झुम्पा लहिरी ह्या बंगाली भारतीय अमेरिकन लेखिकेची कादंबरी “
THE LOWLAND “ वाचायला घेतली. The Namesake ही कादंबरी वाचली होती आणि त्या कादंबरीवरचा
सुंदर सिनेमा पाहिला होता. ती कलाकृती आवडली होती. “The Lowland” , ही ह्या
लेखिकेची दुसरी कादंबरी. पुलित्झर / पेन – हेमिंग्वे अवार्ड मिळवल्यामुळे सर्व
परिचित झालेली ही लेखिका एकामागून एक अवार्ड मिळवीत असते. ह्या २०१३ च्या नव्या
कादंबरीला The DSC Prize for South Asian Literature हा अवार्ड मिळाला आहे.
‘The Lowland’
संबंधी माझी पहिली प्रतिक्रिया - एकाच वेळी ही
कादंबरी देशी , विदेशी आणि अदेशी
आहे . ह्या कादंबरीचा अवकाश हा प्रादेशिक आहे तसाच वैश्विक ( Global ) आहे. ही एक छोटा
कौटुंबिक परीघ असलेली कादंबरी आहे असं म्हणावं तर ती नक्षलबारी समस्येवरील एक राजकीय कादंबरी आहे हे लक्षात येते. एका बाजूला नक्षलबारी चळवळीत ओढल्या गेलेल्या एका तरुणाच्या
कुटुंबाची ही करुण कहाणी आहे असे म्हणावे
तर दुसर्या बाजूला नवी क्षितिजे शोधण्यासाठी एक तरुण अमेरिकेचा रस्ता शोधतो आणि आपले सारे काही हरवून बसतो, त्याची ही फरफट कहाणी आहे. ह्या कादंबरीतील एका बुद्धिमान स्त्रीला आयुष्यात नेमके काय हवय, हेच समजत नाही, त्या स्त्रीच्या
आयुष्याची ही शोक कथा आहे. ह्या कादंबरीत कलकत्ता आणि आजूबाजूचा परिसर आहे तसाच
अमेरिकेतील पूर्व आणि पश्चिम किनार्यावरील शहरी जीवन आहे.
अमेरिकेत स्थाईक झालेल्या
भारतीय लोकांच्या जीवनासंबंधी लिहिताना एकाच वेळी त्यांच्या जगण्याच्या समस्यासंबधीचे
लेखिकेचे निरीक्षण जेवढे महत्वाचे आहे तेवढेच अमेरिकन लोकांच्या जगण्याचे वर्णन तिच्या
कादंबर्यातून आणि कथामधून झालेले दिसते.
बंगाली जीवन रेखाटताना त्या कलकत्ता आणि आजूबाजूचा परिसर जसाच्या तसा उभा करतात .
त्यामुळे ती प्रादेशिक कादंबरी आहे असे आपल्याला वाटू लागते. ती तशी प्रादेशिक
नसून देशी आहे कारण भारतातल्या कोणत्याही प्रदेशात जवळपास हेच जीवन आहे. १९७० ते २००८ ह्या काळातील कलकता जीवन ह्या
कादंबरीत चित्रित झाले आहे. नक्षलबारी चळवळीतील अनेक घटना वर्णन करताना त्यावेळचे
कलकत्ता जसेच्या तसे उभे राहते. ह्या कादंबरीतील बंगाली पात्रे अमेरिकेत गेल्यावर जे
जीवन जगतात ते कोणत्याही एन आर आय चे जगणे असते. त्यामुळे ती देशी माणसाची कहाणी
आहे. त्या देशी माणसाच्या आजूबाजूचे अमेरिकन
आयुष्य जेव्हा चित्रित होत जाते तेव्हा ही कादंबरी प्रादेशिक अवकाशातून बाहेर पडून
वैश्विक रूप धारण करते. Rhode Island आणि
त्याच्या आजूबाजूचा परिसर कादंबरीत ठळकपणे चित्रित झाला असून तेथील विद्यापीठातील
भारतीय विद्यार्थ्याचे जीवन प्रभावीपणे चित्रित झाले आहे. बहुतेक भारतीय
विद्यार्थी अमेरिकेत असेच जीवन जगत असतात. शिकायला गेलेला भारतीय तरुण अमेरिकेतील
मुक्त आणि स्वैर जीवनात अलगद अडकतो आणि भरकटतो त्याचेही चित्रण करण्यात आले आहे.
ही कादंबरी तशी राजकीय आहे.
नक्षलबारी चळवळीचा प. बंगालवर झालेला परिणाम प्रभावी पद्धतीने मांडला असून कादंबरी
तरीही रुक्ष झालेली नाही. उदयन हा बंगाली तरुण कलकत्ता विद्यापीठात शिक्षण घेत
असताना नक्षलबारी चळवळीत ओढला जातो आणि चकमकीत मारला जातो. त्याच्या गरोदर असलेल्या विधवा पत्नीवर म्हणजे गौरीवर संकट कोसळते.
उदयनचा अमेरिकेत शिकायला गेलेला भाऊ सुभाष कलकत्याला आई-वडिलांना भेटायला येतो. आपल्या भावजयीला आधार
देण्यासाठी तो तिच्याशी लग्न करतो आणि आपल्याबरोबर अमेरिकेला घेऊन येतो. आपल्या
भावाच्या मुलीला मुलीसारखे वाढवतो आणि बायकोला पुढील शिक्षण घेण्यासाठी सर्व
प्रकारचे प्रोत्साहन देतो. त्याचा हा चांगुलपणा त्याच्या दु:खाचे कारण होतो. जिला
आधार दिला तीच त्याची पत्नी त्याच्याशी तुटकपणे वागते व आपल्या मुलीला त्याच्याकडे
सोडून निघून जाते व स्वतःचे उच्च शिक्षणाचे ध्येय गाठण्यासाठी घर सोडते. आपले
संबंध तोडते. सुभाषशी संपर्क ठेवत नाही. एका
बुद्धिमान स्त्रीच्या मागील जीवनातील पूर्व प्रेमाच्या आठवणी तिचा पिच्छा सोडत नाहीत हे जरी खरे असले तरी
ज्याच्याशी लग्न केले त्याचे जीवन ती उद्ध्वस्त करते. त्यामुळे सुभाषच्या जगण्याची मात्र फरफट होते. अशीही साधी
बंगाली कुटुंबाची कादंबरी. ह्या कादंबरीत कलकत्यातील सामान्य कुटुंबाचे जीवन आहे .
नक्षलवादी चळवळीमुळे उधवस्त झालेले जीवन आहे. कादंबरीत नाट्य आहे . माणूस कसा बदलत
जातो , तो कसा गुंतागुंतीचा आहे, त्याचे अंतर्मन समजणे कसे कठीण आहे, जगताना माणूस
कसा हतबल होतो, त्याच्या हातात त्याचे भवितव्य कसे नसते, भावनिक असणारी माणसे अशी
कशी बदलतात? ती विक्षिप्त का वागतात? एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांची ही कहाणी आहे .
त्यात कौटुंबिक नात्याचा गुंता आहे. त्यांचा जगण्याचा गुंता कसा सुटत नाही आणि त्यांच्यापुढे
नवे प्रश्न कसे उभे राहतात. कादंबरीतील ही
सारी माणसे आपल्या आजूबाजूची असतात.
त्यामुळे ही कादंबरी आपल्या आजूबाजूलाच घडते आहे असे वाटत जाते. माणसाच्या
गुंतागुंतीच्या मनाचा शोध घेणारी ही कादंबरी आहे. ही बंगाली आहे म्हणून प्रादेशिक
आहे. ती सर्व साधारण भारतीय कुटुंबाची आहे म्हणून देशी आहे . अमेरिकन विश्वात घडते
म्हणून विदेशी आहे . दुसर्या देशात स्थाईक असलेली माणसे शेवटी अदेशीच असतात .
म्हणून ही कादंबरी अदेशी आहे.
मस्त वर्णन केलंय कादंबरीच.....जमलं तर नक्की वाचेल हि कादंबरी.
ReplyDeleteYou provoking me to read this. I liked Namesake, it was great (though I feel movie was better). She take very good efforts on detailing every scene in her book.
ReplyDelete