Thursday, September 25, 2014

Wish You Best of Luck ह्या सदिच्छेचा उपयोग होतो काय ?

महाराष्ट्राचे एक प्रसिद्ध शस्त्रक्रिया विशारद होते. त्यांनी लाखो यशस्वी शस्त्रक्रिया केल्या. प्रत्येक शस्त्रक्रिया करण्यापूर्वी ते शस्त्रक्रिया सभागारातील देवाच्या फोटोपुढे नतमस्तक होत आणि मगच शस्त्रक्रिया सुरु करीत असत. एकदा त्यांना ह्या संबंधी प्रश्न विचारला असता त्यांनी असे उत्तर दिले , ' माझ्या हाताच्या पलीकडेही अशी काही शक्ती आहे की तिच्या हातात संपूर्ण यश मिळण्याची किमया आहे म्हणून मी त्या शक्तीला नमन करतो .माझा तसा विश्वास आहे. माझी तशी श्रद्धा आहे.' माणसाची अशी श्रद्धा असते . 
आपण परीक्षेला जात असतो . खूप अभ्यास केलेला असतो. आपल्याला आपले मित्र - हितचिंतक शुभेच्छा देतात . ' बेस्ट ऑफ लक ' असे म्हणतात . हे लक कुठे असते? त्याचा काही उपयोग होतो कां? यश तर आपल्या अभ्यासावर अवलंबून असते. मग ह्या शुभेच्छांचा काय उपयोग? 
पाश्चिमात्य देशातही अशा शुभेच्छा कां देत असतात ? 
त्यांच्याकडे बहुतेक सर्वजण बोलताना शेवटी ' God Bless You ' असे कां म्हणतात? 

एवढेच काय, सकाळी कोणी भेटल्यास ओळख नसली तरी ' Good Morning ' असे कां म्हणतात ? त्यामुळे आपली सकाळ खरोखरच चांगली जाते कां? 
आपण आपल्या आई- वडिलांच्या किंवा वडीलधार्या माणसांच्या पाया पडतो किंवा वाकून नमस्कार करतो. त्यांचे हात आपल्या पाठीवर पडतात व ते आपल्याला ' यशस्वी भव ' असा आशीर्वाद देतात. त्या आशीर्वादामुळे आपण यशस्वी होतो कां? ह्या शुभेच्छा किंवा आशीर्वादामुळे आपणास न कळत एक शक्ती प्राप्त होत असते कां ? एक आत्मिक बळ मिळत असते कां? 
मंगलयान मोहीम यशस्वी व्हावी म्हणून ह्या मोहिमेचे प्रमुख डॉ राधाकृष्णन ह्यांनी मोहिमेपुर्वी तिरुपतीच्या बालाजीचे दर्शन घेऊन मंगलयानाची प्रतिकृती देवाला अर्पण केली . ती त्यांची श्रद्धा होती . त्यांचा देवावर विश्वास होता . तो त्यांच्यावर लहानपणापासून झालेला घरातील संस्कार होता. असे केल्याने त्यांना एक आत्मिक बळ मिळाले असणार . हा त्यांचा वैयक्तिक श्रद्धेचा प्रश्न होता. त्यांची ही श्रद्धा दुसर्या कोणासाठी हानिकारक नव्हती. काही जणांना ती अंधश्रद्धा वाटते. पण त्यांना ती आत्मबळ देणारी वाटत असावी . ज्यांना देव आहे असे वाटते , त्यांच्यासाठी तो आहे व ज्यांना देव नाही असे वाटते त्यांच्यासाठी तो नाही. त्यामुळे स्वतःला आत्मिक बळ मिळण्यासाठी जे लोक देवाचे स्मरण करतात त्यांच्या कृतीवर बोलण्याचा इतरांना काय अधिकार ?
दुसर्यांच्या भावनाचा आदर करणे आवश्यक आहे. उगाच 'उचलली जीभ आणि लावली टाळ्याला ' असे होता कामा नये
माझ्या ओळखीचे समाजवादी विचाराचे , देवाधर्मावर विश्वास नसलेले , परखड विचाराचे , वर्तमानपत्राचे ख्यातनाम संपादक होते. त्यांचे सहकारी देवभक्त होते. ते लघुरुद्र / सत्यनारायण पूजा करीत असत. संपादक त्यांच्याघरी तीर्थ प्रसादाला व मेहूण म्हणून जेवावयास येत असत. त्यांनी त्यांच्या श्रद्धेची कधीच चेष्टा केली नाही. त्यांच्या श्रद्धेचा आदर केला. 
आपल्याला जरी पटत नसले तरी इतरांच्या श्रद्धेचा आदर करावयास शिकले पाहिजे . जो पर्यंत ही श्रद्धा वैयक्तिक असते व दुसर्यांना हानिकारक नसते तो पर्यंत इतरांनी त्यावर बोलण्याचा अधिकार नाही. ती त्या माणसाची गरज असते व त्याला आत्मिक बळ देते .

डॉ नरेंद्र गंगाखेडकर
·         Chandan Pawar : खूपच छान लेख आणि मनाला भिडणारा .....धन्यवाद

·          
Kalyan Shitole Purnapane Sahamat 

·          
Vijay Mainkar Fully agree to these views.
· 
·          

Vijay Habbu Superb commentary, Dr. Gangakhedkar !!!

1 comment:

  1. आपल्या ब्लॉगवरील वाचकसंख्या वाढविण्याकरिता आपला ब्लॉग 'मराठी ब्लॉग लिस्ट' या मराठी वेबसाईटवर जोडा.

    लिंक- http://marathibloglist.blogspot.in/

    ReplyDelete