बर्याच वर्षांनी काही कौटुंबिक कामासाठी नागपूरला जाण्याचे ठरत होते. त्यावेळी बाबा आमटे ह्यांच्या "आनंदवना"ला भेट देण्याचे ठरविले. त्यासाठी एक पूर्ण दिवस राखून ठेवला. ३ फेब्रुवारीला जाण्याचे ठरविले . डॉ विकास आमटे ह्यांना फेसबुकवरून मेसेज पाठविला . त्यांचे दुसर्या दिवशी उत्तर मिळाले. त्यांनी गेस्ट कोऑरडीनेटर श्री प्रभूंचा मोबाईल नंबर दिला व संपर्क साधण्यास सांगितले. भेटीची सर्व व्यवस्था ते करणार होते. त्यांच्याशी नागपूरला पोहोचल्यावर संपर्क साधला.
मी महाविद्यालयीन जीवनात बाबा आमटे ह्यांच्या बद्दल खूप वाचले होते . ऐकले होते. त्यांच्या सामाजिक कार्याची माहिती झाली होती. त्यावेळी बाबा आमटे युवकांच्यासाठी उन्हाळी शिबिरे घेत असत. माझे औरंगाबादचे काही मित्र त्या शिबिरांना जाऊन आले होते. ते खूप प्रभावित झाले होते. त्यातील काहीजण समाजसेवक झाले तर काहीजण समाजवादी चळवळीतून राजकारणात गेले. त्यांच्याशी नंतर संपर्क तुटला.
तीन चाकाची सायकल निर्मिती.: सौर उर्जेचा उपयोग |
बाबा आमटे ह्यांची ओळख महाराष्ट्राला झाली ती पु.ल.देशपांडे ह्यांच्यामुळे. ते दरवर्षी बाबा आमटे ह्यांच्या संस्थेला भेट देत असत. अनेक साहित्यिक त्यांच्या बरोबर तेथे जात असत. एक साहित्य जत्राच भरत असे. त्यांनीच ह्या संस्थेला 'आनंदवन' असे नाव सुचविले . त्यानंतर " जोडो भारत " आणि " नर्मदा बचाव आंदोलन " ह्या चळवळीमुळे बाबा आमटे पुन्हा प्रकाशझोतात आले.
काही वर्षापूर्वी डोंबिवलीला झालेल्या रोटरीच्या वार्षिक परिषदेला डॉ विकास आमटे ह्यांना वक्ता म्हणून आमंत्रित केले होते तेंव्हा "आनंदवन" ह्या विषयावरचे त्यांचे प्रभावी भाषण अजूनही स्मरणात आहे. त्यावेळी आनंदवनाला भेट द्यायचे ठरविले होते. स्वतःच्या व्यावसायिक अडचणीमुळे तो योग जुळून आला नाही.
प्रत्येक हाताला काम : स्वयंपूर्ण होण्याचा अधिकार |
रोजगार निर्मिती तर होते. माणूस स्वावलंबी होतो. |
महात्मा गांधींची प्रेरणा , विनोबा भावे ह्यांचा सहवास आणि मार्गदर्शन आणि बाबा आमटे ह्यांची स्वतःची सामाजिक जाणीव, त्यामुळेच आज आनंदवन उभे राहिले आहे. त्यांनी विलक्षण जिद्दीने हा प्रकल्प उभा केला आहे . वेदनाग्रस्त महारोग्यांच्या जीवनात आनंद तर निर्माण केलाच पण त्यांना स्वावलंबी केले. आज तेथे अनेक नवीन प्रकल्प चालू आहेत. बाबा आमटे ह्यांच्या तिसर्या पिढीने सुद्धा या कामात स्वतःला गुंतवून घेतले आहे.
पॉवरलूमवर कापड निर्मिती. |
आनंदवनात फेरफटका मारताना “ज्यांची हृदये झाडाची असतात , त्यांनाच फक्त फुले येतात”, ही दत्ता हलसगीकारांची कविता पावलापावलावर आठवत राहते. म्हणूनच पु.ल.देशपांडे ह्यांनी “ आनंदवन “ हे नाव ह्या संस्थेला सुचविले असावे.
“ आनंदवनात प्रत्यक्ष काम बघावयाचे असेल तर सकाळी ९ ते ११:३० किंवा दुपारी २:३० नंतर या. येथे रहावयाचे असेल तर गेस्ट हाउस आहे पण बुकिंग करावे लागेल." असा निरोप प्रभूनी दिला होता म्हणून आम्ही सकाळी ९ वाजताच तेथे पोहोचलो. आम्हाला एक दिवसात सर्व पहावयाचे होते कारण संध्याकाळी मुंबईला परतणार होतो.
स्वागतकक्षात प्रभूंची भेट झाली. त्यांनी दोन मार्गदर्शक आमच्याबरोबर दिले.
आमचे गाईड : साळुंखे आणि अशोक |
साळुंखे तीन चाकाची सायकल चालवत आम्हाला परिसर दाखवीत होते तर अशोक इमारतीमधील निरनिराळे विभाग दाखविताना सर्व माहिती देत होते. साळुंखे ३५ वर्षापूर्वी आनंद्वानात आले होते. बाबा आमटे ह्यांच्या अनेक आठवणी ते सांगत. बाबांचे विचार आणि दृष्टी काय होती , हे ही समजावून सांगत. ५०० एकराचा मोठा हिरवागार परिसर. अनेक इमारती झाडामध्ये लपून बसलेल्या. परिसर सुंदर आणि स्वछ होता. काही इमारती आज जुन्या झाल्या आहेत.
अगदी सुरुवातीला हॉस्पीटलची इमारत लागली .
नेत्र चिकित्सा शिबीर / कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिरे येथे होतात. |
तेथे कुष्ट रोग्यावर उपचार केले जातात. त्यानंतर जवळच एक मोठी इमारत आहे. त्या ठिकाणी नेत्रचिकित्सा शिबिर भरते. मोतीबिंदूवर शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ लहाने दरवर्षी येथे येत असतात. आजूबाजूच्या भागातून लोक शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी येथे येतात.त्यांना मोफत सेवा उपलब्ध करून दिली जाते. सर्व सोयीनी युक्त असे हे हॉस्पिटल आहे. त्या ठिकाणीच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्या जातात. अनेक शिबिरे भरतात.
“प्रत्येक हाताला काम “ हे येथील तत्व. “ संधीनिकेतन” ही नवी संस्था . किती सुंदर नाव. ह्या संस्थेत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे शिक्षण दिले जाते. विविध उद्योगांना लागणारे कुशल कामगार येथे शिक्षित होतात. नवी कौशल्ये – Skill Development चा हा प्रकल्प अगदी वाखाणण्यासारखा आहे. अपंग मुलानाही आपले कौशल्य विकसित करता येते. ह्या कुशल कामगारांचे काही फोटो खाली देत आहोत.
संधीनिकेतन : संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य शिक्षण येथे दिले जाते |
आनंदवन ही एक प्रयोगशाळाच आहे. कुष्टरोग्यासाठी ते हक्काचे घर आहे. त्याची सुरुवात त्यासाठी झाली असली तरी आज त्या ठिकाणी अनेक प्रयोग चालू आहेत. हे एक अनोखे विश्व आहे. प्रत्यक्ष पाहून आल्यावर आपल्याला ह्या प्रयोगाची पूर्ण कल्पना येते. हस्तकला , काष्ठ्कला , विणकाम , कापड निर्मिती एवढेच काय तीन चाकी सायकल निर्मिती , सौर विजेवर चालणारी तीन चाकी सायकल असे ४० हून अधिक उद्योग येथे चालू आहेत.
Handloom आणि Powerloomचा विभाग खूप मोठा आहे. कुशल कामगार उत्कृष्ट कापड निर्मिती करतात. अनेक कुटीर उद्योग आहेत. उत्तम प्रतीच्या लेदरच्या वस्तूंची निर्मिती ( चपला , बूट , पर्स इत्यादी) येथे होते. फेब्रीकेशन प्लांट आहे. सौर उर्जेवर चालणारी यंत्रे तयार होत आहेत. टायर आणि प्लास्टिक चा वापर करून बंधारे ही बांधले आहेत.
Handloom आणि Powerloomचा विभाग खूप मोठा आहे. कुशल कामगार उत्कृष्ट कापड निर्मिती करतात. अनेक कुटीर उद्योग आहेत. उत्तम प्रतीच्या लेदरच्या वस्तूंची निर्मिती ( चपला , बूट , पर्स इत्यादी) येथे होते. फेब्रीकेशन प्लांट आहे. सौर उर्जेवर चालणारी यंत्रे तयार होत आहेत. टायर आणि प्लास्टिक चा वापर करून बंधारे ही बांधले आहेत.
मूक-बधीर मुली हसत हसत काम करीत असताना आपले काम आम्हाला समजावून सांगत होत्या. |
ह्या दोन मूक-बधीर मुली यंत्रावर फार सुरेख स्वेटर विणतात. त्या आपल्याशी हातवारे करून बोलतात. त्यांना चांगले लिहिता येते. आपल्याला सतत काहीतरी सांगत असतात. त्यांचा मुद्राभिनय खूप काही सांगून जातो. आपण बोललेले त्यांना चांगले समजते. त्यांची व्यक्त करण्याची भाषा खूप गोड आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचे निरागस हास्य खूप काही सांगून जाते. मी ह्या पूर्वी पार्ल्याच्या मूक – बधीर विद्यालयातील मुला-मुलींशी संवाद साधला होता. पण येथील मुलींच्या कल्पकतेमुळे मी चकित झालो. मन लावून काम करीत असताना त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हे वेगळेच होते. मुंबईच्या कोणत्याही कामगारांच्या चेहऱ्यावर मी असे हास्य कधीच पाहिले नाही. म्हणून हे खरोखर नावाप्रमाणे आनंदवन आहे.
ह्या भल्या मोठ्या सतरंजीची Order मिळाली आहे, चार स्त्रिया ती विणताना . |
विविध रंगाच्या , विविध डिझाईनच्या सतरंज्या येथे तयार होतात |
एक अपंग मुलगी पायात सुई-दोरा धरून ग्रीटिंग कार्डवरील चित्र बनवीत आहे. तिच्या चेहऱ्यावरचे हास्य खूप बोलके आहे
हाताने जे करता येत नाही ते पायाने सहज करता येते. सुंदर ग्रीटिंग कार्ड बनवणारी ही अपंग मुलगी. अपंग कसे म्हणणार ? ही जिद्द .. हे कौशल्य कुठून येते ? सलाम ह्या हसर्या कुशल कामगाराला. |
हे कलाकार, रंगाशी खेळत असतात. कलेची निर्मिती करताना ते आपली वेदना विसरतात. दु:ख विसरतात. जगण्याचा आनंद लुटतात.
बाटलीमध्ये शिल्प |
हे काम किती गुंतागुंतीचे व कठीण आहे हे पाहून आपण थक्क होतो. व आपल्या तोंडातून WOW !! असे उदगार बाहेर पडतात. काही शिल्पे इतकी सुंदर आहेत की कोणीही कला रसिक कोणतीही किमंत देऊन ह्या कलावस्तू विकत घेईल. पण ह्या वस्तू विक्रीसाठी नाहीत. आनंदवनातील कलादालनात त्या ठेवल्या आहेत. एक अप्रतिम कलादालन.
विविध प्रकारच्या लाकडापासून तयार केलेली शिल्पे - निरनिराळ्या झाडांची लाकडे |
येथे शेती केली जाते . फुलबागा-फळबागा आहेत. भाज्या निर्मिती होते. शेती शाळा आहे. मोठे जंगल आहे. वन्य प्राणी आहेत. तलाव आहेत. नीट-नेटका निसर्ग आहे. हजारो झाडी आहेत. आनंद सागर हा मोठा तलाव आहे .
आनंद सागर
दूर देशीचे पक्षी येथे मुक्कामाला येतात. पाण्याचे सुंदर नियोजन आहे.
|
आनंदवनात अनेक इमारती आहेत. प्रत्येकवेळी इमारत बांधताना काही झाडं तोडावी लागली. पर्यावरण महत्वाचे आहे म्हणून बाबा आमटे ह्यांनी एक झाड तोडलं तर दहा झाडं लावायची असा नियम केला आणि अभयारण्य निर्माण झालं.आनंदवनाच्या आजूबाजूचा परिसर एवढा हिरवागार नाही हे नागपूरकडे जाताना लक्षात येते.
अभयारण्याकडे जाणारा रस्ता |
आमच्या मार्गदर्शकाने एका शीघ्र कवीची ओळख करून दिली. त्यांचे दोन कविता संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. माझ्या विनंतीवरून त्यांनी दोन कविता गाऊन दाखविल्या. असे गुणी कलाकार भेटले. वारणानगरचा लहान मुलांचा प्रसिद्ध वाद्यवृंद आपल्याला माहित आहे. त्याच धर्तीवर आनंदवनातील कलाकारांचा एक Orchestra आहे. तेथे एक सभागृह आहे. हा कार्यक्रम म्हणजे एक धमाल असते. संगीतात रमलेली ही आनंदयात्री मंडळी वेगळी आहेत. संगीताची अनोखी मैफल ऐकण्यासारखी आहे.
आनंदवन - स्वरानंदवन |
एक माणूस दुसर्या माणसाची वेदना पाहून व्याकूळ होतो. त्याची सेवा करताना त्याला अशा माणसाना निवारा असावा , हक्काचे व प्रेमाचे घर असावे असे वाटते. रोग मुक्त करण्यासाठी तो प्रयत्न तर करतोच पण त्याच्या हाताला काम देऊन स्वावलंबी करतो व मानाने जगण्यासाठी मदतीचा नव्हे तर मायेचा हात पुढे करतो.कुसुमाग्रजांनी आपल्या कवितेत हेच व्यक्त केले आहे. एका भिंतीवर ही कविता लिहिली आहे. ह्या कवितेतून आनंदवनाची प्रेरणा लक्षात येते.
प्रत्येक कळीत जगत असतो , निर्धार फुल होण्याचा ......... आनंदवनाची प्रेरणा |
हे देवाचे काम करणारा हा माणूस खरा देवमाणूस आहे. गमंत म्हणजे तो देव मानत नाही. तो देव शोधत फिरत नाही. आज तो माणूस तेथे नाही. पण त्याच्या कुटुंबातील सर्व माणसे हेच काम निष्ठेने मन लावून करताना दिसतात. त्यांच्यात ही आवड त्यांनीच तर निर्माण केली. अनेक जणांनी त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन अशीच सेवाकेंद्रे इतरत्र उभी केली आहेत. हे खूप मोलाचे कार्य करणारा हा माणूस.
देव नाही देव्हार्यात - कुठे शोधशी मानवा - बाबा आमट्यांना येथे देव दिसला |
आनंदवनात त्याच्या समाधीसमोर मी उभा होतो. प्रत्यक्ष त्यांना कधी पाहिले नाही. पण आनंदवनात मला ते सर्वत्र दिसले.
बाबा आमटे ह्यांची समाधी |
डॉ विकास आमटे ह्यांच्या पत्नी डॉ भारती आमटे ह्या माझी पत्नी नीलिमा हिच्या वर्ग मैत्रीण. त्या शारदा मंदिर , औरंगाबादच्या शाळेत एकाच वर्गात होत्या. मला हे अनेक वर्षे माहित नव्हते. शारदा मंदिरच्या मुख्याध्यापिका वैशंपायन बाईंची भारती ही मुलगी. हे माहित होते .औरंगाबादचे कॉंग्रेसचे माजी खासदार भाऊसाहेब वैशंपायन त्यांचे वडील. आम्ही आनंदवनाला भेट देणार आहोत असे आम्ही त्यांना कळविले होते. डॉ विकास आमटे ह्यांनी त्यांचा फोन नंबर दिला होता .त्यांना खूप आनंद झाला. आनंदवनातून निघताना त्यांची भेट घेतली. दोन वर्ग मैत्रिणी भेटल्या. जुन्या आठवणी जागा झाल्या. त्या दोघी बराच वेळ बोलत होत्या. इतर वर्ग मैत्रिणींची चौकशी चालू होती. कौटुंबिक चौकश्या झाल्या. नीलिमाने भारती आमटेंचा शाल देऊन गौरव केला.
डॉ भारती आमटे - प्रा ,नीलिमा गंगाखेडकर( ( कल्पना देशपांडे ) - वर्ग मैत्रिणी - खूप वर्षांनी भेटल्या |
त्यांनी तेथील भोजनालयात आमच्यासोबत भोजन केले. जेवताना गप्पा खूप रंगल्या. जुन्या आठवणीना उजाळा आला.शाळेतील मैत्री तशी विसरत नसते. माणसे मोठी होतात.निरनिराळ्या क्षेत्रात नाव मिळवतात. पण बालमैत्री वेगळीच असते. ते ऋणानुबंध कायम असतात.
अशी ही आमची आनंदवनाची भेट. नं विसरता येणारी . खूप काही उर्जा देणारी . जगण्याचे प्रयोजन सांगणारी. आम्हाला आनंदयात्री करणारी.
No comments:
Post a Comment