Monday, January 11, 2016

आपल्या देशाच्या नेतृत्वाला झालं आहे तरी काय ? Where Have All The Leaders Gone ?


आपल्या देशाच्या नेतृत्वाला झालं आहे तरी काय ? पुरे झाला हा राजकीय गोंधळ .
मला माहित आहे की मी एकटाच असा नाही की ज्याला असं वाटतं की हे काय चाललयं ? नुसता वैताग . मोदी – राहुल गांधी – अरविंद केजरीवाल – लालू प्रसाद / नितीशकुमार, ममता , जयललिता ...... ही सगळी सत्ताधारी राजकारणी मंडळी काय करीत आहेत ? विकासाच्या नावाने बोंब. असं वाटलं ,आपण एका बलाढ्य लोकशाही देशात राहतो. पण कसलं काय ? नको ही वाटमारी करणाऱ्या नेत्यांची राजेशाही. आपण निराश आणि वैतागलो आहोत असे बहुतेक लोकांना जाणवते आहे आणि त्याचाच हे लोक फायदा उठविताना दिसत आहेत. आपण बोललंच पाहिजे . त्याचा फारसा उपयोग होईल अशी शक्यता नसतानाही बोललं, लिहिलं पाहिजे म्हणून हा खटाटोप. शेवटी हा देश आपला आहे . त्यांना आंदन दिलेला नाही. देशाच्या राज्यघटनेचा सतत उल्लेख करीत हे लोक आपल्यावर राज्य करीत असतात. ज्या संसदेवर हे निवडून आले आहेत त्या संसदेचे अधिवेशन एक दिवस चालू देत नाहीत. महत्वाच्या बिलावर विधायक चर्चा करीत नाहीत. रोजचे भत्ते मात्र खातात . अशी लोकशाही हवीच कशाला ? त्यासाठी ह्यांना शिक्षाच करावयास हवी ? ह्यांना बहुमत जरी दिलं तरी राज्य करता येत नाही. हे लोक स्वतःचे पगार आणि भत्ते मात्र एकमुखाने मंजूर करून घेतात. त्यावेळी ह्यांना कसलीही लाज वाटत नाही. तिकडे अतिरेकी लचके तोडतच असतात. रोज नवी घटना . सैनिक मरतात . सीमा असुरक्षित असते. कोणालाही काही करावेसे वाटत नाही. टीव्ही च्यानेलवर निष्फळ गप्पा. आरडाओरडा. बघवत नाही तो टीव्ही. ह्यासाठी का आपण स्वातंत्र्यलढा दिला ? मला वाटतं हे जर तुम्हाला सहन करावसं वाटत असेल तर आपण देशप्रेमी नाहीत हेच सिद्ध होते आहे . आपण असे शांत बसणार असू तर हे आपल्याला नागवे करतीलच पण देशाची वाट लावतील. पुरे झाले . ह्यांना ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे . आपण सामान्य माणसानीच आवाज उठविणे आवश्यक आहे . आपण मतदान करतो पण त्यांना ठणकावून सांगत नाही म्हणून ही मंडळी माजली आहेत. आपण आपला आवाज मोठा केला पाहिजे. हे लोक कोण आहेत ? आपणच ह्यांना निवडून देतो . मग हे एवढे माजतात कां ? तुरुंगाची हवा खाऊन आल्यावरही ह्यांचा माज जात नाही. हे एवढे निर्ढावलेले कसे ?
हे सर्व काय चाललं आहे ? आपणच का सहन करायचं ? आपण ह्यांना प्रश्न विचारत नाहीत म्हणून ? अधूनमधून एखाद्या सभेत काही विद्यार्थी / विद्यार्थिनी ह्यांना प्रश्न विचारून त्यांची भंबेरी उडवितात तेव्हा वाटते की ह्यांना असेच विचारत राहिले पाहिजे. ह्यांची बोलती बंद केली पाहिजे . आपण बोलले पाहिजे आणि त्यांनी ऐकले पाहिजे. तीच वेळ आली आहे. We are sick and tired. Enough.
सध्याचा सत्ताधारी भाजप असो की अनेक वर्षे सत्ता भोगलेला कॉंग्रेस पक्ष असो. प्रादेशिक पक्ष ही तसेच. प्रादेशिक नेतेही लुटारू . ही लोकशाही आहे की हुकुमशाही की घराणेशाही. राजे गेले पण नवे राजकीय घराणे निर्माण झाले आहेत. तोंडात शब्द मात्र समाजवाद , पण आहे नुसता माजवाद. आपण हे सहन करतो म्हणून ह्यांचे फावते.
कसले हे राजकीय नेतृत्व ? ज्या नेतृत्वाला आपण सलाम करून गुणगान गातो ते तर खुजे नेतृत्व . हे लोक गांधी – नेहरू –सरदार – नेताजी ह्यांची नावे सतत घेत असतात. शिवाजी – फुले – आंबेडकर ह्यांच्या नावाचा नित्य जप करीत असतात आणि नेमकं उलटं करीत असतात ? आपण ह्यातून काहीच शिकणार नाही असे दिसते ?
मी किंवा माझ्यासारखे असंख्य लोक राजकीय पक्षापासून दूर असतो. पण हे राजकारणच आपल्या जीवनावर सतत परिणाम करीत असते व आपल्याला सुखाने जगू देत नाही. त्यामुळे आपले जीवन राजकारण मुक्त होऊ शकत नाही. त्याकरिता आपल्याला कसे नेतृत्व हवे ह्याचा विचार करीत असताना  खालील दहा नेतृत्व गुणांचा विचार माझ्या डोळ्यासमोर येतो. आपण सर्वांनी सध्याच्या नेतृत्वाबद्दल विचार करताना ह्या नेत्यांचे मूल्यमापन केले पाहिजे . त्यासाठी सध्याच्या ह्या नेत्यांना आपण १ ते १० गुणांपैकी किती गुण देणार आहोत ह्याचा विचार करावा व त्यांचे मूल्यमापन करावे. त्यावरून ह्या नेते मंडळींचे नेमके स्थान समजू शकेल.
१)      A Leader has to show the curiosity.
२)      A Leader has to be a creative.
३)      A Leader has to communicate.
४)      A Leader has to be a person of CHARACTER.
५)      A Leader must have Courage.
६)      To be a Leader, you have got to have CONVICTION.
७)      A Leader should have CHARISMA.
८)      A Leader has to be COMPETENT.
९)      You can’t be a Leader if you don’t have COMMON SENSE.
10)    Leaders are made, not born. Leadership is forged in times of crisis.
वरील दहा गुणांचा विचार करून आपल्याला सध्याच्या नेते मंडळींचे मूल्यमापन करायचे आहे . बघा तुम्हाला काय वाटते? ‘Where Have All The Leaders Gone?’ हे आयोकोका ह्या प्रसिद्ध अमेरिकन विचारवंतांचे पुस्तक नुकतेच वाचण्यात आले. त्यात त्यांनी अमेरिकन नेत्यांचे केलेले मूल्यमापन लक्षवेधी होते . आजच्या परिस्थितीत आपल्या राजकीय नेत्यांचे मूल्यमापन आपण सर्वांनी केले तर आपल्याला आज हे असे कां होते आहे?, हे तर समजेलच पण आपण योग्य त्या नेत्याकडे नेतृत्व देण्याचा विचार सुरु करू. तेच आपल्या हातात आहे . आपण ह्याचा विचार करून आपले नेते निवडले पाहिजे.
1)      Curiosity: नेता असा असायला पाहिजे की त्याच्या स्वतःच्या वर्तुळाव्यतिरिक्त (जे हांजी हांजी करणारे व Yes Sir संस्कृती मध्ये अडकलेले होयबा असतात अशा लोकांच्या सहवासात असलेला ) त्याने इतर लोकांना समजून घेतले पाहिजे . त्याचे वाचन अफाट असले पाहिजे व जागतिक घडामोडीचे ज्ञान असले पाहिजे .त्या नेत्याने इतर तद्न्य मंडळीशी चर्चा आणि संपर्क साधला पाहिजे . स्वतःच्या विचारांची कक्षा ज्यांना वाढवता येते तेच अधिक चांगले नेतृत्व देऊ शकतात. आपण जे करतो तेच खरे आणि योग्य असा ज्याचा विश्वास असतो तो नेहमीच बरोबर नसतो . कोणत्याही नेत्याला योग्य असे सल्लागार असणे फार महत्वाचे असते . दुसर्यांचे जो ऐकून घेत नाही किंवा समजून घेत नाही तो बहुधा गर्विष्ठ असतो. आपल्या सध्याच्या नेतेमंडळींचा विचार केला तर काय दिसून येते ? मोदींच्या आजूबाजूला हांजी हांजी करणारी मंडळी नाहीत हे खरे आहे . मोदींच्या वर्तुळात शिरणेच कठीण आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय राजकारणाचा फारसा अनुभव नव्हता म्हणून त्यांनी गेले वर्षभर फिरून जागतिक राजकारणात स्वतःचे नाव निर्माण करण्याचा प्रयत्न करून काही जागतिक मित्र मिळविले आहेत ह्यात वाद नाही. स्वतःचा ठसा निर्माण करण्यास काही काळ जावा लागेल . पंडित नेहरुनंतर असा प्रयत्न करणारे ते दुसरे पंतप्रधान आहेत. ह्याउलट सोनिया गांधी गेल्या दहा वर्षात आपला ठसा निर्माण करू शकल्या नाहीत. राहुल गांधी ह्यांच्या आजूबाजूला खुषमस्करे असतात. ती कॉंग्रेस कार्यकर्त्यांची संस्कृतीच आहे. राहुल गांधी परदेशात दौरे करतात पण ती त्यांची वैयक्तिक सुट्टी असते व ते त्या देशात जाऊन नेमके काय करतात हे कोणालाच माहित नसते . एका मोठ्या विरोधी पक्षाचा हा उपाध्यक्ष आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणताही  सहभाग घेताना दिसत नाही . तशी छाप ही नाही. राष्ट्रीय राजकारणात त्यांची कसलीही Curiosity दिसत नाही.प्रादेशिक नेते मंडळी ह्या बाबतीत काहीच करताना दिसत नाहीत. जे आडात नाही ते त्यांच्या पोहर्यात कुठून येणार ? केजरीवाल ह्यांचे चांगले सहकारी त्यांना केव्हाच सोडून गेले आहेत. ज्या अण्णा हजारे ह्यांचा हात धरून ते चळवळीत आले होते त्यांनाच त्यांनी रामराम केला.
2)      Creative: नेतृत्व स्वनिर्मितीक्षम असावे लागते. इतरांच्यापेक्षा वेगळे आणि स्वतःचे असे काही विचार असावे लागतात. दूरदृष्टी असावी लागते. निश्चित विचार असावा लागतो. मार्ग शोधून काढण्याचे वेगळे उपाय शोधावे लागतात. कल्पनाशक्ती अफाट असावी लागते. धरसोड वृत्ती नसावी लागते. स्वतःला वाटले आणि अंत:चक्षुना दिसले म्हणून लगेच निर्णय घ्यावयाचा नसतो. ‘आले मनात की केले’, अशी वृत्ती धीकादायक असते. “ MY INSTINCTS” असे म्हणून निर्णय घेणे चुकीचे असते. ते नेहमीच बरोबर नसते . बदल घडवून आणणे हाच नेतृत्वापुढे खरा पर्याय असतो. मोदींचा विचार केला तर त्यांचे अनेक निर्णय हे “MY INSTINCTS” वर अवलंबून असतात. अलीकडेच रशिया – अफगाणिस्तानला भेट दिल्यानंतर येताना पाकिस्तानला दिलेली भेट. अशी Shock Treatment ही ‘My Instinct’ चाच प्रकार आहे .
मोदी ह्यांनी स्वतःच्या अनेक कल्पनांना उदाहरणार्थ  Make in India, Digital India, Skill India, Swachha Bharat, प्रत्येक भारतीयाचे बँक खाते, अशा अनेक योजना अमंलात आणण्यासाठी खूप प्रयत्न करून आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटविण्याचा प्रयत्न केला आहे , हे खरे आहे पण त्याचा परिणाम दिसून येण्यास काही कालावधी जावा लागेल  . राहुल गांधी ह्यांनी पक्ष बळकट करण्यासाठी फारसे प्रयत्न केलेले दिसत नाहीत. ज्या राज्यामध्ये त्यांचे सरकार आहे त्या ठिकाणी त्यांना आपल्या कल्पना पुढे आणण्याची संधी असूनही त्यांचा प्रभाव दिसून येत नाही. प्रचंड बहुमत असूनही आपण दिल्लीचे मुख्यमंत्री आहोत आणि ज्या काही मर्यादा असल्यातरी काहीतरी करून दाखविण्याऐवजी वेगळेच राजकारण करून नुसती सनसनाटी निर्माण करण्याशिवाय केजरीवाल काहीही करू शकले नाहीत.
3)      COMMUNICATE : प्रत्यक्ष परिस्थितीला समजून घेऊन सामोरे जाणे आणि लोकांना सत्य परिस्थितीची जाणीव करून देणे , त्यांना अंधारात न ठेवता सत्य समजावून सांगणे अतिशय महत्वाचे असते. आपल्या कारभारात विलक्षण पारदर्शिकता असली पाहिजे. खोटेपणा असावयास नको. अप्रामाणिकता नको . आपल्या बोलण्यातून लोकांना सत्य जाणवले पाहिजे. निवडणुकीच्या काळात मोदींनी आपण जनतेशी संवाद साधून मते मिळवू शकतो हे सिद्ध केले आहे पण राहुल गांधी त्यात यशस्वी होऊ शकले नाहीत. कोणत्याही प्रकारे उत्तम संवाद साधता येत नसतानाही सोनियाजी ह्यांनी आपले नेतृत्व कसे निर्माण केले हे एक गूढच आहे. कॉंगेसच्या पूर्वीच्या घराणेशाही संस्कृतीमुळेच ते शक्य झाले आहे. ही नेहरू – इंदिरा गांधी ह्यांची पुण्याई त्यांना उपयोगी पडलेली दिसते. आजच्या परिस्थितीत लोकांशी संवाद साधून पक्ष बळकट करणे अत्यंत महत्वाचे असताना दोघेही योग्य ती पाऊले उचलताना दिसून येत नाही. सध्या त्यांच्या नेतृत्वासाठी खरा कसोटीचा काळ आहे.   
4)      CHARACTER : कोणते योग्य आणि कोणते अयोग्य ? कोणते बरोबर आणि कोणते चूक?, ह्याची नेत्याला जाण असणे अत्यंत आवश्यक. जे बरोबर आहे ते पूर्ण करण्यासाठी जे प्रयत्न करावयाचे असतात ते प्रामाणिक असणे आवश्यक आहे . ज्याच्याजवळ सत्ता असते त्याचे चारित्र्य नुसते शुद्ध असून चालत नाही तर लोकांना त्याची खात्री वाटणे आवश्यक आहे. मोदींनी गुजरातमध्ये Doer म्हणून आपले नाव मिळविले. ‘मी पैसा खाणार नाही आणि कुणाला खाऊ देणार नाही’, असे म्हणणारे मोदी लोकांना आवडले आणि विरोधक कितीही आरोप करू देत त्याचा फारसा परिणाम झालेला नाही हे त्यांनी सिद्ध करून दाखविले. ह्याउलट राहुल गांधी ह्यांनी दहा वर्षात एकही मंत्रिपद न स्वीकारून काहीच करून दाखविले नाही. त्या काळात संसदेत त्यांनी कसलाही प्रभाव पाडला नाही. त्यांना मिळालेल्या संधीचे सोने करता आले नाही त्यामुळे नेतृत्व गुण वाढण्यास वावच मिळाला नाही.
5)      COURAGE : Tough talk is not Courage. नुसता शूरपणाचा आवेश बोलण्यात असणे म्हणजे धैर्य नव्हे . नव्या बदलत्या युगात शत्रुपक्षाबरोबर वाटाघाटी करण्यासाठी बोलणी करण्यात तरबेज असणे म्हणजे खरा शूरपणा . शक्ती आणि युक्तीच्या बळावर विरोधकावर बाजी उलटवणे ह्यात खरा शूरपणा . कधीकधी लोकांना आवडणार नाही असा निर्णय घेऊन अमंलात आणणे ह्यात तुमच्या नेतृत्वाची खरी कसोटी असते .मोदी बोलण्यात टफ असतात हे त्यांनी अनेकदा दाखवून दिले आहे. ह्या उलट नाटकबाजी करून आपण फार शूर आहोत हे दाखविण्याचा राहुल गांधींचा प्रयोग हास्यास्पद वाटतो . त्यांना युक्तीचा वापर करून लोकांची सहानभूती स्वतःकडे वळविण्यात फारसे यश मिळालेले नाही.
6)      CONVICTION: तुमच्या पोटात आग असली पाहिजे ( Fire in the Belly ) कोणतेही हातात घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी सर्व प्रयत्नांची पराकाष्टा आणि संपूर्ण वेळ दिला पाहिजे . स्वतः चा स्वतःच्या कामावर पूर्ण विश्वास आणि निष्ठा असली पाहिजे .मोदी ह्यांच्या भाषणात आणि कृतीत Conviction दिसून येते. ह्याउलट राहुल गांधी ह्यांच्यात ‘Fire in Belly’ दिसून येत नाही . त्यामुळे लोकांना त्यांची तळमळ दिसून येत नाही.  
7)      CHARISMA : करिष्मा ज्यांच्या व्यक्तीमत्वात असतो तोच चांगला नेता होऊ शकतो. असे वलय असावे लागते . आपल्या व्यक्तिमत्वाची छाप पाडता आली पाहिजे . ती आपल्या बोलण्यातून , दिसण्यातून , वागण्यातून व्यक्त होते . आकर्षक व्यक्तिमत्व असणे व ते जपणे फार महत्वाचे आहे . त्यासाठी व्यक्तीमत्वात गोडवा असावा लागतो . लोकांच्यावर छाप पाडता आली पाहिजे . काही जणांना करिष्मा उपजत प्राप्त असतो . काहीजण करिष्मा निर्माण करण्यासाठी  प्रयत्न करीत असतात. मोदींनी आपला करिष्मा निर्माण करण्यात काहीसे यश मिळविले आहे. जसे मोदीद्वेषी आहेत तसेच मोदीभक्त असणार्या लोकांची संख्या खूप आहे. तसे मोदी ह्यांचे व्यक्तिमत्व फारसे आकर्षक नाही. त्यांचे अटलजीसारखे भाषेवर प्रभुत्वही नाही. आपल्या परदेश दौर्यात त्यांनी प्रयत्नपूर्वक आपल्या भाषणांची दखल घेण्याइतकी छाप पाडली आहे. राहुल गांधी ह्यांना आकर्षक व्यक्तिमत्व असूनही ते आपल्या भाषणाची छाप पाडू शकले नाहीत. दहाहून अधिक वर्षे संसदेच असूनही त्यांची छाप पडू शकली नाही. जे मुळातच नाही ते येणार कुठून अशी त्यांची परिस्थिती. तसे पाहिले तर मोदी फर्डा वक्ता नाहीत पण मोदींनी सभा गाजविल्या आहेत. संसदेतही त्यांनी आपले विचार ठासून मांडले आहेत. मोदींना मार्केटिंग चांगले करता येते असे त्यांचे विरोधकच मान्य करतात. नेत्याला स्वतःचे व्यक्तिमत्व विकावेच लागते. केजरीवाल ह्यांनी तसा प्रयत्न केला पण त्यांच्यातील सच्चेपणा लोकांना दिसून आला नाही.    
8)      COMPETENT : आपण नेतृत्वासाठी लायक असले पाहिजे . इतरांच्या तुलनेत अधिक वरचढ व प्रभावी असले पाहिजे . आपल्याकडे तसे कर्तृत्वगुण असले पाहिजेत . तुमच्या आजूबाजूला नुसते हांजी हांजी करणारे स्तुतिपाठक असता कामा नयेत. प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक असलेले  नेतृत्वगुण असणे आवश्यक आहे .मोदींनी आपण Competent आहोत हे पक्षात सिद्ध करून दाखविले आहे. त्यांना आजही त्यांच्या पक्षात अनेक स्पर्धक आहेत. तरीही त्यांनी आपले नेतृत्व पक्षात सिद्ध करून दाखविले आहे. राहुल गांधी ह्यांना त्यांच्या पक्षात अनेक चांगले स्पर्धक असले तरी कॉंग्रेसच्या संस्कृतीत ते बसत नसल्यामुळे कोणीही स्पर्धक नाहीत. तरीही आपण Competent आहोत हे त्यांनी सिद्ध केलेले नाही. केजरीवाल ह्यांनी आपल्या पक्षातील स्पर्धकांना बाजूला केले असून ‘मी म्हणेल तीच पूर्व दिशा’ असा संदेश आपल्या  अनुयायांना दिला आहे. आपण competent आहोत हे सिद्ध करण्याची संधी त्यांना मिळाली असली तर शासन करण्याऐवजी राजकीय गोंधळ घालण्याकडे त्यांचा अधिक कल आहे.  
9)      Common Sense:  नेत्यासाठी सामान्य ज्ञान आणि आकलन शक्ती फार महत्वाची असते. तुमचे तर्कशास्त्र पक्के असावे लागते . ते तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग असते. प्रश्नांना समजून घेण्याची क्षमता असावी लागते. खरे जग काय आहे ? आजूबाजूचे लोक कसे आहेत ? लोकांना कसे सांभाळले पाहिजे ? राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समस्या सोडवताना इतर लोकांना बरोबर घेऊन पुढे कसे जाता येईल व दबावापुढे न झुकता ताठ मानेने निर्णय कसा घेता येईल व आपली स्वतःची छाप पडणे अत्यंत महत्वाचे आहे . विरोधकांना नामोहरम तर करायचे पण दुखवायचे नाही , हे जमणे कठीण असते .मोदींना संसदीय राजकारणात विरोधकांना सांभाळणे जमलेले नाही. ते विरोधकांशी संवाद साधू शकत नाही. पण आंतरराष्ट्रीय राजकारणात त्यांनी आपले कौशल्य दाखविले आहे. How to market India?, हे त्यांना बर्यापैकी जमले आहे. राहुल गांधी ह्यांना I am the Boss / King असे वाटत असल्यामुळे ते त्यांच्याच कोशात असावेत असे भासते. त्यांचा इतर विषयाचा चौफेर अभ्यास असेल असे त्यांच्या आजवरच्या भाषणातून वाटत नाही.
१०)  CRISES MANAGEMENT : नेते जन्माला येत नसतात . नेते तयार करावे लागतात . नेतृत्व निर्माण करावे लागते. स्वतः प्रत्यक्ष युद्धभूमीवर न जाता युद्धात हानी न होता युद्ध जिंकता आले पाहिजे. बोर्डरुममध्ये चर्चेत भाग घेताना स्वतः चे वर्चस्व गाजविणे म्हणजे नेतृत्व करणे नव्हे . प्रश्न गुंतागुंतीचा झाला म्हणजे तो कौशल्याने सोडविणे हे अधिक महत्वाचे असते .मोदी ह्यांनी पक्षातील स्पर्धकांना त्यांच्या पद्धतीने हाताळून Crises Management केले आहे. विरोधी पक्षात बसून संसद बंद पाडण्याशिवाय राहुल गांधी पक्षाला फारसे सावरू शकले नाही. त्यांच्याकरिता नेतृत्व सिद्ध करण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. त्यांच्याकडे पक्षनेतृत्व तर असेच चालून आले आहे . त्याला धोका नाही. पण पक्षाला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी लागणारे नेतृत्व त्यांना सिद्ध करावयाचे आहे. मी मोदिभक्त नाही किंवा मोदिद्वेशी नाही. तसाच राहुलप्रेमी नाही किंवा कॉंगेसचा नाही. नेतृत्वगुणांचा विचार करताना जे दिसते तेच निकष लाऊन ही चर्चा केली असून भारतीय लोकांना नेता कसा असावा ह्या संबंधी विचार मांडला आहे. येणारी काही वर्षे आपणास चांगला नेता मिळण्यास कठीण जाणार आहे असेच दिसते.
आज आपल्यापुढे अनेक समस्या उभ्या आहेत. विकास महत्वाचा आहे पण जागतिक मंदी ,दशहतवाद, सीमेवरील अशांतता , युद्धाचे भय , गरिबी , अज्ञान , बेकारी , वाढती महागाई , अनारोग्य , आर्थिक मंदी , जागतिकरणामुळे निर्माण झालेल्या असंख्य समस्या, औद्योगिकरण , चलनवाढ , विकासाची धीमी गती , भांडवलाची कमतरता , विजेची कमतरता , पाण्याचे दुर्मिक्ष , दुष्काळ , हवामानातील बदल , पर्यावरण , कामगारांच्या समस्या , सुशासन , भ्रष्टाचार असे असंख्य प्रश्न उभे असताना सर्वच क्षेत्रात प्रगती घडवून आणणे कठीण आहे . एक वैज्ञानीक व तंत्रवैज्ञानिक दृष्टी असणारा नेता असणे आवश्यक आहे . शासन अधिक लोकाभिमुख कसे असेल, हे महत्वाचे आहे . नेतृत्वाला व्यापक दृष्टी असणे महत्वाचे आहे .

आपण सामान्य लोकांनी नेते निवडताना असा सर्वांगीण विचार केला पाहिजे तरच असे नेतृत्व उदयास येऊ शकेल. ते आपल्या हातात आहे . नेत्याच्या हातात नाही. कुठे गेले हे सारे चांगले नेतृत्व ? Where Have All The Leaders Gone? असा प्रश्न अमेरिकन लोकांना पडला आहे तसाच तो भारतीय लोकशाहीलाही पडला आहे ? 

1 comment:

  1. SUBJECT WAS VERY GOOD BUT PRESENTATION IS BAD,ONE SHOULD UNDERSTAND MODI IS NOT BORN LEADER AND RAHUL IS ONLY BORN IN LEADER'S FAMILTY . THEY BOTH HAVE TREMENDOS LIMITTIONS. MODI CAN BE GOOD CHIEF MINISTIRIAL CANDIDATE AND RAHUL CAN WORK AS CULTURAL AFFAIRS MINISTER NOT MORE THAN THAT -- REAL LEADER INDIA YET TO SEE OR YET TO ARISE

    ReplyDelete