Thursday, December 26, 2019

माझे शिक्षक

तुम्ही खरे विद्यार्थी असाल तर शिक्षक तुमच्या आजूबाजूलाच असतात हे लक्षात असू द्यावे.
काही शिक्षक तुमच्या आयुष्यात येतात . त्यांनी तुम्हाला प्रत्यक्ष शिकविलेले नसते . तुम्ही त्यांच्या  वर्गात शिकणारे विद्यार्थी नसतात .त्यांचे तुमच्यावर त्यांच्या  विद्यार्थ्यांसारखे प्रेम असते . आपुलकी असते . असा एक शिक्षक मला मिळाला . त्यांचे नांव प्रोफेसर जे जी काणे . ते युडीसीटीचे डायरेक्टर होते . त्यांचा विषय होता ऑइल टेक्नॉलॉजी . मी युडीसीटी मध्ये पदार्थविज्ञान विभागात पी. एचडी .करीत होतो . यूजीसीची ३ वर्षाची शिष्यवृत्ती संपली होती .थिसीस लिहिण्याचे काम  सुरु होते . म्हणून मी औरंगाबादच्या ज्ञान -विज्ञान महाविद्यालयात लेक्चरर झालो . माझे मुंबई - औरंगाबाद येणे - जाणे सुरु झाले . त्यामुळे थिसिसचे काम मागे पडले . काही प्रयोग करणे राहिले होते . असेच एके दिवशी काणे सर मी प्रयोग करीत असताना आमच्या प्रयोगशाळेत आले . त्यांनी माझी विचारपूस केली .माझी युजीसी शिष्यवृत्ती संपली आहे हे त्यांना माहित होते . मी मुंबई - औरंगाबाद येणे - जाणे करतो हे त्यांना समजले होते . माझे काम मागे पडते आहे हे त्यांना समजले . त्यांनी मला त्यांच्या कार्यालयात भेटीसाठी बोलविले . मी भीतभीत त्यांना भेटायला गेलो . त्यांनी मला कॉटन टेक्नॉलॉजिकल रिसर्च लॅब , माटुंगा - युडीसीटीच्या जवळच असलेली - ह्या संस्थेत सायंटिफिक असिस्टंटची जागा आहे . तेथे प्रयत्न कर असा सल्ला दिला . 'तेथे नोकरी मिळाली तर तुला सोयीचे होईल . तुला युडीसीटी जवळ असेल . तुझ्या कामाला गती येईल .लवकर थिसीस पूर्ण करता येईल .तुझी आर्थिक विवंचना संपेल ' . मी अर्ज केला आणि  निवडला गेलो. मी त्या संस्थेतील संचालकांचा सायंटिफिक इन्फर्मेशन सहाय्य्क झालो . युडीसीटी जवळ होती . संध्याकाळी प्रयोगशाळेत हजर असे . लायब्ररी उघडी असे . माझे काम वेगाने झाले . मी सहा महिन्यात थिसीस सबमिट केला . काणे सरांच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाले . विद्यार्थ्यांबद्दल एवढी आपुलकी असलेला , त्यांच्या समस्यांची जाण असणारा देवमाणूस  असलेला शिक्षक म्हणजे काणे सर . आजही त्यांची मूर्ती मला माझ्या डोळ्यासमोर दिसते आहे . माझ्या पाठीवर हात ठेऊन ते मला हाक मारीत आहेत ...' नरेंद्र .... ' .
मी त्या देवमाणसाला नमस्कार करतो . असे माझे शिक्षक नसलेले शिक्षक . खरे मार्गदर्शक . माझे आयुष्य बदलून टाकणारे  शिक्षक !

Dr N K Choudhuri , D.Sc.
माझे पीएच.डी. चे मार्गदर्शक

 I pay my respect to my two great teachers who have made a great impact on my life . 1) Dr N K Choudhury, D.Sc. , my Ph.D research guide who guided me for achieving excellence in physics research  and 2) Dr Billmeyer F W Jr of Rensselaer Polytechnic Institute , Troy , N Y who taught me Color  science and technology which helped me to use it in industrial Color applications . Indian Color industry saved millions of Rupees by using industrial Color control.

Today is a Teacher's Day. I cannot forget my teacher  Dr N K Choudhuri , D.Sc. He was my Ph.D guide in physics  at the  University Department of Chemical Technology , University of Bombay . He taught me the  importance of perfection in science research . He told me that in science research  , you have to have " non-compromising  attitude". A great personality. Thank you Dr Choudhuri.

Friday, December 13, 2019

भैरप्पा

कन्नड साहित्यिक एस एल भैरप्पा ह्यांची 876 पानाची ' तंतू ' ही महाकादंबरी वाचतोय . सौ उमा कुलकर्णी ह्यांनी केलेला  मराठी अनुवाद अप्रतिम . मला कन्नड येत नाही . ह्या पूर्वी ' मंद्र ' ही कादंबरी वाचली होती . आवडली होती . दोन्ही कादंबऱ्यांचे अनुवाद  अतिशय सुंदर आहेत . आपण एखादा अनुवाद वाचतोय असे वाटतच नाही . ह्या कादंबरीचा अवकाश खूप मोठा आहे . वाचकाला खिळवून ठेवणारी रसाळ कादंबरी . तशी मी उशिराच वाचली .( प्रकाशन 1997 , दुसरी आवृत्ती 2015 ) .कादंबरी 1947 पासून सुरु होते . स्वतंत्र भारतातल्या स्वतंत्र नागरिकांची व्यथा व्यक्त करणाऱ्या तुमच्या - माझ्या जीवनाची ही कादंबरी आहे . आपले सामाजिक - राजकीय चित्र ज्या वेगाने बदलत  आहे, ते सारे ह्या  कादंबरीत चित्रित झाले आहे . कादंबरी वाचताना आपला समाज किती गुंतागुंतीचा आहे हे तर लक्षात येतेच पण कादंबरीतील पात्रे आपण बघितलेलीच असतात . ती आपल्या  जीवनातील असतात.  तीन - चार पिढ्यांची, आपल्या  आजूबाजूची - शहरातली  तशीच  खेड्यातली .खऱ्या अर्थाने ही ' हिंदू ' समाजाची वैविध्यपूर्ण कहाणी आहे . भालचंद्र नेमाडे ह्यांच्या कादंबरीचे  नाव ' हिंदू ' असले तरी त्या  कादंबरीला  तो प्रचंड आवाका नव्हता . ती कंटाळवाणी वाटली होती. 'तंतू 'ही कादंबरी अधिक सुंदर विणलेली ' हिंदू ' समाजाची कादंबरी आहे . कुठेही कंटाळा येत नाही . रसाळ लेखन . खूप काही लिहिण्यासारखे आहे ह्या कादंबरी बद्दल . नंतर दीर्घ लेख लिहावा असे मनात आहे .
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1454501931231908&id=100000163447478

एपिक गडबड/ हैदर ते Hamlet






काल मकरंद देशपांडे ह्यांचा ' हसविण्याचा धंदा ' पहायला गेलो . 'एपिक गडबड'  हा त्यांचा फार्स आहे . त्याला नाटक म्हणायचं का ? असा मला पडलेला प्रश्न . हा माणूस पागलपणासाठी प्रसिद्ध आहे असे म्हणतात . त्यांचे हे ५० वे नाटक . ननाट्य असलेली बरीच नाटकं . 'त्यांची नाटकं समजत नाहीत पण बघतांना खूप मजा येते ',असे नासिरुद्दीन शहा म्हणाला होता . काल हा फार्स बघतांना मलाही तसेच वाटलं . ह्या नाटककाराला काय शोधायचे आहे , कोण जाणे ? तो आपल्याला थोडा वेळ पागल करतो ,हे खरे . हा माणूस क्रेझी आहे तशीच त्याची नाटकं ही भन्नाट आहेत . ह्याला काय सांगायचं ते कळत नाही .आपल्याला जे कळलं तेच खरं .
एका मुलीचे मामा आणि आई तिच्या लग्नासाठी स्थळ शोधत असतात . पुण्याच्या पेशव्यांच्या १२ व्या पिढीचा एक मुलगा दाखविण्याचे ठरते . तो मुलीला  पहाण्यासाठी घरी येणार  असतो आणि अचानक ४०० वर्षांपूर्वीचा शेक्सपिअर पुण्यात येऊन त्यांच्याच घरात दाखल होतो आणि तोच मुलगा आपल्याला पहायला आला म्हणून ती मुलगी नुसती  आनंदी होत नाही तर त्याच्या  विषयी  प्रेम असल्यामुळे फिदा होते व  लग्नवेडी होते . मग काय काय होते?  . सगळेच क्रेझी ! नुसते भन्नाट . हसून हसून पोट दुखते . ह्या ननाट्यात काय नाही ? हसणे आहे म्हणजे विनोद आहे . गाणे आहे .नृत्य आहे . बडबड आहे . चर्चा आहे . मोनोलॉग आहे . पंचेस - कोपरखळ्या आहेत . शेक्सपिअर आहे . त्याचे चिंतन आहे . त्याची लांब पल्ल्याची वाक्ये असलेली स्वगतं आहेत . त्याचे कवितावाचन आहे . पुण्याचे पेशवे आहेत म्हणजे कोपरखळ्या ठोकायला खूप वाव आहे . मुंबई का  पुणे?, वाद आहे . नाटकातील  संवाद म्हणजे नुसते फटाके. कोपरखळ्या.   त्यात दगडूशेटचा  पुण्याचा गणपती आहे तर मुंबईचा लालबागचा राजा आहे .सामाजिक भाष्य करताना  नुसते  लोकरंजन आहे .
संपूर्ण नाटकांत  नुसती धमाल . बडबड असलेली गडबड  आहे . कल्पनाविलास नाटककाराचा . तसा तो पागलपणा . मॅडनेस .Crazy themes and ideas असलेले हे धमाल नाटक .म्हंटलं तर करमणूक .
सर्व कलाकार आपल्याला सतत हसत ठेवतात ते त्यांच्या अभिनयातून .
प्रयोग रंगत जातो . कालच्या  प्रयोगाला पहिल्या दोन रांगात अनेक नावाजलेले  रंगभूमीवरील नटनट्या उपस्थित होत्या .
निखळ करमणूक असलेला हा फार्स अनेक दिवस लक्षांत राहील .

हैदर ते Hamlet
विशाल भारद्वाज ( विभा ) हा डाव्या विचारसरणीचा लेखक. “मी डाव्या विचारसरणीचा आहे म्हणूनच कलावंत / कलाकार/ लेखक आहे” असे ज्यांना वाटते त्यांचा हा नवा चित्रपट “ हैदर “ . सध्या खूप चर्चेत असलेला. शेक्सपियरच्या Hamlet ह्या नाटकावर आधारलेला किंवा बेतलेला. “शेक्सपियर /Hamlet” ही नावे घेतलीकी प्रेक्षक थोडे आकर्षित होतात. मी ही त्यापैकी एक. काही परीक्षणे वाचली. विभाच्या मुलाखती वाचल्या.  म्हणून सिनेमा पहावयास गेलो. शेवटी शेवटी कंटाळलो. सिनेमा पूर्ण पाहिला. ह्या शेक्सपियरला ( विभा ) नेमके काय म्हणायचे आहे ह्याचा शोध घेऊ लागलो. कलाकृतीची एक मोठी गंमत असते. प्रेक्षक आपला आपला अर्थ लावतो. त्याच्यासाठी दोन शब्द पुरे असतात . १) आवडले २) नाही आवडले. पण समीक्षक खूप लिहून जातात. मग माझ्यासारखा गोंधळून जातो. समीक्षकाला आवडलेले आपल्याला आवडत नाही तेंव्हा मन जास्त विचार करू लागते. कलाकृतीचा असा आस्वाद घेण्याची मला सवय झाली आहे.
हैदरची गोष्ट अशी. हैदरचा काका त्याच्या डॉक्टर असलेल्या वडिलांना मारतो आणि त्याच्या आईशी लग्न करतो. आपल्या वडिलांना कोणी मारले हे त्याला समजते आणि आपली आई त्याच्याशी लग्न करणार आहे हे त्याला जेंव्हा समजते तेंव्हा ह्या हैदरचा शेक्सपियरचा Hamlet होतो. “ सूड घ्यायचा की घ्यायचा नाही “ अशा द्विधा मनस्थितीत तो असतो.
अशी ही विभाच्या  शेक्सपियरच्या Hamlet वर बेतलेली कलाकृती. काहीजणांना ती खूप लक्षवेधी वाटली. ह्या कलाकृतीत काश्मीर हे एक नवीन पात्र. विभाच्या ह्या काश्मीरमध्ये शिकारा आणि शम्मीकपूरची प्रेमाची गाणी नाहीत. तेथे आहे भारतीय सैन्य. सैन्य आणि तेथील नागरिक ह्यांच्यातील तणाव. डाव्या विचारसरणीचा लेखक असल्यामुळे मानवी अधिकाराची गळचेपी करणारे सैनिक अधिकारी तेथे नकोसे वाटतात. 
हैदरचे डॉक्टर वडील हिलाल मीर एका आतंकवादी काश्मिरीला आपल्या घरी आणतात आणि त्याच्यावर घरातच शस्त्रक्रिया करतात . हे त्याच्या बायकोला धोक्याचे वाटते. डॉक्टर म्हणून मानवतावादी प्रवृतीचा असलेला हा डॉक्टर हा धोका पत्करतो. मिलिटरीच्या लोकांना ह्या आतंकवादीचा सुगावा लागतो. ते डॉक्टरला पकडतात . त्याला बंदिस्त करतात. त्याचे घर उध्वस्त करतात कारण त्यात आतंकवादी असतात व ते सैनिकावर उलट गोळीबार करीत असतात. ह्या डॉक्टरला  छावणीत ठेवतात व  माहिती काढून घेण्यासाठी त्याचा छळ करतात. हा डॉक्टर तेथून सुटतो खरा पण त्याचाच भाऊ त्याला झेलम नदीत बुडवून मारण्याचे षड्यंत्र रचतो कारण त्याला आपल्या वहिनीबरोबर लग्न करावयाचे असते. आणि अलीगढला शिकण्यासाठी गेलेला हैदर परत येतो. आपले उधवस्त घर पाहतो. वडिलांचा शोध घेतो. आई काकाबरोबर रमलेली पाहून दु:खी कष्टी होतो. आणि ह्या सर्वांचा बदला कसा घ्यावयाचा ह्याचाच विचार करीत तो आतंकवादी होतो.
असा हा हैदर. माणसे आतंकवादी कां होतात ? ह्याचा शोध घेण्यासाठी विभाने घेतलेला शेक्सपियरचा आधार.
मुख्य भाष्य आहे ते AFSPA ह्या आर्मीला दिलेल्या विशेष अधिकारावर. स्वतंत्र काश्मीर कां हवे ? भारतापासून आणि पाकिस्तानपासून स्वातंत्र्य कां हवे हे मांडण्याचा केलेला प्रयत्न. सार्वमतावर मांडलेले हैदारचे विचार. हे लेखकाचे भाष्य की तेथील सध्याच्या परिस्थितीचे वर्णन. सैनीक अधिकारी कसे छळ करतात व त्यांना मिळालेल्या अमर्याद अधिकाराचा दुरुपयोग करतात असे सांगण्याचा प्रयत्न ह्या कलाकृतीतून करण्याचा प्रयत्न दिसून येतो. हे सर्व हैदरच्या तोंडून व्यक्त होते. सिनेमाला प्रेमाची  गोष्ट असावी लागते म्हणून ती सारी पात्रे आहेतच. कुटुंबातील गुंतागुंतीचे संबंध असावे लागतात म्हणून हैदर , त्याचे काका व त्याची आई ह्यांच्यातील संबंध , हैदरची प्रेयसी , प्रेयसीचे वडील आणि त्यांचा काकाला असलेला छुपा पाठींबा . अशा अनेक कौटुंबिक व राजकीय गुंतागुंती. त्याचा काका म्हणजे तेथील राजकारणातील एक कारस्थान करणारे पात्र.
ह्या सिनेमातील काश्मीरमधील अलगतावादी म्हणजे शेक्सपियरच्या नाटकातील राजे , हैदरचा काका खुर्रम म्हणजे क्लाऊडीयस हे पात्र,
विभा एका बाजूला म्हणतात की मी राजकीय भाष्य करीत नाही. मी फक्त माणूस म्हणून राजकीय प्रश्नाकडे बघतो आहे. काश्मीरमधील विचित्र परिस्थितीत अडकलेल्या एका कुटुंबातील निरनिराळ्या व्यक्तींच्या दृष्टीकोनातून बघतो आहे. AFSPA ह्या राजकीय समस्येकडे मी लक्ष वेधून घेतो आहे. त्या पैलूचा काय परिणाम होतो आहे ते शोधतो आहे. त्याचप्रमाणे असंख्य विधवा बायकांच्या प्रश्नाकडे पाहतो आहे.
हाच तर ह्या फिल्मचा उद्देश होता. पण भाष्य करताना विभांचा कल कोणत्या बाजूला आहे हे सतत जाणवते आणि त्यांच्या डाव्या विचारसरणीमुळे ह्या संपूर्ण प्रश्नाकडे कसे बघतात हे प्रकर्षाने जाणवते. आणि तेथेच ह्या कलाकृतीचे कलामूल्य नाहीसे होते व शेक्सपियरच्या पात्राशी  ह्याचा काहीच संबंध नाही असे वाटू लागते.
आतंकवादी का होतात ? हे शोधताना एका बाजूला आतंकवादी समर्थन, सार्वमताचा मुद्दा ठासून मांडणे , मानव हक्क चळवळीचे आपण विचारवंत असल्यामुळे भारतीय सैनिकांनी केलेला अत्याचार योग्य नाही अशी भूमिका घेणे हाच तर ह्या कलाकृतीचा उद्देश असावा हे चित्रपट पाहून जाणवते. काश्मीर मधील अलगतावादी मंडळीना हा सिनेमा अधिक आवडण्याची जास्त शक्यता आहे. ते अंतर्मुख होऊन विचार करणारे असतील असे वाटत नाही. आपल्यासारख्या प्रेक्षकांना हा विचार मुळीच योग्य वाटणार नाही म्हणून हा चित्रपट कितीही कलात्मक करण्याचा प्रयत्न केला असला तरी आवडत नाही. काश्मीरचा प्रश्न गुंतागुंतीचा आहे. तेथील राजकर्ते , केंद्रात राज्य करणारे आपले सरकार , तेथील अलगतावादी  गट आणि भारतीय सेनेला देण्यात आलेले विशेष अधिकार ह्या सर्वांचा विचार सर्वांनी करावा म्हणून मी हा चित्रपट काढला असे विभांचे म्हणणे आहे. पण त्यांचे भाष्य हे संतुलित नसल्यामुळे पटणारे नाही असे चित्रपट पाहिल्यानंतर वाटते. 
विभा म्हणतात मी हे सारे मला मांडायचे म्हणून मांडतो.  मी अंतर्मुख होऊन विचार केला आहे. तुम्हीही विचार करा असे ते एका बाजूला सांगतात तर मला प्रेक्षकाशी काही देणं घेणं नाही. त्यांना पाहिजे तो अर्थ त्यांनी लावावा. मी लोकप्रियतेच्या मागे लागून काहीही लिहित नाही, असेही ते म्हणतात.
शेक्सपियरकडे लोक पुन्हा पुन्हा जातात. त्याच्या Hamlet चा आधार घेऊन काश्मीर प्रश्नाकडे तेथील आतंकवादी चळवळीकडे एक छोटीशी गोष्ट घेऊन जाणारा हा कलावंत उगाचच साम्य शोधतो आहे असे मला तरी सिनेमा बघितल्यावर वाटले. शेक्सपियरच्या नाटकात मानवी संबंधाचे गुंतागुंतीचे संबंध दिसून येतात. अनेक भावभावनांना वाट करून दिलेली असते. प्रेम , राग , द्वेष , मत्सर , कुटुंब व त्यातील विविध प्रकारची माणसे आणि देश आणि प्रांत ह्या सर्वांचे विलक्षण मिश्रण त्याच्या नाटकात होते. तसे काही ह्या चित्रपटात दिसून आले नाही. तेंव्हा शेक्सपियरचा आधार घेऊन असा चित्रपट काढला असे म्हणणे योग्य नाही.

लंबक कुठे झुकतोय ?



मकरंद जोशी ह्या सयोंजकानी दीपावली अंकात घडवून आणलेली चर्चा.  भारतीय आणि जागतिक - राजकारणाचा एकूण लंबक डावीकडून उजवीकडे झुकतोय असे जाणवल्यामुळे घडवून आणलेली चर्चा. सर्व लेखक डाव्या किंवा समाजवादी विचारसरणीकडे झुकलेले .उत्तम कांबळे ह्यांना समाज धर्माच्या नावाने हळवा बनत चालला आहे असे वाटते .त्यांनी आरक्षणावर खूप सडेतोड विचार मांडले आहेत . बाकीचे विचार फारसे पटणारे नाहीत . मी त्यांचे मार्क केलेले लिखाण अवश्य वाचा.
जयदेव डोळे ह्यांना मी ते तरुण असताना केलेल्या युक्रांद चळवळीपासून ते जर्न्यालिझमच्या प्राध्यापकी पर्यंत ओळखतो . डावे- समाजवादी कल असलेले. त्यांनी मोदींचा उदय कसा झाला ?,आणि आजचा मध्यमवर्ग त्यास कसा जबाबदार आहे? समाजवाद्यांची - डाव्या विचारसरणीची पीछेहाट होण्यास सुखवस्तू मध्यमवर्ग जबाबदार कसा जबाबदार आहे? ,  असा विचार मांडताना समाजवादी लोकांचे काय चुकत गेलं ह्याचा आढावा घेतला असता तर अधिक चांगलं झालं असतं . त्यामुळे त्यांचे मुद्दे पटत नाहीत.
हेमंत देसाई , पूर्वी मटाचे लेखक-पत्रकार . डाव्या विचारसरणीचे . जगभराच्या राजकारणाचा धांडोळा घेतलाय .अति डावे - अति उजवे ह्याबद्दल लिहिलंय . कम्युनिस्ट राजवटीत हुकूमशहा कसे झालेत आणि त्यांनी मार्क्सला कसं मागे टाकलं , ह्या बद्दल लिहिलं असतं तर...!  कम्युनिझम जगातून कसा नाहीसा झाला ?,हे न सांगता उजव्यांना ठोकून काढण्यात लेखाची लांबी वाढवली . डावे किंवा समाजवादी कुठे चुकतात हे न सांगता उजव्यांना ठोकण्यात अर्थ तो काय?  कंबोडियाची कम्युनिस्ट हुकूमशाही राजवट , सोव्हिएत युनियनचे विघटन , चीनच्या  माओनंतर आजचा नवा भांडवली माओ , व्हिएतनाम मध्ये होत असलेले बदल आणि भारतात निष्प्रभ झालेली कम्युनिस्ट चळवळ ह्याचा कुठेच उल्लेख नाही . त्यामुळे लेख प्रभावी झाला नाही.
अच्युत गोडबोले तरुणपणी कम्युनिस्ट होते . नंतर आयटीत सीईओ होते. मोदी सरकारच्या तीन वर्षाचा आढावा घेताना त्यांच्यातील डावी विचारसरणी जागी झाली आणि त्यांनी मोदींच्या अर्थकारणावर टीकात्मक लिहिलं. राजकारणावर त्यांनी खूप दिवसांनी लिहिलं असावं.
विश्वास पाठक हेच एक उजव्या राजकारणाचे प्रतिनिधी . त्यांनी भाजपचा बाजूने लिहिणे स्वाभाविकच आहे. काही ठोस मुद्दे मांडायला ते विसरले नाहीत. रवी आमले उदारमतवादी शहाणीव ह्याबद्दल लिहिताना उजव्यांना ठोकत होते.
पाठक सोडले तर सगळे डाव्या- समाजवादी वृत्तीचे . ह्या पुरोगामी - समाजवादी लेखकांना - डाव्या विचारसरणीचे लोक आणि पक्ष का मागे पडत आहेत? ,  त्यांचे कुठे चुकत आहे?, उजवे का सबल होत आहेत ?, व काँग्रेसला पुन्हा चांगले दिवस का येत नाहीत ?, किंवा चांगला पर्याय का उभा राहात नाही?, ह्या विषयाचे चिंतन कोणीही केलेले नाही. ह्यावर चर्चा व्हावी हे नक्की. झापड लावून लिहिल्यामुळे मुद्दे पटत नाहीत.
काही लेखांचे मुद्दे सोबत जोडतो आहे.