Wednesday, July 23, 2025

चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे ...


नाटककार मितभाषी असला तरी तो संवादी लेखक असतो. नट हा व्यक्त होणारा संवादी असतो. प्रेक्षक हा मन लावून बघणारा श्रोता असतो. दिग्दर्शक हा सतत संपर्क, चर्चा आणि भावना  व्यक्त करणारा असतो. तो नाटककारांशी, नटाशी आणि रंगभूमी तंत्रज्ञाशी चर्चा करीत असतो. चंद्रकांत कुलकर्णी हा एक असा दिग्दर्शक आहे की जो बोलण्यातून व्यक्त होत असतो. तो नाटककार, नट संच आणि रंगभूमी तंत्रज्ञाशी ह्या पुस्तकातून बोलताना आपणास दिसतो. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या सर्व नाटकांचा इतिहास ह्या पुस्तकात आहे. त्यांनी वेळोवेळी केलेल्या चर्चांचे हे पुस्तक आहे. ८३हून अधिक नाटकांचे ते दिग्दर्शक आहेत. ते सतत चर्चा करतात नाटकासंबंधी. त्या आपण वाचत असतो ह्या पुस्तकातून. त्यांनी कलाकारांबरोबर केलेल्या अर्थपूर्ण चर्चा जसे आपण वाचत जातो तसेच तंत्रज्ञाबरोबरच्या अनेक गोष्टी आपल्याला नवीनवी माहिती देत जातात . त्यांनी प्रायोगिक व व्यावसायिक ह्या दोन्ही रंगभूमीवर काम केलेलं आहे. 

चंद्रकांत हे आमच्या औरंगाबादचे. मी १९६६ साली औरंगाबाद सोडलं. त्यांनीं १९६६ ते १९७६ या काळातच नाट्य क्षेत्रात सुरवातीची काही वर्षे औरंगाबादमध्ये घालविली. ते मुळचे परभणीचे. पाथ्री जवळच्या हमदापुर गावचे. कोरडवाहू शेती करणार्या एका शेतकर्यांचा चंद्रकांत हा मुलगा आहे. त्यांच्या आईने परभणी सोडून औरंगाबादला येण्याचा निर्णय घेतला. अतिशय कष्टमय दिवसांचा तो काळ होता. त्यावेळच्या औरंगाबादचे त्यांनी जे वर्णन ह्या पुस्तकात केले आहे, ते वाचताना मला आमचे औरंगाबादचे दिवस आठवत होते. कनिष्ठ मध्यमवर्गीय लोकांचे ते जगणे आम्हीही  जगलो होतो. त्याचीच आठवण मला होत गेली. मुख्य म्हणजे सुपारी मारुती जवळच्या नगारखाना गल्लीचा ते उल्लेख करतात. त्याच गल्लीतील मुळे मास्तरच्या वाड्यात आम्ही रहात होतो. गुलमंडी, गुजराती शाळा, पैठण गेट परिसर, औरंगपुरा आणि मराठवाडा विद्यापीठ याचे जे वर्णन त्यांनी केलं आहे ते तंतोतंत बरोबर आहे. 

मी  १९६८ला औरंगाबाद सोडलं होतं आणि त्यानंतरच  मराठवाडा विद्यापीठात नाट्य विभाग सुरू झाला होता. चंद्रकांत हे तेथील नाट्य पदवीधर. त्यांनी लक्ष्मण देशपांडे ह्यांचा विशेष उल्लेख केला आहे.  लक्ष्मण हे माझे मित्र. ते माझ्यापेक्षा वयाने मोठे. आम्ही औरंगाबादच्या शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी. लक्ष्मण देशपांडे तेथूनच पदवीधर झाले. शिकतांना ते नाटकांत चमकू लागले. विद्यापीठात  नाट्यशास्त्र विभागात ते प्राध्यापक होते. चंद्रकांत आणि त्याचे इतर मित्र मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागातूनच पदवीधर झाले.   

बाबा दळवी औरंगाबादच्या 'मराठवाडा' दैनिकात अनंत भालेराव यांचे सहकारी होते. मी बाबा दळवी यांना चांगले ओळखत असे. मला त्यांनी चांगले लिहिते केले. माझे लिखाण 'मराठवाड्या'त प्रसिद्ध होत असे. मी त्यांना अनेकदा भेटलो आहे.अजित आणि प्रशांत दळवी ही त्यांची दोन मुलं. अजित हा लेखक आणि प्राध्यापक तर प्रशांत हा नाटककार आणि रंगकर्मी. चंद्रकांत हा दोन्ही दळवी बंधूचा जिगरी दोस्त. ते समवयस्क आणि नाटक वेडे.  माझा चंद्रकांत आणि दळवी बंधू यांच्याशी कधीच संपर्क नव्हता. मी त्या काळात औरंगाबाद सोडले होते. त्यांची औरंगाबादची नाट्य कारकीर्द सुरू झाली होती. मुंबईत त्यांची कारकीर्द सुरू झाल्यानंतर मी त्यांची १५च्यावर नाटकं बघितली असतील. दीनानाथ आणि शिवाजी मंदिरला मी चंद्रकांतला अनेकदा बघितलं आहे. पण ओळख अशी करून घेतली नाही. मी तसा एक प्रेक्षक. नाटक पहायला जाणारा.

चंद्रकांत हा औरंगाबादच्या ज्ञानविज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी. त्याने पुस्तकात प्रा. वसंत कुंभोजकरांचा विशेष उल्लेख केला आहे. ते माझे ही शिक्षक आणि प्राध्यापक. मी १९६३-६६ मध्ये त्याच  महाविद्यालयात होतो. मी विज्ञानाचा विद्यार्थी. अभ्यासक्रमात मराठी ही माझी दुसरी भाषा. त्यावेळी मराठीचे प्रसिद्ध साहित्यिक मा.गो.देशमुख आमचे प्राचार्य होते. भगवंत देशमुख, गो.मा.पवार आणि वसंत कुंभोजकर ह्यांनी त्यावेळी महाविद्यालयाचा मराठी विभाग गाजवला होता. भगवंतराव नंतर कोल्हापूरला बदलून गेले. गो मा पवार आणि वसंत कुंभोजकर आम्हाला मराठी शिकवीत असत.  त्यावेळी विद्यापीठात मराठी विभाग नव्याने सुरू झाला होता. प्रसिद्ध समीक्षक म्हणून नावाजलेले मुंबईचे वा.ल.कुलकर्णी मराठवाडा विद्यापीठात मराठी विभाग प्रमुख होते. त्याच वेळी विनोदी लेखक द.मा.मिरासदार हे औरंगाबादचे देवगिरी कॉलेज गाजवित होते. मला ते दिवस आजही आठवतात.

चंद्रकांत यांना वसंत कुंभोजकर सरांनी वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यावयास लावला. त्यांनी त्याला खूप प्रोत्साहन दिले व त्यांनी अनेक स्पर्धातून बक्षिसे मिळविली. त्याबद्दल त्यांनी विस्ताराने लिहिले आहे. त्यामुळे मला ही अशीच आठवण झाली.  मलाही कुंभोजकर सरांनी प्रसिद्ध अशा रानडे वादविवाद स्पर्धेत भाग घ्यावयास लावला होता. त्यांनी मला विशेष मार्गदर्शन केले होते. मी त्या स्पर्धेत मराठवाडा विभागात दुसरे पारितोषिक मिळविले होते. त्यावेळी ज्ञान विज्ञान महाविद्यालयाचा मराठी विभाग आणि शिक्षक इतके नावाजलेले होते की मी विज्ञान सोडून मराठी भाषेचा विद्यार्थी झालो असतो तर कदाचित मराठी साहित्यात अधिक रमलोही असतो.

चंद्रकांत यांनी कमलाकर सोनटक्के यांचा विशेष उल्लेख केला आहे. तो महत्वाचा आहे. मराठवाड्याचा नाट्यक्षेत्रातला तो पहिला प्राध्यापक. नाट्य विभाग सुरू झाला तो त्याच्या प्रयत्नांमुळेच. लक्ष्मण देशपांडे आणि कमलाकर सोनटक्के हे मराठवाड्याचे नाट्यऋषी. त्यांच्यासारखे लोक विद्यापीठाच्या नाट्यविभागात होते. त्यामुळेच चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासारखे दिग्दर्शक आज पुढे आले आहेत.

चंद्रकांत हा प्रशांत दळवी आणि अजित दळवी यांचा मित्र. सुरवातीला 'जिगिषा' ही नाट्यसंस्था उभारुन चंद्रकांत, दळवी बंधू आणि त्यांच्या मित्रांनी औरंगाबादच्या वातावरणात खूप मोठा बदल घडवून आणला. त्याच मित्र - मैत्रीणी हयानी औरंगाबाद सोडून मुंबईला येण्याचा महत्वाचा निर्णय घेतला.  आणि नंतरच्या  ४-५ वर्षातच मुंबईच्या व्यावसायिक रंगभूमीवर आपला वेगळा ठसा उमटवला. त्यांचा गेल्या ३५-४० वर्षातील नाट्यप्रवास जवळून पहावयाचा असेल तर चंद्रकांत कुलकर्णी यांचे हे पुस्तक अवश्य वाचा.

नाट्यशास्त्राचा पदवीधर असलेला आणि २० नाटकं दिग्दर्शित करणारा चंद्रकांत कुलकर्णी मुंबईत आल्यानंतर सर्व प्रथम भेटला तो व्यावसायिक रंगभूमीच्या मोहन वाघ यांना. त्यांनी त्याची नेमणूक केली ती दिग्दर्शन सहाय्यक म्हणून. 'रमले मी!' हे प्र.ल. मयेकर यांचे नाटक चंद्रकांत यांनी दिग्दर्शित केलं. संजय मोने, वंदना गुप्ते हे प्रमुख कलाकार या नाटकात होते. त्या प्रयोगानंतर चंद्रकांत कुलकर्णी यांची चढती भाजणी सुरूच  झाली आणि त्यांनी त्या नंतर ८०-९०नाटकं रंगभूमीवर आणली. 'रंग उमलत्या मनाचे' हे वसंत कानेटकर यांचे पहिले नाटक मोहन वाघांनी चंद्रलेखातर्फे सादर केलं. त्यांचे दिग्दर्शक होते चंद्रकांत कुलकर्णी. त्यात प्रदीप वेलणकर, वंदना गुप्ते हे कलावंत होते. ह्या नाटकाने रंगभूमी वरील वातावरण अक्षरशः दणाणून गेलं. नंतर गाजलं ते 'डॉक्टर तुम्हीसुद्धा' . या नाटकात कलाकार होते सुहास जोशी, मोहन गोखले आणि सुनील शेंडे. या नाटकाच्या प्रेमात पडला महेश मांजरेकर. त्यानंतर महेश मांजरेकर यांची नाटके चंद्रकांत कुलकर्णी यांना दिग्ददर्शनाला मिळत गेली. 

१९८४ मध्ये त्यांचे 'चारचौघी' गाजलं. त्यात कलाकार होते दीपा श्रीराम, आसावरी जोशी, वंदना गुप्ते आणि प्रतीक्षा लोणकर. आजही या नाटकाने नाट्य क्षेत्रात अनेक विक्रम मोडले आहेत. त्या नाटकातील कलाकार आहेत रोहिणी हट्टगंडी, कादंबरी कदम, पर्ण पेठे आणि मुक्ता बर्वे. मी ह्या नाटकांचा हाऊसफुल्ल प्रयोग बघितला होता. चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेले हे एक अप्रतिम नाटक. या आशयप्रधान नाटकाची पाठराखण करणार्या महाराष्ट्रातील सजग, सुजाण, सुबुद्ध आणि असामान्य प्रेक्षकांना हे नाटक अर्पण केलेलं  आहे असं नाटकाच्या पुस्तक प्रस्तावनेत लिहिलं आहे. हे विशेष. असं हे अविस्मरणीय नाटक.

मी पाहिलेली चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित नाटकं:

* चारचौघी - प्रशांत दळवी
* वाडा चिरेबंदी - महेश एलकुंचवार
* मग्न तळ्याकाठी - महेश एलकुंचवार
* गांधी विरुद्ध गांधी - अजित दळवी
* हमिदाबाईची कोठी - अनिल बर्वे
* हसवाफसवी - दिलीप प्रभावळकर
* हॅम्लेट- शेक्सपिअर - जिगीषा
* संज्याछाया - प्रशांत दळवी - जिगीषा
* नियम व अटी लागू - संकर्षण कर्हाडे

दिग्दर्शक म्हणून वाटचाल करताना चंद्रकांत यांनी जमविलेले हे अनुभवाचे गाठोडं खूप मोलाचं आहे. ह्या पुस्तकात हे गाठोडे मोकळं सोडलं असल्यामुळे आपण हा नाट्यप्रवास त्यांच्या बरोबर करीत राहतो व पडद्यामागचे त्यांचे नाट्य अनुभव ऐकत राहतो. 'जिगीषा' ही औरंगाबादची नाट्यसंस्था मोठी होत गेली ती चंद्रकांत कुलकर्णी आणि दळवी बंधू यांच्या मुळेच. मुंबईला ही मराठवाडी मंडळी आली. सुरवातीला दूरदर्शनचे बातमीदार प्रदीप भिडे यांच्या मैत्रीमुळे ती येथे छान स्थिरावली. हे नमूद केले आहे चंद्रकांत कुलकर्णी यांनी. 

त्यांना ह्या पुढील नाट्य कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा !

*****

Tuesday, July 22, 2025

ऐवज: अमोल पालेकर


मी १९६६ मध्ये बीएआरसी मधील एक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी मुंबईत आलो. त्यानंतर युडीसीटीमध्ये पदार्थविज्ञान शास्रात पीएच.डी.साठी रिसर्च फेलो म्हणून निवडला गेलो. तेथील वसतीगृहात रहात होतो. औरंगाबादच्या वातावरणातून मुंबईत आल्यावर नाटक-सिनेमा हाच एक माझा विरंगुळा होता. मी वसतीगृहात नसलो की माझा पत्ता होता 'शिवाजी मंदिर किंवा तेजपाल सभागृह' असा होता, असे माझे मित्र म्हणत असत. प्रायोगिक रंगभूमीवरची नाटकं जशी बघत असे तसेच व्यावसायिक रंगभूमीवरची नाटकं बघणं हा माझा छंद होता. त्यावेळी प्रायोगिक रंगभूमीवर विजय तेंडुलकर आणि व्यावसायिक रंगभूमीवर वसंत कानेटकर हे आघाडीचे नाटककार होते. सध्या मी 'ऐवज' हे अमोल पालेकर यांचे पुस्तक वाचत होतो आणि त्यानंतर वाचायला घेतलं 'चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे..' हे पुस्तक. त्या बद्दल नंतर लिहिन.

'गिधाडे,अवध्य, सखाराम बाईंडर, घाशीराम कोतवाल', ही अमोल पालेकर हे प्रमुख नट असलेली नाटकं मी तेजपालला पाहिली होती. त्यावेळी सत्यदेव दुबे यांचे प्रायोगिक रंगभूमीवर फार मोठे प्रस्थ होते. हा माणूस म्हणजे एक अक्राळविक्राळ दोन हात करणारा दिग्दर्शक, असे वर्णन अमोल पालेकर यांनी 'ऐवज'मध्ये केलं आहे, ते तंतोतंत बरोबर आहे. तेजपाल सभागृहामध्ये ७०० सीट आहेत, पण त्यावेळी दुबे यांच्या प्रयोगिक नाटकांना केवळ ८-१० प्रेक्षक असत. त्यात मी ही असे. याउलट शिवाजी मंदिरात होणाऱ्या नाटकाला तिकीट मिळणे कठीण असे.
इंडियन नॅशनल थिएटर, रंगायन, आविष्कार, पुण्याचे पीडीए यांच्यापेक्षा दुबेचें 'थिएटर युनिट' अधिक प्रसिद्ध होते. मला आठवतो तो १९६८चा सत्यदेव दुबे दिग्दर्शित 'आधे अधुरे' हा प्रयोग. मोहन राकेश हे नाटककार त्या नाटकामुळे खूप गाजले. अमरीश पुरी, ज्योत्स्ना कार्येकर, भक्ती बर्वे, दीपा बसरूर आणि अमोल पालेकर हे कलाकार त्या नाटकात होते. अमरीश पुरी ह्या कलाकाराची भूमिका मला 'अप्रतिम नाट्याभिनय' म्हणून आजही आठवते. अमोल पालेकर यांचे बादल सरकार यांच्या 'पगला घोडा' तील काम मला आजही आठवते. १९७०चा तो प्रयोग उल्लेखनीय होता. अमोल पालेकर नंतर दिग्दर्शक म्हणून नावाजला तो मोहन राकेश आणि बादल सरकार यांच्या नाटकांच्या मुळे. १९७६मध्ये अमोल पालेकर यांनी दिग्दर्शित केलेले उल्लेखनीय नाटक होतं महेश एलकुंचवार यांचे 'पार्टी' हे नाटक. महेश एलकुंचवार हे माझे आवडते नाटककार. विजय तेंडुलकर ह्या ख्यातनाम नाटककाराची नंतर माझी छान ओळख झाली. पार्ल्याच्या माझ्या कार्यालयात ते अनेकदा आले. मी ही त्यांच्या घरी गेलो आणि त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या. नागपूरला मी गेलो होतो तेंव्हा महेश एलकुंचवार यांना मुद्दाम भेटलो होतो. त्यांच्याशी गप्पा मारल्या होत्या. चि त्र्यं खानोलकर यांचे 'अवध्य' हे सुंदर नाटक. पण आरती प्रभूंच्या हळूवार कविता मला अधिक आवडत असत. तेजपाल मध्ये 'अवध्य'च्या प्रयोगाला त्यांना जवळून बघितलं. छबिलदास मध्ये त्यांना काही वेळा बघितल्याचे आठवते.
डॉ. लागू यांची प्रमुख भूमिका असलेलं  'काचेचा चंद्र' हे नाटक शिवाजी मंदिर मध्ये बघितल़ेलं आठवतं. व्यावसायिक रंगभूमीवर गाजलेलं ते प्रायोगिक वळणाचं नाटक.
अमोल पालेकर हा नट, दिग्दर्शक म्हणून गाजत होता तो प्रायोगिक रंगभूमीवर. तेंडुलकर, खानोलकर, गिरीश कर्नाड, सई परांजपे हे नाटककार, डॉ लागू, अरविंद आणि सुलभा देशपांडे, दीना पाठक, तरला मेहता, पर्ल पदमसी या कलाकारांच्या सहवासात तो समांतर चळवळीत पुढे आला आणि चमकला. ,'ऐवज' मध्ये त्याने ह्या सर्वांच्या बद्दल खूप मनमोकळेपणाने लिहिले आहे.
रंगभूमीवर काम करणारा अमोल पालेकर रुपेरी पडद्यावर गाजू लागला तो त्याच्या साध्या दिसण्यामुळे. 'बॉय नेक्स्ट डोअर' असणारा हा साधा, लोभस, अडखळणारा मुलगा चित्रपट जगतात गाजू लागला. १९७८-७९ मध्ये त्यांचे रजनीगंधा, छोटीसी बात, चित्तचोर हे चित्रपट हिट झाले. १९९०मध्ये संध्या गोखले ही चुणचुणीत मुलगी त्याच्या आयुष्यात आली. वकीली करणारी ही मुलगी त्याच्या आयुष्यात आली. त्यावेळी तो चित्रपट दिग्दर्शित करीत होता. 'कैरी' ची कथा तिला आवडली होती. तो दिग्दर्शक झाला तेंव्हा तिने त्याला एक वकीली सल्ला दिला होता तो असा.' दिग्दर्शक म्हणून काम स्वीकारताना एकतर्फी अटी मान्य करू नका'. अमोल पालेकर तिच्यात भावनिक गूंतत गेला आणि एक दिवस संध्याने चित्राची जागा घेतली. हे 'ऐवज' मध्ये त्याने विस्ताराने लिहिले आहे. 
चंद्रकांत कुलकर्णी यांनी त्यांच्या पुस्तकात फार छान लिहिले आहे. नाटककार आकृती देतो, दिग्दर्शक प्रकृती देतो, नट कृती देतो, तंत्रज्ञ अलंकृती देतो, तेंव्हा प्रेक्षक स्वीकृती देतो. अमोल पालेकर हा एक यशस्वी नट आणि दिग्दर्शक. त्याला प्रेक्षकांनी स्वीकृती तर दिली. 'आक्रीत'  त्याने दिग्दर्शित केला. तो यशस्वी झाला. त्याची पटकथा लिहिली होती विजय तेंडुलकर यांनी . मानवत खून खटल्यावर अमोल पालेकर यांनी चित्रपट काढला. ती पटकथा लिहिली होती  तेंडुलकर यांनी. दुबे यांच्यामुळेच अमोल पालेकर पुढे आला. दुबे मुळेच त्याची ओळख झाली मराठी नाटककार तेंडुलकर, खानोलकर आणि चेतन दातार यांच्याशी. अमरीश पुरी हा कलाकार शोधून काढला होता तो दुबेनीच. अमोल पालेकरला नट बनविले ते सत्यदेव दुबे हयानीच. 'Boy next door',असलेला अमोल पालेकर मधील नट शोधला तो दुबेंनीच. सत्यदेव दुबे जेव्हा अंथरुणावर खिळून पडले होते तेंव्हा त्यांना भेटायला अमोल पालेकर गेला होता, तेंव्हा तो त्यांना  म्हणाला, 'मी तुझ्या ऋणातून मुक्त होऊ शकणार नाही दुबे' .
अशा अमोल पालेकर यांचे आत्मचरित्रात्मक असलेलं 'ऐवज' हे पुस्तक वाचनीय तर आहेच. ते मराठी प्रायोगिक रंगभूमी व चित्रपट याचा इतिहास आहे. या पुस्तकाचे कुशल संपादन झाले असते व पुस्तकाची पृष्ठसंख्या कमी झाली असती तर ते अधिक वाचनीय झाले असते, असे मला वाटते. मी एकाच बैठकीत ते वाचू शकलो नाही. मला हे पुस्तक वाचायला ८-१० दिवस लागले.  

*****