल्हादक"व्यक्तिमत्वाची झाली होती. तिला रवीबाबूंचा 'अबोल'पणा आवडला नाही म्हणून की काय एके दिवशी तिने हसत हसत रवीबाबूंच्या खोलीत प्रवेश केला आणि अबोल असलेल्या रवीबाबूला तिने बोलते केले. त्यांच्या गप्पाटप्पा सुरु झाल्या. रवीबाबूंनी तिला सांगून टाकले की बॅरिस्टर व्हावे म्हणून माझे बंधू मला विलायतेला पाठवीत आहेत पण मला त्यात रस नाही. मी एक पद्यकार आहे . कविता हेच माझे भांडवल आहे . गीत रचना व मनात गुणगुणणे हेच मला प्रिय आहे. त्यातच माझे मन रमते. मी त्यातच आनंद उपभोगतो.
रवीबाबूंच्या ह्या काव्यप्रेमामुळे अना प्रभावित झाली कारण मुळातच ती सुद्धा बालकवींच्या फुलराणीसारखी भाववेडी स्वप्नांतरीताच होती .
एकेदिवशी ती भाववेड्या रवीबाबूंना म्हणाली .' काव्यमय नांव ठेवण्यास तू पटाईत असशील; तर मग ठेव बघू मला खास सुंदर असं नांव ' लबाड स्मित करणाऱ्या त्या अना ला रवीबाबूंनी एकदम क्षणाचाही विलंब न करता नांव दिलं "नलिनी ". त्या वेड्या अना ने रवीबाबूंना ते नांव कवितेत गोवून दाखविण्यास सांगितले. रवीबाबूंनी लगेच एक सुंदर कविता रचली .ती कविता लगेच भैरवी रागात गाऊन दाखविली.
" नलिनी " हे नांव रवींद्रांचे आवडते नांव होते. अनाशी परिचय होण्यापूर्वी त्यांनी रचलेल्या "कविकाहीनी" ह्या काव्याच्या नायिकेचे नांव "नलिनी " आहे. इतरही कवितात त्यांनी हे नांव अनेकदा वापरले आहे असे दिसते.
रवीबाबूंचे भावरम्य गीत ऐकल्यानंतर अना उदगारली ," रवीबाबू , तुमचे हे गीत ऐकून मला वाटतं कीं जरी मी मृत्युशय्येवर पडलेले असले तरी माझ्यात संजीवन संचारेल ".
रवीबाबूंचा अनाशी सहवास वाढत गेला . दोघेही एकमेकांवर लुब्ध झाली .एकदा अना रवीबाबूला म्हणाली ,' किती सुंदर आणि रेखीव चेहरा आहे तुझा ! कधी दाढीने झाकायची लहर आली तर झाकू नकोस हो तो !लोपून जातील त्या सुंदर बाह्य रेषा " . रवीबाबूंनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलंय ...." It was from her that I first heard praise of my personal appearance- praise - that was often very delicately given ". हा प्रसंग वाचल्यानंतर मनात उगीचच विचार येतो की , रवींद्रबाबूंचा तो दाढी वाढविलेला फोटो पाहण्याची सवय असलेल्या आपल्याला रवींद्रनाथानी दाढी का ठेवली असावी ?त्यामागे वरील तर कारण असावे का ? ; हा विचार अगदी न कळत माझ्या तरी मनात आला .
रवींद्रांचा आणि अनाचा सहवास लवकरच संपला . रवीबाबू २० सप्टेंबर १८७८ ला विलायतेत निघून गेले. त्यांची आणि अना ची पुन्हा भेटी झाली नाही. अना चा विवाह एका पाश्चिमात्य युवकाशीच झाला . अना ची आणि रवीबाबूंची पुढे कधीच गाठभेट पडली नाही का ? ह्या प्रश्नाला उत्तर सापडत नाही. .. परंतू रवींद्रांची ही नलिनी त्यांच्या काव्यात सर्वत्र संचार करताना दिसते आणि अना ही सुद्धा रवीबाबूंचे ते गोड नांव " नलिनी ( lotus flower ) धारण करताना आढळते.
अना बद्दल लिहिताना रवींद्रनाथ एकेठिकाणी म्हणतात ... " चारुता आणि आल्हादकता ह्यांचे सुंदर मिश्रण तिच्या स्वभावात आढळते तिचे वर्णन एकाच शब्दात करावयाचे झाले तर ते " आल्हादिका " ह्या शब्दात करता येईल ".
म्हातारपणी रवींद्रनाथ संभाषणाच्या ओघात दिलीपकुमार रॉय ह्यांना भावार्द स्वरात म्हणाले , " मी अना ला कधीही विसरलो नाही . तिच्याविषयी हलका उदगार माझ्या तोंडून कधीच निघाला नाही . तिच्या माझ्यावरील प्रेमास एखादे सवंग संबोधन ( Light lable ) लावून मी त्याचा अपमान करूच शकत नाही. नंतरच्या आयुष्यात संवेदनेच्या अन जाणिवेच्या छायाप्रकाशाच्या लीला मी पुष्कळ पाहिल्या . एक गोष्ट मात्र निश्चित आणि ती मी अभिमानाने सांगतो की स्त्री प्रेमास मग ते कसेही असो चुकूनही कधी कमी लेखले नाही. मी त्याबद्दल सदैव कृतज्ञ आहे. त्याला स्नेह म्हणा , प्रेम म्हणा , प्रीती म्हणा - मी ते मला मिळालेले वरदान असेच मानीत आलो आहे . स्त्रीने केलेले हे प्रेम नेहमी माझ्या मनांत फुलांचा अनमोल सडा घालून जाते . त्यातील मुग्ध भावनांच्या सिंचनाने मनांत स्वप्नरूपी पुष्पे राशीराशीने उमलतात "
( पूर्वप्रसिद्धी : दै . मराठवाडा २१ ०७ १९७४ )