Thursday, May 31, 2018

माणसं: विजय तरवडे


आपल्या आयुष्यात भली-बुरी माणसे येतात , चांगली- वाईट भूमिका पार पडतात आणि भूमिका संपली की विंगेत जातात . आपण वाईट लोकांना हाकलू शकत नाहीत नि चांगल्या लोकांना थांबवू शकत नाही.” हाच माणसाकडे बघण्याचा विजय तरवडे ह्यांचा दृष्टीकोण .
अशीच विविध रंगी माणसे त्यांच्या जीवनात आली आणि गेली .त्या माणसांच्या आठवणीतून त्यांनी उभी केली व्यक्तिचित्रे . त्या माणसांच्या चटका लावणाऱ्या आठवणी त्यांनी आपल्याला सांगितल्या आहेतमाणसंह्या त्यांच्या पुस्तकातूनदीडदोन पानांत असे व्यक्तिचित्रण करणे तसे कठीण . मोजके शब्द .खुसखुशीत भाषा . मित्राशीच बोलतो आहोत असे संवाद . विजय तरवडे ह्यांना ही माणसे शाळेत , कॉलेजमध्ये आणि ते ज्या छोट्यामोठ्या नोकर्या करीत असत त्या कार्यालयात भेटली. म्हणजे ही सारी माणसं आपल्याही  आजूबाजूची . त्यांनी विमा कंपनीत अनेक वर्षे विविध पदावर काम  केलं असल्यामुळे त्यांना अनेक बेरकी , विचित्र स्वभावाची माणसे भेटली. ह्या कनिष्ठ- मध्यम वर्गीय माणसात त्यांचा माणूस शोध चालू होता .तसे पाहिलं  तर हे लिखाण थोडेसे आत्मचरित्रात्मक असेल जर ही माणसे त्यांच्या प्रत्यक्ष जीवनात आली असतील तर किंवा त्यांचा माणूस शोध चालू असेल आणि एखाद्या कथाकादंबर्यातील ही पात्रे असतील. मला ती शक्यता कमी वाटते कारण ह्या पुस्तकातीलमीविजय तरवडेच आहेत. खरं तर ही माणसं तुम्हा-आम्हाला नेहमीच भेटतच असतात म्हणून हे पुस्तक वाचताना आपणच आपल्या जीवनातील अशी माणसं शोधत जातो किंवा आठवत राहतो
विजय तरवडे ह्यांना परचुरे सरांसारखा माणूस भेटला नसता तरजिंदगी जिंदादिली का नाम है ! ‘ हे सहजासहजी समजलं नसतं .
भावे आणि शंकर सारडा सारखी माणसं भेटली नसती तर त्यांचालेखकूझाला नसता
विजय तरवडेसाधनापरिवाराशी संबंधित . त्यामुळे लेखक, स्तंभ लेखक आणि पत्रकार .
विजय तरवडे ह्यांनी वसंत बापट , प्र प्रधान , रवींद्र पिंगे , सुहास शिरवळकर , शी भावे , जयवंत दळवी आणि शंकर सारडा ह्यांची व्यक्तिचित्रे खूप सुंदर उभी केली आहेत . ही मंडळी जनातली आणि मनातली . आपण ह्या सर्वाना त्यांच्या साहित्यातून अनेकदा भेटलेलो आहोतच . शेवटी लेखकातील माणूसही आपण शोधतच असतो. त्यांनी तो जवळून पाहिला.
विजय तरवडे त्यांच्या एका प्राध्यापकाच्या आठवणीने फार व्याकूळ होतात . ते लिहितात ....
तो भूतकाळ आता फक्त माझ्या मनात आहे . तो पुन्हा जीवंत करण्याचा अट्टाहास का धरू ? तो आहे फक्त माझ्या आणि कुणा कुणा संबंधित स्वजनापुरता. कधी कधी तो स्मरतो . कंठ दाटून आला तर आवंढा गिळतो. वर्तमान हा फक्त नावापुरता वर्तमान असतो . त्यांचे एकमेव शांतीस्थान म्हणजे भूतकाळ , स्मरणकाळ !’ 
वय झालं की आपण सगळे तेथेच रमतो . हे सत्य नाही का ? हेच त्यांनी ह्या पुस्तकातून त्यांना भेटलेल्या माणसाविषयी सांगितलं आहे . ते खूप भावपूर्ण आहे . अंतर्मुख करणारे आहे
ह्या पुस्तकातील माणसं त्यांना जीव लावतात . भांडकुदळ नातेवाइकांच्या आणि खडूस साहेबांच्या विश्वात त्यांना आपण एकटे नाहीत असे वाटते म्हणून ते भरभरून ह्या माणसांवर लिहितात
अग्निमित्र प्रधान सरांनी त्यांना लिहितं केलं , वसंत बापटानी विजय तरवडे ह्यांची कवितासाधनेतछापली . कुसुमाग्रजांनी त्या कवितेचे कौतुक केलं . विजय तरवडे ह्यांच्या सारख्या नवोदित लेखकाला त्यावेळी नोबेल प्राईज मिळाल्यासारखा आनंद झाला . त्याच वेळी जयवंत दळवी ह्यांनी त्यांच्या लिखाणाचे कौतुक केलं पण सत्यकथेने  त्यांना नव्याने लिखाण करण्याचा सल्ला दिला . त्यामुळे त्यांनी तो नादच सोडून दिला
असा हा लेखक, कथाकार , कादंबरीकार आणि स्तंभ लेखक विजय तरवडे
ह्या पुस्तकात वर्णन केलेली काही माणसे त्यांना सोडून गेली. तेव्हा त्यांना अशा बातम्यांची संवय करून घ्यावयास हवी असे वाटू लागते ते भावनाविवश होताना दिसतात
अशा माणसातच रमायला हवे. जिंदगी जिंदादिली का नाम है ! हेच खरं .
( विजय तरवडे माझे फेसबुक मित्र . अजून आमची प्रत्यक्ष भेट झालेली  नाही. एकदा फोनवर बोलणे झाले होते .भेटू लवकरच . पुण्यात किंवा मुंबईत )

Sunday, May 27, 2018

स्वातंत्र्यवीर सावरकर

माझ्या शालेय जीवनात नेहरू - गांधी , नेताजी - सावरकर ह्यांच्यासंबंधीचे धडे अभ्यासक्रमात होते . ' गाऊ त्यांना आरती ' असा आमच्या मनांत भाव असायचा . आज सामाजिक - राजकीय वातावरण गढूळ झाले असून एक विद्वेषाचे वातावरण सर्वत्र दिसते  आहे .
गोपीनाथ तळवलकर ह्यांचे ' आनंदभुवन ' हे नेहरूंचे पुस्तक आम्हाला नॉनडिटेल म्हणून अभ्यासक्रमात होते . त्याचे जवळजवळ पाठांतर केले होते . नेहरू औरंगाबादला आले तेव्हा त्यांना पहाण्यासाठी आम्ही मुलं  किती उत्सुक होतो . त्यांच्या शेरवाणीवर असलेल्या गुलाबाच्या फुलाचे आम्हाला खूप कौतुक होते . अलाहाबादला जाऊन 'आनंदभुवन 'पहायचे राहून गेले पण दिल्लीला पहिल्यांदा गेलो तेव्हा 'त्रिमूर्ती'ला आवर्जून भेट दिली . आम्ही नेहरू भक्त लहानपणापासूनच होतो .
सुनील नभ हे सुंदर नभ हे नभ हे अतलची हा 
सुनील सागर सुंदर सागर सागर अतलची हा 

ह्या ओळी शाळेतील पुस्तकात वाचल्या तेव्हाच पाठ झाल्या होत्या . शिक्षकांनी ही कविता खूप छान शिकवली होती . त्यानंतर ' सागरा प्राण तळमळला ...' हे गीत जेव्हा जेव्हा ऐकलं तेव्हा तेव्हा सावरकरांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहिली . ' १८५७ चे बंड की स्वातंत्र्य युद्ध ' ह्या वादविवाद स्पर्धेत भाग घेतला होता त्यापूर्वी सावरकरांचे पुस्तक वाचलं होतं . सावरकर गेले तेव्हा शाळकरी मुलगाच होतो .औरंगाबादच्या बळवंत मोफत वाचनालयात वर्तमानपत्र वाचायला जात असे . तेथे ' मराठा ' तील आचार्य अत्रे ह्यांचा सावरकरावरील लेख  वाचला  तो आजही आठवतो . त्यांचे मराठी साहित्य संमेलनातील भाषण सर्वात वेगळं होतं ते ही वाचलेलं आठवतं .त्यांचा  गायीवरचा लेख आणि  इतर विज्ञानवादी निबंध वेगळी दृष्टी देऊन गेले . मणीशंकर अय्यर ह्या केंद्रीय मंत्र्यांनी जेव्हा त्यांच्या विरुद्ध मोहीम सुरु केली तेव्हा सावरकर विरोधकांची दुसरी बाजू समोर आली . तो पर्यंत सावरकर द्वेष प्रखरपणे जाणवला नव्हता . पु नी अटलजींच्या बरोबर ठाण्यातील एका सभेत सावरकरांच्यावर केलेलं भाषण आजही आठवतं . अलीकडे फेसबुकवर सावरकरविरोधी जे लिहिलं जातंय ते पाहिलं म्हणजे ह्या लोकांना हा क्रांतिकारक , मराठी कवी , वैज्ञानिक दृष्टी असलेला राजकारणी समजलाच नाही . भले त्यांचा हिंदुत्ववाद लोकांना मान्य नसेल पण ह्या सोकॉल्ड सेक्युलरवादी लोकांनी ७० वर्षात देश कुठे नेऊन ठेवलाय ? तो मणीशंकर अय्यर काश्मीरमध्ये जाऊन त्या गिलानीबरोबर कसली खलबतं करीत असतो आणि दुसर्यांना राष्ट्रद्रोही म्हणतो . त्या अरुंधती रॉयची बाजू घेणारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारताना तिच्या फुटीरतावादी मंडळीबरोबरच्या गाठीभेटीबद्दल एक  चकार शब्द बोलत नाहीत . तो कन्हय्या काहीही बोलला तरी चालतं . विक्रम गोखलेपरेश रावळ बोलले की किरट्या समजेचे वाचाळपंथी  अशी संभावना करणारे हे डावे , पुरोगामी , समाजवादी आणि निधर्मी विचारवंत . गांधीजींचा पराभव करणारे हे गांधीवादी . ह्यांना गांधीही समजले नाहीत  , नेहरूही समजले नाहीत . सावरकर असो का नेताजी सुभाष , त्यांना समजून घेता येतील असे वाटत नाही . गांधी , नेहरू , नेताजी आणि सावरकर ह्यांचे जे योगदान आहे ते आहेच . त्यांच्या काही चुका झाल्या असतील . पण त्यांनी जेवढं दिलंय तेच अधिक महत्वाचं आहे .मला हे सारेच वंदनीय .
त्याच वेळी शाळेत वादविवाद स्पर्धा असत . एकेवर्षी विषय होता ' १८५७ चे बंड की स्वातंत्र्य युद्ध ' . आणि सावरकरांचे पुस्तक हातात पडले  आणि भारावून गेलो . तात्या टोपे , महाराणी लक्ष्मीबाई आणि बहादुरशहा जफारखान ह्यांच्या इंग्रजांविरुद्धच्या लढ्याची ओळख झाली . झांशीला अलीकडे गेलो तेव्हा सावरकर आठवले . योगायोगाने जो गाईड होता तो त्या भागातील मुस्लिम होता . त्याच्या अंगात जणूकाही वीरश्रीच संचारली होती . त्याने आपल्या आवाजात त्यावेळचे चित्र उभे केले . मला सावरकरांच्या लिखाणाचीच आठवण झाली . तसेच शब्द . तशीच भाषा .
ग्वाल्हेरला  झांशीची राणी जिथे मारली गेली त्या जागेवर जेव्हा गेलो तेव्हा ग्वाल्हेरच्या शिंद्यानी सहकार्य न दिल्यामुळे राणी कशी दुःखीकष्टी झाली असेल ते आठवले . त्या ग्वाल्हेरच्या फंदफितुरी करणाऱ्या घराण्याबद्दल आजही  मनात राग आहे .
सावरकरांचे ' माझी जन्मठेप ' दोनदा वाचले . अंदमानला गेलो तेव्हा त्यांच्या खोलीच्या बाहेरील निळा समुद्र पाहिला तेव्हा ' सागरा प्राण तळमळला ' ही  त्यांची कविता आठवली .
मणी शंकर अय्यर सारखा माणूस इतका सावरकर द्वेषाने बोलतो तेव्हा ह्या पाकिस्तानप्रेमी माणसाविषयी संताप येतो . त्याला सावरकर समजलेच नाहीत म्हणून कींव करावीशी वाटते .
अलीकडेच मुक्ता बर्वे ह्यांनी' चॅलेंज ' हे सावरकर ह्यांच्या जीवनावरचे सुरेख नाटक रंगभूमीवर आणले आहे . ज्यांना सावरकर थोडे समजून घ्यावयाचे आहेत त्यांनी ते अवश्य बघावे .
समाजवादी  नेते एस. एम. जोशी ह्यांना  १९२३ पूर्वीचे सावरकर मान्य आहेत असे ते म्हणाले होते . नंतरचे हिंदुत्ववादी सावरकर त्यांना आणि इतर समाजवाद्यांना मान्य नाहीत . नसतील मान्य .
मला सावरकरांचे  एक वाक्य नेहमी आठवते ...
' तुम्ही तुमचे अमेरिकत्व विसरणार असाल , तुम्ही तुमचे इंग्रज असणे विसरणार असाल , तुम्ही तुमचे जर्मन असणे विसरणार असाल तर मी माझे भारतीयत्व विसरायला तयार असेल .' त्यांच्या प्रखर राष्ट्रवादाची ही व्याख्या .
असा प्रखर राष्ट्रवाद मला व्हिएतनामी लोकात दिसून आला .
शालेय जीवनात सावरकरांचा प्रभाव पडला तो त्यांच्या साहित्यामुळे . विशेषतः कवितेमुळे . साहित्यिक सावरकर नेहमीच मनाच्या कोपऱ्यात वस्तीला असतात . आचार्य अत्रे ह्यांचा सावरकरांच्यावरचा मृत्यू लेख आजही आठवतो .  मुंबईला प्रथम आलो तेव्हा शिवाजी पार्कला भेट दिली तेव्हा सावरकर सदनाच्या जवळ जाऊन थोडा वेळ उभा राहिलो तेव्हा मला दारात सावरकर उभे आहेत असाच भास झाला होता .
सावरकरांच्या विषयी जो विद्वेष पसरविला जातो त्यामुळे मन उदास होते . पटत नसतील त्यांचे विचार .पण द्वेष का ? तसे पाहिले तर नेहरू - गांधींचे सर्व विचार सर्वांना पटतातच असे नाही . त्यांचे मोठेपण त्यामुळे कमी होत नाही .
मार्ग भिन्न . विचार भिन्न . वाटा निराळ्या . मला तरी नेहरू - गांधींसारखे सावरकर - नेताजी सुभाष तेवढेच वंदनीय आहेत .