Thursday, October 15, 2015

स्वेतलाना एलेक्सीविच : नोबेल (साहित्य) पुरस्कार २०१५

स्वेतलाना एलेक्सीविच ह्यांना ह्या  वर्षीचे साहित्याचे नोबेल मिळाले आहे. बेलारुसची असलेली ही लेखिका शोधपत्रकार आहे. त्यांचे लिखाण म्हणजे पूर्वीच्या सोव्हिएत युनियनमधील लोकांनी जे अतोनात दु:ख सहन केलं आणि असामान्य धैर्य दाखविलं त्यांची ही दर्दभरी कहाणी आहे. हे लिखाण म्हणजे कथा –कादंबरी नव्हे. अफगाणिस्तान मधील सोव्हिएत लढाई , सोव्हिएत साम्राज्याची झालेली पडझड आणि चेर्नोबिलचा अणुशक्ती अपघात व त्याचे भयंकर परिणाम ह्या विषयावरील अभ्यासपूर्ण लिखाण ह्या अस्वस्थ असलेल्या लेखिकेने जगासमोर मांडले आहे . ह्या पुस्तकातून त्या भागातील लोकांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला जावा म्हणून केले गेलेले लिखाण . ह्या सर्व घटना घडताना तेथील लोकांच्या भावभावनांचा जो कल्लोळ झाला त्याचे विदारक व हृदयस्पर्शी चित्रण ह्या पुस्तकातून होतें . त्यांनी रशियन भाषेतून ३  पुस्तके लिहिली आहेत. स्प्यानीश व इटालियन भाषेतून ही पुस्तके उपलब्ध आहेत. अमेझॉनवर इंग्रजी भाषेतील पुस्तकाकरिता माहिती शोधली पण ती उपलब्ध नाहीत. ते इंग्रजी भाषेत आजतरी उपलब्ध नाही. 

“ मला माहीत नाही की मी कशाबद्दल बोलू – मरण की प्रेम ? दोन्हीही एकच तर नाही ना ? कशावर बोलायचं ? हा मला पडलेला प्रश्न” १९९७ मध्ये चेर्नोबिलच्या अणु अपघाताबद्दल लिहिताना त्यांनी व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया. 
नोबेल जाहीर झाले तेव्हा बोलताना जी प्रतिक्रिया दिली ती खूप काही सांगून जाते. ती अशी ....

सध्या जगण्याचा इतका वेग आहे की आपल्याला विचार करावयास वेळच मिळत नाही. आपल्या बाजूला जे वास्तव आहे त्याचा अगदी थोडासा भाग आपल्या माहितीचा असतो. त्यामुळे आपल्याला फार थोडेच समजते . माझे लिखाण हे असेच आहे. आजूबाजूला जे दिसलं त्याचे हे त्या वेळचे चित्रण आहे. तो त्या माणसांच्या भावभावनांचा आवाज आहे.

मी जे बघितले ते वेदनादायक होतं .माझ्या आजूबाजूची परिस्थिती भयावह होती. असह्य होती. आम्ही त्या परिस्थितीचे बळी होतो. आमच्या कुटुंबाने , आमच्या आजूबाजूच्या लोकांनी हे जागतिक युद्धानंतरचे आयुष्य पाहिले आहे , भोगले आहे. प्रत्येकाची सांगण्यासारखी एक वेगळी गोष्ट आहे . त्या परिस्थितीमध्ये ते काय आणि कसे जगले ह्याची ही कहाणी आहे. त्यांचे ते दु:ख आहे. हिटलरच्या छळ छावन्यावर लोकांनी कां लिहिलं ? ते त्यांनी भोगलं . त्यांना ते सांगावेसे वाटलं . मला ही तसेच मी जे पाहिलं ते सांगावेसे वाटते म्हणून मी लिहिते. ह्या वेदनामय जीवनातून आमची पूर्ण सुटका होऊन आम्ही स्वतंत्र का होऊ शकत नाही हा मला पडलेला प्रश्न आहे. आम्ही भीतीयुक्त वातावरणातून कधी बाहेर पडू ? हे मला भेडसावते.


अगदी जवळच्या मित्राशी बोलता यावे असे मला वाटते . म्हणून मी जे लिहिते ते माझे मनोगत माझ्या मित्राकरिता असते. मला जे आयुष्य दिसले ते त्यांना सांगावेसे वाटते. मी स्वत:ला न्यायाधीश समजत नाही. ती माझी भूमिका नसते. आपण ह्या भयानक भीतीयुक्त वाटेवरून किती दिवस चालू शकू?  हा मला पडलेला खरा प्रश्न आहे. त्यामुळे काव्यात्म शोकांतिका मला त्रास देते. ती सतत माझ्याबरोबर असते, लोकांच्या डोळ्यात अश्रू यावेत म्हणून मी हे लिहित नाही तर डोळ्यातील अश्रुना स्वच्छ ( Purifying Tears )करावे म्हणून मी लिहिते. सर्व गोष्टींचा एकत्रित विचार करता यावा म्हणून हा लिखाण खटाटोप. 
इतकी स्वच्छ भूमिका समोर ठेऊन लिखाण करणारी ही लेखिका.
  
स्वेतलाना ह्या स्टालीनस्लाव ह्या पश्चिम युक्रेन मधील गावात जन्मल्या. वडील बेलारसियन तर आई युक्रेनची. आई-वडील दोघेही शिक्षक . शाळेत असतानाच लिखाणाची आवड निर्माण झाली. काही दिवस एका ग्रामीण शाळेत शिक्षिकेची नोकरी केली व त्यानंतर मिन्स्क विद्यापीठात पत्रकारितेचा अभ्यास केला. १९७२ ला पदवी मिळाल्यावर बेरेसा आणि मिन्स्क येथे पत्रकार म्हणून काम केलं. Neman ह्या साहित्य विषयाला वाहिलेल्या मासिकात नोकरी केली. एका ९ मजली इमारतीमध्ये वास्तव्य केलं. गुप्तहेर संघटना त्यांच्यावर लक्ष ठेवून होती. त्यामुळे महत्वाच्या गोष्टी बोलण्यासाठी फक्त स्वयंपाकघर वापरत असत.

त्यांचे पाहिलं पुस्तक “ I Have Left My Village “ हे कम्युनिस्ट विरोधी असल्यामुळे जप्त करण्यात आलं. ते पूर्णपणे नष्टही केलं गेलं. १९८३ मध्ये “ War’s Unwomanly Face “ हे पुस्तक लिहिलं. दुसऱ्या महायुद्धातील शेकडो स्त्रियांच्यावर जे संकट आलं आणि त्यांनी जे भोगलं त्यावर लिहिलेलं हे पुस्तक.  लिहिल्यानंतर दोन वर्षांनी ते प्रसिद्ध झालं. त्या पुस्तकातील महत्वाचा भाग सेन्सॉरच्या कात्रीत सापडला आणि बराचसा गाळून टाकण्यात आला. ह्या पुस्तकांची फारशी विक्री झाली नाही. २० वर्षानंतात त्यांनी ते पुस्तक पुन्हा लिहिलं आणि गाळून टाकलेला भाग पुन्हा लिहून काढला . कम्युनिस्ट राजवटीत लिखाण स्वातंत्र्यावर कशी बंधने होती हे त्यावरून लक्षात येते.  

Zinky Boys ( १९८९) हे पुस्तक सोव्हिएत -अफगाण युद्धावर लिहिलं होतं, सोव्हिएत संघ  ह्या युद्धानंतर फुटला. त्या युद्धातील लष्करी अधिकारी , सैनिक , त्यांच्या बायका आणि मुले , त्यांचे आई- वडील ह्यांच्या मुलाखती घेऊन ती युद्ध कहाणी चित्रित केली. ज्या सैनिकांच्या प्रेत पेट्या रशियात पोहोचल्या आणि त्या कुटुंबातील लोकांनी जे काही सहन केलं त्याची करूण कहाणी त्यांनी ह्या पुस्तकातून मांडली. “ मला कसलीही राजकीय चर्चा करावयाची नाही. जर तुमची राजकीय चूक झाली असेल तर मला माझे तुटलेले पाय परत करा.” , हे एक सैनिक बोलून दाखवितो तेव्हा युद्धाचे परिणाम कसे भोगावे लागतात हे अनेक सैनिकांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या करूण कहाण्या ऐकल्यानंतर लक्षात येतं.  अफगाणिस्तानच्या लढाईत ठार झालेल्या मुलाची आई आणि तिचा आक्रोश आणि काबुल येथे वेडा झालेला एक लष्करी अधिकारी आणि त्याची कहाणी ऐकून त्या सुन्न झाल्या आणि त्यांनी ह्या युद्ध कहाण्या लिहिल्या. रशियातील केजीबीला ह्या गोष्टी लोकांच्या समोर येऊ नयेत हे वाटल्यामुळे त्यांनी त्यांच्यावर खटले भरण्याचे ठरविलं. सोव्हिएत आर्मीच्या विरोधी हे कटकारस्थान आहे म्हणून त्यांच्यावर दबाव आणला गेला. त्यांचे साहित्य जप्त केलं गेलं.  
त्यांचे लिखाण हे शोध पत्रिके सारखं आहे. ते ललित साहित्य नाही. ते संशोधन करून , अनेकांच्या मुलाखती घेऊन , प्रत्यक्ष पाहणी करून जगापुढे मांडलेला भावना कल्लोळ असलेला रिपोर्ट आहे .युद्धामुळे असहाय झालेल्या  आणि अतीव दु:ख , वेदना सहन केलेल्या माणसांचा तो शोध आहे . ह्या माणसांच्या आशा आणि  त्यांना वाटणार्या भीतीचा इतिहास आहे. चारचार वर्षे संशोधन करून ह्या माणसांचे आयुष्य समजून घेतलं आहे. त्यात माणसांच्या भाव भावनांचा कल्लोळ दिसून येतो . हे त्या राजवटीचे विदारक चित्रण आहे, त्यात मन हेलावून टाकणारे अमानवी प्रसंग आहेत.शेकडो लोकांच्या आर्त भावनांचा पडसाद त्यांनी शब्दबद्ध केला आहे. इतिहास फारसा महत्वाचा नाही तर त्या लोकांचे त्यावेळचे जगणे अधिक त्रासदायक होतं हे जगाला कळावं म्हणून त्यांनी केलेलं हे लिखाण आहे. चेर्नोबिलची कथा १०७ लोकांची प्रत्यक्ष पाहिलेली करूण कहाणी आहे. त्यांच्या वेदनांचा इतिहास आहे. त्यांच्या बहिणीच्या तोंडून त्यांनी  ऐकलेल्या हृदयद्रावक कहाण्या आहेत. “ Your cow sends radiation to my cow “, ही प्रत्यक्ष घडलेली गोष्ट आहे. फेरीटेल वाटाव्या अशा अनेक भयानक  गोष्टी आहेत. “I often thought that the simple fact, the mechanical fact , no closer to the truth than a vague feeling , rumor , vision “ असं त्या प्रसंगाचं  वर्णन त्या करतात.
  
इ.स. २००० मध्ये त्यावेळच्या राजवटीतील दिल्या गेलेल्या  जाचामुळे त्यांनी त्यांचा देश सोडला. त्यांचे लिखाण त्यांच्या देशात प्रसिद्ध होऊ शकलं नाही . Soros Foundation ह्या संस्थेमुळे ते रशियन भाषेत प्रसिद्ध झालं आणि ग्रंथालयात पोहोचलं .पुढे इंग्रजीत आणि इतर युरोपियन भाषात भाषांतरे झाली. 
 Paris, Gothenburg आणि Berlin येथे काही दिवस वास्तव्य केल्यानंतर २०११ मध्ये त्या बेलारुसला परतल्या. त्या स्वत:ला रशियन किंवा बेलारसियन लेखिका समजत नाहीत. ‘I would say I am writer of that epoch, the Soviet utopia, writing the history of that utopia in each of my books’.

2014 मध्ये ‘Le Monde ‘पुस्तक लिहिलं. त्या म्हणतात , ‘That the annexation of Crimea to Russia revealed the country’s return to fundamentalism, to dream of being a great empire and inspire fear. – Empty shelves in stores and long lines for toilet papers may be things of past in Russia, but affluence never led to democracy in Russia. It only helped an imperialistic mindset resurface “. रशियन राजवटीवर व्यक्त केलेलं हे भाष्य साम्यवादी विचारसरणीने लोकांच्या जीवनात फरक पडला नाही हे तर दर्शवितेच पण लोकशाही आणि स्वातंत्र्याचा पुरस्कार करते .

गेल्या २० वर्षातील रशियातील राजकीय सामाजिक घटनाबद्दल बोलताना त्या पोलंड येथील कार्यक्रमात म्हणाल्या , ‘My book is not hopeless . It describes the strength of human spirit. But I cannot find answer to one question. Why do our sufferings, our grandfathers’ sufferings not convert into freedom? ‘.
साम्यवादी राज्यव्यवस्थेत विचार स्वातंत्र्याची जी गळचेपी होती ती जगापुढे मांडणारी ही लेखिका म्हणूनच वेगळी आहे. नोबेल पुरस्कार देऊन  तिचा योग्य असा गौरव झाला  आहे.  

 



Monday, October 5, 2015

THE LOWLAND : एक देशी , विदेशी आणि अदेशी कादंबरी


झुम्पा लहिरी  ह्या बंगाली भारतीय अमेरिकन लेखिकेची कादंबरी “ THE LOWLAND “ वाचायला घेतली. The Namesake ही कादंबरी वाचली होती आणि त्या कादंबरीवरचा सुंदर सिनेमा पाहिला होता. ती कलाकृती आवडली होती. “The Lowland” , ही ह्या लेखिकेची दुसरी कादंबरी. पुलित्झर / पेन – हेमिंग्वे अवार्ड मिळवल्यामुळे सर्व परिचित झालेली ही लेखिका एकामागून एक अवार्ड मिळवीत असते. ह्या २०१३ च्या नव्या कादंबरीला The DSC Prize for South Asian Literature हा अवार्ड मिळाला आहे.
‘The Lowland’ संबंधी माझी पहिली प्रतिक्रिया - एकाच वेळी ही कादंबरी देशी , विदेशी आणि अदेशी आहे . ह्या कादंबरीचा अवकाश हा प्रादेशिक आहे तसाच वैश्विक ( Global ) आहे. ही एक छोटा कौटुंबिक परीघ असलेली कादंबरी आहे असं म्हणावं तर ती नक्षलबारी समस्येवरील एक राजकीय कादंबरी आहे हे लक्षात येते.  एका बाजूला  नक्षलबारी चळवळीत ओढल्या गेलेल्या एका तरुणाच्या कुटुंबाची ही करुण कहाणी आहे  असे म्हणावे तर दुसर्या बाजूला नवी क्षितिजे शोधण्यासाठी एक तरुण अमेरिकेचा रस्ता शोधतो आणि आपले सारे काही हरवून बसतो, त्याची ही फरफट कहाणी आहे. ह्या कादंबरीतील एका बुद्धिमान स्त्रीला आयुष्यात नेमके काय हवय,  हेच समजत नाही, त्या स्त्रीच्या आयुष्याची ही शोक कथा आहे. ह्या कादंबरीत कलकत्ता आणि आजूबाजूचा परिसर आहे तसाच अमेरिकेतील पूर्व आणि पश्चिम किनार्यावरील शहरी जीवन आहे.
अमेरिकेत स्थाईक झालेल्या भारतीय लोकांच्या जीवनासंबंधी लिहिताना एकाच वेळी त्यांच्या जगण्याच्या समस्यासंबधीचे लेखिकेचे निरीक्षण जेवढे महत्वाचे आहे तेवढेच अमेरिकन लोकांच्या जगण्याचे वर्णन तिच्या  कादंबर्यातून आणि कथामधून झालेले दिसते. बंगाली जीवन रेखाटताना त्या कलकत्ता आणि आजूबाजूचा परिसर जसाच्या तसा उभा करतात . त्यामुळे ती प्रादेशिक कादंबरी आहे असे आपल्याला वाटू लागते. ती तशी प्रादेशिक नसून देशी आहे कारण भारतातल्या कोणत्याही प्रदेशात जवळपास हेच जीवन आहे.  १९७० ते २००८ ह्या काळातील कलकता जीवन ह्या कादंबरीत चित्रित झाले आहे. नक्षलबारी चळवळीतील अनेक घटना वर्णन करताना त्यावेळचे कलकत्ता जसेच्या तसे उभे राहते. ह्या  कादंबरीतील बंगाली पात्रे अमेरिकेत गेल्यावर जे जीवन जगतात ते कोणत्याही एन आर आय चे जगणे असते. त्यामुळे ती देशी माणसाची कहाणी आहे.  त्या देशी माणसाच्या आजूबाजूचे अमेरिकन आयुष्य जेव्हा चित्रित होत जाते तेव्हा ही कादंबरी प्रादेशिक अवकाशातून बाहेर पडून  वैश्विक रूप धारण करते. Rhode Island आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर कादंबरीत ठळकपणे चित्रित झाला असून तेथील विद्यापीठातील भारतीय विद्यार्थ्याचे जीवन प्रभावीपणे चित्रित झाले आहे. बहुतेक भारतीय विद्यार्थी अमेरिकेत असेच जीवन जगत असतात. शिकायला गेलेला भारतीय तरुण अमेरिकेतील मुक्त आणि स्वैर जीवनात अलगद अडकतो आणि भरकटतो त्याचेही चित्रण करण्यात आले आहे.

ही कादंबरी तशी राजकीय आहे. नक्षलबारी चळवळीचा प. बंगालवर झालेला परिणाम प्रभावी पद्धतीने मांडला असून कादंबरी तरीही रुक्ष झालेली नाही. उदयन हा बंगाली तरुण कलकत्ता विद्यापीठात शिक्षण घेत असताना नक्षलबारी चळवळीत ओढला जातो आणि चकमकीत मारला जातो. त्याच्या गरोदर असलेल्या  विधवा पत्नीवर म्हणजे गौरीवर संकट कोसळते. उदयनचा अमेरिकेत शिकायला गेलेला भाऊ सुभाष कलकत्याला  आई-वडिलांना भेटायला येतो. आपल्या भावजयीला आधार देण्यासाठी तो तिच्याशी लग्न करतो आणि आपल्याबरोबर अमेरिकेला घेऊन येतो. आपल्या भावाच्या मुलीला मुलीसारखे वाढवतो आणि बायकोला पुढील शिक्षण घेण्यासाठी सर्व प्रकारचे प्रोत्साहन देतो. त्याचा हा चांगुलपणा त्याच्या दु:खाचे कारण होतो. जिला आधार दिला तीच त्याची पत्नी त्याच्याशी तुटकपणे वागते व आपल्या मुलीला त्याच्याकडे सोडून निघून जाते व स्वतःचे उच्च शिक्षणाचे ध्येय गाठण्यासाठी घर सोडते. आपले संबंध तोडते. सुभाषशी संपर्क ठेवत नाही.  एका बुद्धिमान स्त्रीच्या मागील जीवनातील पूर्व प्रेमाच्या आठवणी  तिचा पिच्छा सोडत नाहीत हे जरी खरे असले तरी ज्याच्याशी लग्न केले त्याचे जीवन ती उद्ध्वस्त करते. त्यामुळे  सुभाषच्या जगण्याची मात्र फरफट होते. अशीही साधी बंगाली कुटुंबाची कादंबरी. ह्या कादंबरीत कलकत्यातील सामान्य कुटुंबाचे जीवन आहे . नक्षलवादी चळवळीमुळे उधवस्त झालेले जीवन आहे. कादंबरीत नाट्य आहे . माणूस कसा बदलत जातो , तो कसा गुंतागुंतीचा आहे, त्याचे अंतर्मन समजणे कसे कठीण आहे, जगताना माणूस कसा हतबल होतो, त्याच्या हातात त्याचे भवितव्य कसे नसते, भावनिक असणारी माणसे अशी कशी बदलतात? ती विक्षिप्त का वागतात? एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांची ही कहाणी आहे . त्यात कौटुंबिक नात्याचा गुंता आहे. त्यांचा जगण्याचा गुंता कसा सुटत नाही आणि त्यांच्यापुढे नवे प्रश्न कसे  उभे राहतात. कादंबरीतील ही सारी  माणसे आपल्या आजूबाजूची असतात. त्यामुळे ही कादंबरी आपल्या आजूबाजूलाच घडते आहे असे वाटत जाते. माणसाच्या गुंतागुंतीच्या मनाचा शोध घेणारी ही कादंबरी आहे. ही बंगाली आहे म्हणून प्रादेशिक आहे. ती सर्व साधारण भारतीय कुटुंबाची आहे म्हणून देशी आहे . अमेरिकन विश्वात घडते म्हणून विदेशी आहे . दुसर्या देशात स्थाईक असलेली माणसे शेवटी अदेशीच असतात . म्हणून ही कादंबरी अदेशी आहे.      

Friday, October 2, 2015

डिजिटल इंडिया – मेक इन इंडिया


इंटरनेट सुरु होण्यापूर्वी ......

युरोपमधील सर्व विद्यापीठातील संगणक एकमेकांना जोडले गेले होते व संशोधक माहितीची आदानप्रदान करीत होते. त्याच वेळी (१९७५- १९७६ )TIFR मधील महासंगणक प्रायोगिक म्हणून युरोपमधील मुख्य संगणकाला जोडला गेला होता. VJTI मध्ये त्या संगणकाचे एक टर्मिनल होते. संशोधकांना एका क्षणात जगातील संशोधनाची माहिती उपलब्ध होत होती. 
भारतातील सर्व संशोधन प्रयोगशाळा , IIT, आणि विद्यापीठे ह्यांच्यातील संगणक एकमेकांना जोडावे आणि TIFR च्या संगणकाच्या साह्याने जगातील इतर संशोधन संस्थांशी संबंध जोडला जावा असे प्रयत्न चालू होते.
BARC , INSDOC , DRTC ,
आणि DST ह्या संस्था एकत्र येउन Information Science and Technolgy प्रकल्प राबवीत होत्या.
ह्या सर्व संस्थांनी एकत्र येउन Information Scientist साठी नवा अभ्यासक्रम सुरु केला होता व तसा शिक्षणक्रम आखला होता. मी माटुंग्याच्या CTRL ह्या संस्थेतर्फे ह्या उपक्रमात सहभागी झालो होतो. तेव्हा शिक्षणक्रमाचा एक भाग म्हणून आम्ही इतर वैज्ञानिकांना डेमो देण्याचे काम करीत असू.
मी TIFR मध्ये असाच डेमो देत होतो. त्या दिवशी डॉ जयंत नारळीकर ते बघण्यासाठी आले होते . मला त्यांच्याबद्दल माहिती होतीच. मी संगणकामध्ये त्यांचे नाव टाकले आणि काही क्षणातच त्यांचे सर्व रिसर्च पेपर असलेली यादी छापून बाहेर आली . मी ती यादी जपून ठेवली होती . माझा संगणकाशी विज्ञान माहिती अधिकारी म्हणून आलेला हा अनोखा संबंध . त्यावेळी IE किंवा गुगल नव्हते .
इंटरनेट येण्यापूर्वीचा हा अनुभव खूप मजेशीर होता. संशोधकाला तासच्या तास वाचनालयात अनेक ग्रंथात व जर्नलमध्ये शोधत बसावे लागत असे , ते लगेच सापडत नसे. हा संगणकाचा उपयोग क्रांतिकारी होता. Current Awareness Abstract काही मिनिटात उपलब्ध करून देण्याचे काम सहाय्यक विज्ञान अधिकारी करून देत असत.
भारतात ही यंत्रणा असावी म्हणून प्रयत्न चालू होते पण त्यावेळी कोणीही ह्या तंत्रज्ञानाकडे तेवढे लक्ष दिले नव्हते .
आज गुगलने जग पादाक्रांत केले आहे. माझा वर्षाचा नातू मला म्हणतो , ' आजोबा , कशाला शोधत बसतां ? गुगल करा , पाहिजे ती माहिती लगेच मिळते ' .

इंटरनेट येण्यापुर्वीचा वरील उल्लेख मी केला त्यावेळी माझ्या आठवणीप्रमाणे विद्याचरण शुक्ला हे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री होते. त्यांच्या हस्ते वरील कार्यक्रमाचे उद्घाटन होणार होते. अचानक इमर्जन्सी जाहीर झाली आणि ते कार्यक्रमाला तर आले नाहीच पण ती योजनाच बारगळली . म्हणजे आपल्या देशाने IT युगात प्रवेश करणे लांबले. त्यावेळी आपले संगणक युगातील पाऊल मागे पडले ते पडले . डिजिटल इंडिया होण्यासाठी आपण सरसावलो होतो. आपले शास्त्रज्ञ तयार होते पण राजकीय घडामोडीमुळे देश संगणक युगाला मुकला.  

MAKE IN INDIA
आपल्याकडे राजीव गांधी ह्यांच्या प्रयत्नामुळे संगणक युग सुरु झाले होते. तसे त्यांना श्रेय देण्यास हरकत नाही. जॉर्ज फर्नांडीस ह्यांनी आय बी एम ला त्यांचे दुकान बंद करावयास लावले होते तेव्हाच आपल्याकडील संगणकीय युग बंद झाले होते. त्यामुळे राजीव गांधींच्या काळात आपण नव्याने संगणकीय युगात प्रवेश केला होता. तो पर्यंत आपले सारे उच्च शिक्षित मनुष्यबळ ( आय आय टी चे पदवीधर ) अमेरिकेत स्थाईक झाले होते व तेथील गणकयंत्रीय क्षेत्रात ठसा उमटवीत होते.

Large number of Indians or India origin people are working for Google, Microsoft, Facebook and all big Indian IT companies are developing some packages or partner in their development. There are many start-up companies of Indians Americans who have developed innovative IT products. In spite of this, no Indian or Indian IT companies have developed global IT product or IT Company.  Same is true in other technology areas such as NANO technology. In such situation, it is better that we collaborate with global companies and ask them to produce technology products at affordable price for Indian market. Certainly, they will invest in India for profit as they will have high volume business. ‘Make in India’, is another approach. This was done by China long back. Their economy is improved because of that approach. We can do it differently. All IT hardware is now manufactured in China. We missed this when IBM was asked to close their shop in India. We have to learn from the past.

एक साधे उदाहरण देतो. एका कंपनीने PCXT बाजारात आणला होता. अमेरिकेत असलेल्या एका गुजराती संगणक तंत्रज्ञाने ह्या कंपनीची एजन्सी मिळवली होती. अमेरिकेत विक्री केंद्र सुरु केले होते. बर्यापैकी पैसे कमावले. नवे तंत्रज्ञान होते. एका भारत भेटीत भारताची गरज त्याच्या लक्षात आली. त्याने अमेरिकेत कंपनी सुरु केली. भारतातही स्वतःच्या घरण्या माणसांची मदत घेऊन एक कंपनी सुरु केली. भारतात “ MAKE IN INDIA” करणारी ही PCXT कंपनी त्याच्या अमेरिकेतील कंपनीकडून  PCXTचे पार्टस घेऊन भारतात PCXT तयार करू लागली. थोड्याच दिवसात खूप मोठी विक्री होऊ लागली आणि एक मोठी कम्पुटर कंपनी झाली. हेच तंत्र इतर लोकांच्या लक्षात आले आणि थोड्याच दिवसात अनेक PC तयार करणाऱ्या कंपन्या भारतभर सुरु झाल्या. एवढेच काय तर साधा इलेक्ट्रोनिक्स डिप्लोमा घेऊन एक दोन वर्षे काम करणारा इंजिनिअर स्वतःचा PC तयार करणारा व्यवसाय करू लागला. आजही असे अनेक उद्योजक माझ्या ओळखीचे आहेत. असे डोके गुजराथी माणसाचेच असते. अमेरिकेत स्थाईक झालेले अनेक गुजराथी हे TECHNOLOGY TRANSFER सहज करू शकतात. मराठी इंजिनिअर अधिक पगाराची नोकरी करून समाधानी राहतो. त्यांचे तसे नसते.अनेक क्षेत्रात संशोधन करणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ मंडळीना ह्या क्षेत्राची चांगली कल्पना आहे.
अमेरिकेत Technology आणि Innovation इतक्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. ते लायसन्स विकत घेऊन उपलब्ध झाले तर भारतात अतिशय कमी किमतीत हे Products तयार होऊ शकतात. तुम्ही १५-२० दिवसाच्या दौर्यात २-४ Technology Productsची माहिती घेऊन  त्यांची योग्य ती लायसन्स फीस देऊन भारतात  सहज घेऊन जाऊ शकतात. “ Make In India” ज्यांना करावयाचे आहे त्यांनी ह्या एन आर आय लोकांचा अधिकात अधिक उपयोग करून घ्यावा. छोट्या उद्योजकाने ह्या कल्पनेचा कल्पकतेने उपयोग केला तर अनेक वस्तू भारतात कमी किमतीत बनवता येतील. स्टार्ट-अप कंपन्या खूप आहेत . चांगले Products उपलब्ध आहेत . ते भारतात बनविता येऊ शकतात. म्हणून मला मोदींची “ MAKE IN INDIA” ही कल्पना नवी नसली तरी अधिक आकर्षक वाटते.