Sunday, August 18, 2013

निमीत्त देवकणाचे

सध्यां हिग्ज बोसान ह्या कणाचा शोध चालू आहे. सुरुवातीला ह्या कणाला देवकण ( God Particle ) असे संबोधले जात असे. आतां त्याला तसे म्हणू नये असे ठरले आहे. अजूनही हा कण दिसलेला नाही, तरीही त्याचे अस्तित्व मान्य झाले आहे.
देव कण म्हणजे कुठेतरी परमेश्वराची कल्पना मान्य करणे असा अर्थ होत असल्यामुळे शास्त्रज्ञांचा देव कण म्हणण्याला विरोध असावा.
परमेश्वर हा तसा दिसत नाही. परमेश्वराची संकल्पना गीतेमध्ये मांडण्यात आली आहे. आचार्य विनोबा भावे ह्यांनी "गीताई" मध्ये फार सुंदर शब्दात वर्णन केले आहे
"मी चि अव्यक्त रूपानें जग हे व्यापले असे 
माझ्यात राहती भुते मी नं भूतांत राहतो" 
पदार्थ विज्ञान शास्त्रात आपण उर्जा आणि अणु कण ह्यांच्या संकल्पना मान्य केल्या आहेत. परंतु हे अणु कण आणि उर्जा आपण डोळ्यांनी कधीच पाहू शकत नाही.न्यूटनच्या  गुरुत्वाकर्षणाची संकल्पना आपणास समजते पण आपण ती डोळ्यांनी पाहू शकत नाही. न्यूटनला झाडावरील फळ खालीच कां पडते ह्याचा शोध लागला पण गुरुत्वाकर्षणाची शक्ती मात्र दिसू शकली नाही.तसेच  विश्व किरणाचे ( Cosmic Rays ) परिणाम आपणास दिसतात पण विश्व किरणे दिसत नाहीत. म्हणजे अणु कण आणि उर्जा शक्ती अव्यक्त असूनही त्यांचे अस्तित्व आहे.आपणास परिणाम दिसतो पण अस्तित्व दिसत नाही.
 Cause and Effect ह्यावर विज्ञान आधारलेले आहे.Effect दिसतो म्हणून Cause शोधणे हे विज्ञानाचे काम. परमेश्वराचे ही तसेच आहे. तो असूनही दिसू शकत नाही.परमेश्वराने अव्यक्त रूपाने हे जग व्यापले आहे , हे मान्य करावयास हरकत नसावी.
" आकाशात महा-वायु सदा सर्वत्र राहतो " त्यामुळेच आपल्याला टी.व्ही.वर , इंटरनेटवर दृश्य चित्रे पाहता येतात. एका ठिकाणी घडत असलेल्या घटना दूरवर क्षणार्धात सहज दिसतात.  दूरध्वनीवर अगदी सहज बोलता येते. रेडिओवर प्रक्षेपण होऊ शकते. हे कसे शक्य आहे हे जर समजून घेतले तर ह्या अव्यक्त असणार्या गोष्टी समजू शकतात.
" साक्षी मी प्रकृति- द्वारा उभारी सचराचर 
त्यामुळे सर्व सृष्टीची ही घडामोड होतसे" 
प्रकृति आणि सृष्टीचा शोध हे विज्ञानाचे कार्य. म्हणजेच अप्रत्यक्षपणे विज्ञान ह्या अनाकलनीय , अदृश्य शक्तींचा शोध घेत असते. त्याला देव म्हणायचे कीं नाही हा ज्याच्या त्याच्या विचाराचा भाग आहे.
 "तापतो सूर्यरूपें मी सोडितो वृष्टि खेंचितो 
मृत्यू मी आणि मी मोक्ष असें  आणि नसें हि मी "
अव्यक्त रूपाने हे जग व्यापलेले आहे. असंख्य सूर्य अवकाशात तळपत असतात. विश्वाच्या पलिकडेही अनेक विश्वें आहेत. प्रकृति आणि सृष्टीत सतत अनाकलनिय घडामोडी घडत असतात. ह्या सर्व घडामोडीच्या मागे एक अदृष्य शक्ती / उर्जा आहे. अशाच एका उर्जेतून हिग्ज बोसान हा मुलभूत कण दिसून आला. असे १२ मुख्य मुलभूत कण आहेत आणि २०० च्या वर अणु कण सापडले आहेत. विश्वनिर्मितीची कारणे समजण्यासाठी ह्या नव्या उर्जेचा आणि कणांचा शोध महत्वाचा आहे.

परमेश्वराच्या अस्तित्वाचा शोध ही असाच महत्वाचा आहे. तो अव्यक्त आहे. त्याची विविध रूपे आपल्याला ह्या निसर्गात दिसून येतात हे मात्र खरे. त्याला परमेश्वर असे संबोधले नाही तरी चालेल.
विश्वाच्या पलीकडे विश्व 

Thursday, August 15, 2013

पंचाहत्तरी

७५ वर्षे ज्या जेष्ठ नागरिकांनी पूर्ण केली आहेत त्यांचा सत्कार करण्यासाठी हा सोहळा आयोजित केला आहे आणि त्यांत सहभागी होण्यासाठी मला आमंत्रित केले आहे त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. आज ह्यां जेष्ठ नागरिकांचा सत्कार करतांना मला खूप आनंद वाटतो आहे. ७५ उन्हाळे पावसाळे पाहिलेल्या ह्या जेष्ठांना मी काय सांगणार ? जगण्याचा विलक्षण अनुभव तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही अनेक चढउतार पाहिले आहेत. यश - अपयश तुमच्या  पदरी पडले आहे. " जीवन ह्यांना कळले हो " हे ही मला माहित आहे. तरीही मला एक गोष्ट नेहमीच वाटत आली आहे की ......
       आपल्याजवळ जगताना जे घांव सोसावे लागतात तीच आपली खरी "सुवर्ण पदके" आहेत हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
जेष्ठ नागरिक संघ 

आज जीवनाच्या उतरणीचा हा  काळ आहे असे तुम्हाला वाटत असणार. त्यांत चूक नाही. जीवनामध्ये एका टप्प्यावर आपली घसरण चालू असते. आपण नेहमीच उंचावर असतो असे नाही. एक उतरणीचा काळ येतोच.
आपण कधीतरी मध्यावर असतो. वाट अर्धीच चालून झालेली असते. पुढची वाट चालावयाची  बाकी असते. आपण अर्ध्या आनंदात आणि अर्ध्या दु:खात  असतो. आपण जीवन भरभरून जगलेले नसते. जीवनात काहींसे निराश झालेले असतो. ऊन-सावलीचा खेळ चालू असतो. ऊन तापदायक वाटते. तर सावलीतही थंडी वाजू लागते. कोवळ्या उन्हाची अपेक्षा असताना रखरखीत उन्हाला सामोरे जावे लागते किंवा ऊब हवी असताना कडाक्याची थंडी सहन करावी लागते. जगणे हे असेच असते.त्यामुळे  आपल्याला जगण्याचा नवा अर्थ समजू लागतो...... मला हिमालयात प्रवास करतांना हे सारखे जाणवत असे.
साठी - सत्तरीला आलेली माणसे आयुष्याच्या ह्या वळणाकडे कशी बघतात ह्याचे वर्णन करायचे असेल तर मला उषा मेहता ह्यांची कविता आठवते ....
मागं ना वळता येत
ना जाता येत पुढं
असल्या विचित्र वळणावर
उभं आयुष्य उभं
पळत सुटलेल्या वर्ष्याच्या
फाडून केल्या चिंध्या
काळ्या तळ्यात बुडवूनदेखील
पाठलाग करीत राहिल्या
फाटतय , पण विटत नाही
रफू करीत राहिलेय
वस्त्र जीर्ण झालं नाही ....पण
सरत आले धागे

अशी अवस्था असते हे खरे आहे.आपण कोणालाही भेटलो की , " काय, कसं काय आहे? ( How are you ? ) असं सहजपणे विचारतो आपल्याला तितक्याच सहजपणे उत्तर मिळते , " मी छान आहे " ( I am fine.) मला सर्व काहीं मिळालं आहे , मी खूप आनंदी आहे. मला जे हवे ते सारं मिळालं आहे " असं असतानांही  डोळ्यात मात्र असमाधान कां दिसते ? .... हा प्रश्न मला नेहमी  भेडसावत असतो. मी त्यामुळे थोडासा अस्वस्थ होतो.
कुटुंब , घर, कार्यालयाचे काम , स्वतःचे आरोग्य  हे सारे म्हणजे आपले रोजचे आयुष्य. काम , कुटुंब , मुलं ह्यांचाच सतत विचार. मुलं मोठी होतात. शिकतात. स्वतःच्या पायावर उभे राहतात. स्वतःचा संसार थाटतात.
कामासाठी घर सोडून दुसरीकडे जातात. आपली बायको आणि आपण आपलं नातं काहीसे विसरतो. जणू काही दूरचे मित्र आहोत असे वागू लागतो . एक दिवस निवृत्तीचा येतो. त्यावेळी विलक्षण पोकळी अनुभवायास येते. त्यामुळेच आयुष्य संपल्यासारखे वाटू लागते. निरर्थक वाटू लागते. आयुष्याला काही प्रयोजनच नाही असं वाटू लागते. तेंव्हाच आयुष्याचा नवा अर्थ शोधायला पाहिजे. नवी प्रयोजने शोधली पाहिजेत. स्वतःसाठी जगता आले पाहिजे.हे सर्व जेष्ठ नागरिकांनी समजून घेतले पाहिजे.
आपण बहुतेक जण जीवनात मिळालेले संकेत समजून घेत नाहीत. त्यामुळे आपली गोची होते.  आयुष्य महत्वाचे नाही. आयुष्याचा प्रवास महत्वाचा असतो. आपण आपल्यापेक्षा इतरावर अधिक प्रेम करणे महत्वाचे आहे. तसेच स्वतःवरही प्रेम केले पाहिजे. स्वतःची काळजी घेतली पाहिजे.स्वतः करिता जगले पाहिजे.
आपल्या ओंजळीत असलेल्या द्राक्षाकडे बघा. त्या द्राक्षांना जीवन मिळालं आहे. त्यांत सूर्याचे प्रेम, पावसाची सुंदरता आणि परमेश्वराची कल्पकता साठलेली आहे. हा तर निसर्गाचा प्रभाव आहे. आपण ही तसेच असतो. निसर्गही आपल्याला असेच देत असतो. तो एक चमत्कार आहे. आनंद आणि समाधानाची वलये आपल्याभोवती  फिरत असतात. तेंव्हा त्या दिव्य प्रेमशक्तीच्या  जाणीवेमुळे आपण आनंदात राहिले पाहिजे. "आनंद वाटत रहा. दु:ख सहन  करा.' हेच मला सांगावेसे वाटते .अधिक काय सांगू ?
कोणत्या वेळी काय होईल हे सांगता येत नाही. Expect the Unexpected. त्याकरिता आनंद उधळीत जगणे हाच खरा उपाय. उरलेल्या आयुष्याचा प्रवास करतांना नको असलेले गाठोडे सोडून देऊन प्रवास केला पाहिजे.
आपण मरावे परंतु जिवंत असावे असे वाटते ना? म्हणजेच"  मरावे परी किर्ती रुपी उरावे ...".आपली आठवण आपल्या आप्तस्वकीयांना सतत होत राहावी असे वाटते ना? मग आनंद वाटत जा. ... आनंद  सगळ्यांनाच हवा असतो.
आपल्या ह्या धकाधकीच्या आयुष्यात आपण  रोज जगतां जगतां मरत असतो. He died while he was alive. असं आपलं जगणं असतं.
मला तर वाटतं की ... While dyeing , we must live. आणि Distribute Happiness to All.
आपण मरणार आहोतच मग जगायचे कशासाठी ? ह्या प्रश्नाचे उत्तर , जगण्यात आनंद लुटता आला पाहिजे हेच आहे. लक्षात ठेवा , आकाशाचा रंग निळा असतो तरीही  ते काळ्याकुट्ट ढगांनी व्यापलेले असते. आयुष्य असेच असते. निळ्या रंगाकडे बघा. आणि काळाकुट्ट अंधार आणणारे ढग विसरून जा ........
आनंद लुटा. आनंद वाटा . शुभेच्छा. धन्यवाद.
( जेष्ठ नागरिक संघ , अंधेरी पूर्व च्या  वर्धापन दिनाच्या दिवशी रोटरी क्लबचा प्रतिनिधी म्हणून  केलेले हे भाषण )