Friday, March 27, 2015

“What Should I Do With My Life?


माणसाला दोन गोष्टी हुशार बनवतात. एक : वाचलेली पुस्तके . दोन: भेटलेली माणसे. अशाच काही वाचलेल्या पुस्तकाबद्दल. एक पत्रकार लेखक ९०० च्यावर लोकांना भेटतो. त्यांचे जीवन समजून घेतो. त्याला सामान्य माणसातील असामान्यत्व दिसून येते. त्यांची विलक्षण जिद्द दिसून येते. तो ही माणसे पुस्तकासारखी वाचतो. आणि त्यांच्यावर लिहितो. आपल्यालाही अशी माणसे रोजच्या जीवनात भेटत असतात.ती आपल्याच आजूबाजूला असतात. आपल्यासारखीच. आणि मग लक्षात येते की आपण माणसे पुस्तकासारखी वाचली पाहिजेत. त्यांना समजून घेतलं पाहिजे. 
“What Should I Do With My Life?” हे P O Bronson  ह्या लेखकाचे पुस्तक सहज हातात आले. थोडेसे चाळले. आणि वाचण्यात मन रमून गेले. मग पुस्तक खाली ठेवावे असे वाटलेच नाही. “ आयुष्यावर बोलू काही “ हा संदीप खरे आणि सलील कुलकर्णी ह्यांचा काव्यगायनाचा सुंदर कार्यक्रम काही वर्षापूर्वी पाहिला होता.तसाच विषय. आपण आपल्या आयुष्याच्या यशापयशावर बोलत असतो. कधीकधी स्वतःशीच. आपल्याला काय मिळाले किंवा काय मिळाले नाही ह्याचा विचार करीत असतो. परंतु नुसता विचार करणे नव्हे तर आपले जगणे किती आनंदी करू शकतो ह्यावर बोलणे आवश्यक आहे. आपल्या आयुष्याला अर्थपूर्ण करण्यासाठी आपण सारेच जण झटत असतो. जगण्याचा अर्थ शोधत असतो. रोजच्या जगण्याला अधिक सुंदर करण्याचा व आपल्या जीवनात अधिक आनंद निर्माण करण्याचा आपला प्रयत्न असतो.
हे पुस्तक म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या सर्व सामान्य माणसाच्या धडपडण्याचा शोध घेणारे सुंदर पुस्तक. आयुष्यात काय हवे? ते कसं मिळवायचे ? कसं आनंदी व्हायचे? त्यासाठी कसा प्रयत्न करायचा. हे सारं ९०० निवडक व्यक्तींच्या जीवनाचा शोध घेणारे पुस्तक. 
ह्या व्यक्तींचे आयुष्य कसं सुंदर होत गेले आणि आयुष्यात आनंद कसा मिळविला. त्यांनी काय मिळविले आणि काय गमावलं?  हे खूप काहीं सांगणारे अप्रतिम पुस्तक. हा लेखक माणूस कसा शोधतो ह्याचा प्रत्यय येतो.तुम्ही-आम्ही अशी माणसे रोजच पहात असतो पण असा शोध घेत नाही. ह्या पुस्तकातून दिसणारी ही इंद्रधनुष्याचे विविध रंग असणारी मानवी आयुष्ये समजून घेतली तर आपण नक्कीच म्हणू .. “ ह्या जन्मावर शतदा प्रेम करावे ...” जगण्याला नवी उभारी देणारे हे पुस्तक.

ह्या पुस्तकात काय आहे? सामान्य माणसातील असामान्य माणसे. नियतीचे भान असलेली माणसे आहेत तसेच जे ठरविले ते दुर्लक्ष करणारी माणसे आहेत. कठीण काळापासून खूप काहीं शिकणारी व धडपडणारी माणसे आहेत. आत्मविश्वासाला अर्थ प्राप्त करून देणारी  माणसे आहे. असलेले जगताना नसलेले शक्य करून दाखविणारी माणसे आहेत.विचारातील पारदर्शिकता असलेली पण त्यासाठी थांबणारी आणि धडपडणारी माणसे आहेत. मी कुणाचा आहे ? असा प्रश्न पडलेली पण मला जे हवय त्या आनंदासाठीच मी जगणार ,धडपडणार असा विचार असलेली माणसे आहेत. मेंदूला उत्तेजित करणारी स्त्री- पुरुष मंडळी आहेत. प्यारासाईट  उद्योगशीलता असलेली माणसे आहेत. 

जगण्यासाठी माणसाजवळ एक off switch असावे असे सांगणारा माणूस आहे. स्वतंत्रतेची छत्री असावी म्हणणारी माणसे आहेत. कर्तव्य विसरणारी माणसे आहेत. कामगार वर्ग विरुद्ध सुशिक्षित मध्यमवर्ग ह्यांच्यात  भांडण पेटवणारी माणसे आहेत. त्यांचे जगणे आहे. शिक्षणाची आंस असलेला सामान्य ड्रायव्हर आहे तर स्वप्न पाहणारा , चर्च बांधणारा आगळा - वेगळा माणूस आहे. क्यासिनोचे अर्थ शास्त्र समजून घेणारा उत्साही माणूस आहे. बातमी देणारी स्त्री बातमीदार आहे. पैसे न स्विकारणारी माणसे आहेत. मानसिक व्यंगावर मात करणारा माणूस आहे. श्रीमंती माणसाला कशी बदलवत असते हे सांगणारा माणूस आहे. 'हे नंतर , ते आधी', असे म्हणून स्वतःवर प्रयोग करणारी माणसे आहेत. आई होणे हे भरवण्यापेक्षा अधिक काही आहे हे समजावून सांगणारी आई आहे.
P O Bronson 

उपदेश , मार्गदर्शन आणि अधिकार ह्याचे महत्त्व सांगणारी माणसे आहेत. बदल हाच आपल्याला जिवंत ठेवतो असे सांगणारी प्रभावी माणसे आहेत. 'स्वतःला ऐकून घेत चला , स्वतःच स्वतःचे श्रोते व्हा. वास्तव समजून घ्या. पूर्वानुभव आड येऊ देऊ नका', असा न कळत सल्ला देणारी माणसे आहेत. 'मी आणि बदलणारा मी ह्याचा शोध घेत चला', असं सांगणारा माणूस आहे. यशाच्या नव्या गाथा आहेत. प्रश्नाचे उत्तर न देता प्रश्नाचे महत्वच कसे कमी  करावे असे सांगणारा वेगळा माणूस आहे. समविचारी लोकांच्या सहवासात आनंद शोधणारी माणसे आहेत. यशाचा पिच्छा न सोडणारा विलक्षण माणूस आहे. परदेशात अनुभवासाठी जाणारी माणसे आहेत. एकाचवेळी अनेक करिअरचा विचार करणारी आणि धडपडणारी विलक्षण माणसे आहेत.  असा हा माणसांचा शोध घेणारे हे पुस्तक.
स्वप्ने, भीती , आत्मविश्वास, अपयश ,अनुभव असणे आणि नसणे , Passion , जगण्याचे प्रयोजन, नोकरी आणि  वळणावरच्या वाटा , पैसा मिळवणे , स्वप्नातील नोकरी , आयुष्याचा हेतू, विवाह ,मुलं आणि आयुष्य , स्वातंत्र्य ,ध्येयपूर्ती, बदल ,जगण्याचे नाट्य,आपला आंतला आवाज ,जिद्द, "स्व"चा शोध, आपल्या गरजांची भूक ,व्यवसाय आणि त्यांत मिळवायचा आनंद, शहरी  जीवनशैली, निसर्ग आणि विज्ञान ,निराशा आणि अलिप्तता, ठेविले अनंते वृत्ती, वेगळेपणाचा ठसा, न्यूनगंड, डोके आणि हृदय,इत्यादी इत्यादी.....ह्या सर्वावर प्रत्येकाचे वेगवेगळे बघणे ...
असा हा माणूस शोध खूप  काही सांगून जातो. ही माणसे मनापासून आवडतात आणि खूप काहीं शिकवून जातात.

 शेक्सपिअरसंबंधी
 ( पाश्चिमात्य तत्वज्ञानाची कहाणी सानेगुरुजी, पृष्ठ १६३ )
“शेक्सपिअरपाशी पांडित्य व तत्वज्ञान नव्हते. शेक्सपिअरजवळ प्रत्येक शास्त्राचे तोकडे व कामचलाऊ ज्ञान होते परंतु तो एकाही शास्त्रात प्रवीण नव्हता.मात्र तो सर्व क्षेत्रात रुबाबदारपणे, वक्तृत्वाने ,एखाद्या नवशिक्याप्रमाणे बोलतो. शेक्सपिअरचा ग्रहज्योतिष्यावर विश्वास आहे. तो म्हणतो , " ज्यावर तारे आपल्या गुप्त सामर्थ्याने अभिप्राय व्यक्त करतात .... ते हे प्रचंड राज्य." 
शेक्सपिअरच्या सदैव अशा या चुका होतात की ज्या पंडित बेकन कधीही करता ना. शेक्सपिअरचा हेक्टर Aristotal चे उतारे बोलतो व कॉरिओलिनस केटोचा उल्लेख करतो. शेक्सपिअर ल्यूपरक्यालिया टेकडी आहे असे मानतो. आणि एच. जी. वेल्सला सीझर जितपत समजतो तितपतच शेक्सपिअर सीझरविषयी जाणतो.
शेक्सपिअर स्वतःच्या आरंभीच्या जीवनासंबंधी अगणित उल्लेख करतो आणि आपल्या वैवाहिक जीवनातील दु:खे सांगतो .
तो बाष्कळपणा अश्लीलपणा शब्दावर कोट्या इतक्या करतो की तो  एखाद्या गंमतबाजी करणार्याला शोभावा. तो बेकनसारखा शांत व धीमा तत्वज्ञानी नाही. कारलाइल म्हणतो की, 'शेक्सपिअर  हा एक अत्यंत थोर बुध्दिमान आहेपरंतु खरे म्हणायचे झाले तर तो प्रतिभावंताचा राजा आहे. त्याची कल्पनाशक्ती निरुपम आहेत्याची दृष्टी सूक्ष्मतम आहे.तो एक महान व अविस्मरणीय मानसशास्त्रज्ञ आहेतुमचे मन तुम्ही त्याच्या पासून लपवू शकणार नाही; परंतू काहीही असले तरी तो तत्वज्ञानी मात्र नाहीएखाद्या हेतुने बांधलेली व सुबुद्ध अशी विचारसरणी त्याच्याजवळ नाहीस्वतःच्या जीवनाच्या किंवा मानवजातीच्या जीवनाच्या अमुक एका निश्र्चित ध्येयासाठी त्याने आपल्या विचारांना एकत्र गुंफले नाही'. शेक्सपिअर प्रेम आणि प्रेमाचे प्रश्न यांत बुडून गेलेला आहे आणि मोन्तेनच्या शब्दात सांगायचे झाल्यास जेव्हा त्याचे हृदय भग्न झालेले असते तेव्हाच त्याला तत्वज्ञान सुचते . परंतु एरव्ही एकंदरीत शेक्सपिअर जगाचा आनंदाने व खेळकर वृत्तीने स्वीकार करतो.
त्याला जग म्हणजे गंमत व मौज वाटते . शेक्स्पिअरजवळ प्लेटो किंवा निश्ते ह्यांच्यासारखी दृष्टी किंवा कळकळ नव्हती. शेक्सपिअरजवळ काही नव्हते . त्याला हे जगच छानदार वाटत होते.”
शेक्सपिअरचा ह्या जगप्रसिद्ध माणसाचा हा शोध खूप बोलका आहे. शेवटी तोही एक माणूस.

वि. स. खांडेकर वाचले होते म्हणून ........
अरुण साधू ह्यांचा लोकसत्तेतील लेख वाचला. त्यात ते लिहितात .....
वि.स. खांडेकर 
“ मी तारुण्यात खांडेकर थोडेफार वाचले . फडकेही वाचण्याचा प्रयत्न केला पण मला ते वाचता आले नाही. खांडेकर मला फार निरागस आणि विसविशीत वाटले . हे मी आता सांगतोय. हे सांगणं हा खरं म्हणजे मोठा अपराध आहे. ते मराठीतले पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक आहेत. त्यामुळे त्यांच्या विषयी असे बोलणे चांगलं नाही. खांडेकरांनी भाषा दिली. भाषेचे वळण दिलं. मध्यमवर्गाला खूप घोळवलं.”
साधुनी जे लिहिले , ते एकदम बरोबर आहे. साधू माझ्याच वयाचे असतील. मला माझ्या शालेय जीवनाची आठवण झाली. त्यावेळी वर्गशिक्षक आम्हा मुलांना फळ्यावर सुविचार लिहिण्यास सांगत असत. रोज एक सुविचार लिहावा लागे. तेंव्हा वाचनालयातील पुस्तकातील वि, स. खांडेकर मदतीला धावून येत असत. आजही त्यावेळी फळ्यावर लिहिलेले त्यांचे ते सुविचार पाठ आहेत.
खांडेकरांनी भाषा दिली. सौंदर्य दिले. शब्दांचा फुलोरा दाखविला.
“अति उच्च ध्येय डोळ्यासमोर ठेवून पतित होण्यापेक्षा मर्यादित उंचीवर भक्कम पावले उचलीत जाणेच योग्य.” हा पाठ केलेला सुविचार जीवनात खूप वेळा उपयोगी पडला.
“ यशाचे सुमधुर चांदणे हवे असेल तर प्रयत्नांचा चंद्र तेजोमय ठेवला पाहिजे.”
गेल्या आठवड्यात “यलो” हा मराठी सिनेमा पाहिला. “You can do it” हे ‘आजचे मराठी’ नेहमीच ऐकतो. खांडेकरांची मराठी भाषा अवगत केली असती तर अधिक सुंदर मराठी भाषा नव्या पिढीला आली असती. आपण लोकमान्य टिळक , गोपाळ गणेश आगरकर , विष्णू शास्त्री चिपळूणकर, ह ना आपटे, वि द घाटे , वि स खांडेकर ह्यांची मराठी भाषा विसरलो म्हणूनच आपणास मराठी शब्द आठवत नाहीत. त्यामुळे इंग्रजी मिश्रित मराठी भाषा आपण बोलत असतो. हे लक्षात आलं. जय मराठी.

मराठी कादंबरी संबंधी .....
मराठी कादंबऱ्या कोणी वाचत नाही.विकत घेऊन वाचणारे तर त्याहून कमी. अगदी नावाजलेल्या लेखकाच्या कादंबऱ्या ३०- ४० वर्षात खपतात त्या फक्त २००० ते ३०००. लेखक खूप चिंतेत आहेत. मला प्रश्न पडतो की प्रकाशक किती कफल्लक होत असेल
मी पुस्तके विकत घेऊन वाचणारा आहे. त्यामुळे कादंबरी आवडली नाही की पैसे वाया गेल्याचे दु:ख अधिक होते आणि वेळही जातो.
डॉ नरेंद्र गंगाखेडकर
drnsg@rediffmail.com      
  

Wednesday, March 25, 2015

माणूस नावाचा शोध

सामान्य वाचकांना व पु काळे , चेतन भगत आवडतात तर फोडणीच्या वाचकांना भालचंद्र नेमाडे आवडतात. 
सामान्य नाट्यप्रेक्षकांना बाळ कोल्हटकर , वसंत कानेटकर , पु ल देशपांडे आवडतात तर फोडणीच्या प्रेक्षकांना विजय तेंडूलकर , गिरीश कर्नाड , कारंथ आवडतात. 
सामान्य लोकांना संदीप खरे , मंगेश पाडगावकर हे कवी आवडतात तर फोडणीच्या लोकांना ग्रेस , पु शि रेगे , विंदा करंदीकर आवडतात.
सामान्य मराठी प्रेक्षकांना ' दुनियादारी ' , 'आंधळी कोशिंबीर ' , ' मुंबई - पुणे - मुंबई' हे चित्रपट आवडतात तर फोडणीच्या प्रेक्षकांना ' अ रेनी डे ' , ' जोगवा' हे चित्रपट आवडतात.
अशी मोठी यादी करता येईल.

If you divide into two groups ( Classes and Masses ) , then it is somewhat true. I have just classified into these two groups as an example. It may vary.

कधी कधी आपण सामान्य असतो तर कधी कधी आपण सामान्याहून वेगळे असतो. त्यामुळे कलाकृतीची mix निवड करतो. आवड निवड बदलते .


Good ones are those which are liked by masses as well as classes.
Now the problem is time. Masses like it short and sweet while classes do not mind a lengthy one provided it has readability.


माणसाला दोन गोष्टी हुशार बनवतात. एक : वाचलेली पुस्तके. दोन : भेटलेली माणसे. ही माणसे प्रत्यक्ष जीवनात भेटत असतातच. आपण ही माणसे पुस्तकासारखी वाचली पाहिजेत. आपल्याला जमतं असं नाही. पुस्तकातून , कादंबर्यातून , नाटकातून आणि सिनेमातून आपल्याला माणसे भेटत असतात. नाटकात/सिनेमात  आपण ती नटाच्या रूपाने पहात असतो. आपला माणसे वाचण्याचा अभ्यास नकळत होत असतो. 
हा माणसांचा शोध आपले जीवन समृद्ध करीत असतो.

ज्या ज्या वेळी मी एखादे नाटक , सिनेमा बघितला किंवा एखादे पुस्तक वाचले तेव्हा तेव्हा मी फेसबुकवर  त्या संबंधी माझ्या स्टेटसवर नोंदी केल्या , त्याच येथे देत आहे. मला जे आवडले किंवा खटकलं ते मी लिहिलं. प्रत्येकाची आवडनिवड निराळी असते ह्याची मला जाणीव आहे.

' एम. एच. ०२ डी.एल. ५२६२

'अविष्कार'ने मिलिंद बोकील ह्यांच्या 'संकेत' ह्या कथेवर आधारित ' एम. एच. ०२ डी.एल. ५२६२' हा दीर्घांक सादर केला. पार्ल्याच्या साठे महाविद्यालयाच्या सभागृहात बर्यापैकी प्रेक्षक आले होते.ह्यावरून प्रायोगिक नाटकाच्या चळवळीला बर्यापैकी गर्दी जमतेय हे चांगले लक्षण दिसतेय. प्रयोग ठीक होता. कथेचा जीव लहान होता. खाण्यापिण्याशिवाय शरीराला इतर ही गरजा असतात हा विषय. एक मुलगा असलेली तरुण घटस्फोटिता. कुणात तरी गुंतत जाते. शरीराची ओढ अस्वस्थ करते. स्वतःच्या मुलाची थोडीशी अडचण वाटू लागते. मनाची घालमेल चालू असते. जाणिवांचे इंजेक्शन असते कां? असेल तर किती बरे होईल. माणसाच्या विविध जाणीवा. त्यात शरीराच्या जाणीवा असतातच. अशा एका स्त्रीच्या मनाचा घेतलेला शोध. एका घटस्फोटीतेचं मन अस्थिर झालयं . तिच्या शारीरिक जाणीवामुळे. ह्या दीर्घांकात दोनच पात्रे. आई आणि मुलगा. मानसी कुलकर्णी आणि शशांक ह्या दोघांनी सुंदर काम केले आहे. अलिकडेच महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत ही एकांकिका सादर करण्यात आली होती. टीव्हीवर छोटीशी झलक पाहिल्याचे स्मरते. लेखकाने घेतलेला हा स्त्री मनाचा शोध.

समुद्र 


मिलिंद बोकील ह्यांच्या ' समुद्र ' ह्या कादंबरीवर आधारित चिन्मय मांडलेकर लिखित आणि दिग्दर्शित त्याच नावाचे नाटक पहाण्यात आले. प्रमुख भूमिका चिन्मय आणि स्पृहा जोशी ह्यांची. जरा वेगळा विषय. माणसाच्या मनाचा घेतलेला शोध. समुद्राची विविध रूपे असतात आणि त्याचा तळ शोधणे कठीण असते. तसेच माणसाचे मन . ते दोलायमान असते. बदलत असते. नवरा - बायकोची ही गोष्ट. त्यांच्यातील निर्माण झालेला तणाव. इंटुक बायको वेळ घालवण्यासाठी बुक क्लबमध्ये जात असते. स्वतःच्या व्यवसायात मग्न असलेला नवरा इंटुक पत्नीशी संवाद साधू शकत नाही. बुक क्लबमध्ये चर्चा करीत असताना बायको नकळत एका पुरुषाच्या सहवासात येते आणि गुंतत जाते व शरीरसंबंधापर्यंत प्रवास होतो. त्यामुळे दोघामध्ये वादळ निर्माण होते. दोघांची दुभंगलेली मने.
विकएन्डला एका समुद्रकाठी असलेल्या हॉटेलवर सुट्टीसाठी येतात. आणि त्यांच्यातील असलेल्या विसंवादावर संवाद म्हणजे भांडणच सुरु होते. दोघानाही दोघांच्याही मनाचा तळ समजत नसतो. त्यांच्यातील संवाद,वादविवाद म्हणजे हे नाटक. अलिकडे सर्वच तरुण मंडळीत असं घडताना दिसतंय. म्हटलं तर वास्तववादी. रिलेशनशिपच्या जमान्यात हे तसं नवीन नाही. स्त्री - पुरुषांची निखळ मैत्री असू शकते कां ? नेहमीच ह्या मैत्रीचा शेवट शय्येपर्यंत जात असतो कां? त्यात काही वावगं आहे कां? माणसाचे म्हणजे स्त्री- पुरुषांच्या मनाचा तळ समजू शकतो कां? पुरुष नेहमी कसा वागतो ? स्त्रीला म्हणजे तिच्या मनाला कसं समजून घ्यायचे ?

पुरुषाचा बाहेरख्यालीपणा समाज खपवून घेतो.बरेचदा रूढीपरंपरेत तो समजून घेतला जातो.पण एखाद्या बाईने पतीव्यातिरिक्त परपुरुषाशी कारणपरत्वे केलेला संग समाजमान्य नसतो. किंबहुना समाजात स्त्री लक्ष्मणरेषेपलीकडे गेलेली चालत नाही. याच कारणाने जेष्ठ नागरिकांना ही नाटकातील गोष्ट पटण्यासारखी नाही.
ह्या नाटकातील संवाद हेच माणूस मन शोधण्याचा प्रयत्न करतात. 'पुरुषी मन असेच असतं ' अशी प्रतिक्रिया एका स्त्री- प्रेक्षकाची. सिनियर मंडळीना हे नाटक मुळीच रुचलं नाही. नाटकातील स्त्रीपात्राने केलेलं स्वतःचे समर्थन त्यांना पटणं शक्य नव्हतं.
चिन्मय आणि स्पृहा ह्यांची कामे उठावदार झाली आहेत. पण नाटकातील स्त्रीपात्राच्या भूमिकेत ती शोभून दिसली नाही कारण ती वयाने खूप लहान वाटते.
नेपथ्य आवडले नाही. समुद्र किनारा आणि टेकडी उभी करणे अवघड होते तरीही नेपथ्य जमलेच नाही.
नाटक वेगळे आहे पण म्हणावे तसे जमले नाही. चिन्मय आणि स्पृहा ह्यांच्या लोकप्रियतेमुळे हे नाटक चालेल कदाचित. लेखकाचा माणूस शोध लक्ष वेधून घेतो. नव्या पिढीचे हे नवे प्रश्न आहेत. 


लग्न पहावे करून

 " लग्न पहावे करून " हा चित्रपट पाहिला. ही गोष्ट आहे ," शुभ विवाह " ही लग्न जुळवणारी संस्था काढणारे निशांत आणि आदिती ह्यांची . शेवटी ती दोघे आपलेच लग्न कसे जमवतात हे पाहण्यासाठी पूर्ण सिनेमा पहावा लागेल. त्यांच्या संस्थेचे ध्येय वाक्य आहे " इथे लग्न टिकते " . हा सिनेमा तसा हलका फुलका पण खूप काहीं सांगून जाणारा. १ १ वी १ २ वीच्या मुला- मुलीचे प्रेम प्रकरण , अमेरिकेला जायला मिळेल म्हणून लग्नाला तयार झालेली मुलगी मुलाला अमेरिकेत नोकरी मिळणार नाही हे कळल्यावर लग्न कसे मोडते , दोनदा जुळलेले लग्न होतच नाही कारण ज्या मुलांशी लग्न जुळते तीच मरण पावतात म्हणून लग्नाचा विचार सोडून देणारी आदिती " इथे लग्न टिकते " असे घोष वाक्य समोर ठेऊन विवाह जुळवणारी संस्था काढते. त्यावर काढलेला हा सिनेमा. कसलंही लॉजिक नसलेला हा म्याजीक सिनेमा. चांगला जमला आहे. संवाद छान आहेत. . कलावंत आपल्याला सिनेमा पूर्ण पहावयास लावतात हेच सिनेमाचे वैशिष्ट्य.
आजच मटात वाचलेले एक वाक्य. " विवाहसंस्था ही दोन जीवांच्या सुखासाठी निर्माण झालेली नसून स्त्रीपुरुषांची आर्थिक आणि लैंगिक युती होऊन त्या योगे समाजप्रवाहाचे सातत्य टिकवणे हा या मागील हेतू असतो. " असाच शोध ह्या चित्रपटात घेतला आहे असे वाटते.
पूर्वी लैंगिक युतीसाठीच विवाह होत असत. आज आर्थिक युती तितकीच महत्वाची ठरते आहे. मुलांना शिकलेली मुलगी किंवा कमावणारी मुलगी त्यासाठीच हवी असते. लिव्ह इन रिलेशनशिपमुळे लैंगिक युती सहज शक्य झाली आहे त्यामुळे विवाह हवाच कशाला ? असाही नवा प्रश्न निर्माण झाला आहे. ह्याच विषयावर Mr.and Mrs. हे  नवे नाटक आले आहे. त्या नाटकात असाच माणूस शोध घेतला आहे. मराठी नाटक वयात येऊन खूप वर्षे झाली. पण आजच्या तरुणाईचे प्रश्न घेऊन माणूस शोध करणारया कलाकृती अधिक लक्ष वेधून घेताना दिसतात.


मुसाफिर

'मुसाफिर' अच्युत गोडबोले ह्यांचे ४७४ पानाचे ( आवृत्ती ४५ ) आत्मचरित्र वाचायला घेतलं. आज वाचून संपवलं. हा इन्फोटेकमधला दादा माणूस. नारायण मूर्ती ह्यांनी पटनी कम्प्युटर सोडली तेंव्हा त्या खुर्चीवर जाऊन बसलेला हा गृहस्थ. पुढे अनेक मोठ्या आय टी कंपन्यात सीइओ. हे माहित असल्यामुळे पुस्तकातील त्या भागापासून वाचायला सुरुवात केली. मी गणकयंत्राशी त्यावेळपासून संबंधित असल्यामुळे मला विशेष उत्सुकता होती. अर्थात मी बिझिनेस Application मध्ये कधीच नव्हतो. पण Technical application मध्ये सर्वजनरेशनचे कॉम्पुटर वापरले होते. त्यामुळे हा भाग मी प्रथम वाचला. हा तर भारतीय आय टी व्यवसायाचा इतिहास. प्रत्येक आयटीवाल्याने अवश्य वाचावा. सुंदर. अच्युत गोडबोले ह्यांच्या करिअरचा ग्राफ.
सोलापूरच्या मध्यमवर्गीय ब्राम्हण कुटुंबातील एक हुशार विद्यार्थी. मुंबईला आय आय टीत प्रवेश घेतो. अभ्यासाव्यतिरिक्त अनेक विषयात रस. चौफेर वाचन. त्याच्यासारखेच त्याचे अनेक मित्र. डाव्या विचारसरणीकडे झुकलेले. वेगळं काहीतरी करू पाहणारे. बीटेक झाल्यावर नोकरीचा विचार सोडून आदिवासी लोकांच्या कल्याणासाठी चळवळ उभारणारे.
दहा दिवसाची तुरुंगाची हवा खाल्यानंतर अच्युतच्या लक्षात येते की हे आपलं काम नाही. मुंबईला परतल्यानंतर असेच भटकणे. वाचत राहणे. बेकारीचे दु:ख सोसणे. नाटक , साहित्य , तत्वज्ञान , चित्रकला . अर्थशास्त्र , कामगार चळवळी दलित चळवळी, ह्या सर्वच क्षेत्रात रस. केमिकल इंजिनीअरिंग विसरून जाणे. आणि मग नुकत्याच नव्याने सुरु झालेल्या आयटी क्षेत्रात नोकरी. तेथे मन लागतच नाही. Jack of All - Master of None अशी अवस्था. विलक्षण जिद्दीने प्रोग्रामिंग मध्ये तज्ञ होणे. हा प्रवास उल्लेखनीय. मग वाटचाल व्यवस्थापकीय पदाकडे. यशामागून यश. आर्थिक सुबत्ता. एक देखणे यश. हा प्रवास म्हणजे हे आत्मवृत्त. वाचण्यासारखे.लेखकाने स्वतःचा घेतलेला शोध.
ह्या आत्मचरित्राचा मन हेलावून सोडणारा भाग म्हणजे अच्युत आणि त्याच्या पत्नीने सोसलेले दु:ख . त्यांच्या मुलाला ऑटीझमचे दुखणे आहे. कोणताही माणूस कोलमडून पडेल. पण अच्युत त्यातून कसा उभा राहतो हे वाचताना आपण त्याच्या जिद्दीने प्रभावित होतो.
असा हा चौफेर व्यक्तिमत्वाचा माणूस समजून घेतला तर आपलेही जीवन समृद्ध होते. एक विलक्षण व्यक्तिमत्व.


Lunch box - A Art Film

A quite different movie from regular films.I am impressed by the performance of Irrfan Khan. 
He has once again proved that he is a superb 
actor. His expressions with body language show that that he does not need any dialogue. One cannot forget his character - a widower who is going to retire. Nirmat Kaur who played the role of Ila , a woman in crises is a genius in 
acting. Ila is neglected by her husband because of his extra- marital relationship and she is trying to find out happiness in her life. Irrfan feels that Bhutan is the best place to settle as happiness index of Bhutanis is the  highest in the world. The movie tries to tell us that sometimes catching a wrong train may  take us to the right destination.The film is based on weak foundation and as such there is no logic in the story of Lunch Box.The Story has no good ingredients but gives many messages for understanding the  complex life. Watching Irrfan and Nirmat Kaur in the film is a great learning experience.

पीके

सध्या गाजत असलेला 'पीके' कसा आहे हे पाहण्यासाठी मुद्दाम गेलो आणि घोर निराशा झाली. ह्या पूर्वी ह्याच विषयाशी जवळचे असलेले ' देऊळ ( मराठी ) ' आणि ' OMG ( हिंदी )' हे दोन चांगले चित्रपट पाहीले होते. हा चित्रपट एकदम भंकस वाटला. दुसर्या ग्रहावरून पृथ्वीवर उतरलेला पण परत जाण्याचा रिमोट हरवलेला हा दुसर्या ग्रहावरचा माणूस म्हणजे आमिरखान. त्या ग्रहावरून येताना काय पिउन आला होता ते माहित नाही पण हा ' पीके ' तत्वज्ञानी आहे असे म्हणतात. त्याची वाह्यात बडबड विनोदाचा आधार घेऊन जे काही सांगते ते अधिक चांगल्या पद्धतीने सांगितले असते तर लोकांचे अधिक चांगले प्रबोधन झाले असते.
ईश्वर, धर्म आणि देवाचे व्यवस्थापक ह्यांच्यावर विनोदाचा आधार घेत भाष्य करणारा हा 'पीके' काय पिउन आला आहे हे शेवटपर्यंत समजत नाही. त्यामुळे चांगला विषय भंकस पद्धतीने मांडला आहे. राजू हिराणी ह्यांचे लेखन , संपादन आणि दिग्दर्शन कल्पनाशून्य आहे. विनोदाला उंची नाही व प्रबोधन करण्यासाठी केलेला हा सिनेमा संवादामुळेच वादग्रस्त होणे स्वाभाविक आहे. आमिरखानचे एवढे वाईट काम मी ह्यापूर्वी पाहीले नाही. सत्यम , शिवम आणि सुंदरम नसलेला हा सिनेमा पूर्ण वेळ पाहणे ही एक शिक्षा आहे. असे असूनही मार्केटिंग खूप झाल्यामुळे गल्ला मात्र भरला आहे. 

निवडणुकीतील पुस्तक बॉम्ब

The Accidental Prime Minister - Sanjay Baru
 Crusader or Conspirator - P C Parakh 
' Insider ' can always creates problems if he is not taken care. Very good journalistic analysis based on political understanding. These books were released before Lokasabha elections. It has damaged the Congress party. हा ही माणूस शोध. राजकीय व्यक्तींच्या सहवासात आल्यावर पत्रकार आणि शासकीय अधिकारी त्यांना खूप जवळून पहातात. त्याचे बरे -वाईट गुण त्यांना माहित असतात. एकदा संबंध संपल्यानंतर ते मोकळे असतात. आणि आत्मवृत्त लिहिताना अनेक गोष्टीचा स्फोट करतात. त्यातील खरं काय खोटं काय?  हे  आपण शोधायचं ? 


आर के लक्ष्मण 


कित्येक वर्षे TOI किंवा मटा हातात घेतला की पहिले लक्ष जात असे ते आर. के. लक्ष्मणच्या कार्टूनकडे. ते भाष्य खूप काही सांगून जात असे. त्यामुळे ही बेरकी राजकीय मंडळी समजू लागली. व्यंगचित्रातून व्यक्तिमत्व उभे राहत असे. माणसांच्या अंगातील व्यंग दिसू लागले. ज्याचे व्यंगचित्र , तो माणूसही दिलखुलास हसत असे. प्रहार असे पण विखार नसे. 
एका समारंभात प्रत्यक्ष व्यंगचित्रे काढताना  आर.के .ना बघितले. WOW !! एका प्रतिभावंत कलाकाराला जवळून पहायला मिळाले. भाषण न करता व्यंगचित्र काढून खूप काही बोलणारा हा अनोखा माणूस. 
असा हा माणूस गेली काही वर्षे आजारी असल्याच्या बातम्या ऐकून मन उदास होत असे. आज सारे संपले. काही वर्षे नित्यनेमाने रोज भेटणारा हा भला माणूस गेला हे ऐकून मन उदास झाले. त्यांचे व्यंगचित्राचे पुस्तक पुस्तकाच्या कपाटात आहे. केंव्हा ही हातात घेतले की खूप काही सांगून जाते. व्यंगचित्रातून दिसणारे ही माणसे आपले जीवन समृद्ध तर करतातच पण आपल्याला माणसाची व्यंगे दाखवून अंतर्मुख करतात. आर के लक्ष्मण ह्यांनी हाच मोठा संस्कार वर्तमानपत्र  वाचणार्या आम्हा वाचकावर केला आहे. एक छोटेसे चित्र खूप काही शिकवून जाते. आपण त्या व्यंगचित्रातून माणसे शोधत असतो. 


drnsg@rediffmail.com 





Wednesday, March 11, 2015

‘इन्शाअल्ला’ – सत्यदेव दुबे ह्यांच्या आत्मवृताचे नाट्यरूप


काल सत्यदेव दुबे लिखित चेतन दातार अनुवादित ‘इन्शाअल्ला’ हे ‘अविष्कार’ निर्मित नाटक पाहिले. अजित भगत ह्यांचे दिग्दर्शन. एक प्रचंड ताकदीचा प्रयोग. ह्याला नाटक म्हणावयाचे की एका प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शकाने स्वतःच्या जगण्याच्या अनुभवाला दिलेले नाट्यरूप म्हणावयाचे. हे नाट्यविषयाचे चिंतन म्हणावयाचे की स्वतःच्या जगण्याचे तत्वज्ञान म्हणावयाचे. स्वतःचे नाट्यविश्व आणि जगणे ह्यातील संघर्ष मांडताना आयुष्यात घडलेल्या काही घटना आणि कडू-गोड आठवणींचा आधार घेऊन केलेले हे मुक्त चिंतन आहे. तसे हे रूढार्थाने नाटक नाही.  

दुबेंनी आयुष्यभर प्रायोगिक नाटकेच केली. अनेक वर्षापूर्वी तेजपाल सभागृहात मी त्यांची सुरुवातीची नाटके पाहिली होती. त्या वेळी ह्या नाट्यदिग्दर्शकाला जवळून पाहिले होते. नंतर त्यांच्या विक्षिप्त स्वभावाबद्दल खुप ऐकले आणि वाचले होते. नाट्यप्रशिक्षक म्हणून ते नावाजलेले होते. त्यांची कडक शिस्त अनेक कलाकारांनी अनुभवली होती. त्यासंबंधी अनेकांनी लिहिले होते. तसे हे नाट्यक्षेत्रातील वादग्रस्त व्यक्तिमत्व. त्यांच्या स्वतःच्या काही जीवन संकल्पना आणि नाट्याविषयीच्या तीव्र जाणीवा होत्या. प्रेक्षकाला काय आवडतं ह्यांच्याशी त्यांचं काही देणं घेणं नव्हतं. तरीही ते नाटके करीत राहिले. त्यांचा एक चाहता वर्ग होता.
असा हा प्रचंड ताकदीचा नाट्यदिग्दर्शक. तसा तो यशस्वी नाटककार कधीच नव्हता. ह्याची त्यांना पुरेपूर जाणीव होती. आपण कोण आहोत? आपली काय क्षमता आहे? , ह्याची पूर्ण जाणीव त्यांना होती. ते ओळखूनच त्यांनी केलेले हे आत्मचिंतन. स्वतःला शोधण्याचा केलेला प्रामाणिक प्रयत्न. हे तसे त्यांचे आत्मचरित्रच. त्याला नाट्यरूप देणे तसे अवघडच. संवादातून प्रेक्षकांशी थेट बोलण्यासाठीच दुबेंनी हे लेखन केले आहे. आपल्याशी दुबे बोलत आहेत आणि संवाद साधून स्वतःचे मनोगत व्यक्त करीत आहेत असाच नाटकभर भास होत राहतो. एखादे आत्मचरित्र वाचताना जसे वाटते तसेच वाटत राहते. पण हा आत्मचरित्र नायक आपल्याशी संवाद साधत असतो. प्रायोगिक नाटकासाठीच्या  छोट्याशा सभागृहात आपल्यापासून हा नायक अगदी थोड्याशा अंतरावर असल्यामुळे जणूकाही आपल्याशीच , आपल्याच डोळ्यात बघून बोलतो आहे , असाच भास होतो. अर्थात तोच बोलत असतो आणि आपण ऐकत असतो. अंतर्मुख होऊन जगण्याचा अर्थ शोधत असतो.  
सुशील इनामदार ह्यांनी सर्वेश्वर म्हणजे सत्यदेव दुबे ह्यांचीच भूमिका केली असून ज्यांनी दुबें ह्यांना पाहिले आहे त्यांना त्यांची आठवण व्हावी इतके सुंदर काम केले आहे. गौतम बेर्डे ह्यांचा देवेंदर आणि मृणाल वरणकर हिची गुलनची भूमिका उल्लेखनीय आहे. अगदी तोडीस तोड. संवाद फेक अप्रतिम. खरं म्हणजे अगदी छोट्या छोट्या भूमिका करणारे ‘अविष्कार’चे सर्वच कलाकार कलागुणसंपन्न आहेत. ते नुसतेच हौशी नाहीत तर एखाद्या कसलेल्या कलावंताला खूप काही शिकवून जातात. त्यामुळेच ह्या न-नाट्याचे सादरीकरण इतके अप्रतिम की हे लक्षात राहणारे नाटक होऊन जाते. प्रायोगिक नाटकाला तसे मोजकेच प्रेक्षक असतात हे आपल्या सर्वाना माहितच आहे पण ‘अविष्कार’चे काकडेकाका असे नवे नवे प्रयोग करीतच असतात. ह्या नाट्यकर्मीची ह्या वयात कमाल वाटते. JUST GREAT. अवश्य नाट्यानुभव घ्यावा.    
     

  

Monday, March 2, 2015

' ने मजसी ने परत मातृभूमीला ..... '


'ने मजसी ने परत मातृभूमीला ....' ह्या सावरकरांच्या काव्यपंक्ती अनेक जण एन.आर.आय लोकांच्यावर टीका करताना वापरताना दिसतात.
" आपले परदेशातील मराठी बांधव पुढ्यात हार्मोनियम वगैरे घेऊन ' ने मजसी ने ..'म्हणतात तेव्हा गंमतवाटते कारण एकीकडे त्यांची ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी धडपड चालू असते " हे अवधूत परळकरांचे स्टेटस फेसबुकवर वाचण्यात आले होते व त्यावरील अनेकांच्या प्रतिक्रिया वाचण्यात आल्या. सावरकरांच्या ह्या काव्यपंक्ती  एन.आर.आय लोकांच्यावर टीका करताना वापरल्या होत्या. असे करताना त्यांना नेमके कोणावर टीका करावयाची होती हे समजत नव्हते.  
    मुख्य म्हणजे उच्च शिक्षणासाठी अनेक भारतीय परदेशात जातात. त्यानंतर तेथेच स्थाईक होतात. हे फार पूर्वीपासून चालू आहे. अगदी इंग्रजांच्या काळात अनेक भारतीय शिक्षणासाठी इंग्लंडला जात असत. आपले सगळेच नावाजलेले पुढारी महात्मा गांधी , जवाहरलाल नेहरू , नेताजी सुभाष , सरदार पटेल , वि दा सावरकर , असे कितीतरी लोक त्या वेळी विलायतेला गेले. गांधीजी नंतर दक्षिण आफ्रिकेत गेले. कदाचित ही मंडळी इंग्लंडला गेली नसती तर पुढे स्वातंत्र्य लढ्यात पडलीच नसती.  अर्थात आज
तशी परिस्थिती नाही. 
    सुरुवातीला ब्रेनड्रेनमुळे परदेशात जाणार्यांची संख्या खूप वाढली. अलिकडे सर्वच क्षेत्रात रिझर्वेशन असल्यामुळे १०० टक्के मार्क मिळवले तरी पाहिजे त्या क्षेत्रात प्रवेश मिळणे कठीण झाले आहे. मग पर्याय कोणता ? परदेशगमन. आधी उच्च शिक्षणासाठी. मग अधिक पैसा मिळवण्यासाठी. मग अधिक सुखी जीवन जगण्यासाठी. जोडीदार मिळण्यासाठी मग भारत भेटी चालू होतात. पुढे स्थिरस्थावर होण्यास वयाची ३० वर्षे निघून जातात.  
     सावरकरांची वर उल्लेख केलेली कविता त्यांच्या मातृभूमीच्या ओढीची कल्पना देते. देशभक्तीने प्रेरित झालेल्या सावरकरासारख्या संवेदनशील माणसाच्या मनातील ते भाव ह्या कवितेत उत्कटतेने व्यक्त झाले आहेत. त्यामुळे ती कविता किंवा त्या ओळी कोणत्याही भारतीयाला स्वदेशाची आठवण करून देतात. शालेय जीवनात क्रमिक पुस्तकात वाचलेल्या ह्या काव्यपंक्ती त्यांच्या मनात कुठेतरी दडून बसलेल्या असतात. कोणत्याही माणसाला आपले गांव , आपला देश सोडून काही दिवस परदेशी गेल्यानंतर एकटे असताना आपल्या गावाच्या , आपल्या देशातील माणसांच्या आठवणीने ह्या ओळी आठवाव्या  हे स्वाभाविक आहे. हे त्याच्या संवेदनशीलतेचे लक्षण आहे. हा त्या काव्यपंक्तीचा प्रभाव आहे.   

      स्वातंत्र्यवीर सावरकरांची अगतिकता आपल्याला दिसते पण परदेशात गेलेल्या अनेकांची अगतिकता आपल्याला दिसत नाही त्यामुळे विनोदाचा आधार घेऊन ह्या एन.आर.आय. लोकांची चेष्टा करणारे बरेच लोक आहेत. ते त्यांना समजावून घेताना दिसत नाहीत.  

      अनेकांचा एन.आर.आय भारतीयावर फार राग दिसून येतो . आज मोठ्या प्रमाणावर प्रत्येक कुटुंबातील एखादी व्यक्ती तरी उच्च शिक्षणासाठी परदेशात जात आहे , तेथेच स्थाईक होत आहे. त्यांचे जीवनमान सुधारते आहे. काहीजण गर्भश्रीमंतही झाले आहेत. सुरुवातीला अधूनमधून हे लोक भारतात येतात . जवळच्या नातेवाईक आणि आप्तस्वकीय मित्रमंडळीना भेटतात आणि सुट्टीनंतर परत जातात. असे काही वर्षे नित्यनेमाने चालू असते. पुढे ते कमी कमी होत जाते.  भारतात येताना त्यांचा उत्साह असतो. भारतातून परत जाताना येथे कशाला आलो , असे त्यांना वाटत राहते. येथील दैनंदिन अडचणी आणि जगण्याच्या गैरसोयी ह्यामुळे ते परेशान झालेले असतात . पु. ल. देशपांडे दरवर्षी कोकणात खूप उत्साहाने जात असत पण तेथून परतताना ' मी कां आलो?' असा प्रश्न त्यांना पडत असे . अगदी तसेच ह्या एन.आर.आय. मंडळीचे भारतात आल्यावर होत असणार.
        शहरात राहून मजा करणा-या अनेकाना आपल्या गावाचा, आपल्या माणसांचा आणि त्यातील जुन्या दिवसांचा उमाळा येत असतो हे खरंच आहे. आयुष्यातील बरेवाईट दिवस त्यांच्याबरोबर काढलेले असतात. हा उमाळा असणारच. तो माणूस स्वभाव आहे.  परदेशात जाण्याचा एक फायदा असतो. तेथील प्रगत जीवनपद्धतीमुळे बहूतेकांचे डोळे दिपून गेलेले असतात. आपल्या देशातील अनेक गोष्टी त्यांना खटकू लागतात. इकडेही काही गोष्टी बदलणे आवश्यक आहे असे त्यांना वाटू लागते. असे वाटणे चूक नसते. बोलताना असे काही सुचविले की इकडच्या लोकांना ते आवडत नाही. तिकडे राहून इकडच्या लोकांना भारत का सुधारत नाहीतुम्ही काय करायला पाहिजे म्हणजे भारत सुधारेल असे त्यांनी सुचविले की इकडच्या लोकांना आवडत नाही. त्यांना त्याचा राग येतो. फुकटचे सल्ले कशाला देता? असा उलटा प्रश्न विचारला जातो. काही बोलले की अशी उत्तरे दिली जातात. मग काय ? गुपचूप बसलेले बरे. सुट्टी संपली की परत जाणे हाच उत्तम उपाय. तेथे त्या देशात मन रमत नाही. येथे ह्या देशात भवितव्य नाही. इकडे आड , तिकडे विहीर. 

      अलिकडे ह्या भारतीय मंडळींची छोटी छोटी मंडळे स्थापन झाली आहेत. ती प्रादेशिक असतात. साहित्य , कला आणि मनोरंजन हाच प्रमुख उद्देश असतो आणि आपण ज्या भागातून आलो तेथील संगीत , नाट्य आणि कला ते जोपासत असतात. त्यामुळे त्यांच्या वार्षिक महोत्सवात भारतातील साहित्यिक आणि  कलावंत ह्यांना आवर्जून बोलावतात. त्यांची आपल्या लोकांशी असलेली नाळ तुटलेली नसते. त्यांना प्रेम आणि आपुलकी असते. भाषेचा आणि संस्कृतीचा अभिमान असतो. तेथील जीवनाशी ते पूर्ण एकरूप झालेले नसतात. त्यांची पाळेमुळे तेथे रुजलेली नसतात. त्यांना आपल्या देशाची , गावाकडल्या माणसांची ओढ असते. ती दूर गेलेली असली तरी त्यांचे दूर गेलेले गाव आणि माणसे त्यांच्या मनात घर करून बसलेली असतात. आजकाल असे सर्वांचेच झालेले असते . त्यासाठी परदेशात कशाला जायला हवे ? आपण एका प्रांतातून दुसर्या प्रांतात गेलो की हेच अनुभवतो. 
      गावाकडून मुंबईत कामासाठी येणारा कामगार असो किंवा युपी-बिहार मधून पोट भरण्यासाठी मुंबईत आलेला दुध घालणारा भय्या / भाजीवाला असो किंवा नेपाळमधून भारतात नोकरी शोधत आलेला गेटवरचा  सेक्युरिटी गार्ड असो , हे सारे एन.आर.आय सारखेच जीवन जगताना दिसतात. काही दिवस सुट्टी घेऊन ते गावी जातात तेव्हा ते आपल्या लक्षात येतात . कोणीतरी बदली माणूस असतो म्हणून आपण त्याचा विचार करत नाही . परत आल्यावर आपण दोन जुजबी शब्द बोलून त्यांची चौकशी करतो आणि रोजच्या धकाधकीच्या जीवनात त्यांना विसरून जातो. त्याच्या मनातील गावाकडील तगमग त्या एन.आर.आय व्यक्तीसारखीच असते. त्यात फारसा फरक नाही.
       जे सुखी एन.आर.आय आहेत त्यांचे थोडे वेगळे. असंख्य भारतीय जगाच्या कानाकोपर्यात काय काय कारणासाठी गेले आहेत , त्यांच्या जीवनाकडे बघितले की त्यांच्या मनात काय चाललेलं असतं , हे समजून घेणं महत्वाचं आहे. अशीच एक प्रतिक्रिया खूप बोलकी आहे. एन.आर.आय. व्यक्तीवरचा राग व्यक्त करणारी आहे. "तुम्हाला नाही कळणार NY किंवा LA मधल्या अलिशान फ्ल्याटमध्ये पिझ्झा किंवा ब्रोकोली खातकोकचे किंवा बिअरचे सिप घेत 'सागरा प्राण तळमळलाम्हणण्यातली गम्मत. ने मजसी ने रॉक्स! शिवाय वीकेंडच्या इव्हला आम्हालाही वाटतेच की ओढ इंडियाची. तुम्हाला काय प्रॉब्स?" .पण एखादी निर्वासित व्यक्ती जेव्हा मातृभाषेत गाते तेव्हा परक्या देशात तिला निराळा आधार प्राप्त होतो. हे अनेकांना परदेशात वास्तव्य केले की जाणवते. मग तो जर्मन अमेरिकेत स्थाईक झालेला असो किंवा इंग्रज थायलंडमध्ये मध्ये काम करणारा असो. त्याचे प्राण स्वतःच्या देशासाठी तळमळतातच.
        भारतीय मानसिकतेची गंमत बघा. हेच एन.आर.आय. भारतीय. जेंव्हा
नेत्रदीपक यश मिळवतात तेंव्हा 'He is of Indian Origin' म्हणून ह्यांची मान एकदम ताठ. मग ते नोबेल विजेते हर गोविंद खुराणा असो की मायक्रोसॉफ्टचे सीईओ नाडेला असो. एरव्ही प्रकाशात नसलेल्या असंख्य एन.आर.आय.ला विनोदी भाषेत टोमणे.  
        मी ३० वर्षापूर्वी अमेरिकेला गेलो होतो. मी ज्या अमेरिकन कंपनीचे भारतात प्रतिनिधित्व करीत होतो त्या कंपनीत एक भारतीय इंजिनिअर काम करीत होता. तो तसा ज्युनिअर. तो गुजराती आणि मी मराठी. त्याची माझी ओळख झाली. आठवड्याच्या सुट्टीत म्हणजे शनिवार - रविवार तो मला त्याच्या घरी घेऊन गेला. खूप पाहुणचार झाला. आजूबाजूला फिरवून आणले. त्याचे बरेच नातेवाईक होते. माझी दोन-चार तासांची ओळख. रविवारी मी माझ्या हॉटेलवर निघालो. त्या मंडळीनी माझा असा काही सत्कार केला की मी जणू काही बर्याच दिवसांनी माझ्या घरी माझ्या नातेवाईकाना भेटायला गेलो आहे असे मला वाटले. दूरदेशी स्थाईक झालेल्या लोकांना आपल्या देशीचा माणूस भेटल्यावर एवढा कां आनंद होत असावा ? मला त्या परदेशस्थ भारतीयांचे मन त्या दिवशी समजले. तो सत्कार माझा नव्हता तर मी त्यांच्या गावाचा होतो आणि खूप दिवसाने भेटलो होतो म्हणून ते गहिवरून आले असावेत.  
 झुम्पा लाहिरी ह्या लेखिकेने अशा परदेशस्थ भारतीय माणसांची मने शोधण्याचा प्रयत्न त्यांच्या दोन-तीन कादंबर्यातून केला आहे. त्यातील काही माणसे मी युरोप अमेरिकेत पाहिली आहेत. सुभाष भेंडे ह्यांची " अदेशी" कादंबरी ह्याच विषयावर होती. गोव्यातील शिक्षणासाठी परदेशी गेलेला युवक गोव्यात परत आल्यावर त्याची झालेली घालमेल हा त्या कादंबरीचा परीघ. तो परदेशात भारतीय असतो आणि भारतात "अदेशी"च असतो. 
        मॉस्कोतील भारतीय हॉटेलमध्ये काम करणारी मुलं आणि मुली  पाहिल्या . त्यांचे जीवन  बघितले. बर्लिन , वॉस्को , व्हिएन्ना अशा ठिकाणी भारतीय हॉटेलला भोजनासाठी भेटी दिल्या तेंव्हा त्या हॉटेलचे मालक आणि कुटुंबियांना भेटलो . त्यांच्याकडील काम करणाऱ्या कामगारांना भेटलो. त्या एन. आर. आय. लोकांचे जीवन समजून घेतले. त्यांच्या जीवनातील संघर्ष समजून घेतला . ही मंडळी तेथे गेलीच कशी ? तेथे स्थिरस्थावर झाली कशी ? अस्थिर असूनही राहतात कशी ? कित्येक वर्षात ' ने मजसी ने मातृभूमीला ... ' असे प्राण तळमळून स्वतःच्याच जीवाला सांगत असूनही येथे येऊ शकली नाहीत. आपण भेटलो की जणूकाही त्यांच्या गावाकडली माणसे भेटली असा आनंद त्यांना होत असतो. फार प्रेमाने आणि आपुलकीने ते विचारपूस करीत असतात. बर्लिनला होशियारपूरचा एक माणूस भेटला. मी सहज होशियारपूर किती छान आहे. सुंदर शेती आहे, माणसे चांगली आहेत. असा उल्लेख केला. गेल्या दहा वर्षात तो इकडे आला नव्हता. त्याचे डोळे पाण्याने भरून आले. गावाकडल्या आठवणीनी तो गहिवरून गेला. त्यांनी आमच्या करिता खास पंजाबी पदार्थ करून आणला. खूप प्रेमाने भरवले.
       असेच एकदा विमानात दोन तरूण  भेटले. इस्त्रालयमध्ये काम करणारे. तेथे वृद्ध लोकांची संख्या खूप जास्त आहे. त्यांना मदतनीस म्हणून लोक हवे असतात. मुंबईत चांगली नोकरी होती पण तेथे अधिक पैसे मिळतात आणि घरी मुलामुलींच्या शिक्षणाचा अधिक खर्च. म्हणून त्यांनी ही अधिक पैसे देणारी नोकरी स्वीकारली. २ वर्षांनी ते घरी येत होते. त्यांची बायका-मुले वाट पहात होती. त्यांच्या डोळ्यातील भाव मला काय सांगत होते. ' ने मजसी , ने मज ..... ' . असे कितीतरी भारतीय गल्फमध्ये नोकऱ्या करतात. त्यांना सारखेसारखे भारतात येणे जमत नाही. ज्यावेळी भारताकडे निघतात तेंव्हा त्यांचे चेहरे किती प्रफुल्लीत असतात.
       कोकणात मुंबईहून मनीऑर्डरची वाट पहाणारे आजही खूप मोठ्या संख्येने आहेत आणि गणपतीला कोंकणात जाणारे एवढे कासावीस कां झालेले असतात? त्यांचे प्राण तळमळतानाच दिसतात. अगदी तसेच हे परदेशी नोकर्या करणारे भारतीय. 
माझ्या नात्यातला एकजण आहे. ८-१० वर्षे इंग्लंडमध्ये होता. स्थिरस्थावर झाला. घर घेतले. नवरा-बायको आणि मुले तेथे रुळली. तेथील नागरिकत्वही मिळाले, त्यामुळे तसा तो इंग्रज झाला. असाच  एका क्षणी भारतात जावे , तेथे स्थिर व्हावे , असा विचार त्याच्या डोक्यात आला. आणि तो भारतात परतला. पुण्यात घर घेतले. मुलं शाळेत जाऊ लागली. कुटुंब नातेवाइकात - आजोबा-आजीत रमली. दहा वर्षे होऊन गेली. एक वर्षात मुलगा एस. एस. सी. होईल आणि महाविद्यालयात जाईल. आणि त्याच्या लक्षात आले . जर मुलाला चांगले उच्च शिक्षण हवे असेल तर इंग्लंडचा नागरिक असल्यामुळे तेथे सवलतीत अधिक चांगले शिक्षण मिळू शकते. आणि भारतात रिझर्वेशनमुळे जे पाहिजे तेथे प्रवेश मिळवणे कठीण आहे. आणि त्याचा नाईलाज झाला . त्याला पुन्हा परदेशात जाणे भाग पडले. पण त्याच्या मनात मात्र ' ने मजसी ने ... ' हे गाणे चालूच असते. असे कित्येक लोक माझ्या पाहण्यात आहेत.     
      व्यवहार आणि भावना यांची गल्लत केली की अशी गोची होते . हे खरे आहे. पैसेे खूप काळ कमावायचे असतील तर मग ग्रीनकार्ड हवेच. हे अमेरिकेत गेलेल्या तरुणांना माहित असतेच. सध्याची बहुसंख्य मध्यम वर्गीयांची मनोवृत्ती.....पैसे कमवण्याकरतासर्व प्रकारची सुख उपभोगण्याकरताग्रीन कार्ड हवे अशीच असली तरी ह्या देशात आपण त्यांच्यासाठी काय देण्यास तयार आहोत, ह्याचाही विचार करावयास नको का ? आपण जर अशा संधीच उपलब्ध करून देणार नसू तर नुसते टोचून बोलणे अयोग्य आहे. ब्रेनगेन हवा असेल तर तसे प्रयत्न नको का करावयास ? डॉ होमी भाभा आणि डॉ विक्रम साराभाई ह्यांनी हे ओळखले आणि अनेक तरुणांना भारताकडे आकर्षित केले. त्यांनी आपली कर्तबगारी येथे करून दाखविली.        
       तेंव्हा विनोदाचा आधार घेऊन 'अदेशी' झालेल्या लोकांना दुखावण्यापेक्षा त्यांच्या भावनांचा विचार केला पाहिजे व त्यांना समजून घेतले पाहिजे. ' ने मजसी ने ......' अशी संवेदनशील भावना जपणारी माणसे जो पर्यंत आपल्यात आहेत तो पर्यंत त्यांच्या भेटीचा आनंद होतच राहणार. भले ते लोक उद्या मंगळावर नोकरीच्या शोधात जावो. आज खऱ्या अर्थाने ही मंडळी ग्लोबल होऊ पहात आहेत तेंव्हा आपण लोकल मंडळींनी थोडासा ग्लोबल होण्याचा प्रयत्न करावयास हवा. 
*****