Wednesday, April 9, 2014

राम आणि डॉ. राम मनोहर लोहिया

काल बँकेत गेलो होतो. बँक बंद होती. मग लक्षात आले की रामनवमीची सुट्टी होती. मी देवदेव करणारा माणूस नाही. तसा सश्रद्ध. नियमितपणे देवळात जातो असेही नाही. देवळे मात्र पहात असतो. रामनवमीमुळे रामाची आठवण झाली. राम , रामनवमी, अयोद्ध्या, रामजन्मभूमी, गीतरामायण. हे गीतरामायण लोकप्रिय कशामुळे झाले ? गदिमाच्या महाकाव्यामुळे , सुधीर फडके ह्यांच्या गाण्यामुळे की प्रभू रामचंद्राच्या भक्तीमुळे ? राम आणि कृष्ण ही भारतीयांनी पडलेली सुंदर स्वप्ने आहेत असे म्हणतात. ते खरेच आहे. आणि मला आठवला तो डॉ.राम मनोहर लोहिया ह्यांचा रामावर लिहिलेला सुंदर लेख.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी रामायणासंबंधात केलेल्या लिखाणाबाबत त्यावेळी म्हणजे १९८८ मध्ये बरेच वादळ माजले होते. डॉ.राम मनोहर लोहिया हे तर वादळी व्यक्तिमत्वच. पण रामाविषयी त्यांची भूमिका अगदी वेगळी होती. त्यांच्या विचारांचा हा सारांश असलेला माझा लेख “महाराष्ट्र टाइम्स” (मैफल, रविवार १४ फेब्रुवारी १९८८) मध्ये प्रसिद्ध झाला होता. आजही त्यातील मुद्दे समजून घेण्यासारखे आहेत. तोच लेख ह्या ब्लॉगमध्ये देत आहे. भारतीयांचा "राम" समजून घेण्यास मदत होईल.

माझा तो लेख 
 गेल्या काही दिवसापासून डॉ आंबेडकरांच्या ‘रामायणा’वरील लिखाणाबद्दल वादळ माजले आहे. अतिशय टोकाच्या भूमिका घेऊन लढाई लादली जात आहे.
     हा वाद जेव्हा सुरु झाला तेव्हा माझ्यासमोर एक पुस्तक दिसत होते. डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या लेखाचे मराठीमध्ये अनुवादित झालेले प्रेस्टीज प्रकाशनचे ‘ललित लेणी’ हे ते पुस्तक. या पुस्तकाचे मी अनेक वेळा वाचन केले आहे.डॉ.राम मनोहर लोहिया यांचे व्यक्तिमत्व या लेखातून प्रकट होते.
     ह्या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे पद्मश्री पु.ल.देशपांडे यांनी.त्यांनी डॉ.राम मनोहर लोहियांचे व्यक्तिचित्रण फार सुरेख केले आहे यात वाद नाही.
केवळ आठवणीदाखल
या पुस्तकात डॉ. लोहियांचा लेख आहे ‘राम ,कृष्ण आणि शिव’. बहुधा सर्वच समाजवाद्यांनी लोहियांच्या साहित्याची पारायणे केली असतील ; या लेखाचे वाचन केले असेल. एक स्मरण म्हणून मी या लेखाची आठवण करून देऊ इच्छितो.
     आंबेडकर भक्तांनीही या लेखाचे वाचन करावे असे सांगावेसे वाटते. डॉ.राम मनोहर लोहिया हे जहाल विचारसरणीचे प्रखर व्यक्तिमत्व होते. डॉ. आंबेडकरापेक्षा अधिक त्वेषाने आणि संतापाने विचार मांडणारे ते पुढारी होते. जनमानसामध्ये वर्तमानपत्रांनी त्यांची प्रतिमा डागाळलेली वाटावी अशीच केली होती.या जगात सत्याची कास धरून समर्थपणे जगायचे असेल तर एकट्याने जगण्याची तयारी हवी.डॉ.लोहिया हे असे एकटे निघालेले संन्यासी होते, अशी प्रस्तावना करून पु.ल.नी प्रस्तावना लिहिली आहे.

दृष्टिकोनाचे सार

डॉ. राम मनोहर लोहिया यांचा ‘राम,कृष्ण आणि शिव’ हा लेख सर्वांनी अवश्य वाचावा. या लेखाचा शेवट असा आहे ......
“ हे भारतमाते , आम्हाला शिवाची बुद्धी दे ; कृष्णाचे हृदय दे आणि रामाचा एकवचनीपणा व कर्मशक्ती दे.असीमित बुद्धी ,उन्मुक्त हृदय आणि मर्यादायुक्त जीवन यांनी आमचे सृजन कर “
मला वाटते , डॉ राम मनोहर लोहिया यांचा रामायण-महाभारताकडे बघण्याचा दृष्टीकोन ह्यावर दिलेल्या सारामध्ये आहे.
महान परिपूर्ण स्वप्ने
डॉ. राम मनोहर लोहिया म्हणतात .....
राम-कृष्ण-शिव ही हिंदुस्तानची महान आणि परिपूर्ण स्वप्ने आहेत: उदात्त गांभीर्याची प्रतीके आहेत. ती आपापल्या मार्गाने जात आहेत. राम हा मर्यादित जीवनाचा परमोत्कर्ष आहे. तर कृष्ण उन्मुक्त जीवनाची सिद्धी आहे आणि शिव असीमित व्यक्तिमत्वाची संपूर्णता आहे. यापैकी कोण पूर्ण किंवा अपूर्ण असा प्रश्न उपस्थित होत नाही. कारण पूर्णतेचे परिमाण काय ? परीपूर्णतेचे प्रकारभेद  असू शकतात,वर्गभेद असू शकतात.
लोहिया लिहितात ....
“राम-कृष्णाच्या कथा रम्य आहेत. मन विशाल बनविणाऱ्या आहेत. त्या खऱ्या आहेत किंवा खोट्या आहेत याच्याशी मला काही कर्तव्य नाही. तो नीलकंठ शिव , तो मर्यादापुरुषोत्तम राम व तो योगेश्वर कृष्ण ! त्या प्रत्येकाच्या कथा काळीज मोठ्या करणाऱ्या आहेत.”
याउलट डॉ.आंबेडकरानी ह्या व्यक्तींचे चित्रण केले आहे. म्हणूनच आंबेडकरांचा विचार मानणाऱ्या व्यक्तींनी पुन्हा विचार करण्यास शिकले पाहिजे.

शेकडो वर्षे प्रभाव
लोहियांच्या लेखाची सुरुवात अशी होते ......
“ राम ,कृष्ण आणि शिव यांनी कोट्यावधी भारतीयांच्या मनावर शेकडो वर्षे जबरदस्त प्रभाव पाडला आहे ही वस्तुस्थिती आहे. या तिघाइतक्या ,जनमानसावर प्रभुत्व गाजविलेल्या अन्य व्यक्ती हिंदुस्तानच्या इतिहासात सापडणार नाही. गौतम बुद्ध , अशोक , अकबर या व्यक्तींची नावे माहीत असणारे लोक फारतर शंभरात पंचवीस असतील. ह्या व्यक्तीसंबंधीच्या कथा-कहाण्या माहीत असणारे तर त्याहूनही कमी म्हणजे हजारात फारतर एक-दोनच असतील; पण पुराणकाळातील राम ,कृष्ण आणि शिव केवळ नावेच नव्हे तर त्यांच्या शेकडो कथा सर्वाना माहीत असतात.”
डॉ. लोहिया यांनी समाजशास्त्रीय विचार केला . तसा आंबेडकरानी करावयास हवा होता.
लोहिया लिहितात – “ राम , कृष्ण आणि शिव यांची नावे धर्माशी जोडलेली आहेत म्हणून काही त्या व्यक्ती लोकप्रिय झाल्या नाहीत , मानवी जीवनातील आदर्श म्हणून या त्रिमूर्तीकडे भारतीय जनता पाहत आली आहे. जीवनातील प्रत्येक व्यवहाराच्या प्रसंगी या तीन व्यक्तीची जीवने आदर्श म्हणून जनतेसमोर उभी असतात व कळत-नकळत लोक या आदर्शाचे अनुकरण करीत असतात. विचारपूर्वक मानलेल्या आदर्शापेक्षा अशा प्रकारचे नकळत स्वीकारलेले आदर्शच अधिक प्रभावी असतात.’  

मतभेद ध्यानी घ्या
मला वाटते , डॉ. आंबेडकर आणि डॉ. लोहिया ह्यांच्या दृष्टिकोनातील हा मतभेद लक्षात घेण्यासारखा आहे. डॉ. आंबेडकराना जर ‘राम’ हा आदर्श वाटत नसेल तर त्यांच्या आदर्शाच्या व्याख्या तपासून बघावयास हव्यात. डॉ.आंबेडकर जर दलितांना आपले आदर्श वाटत असतील आणि त्यांचे विरुद्ध बोललेले जर त्यांना आवडत नसेल , तर कोट्यावधी भारतीयांना परमप्रिय असलेले राम आणि कृष्ण ह्यांच्यासंबंधी वाईट लिहिलेले आवडणार नाही हे दलितांनीही लक्षात घेतले पाहिजे. मनुस्मृतीची होळी करणारे आंबेडकर हिंदू समाजाने समजून घेतले; पण रामावर लिहिणारे आंबेडकरांचे विचार बहुसंख्य हिंदू समाज मान्य करणे कठीण आहे.
डॉ. लोहियांच्या मते .....
“ राम-कृष्णाच्या कथा-कहाण्यात  देशातील हास्य आणि स्वप्ने कोरलेली असतात. हास्य आणि स्वप्ने या पेक्षा श्रेष्ठ अशी दुसरी कोणतीही गोष्ट नाही. राष्ट्र हसते तेव्हा ते प्रसन्न , समाधानी असल्याचे प्रतीक असते.त्यावेळी त्याचे काळीजही विशाल असते.राष्ट्र स्वप्न पाहत असते तेव्हा ते आपल्या आदर्शामध्ये रंग भरून कथा गुंफित असते.”
     म्हणून रामकथा ही भारतीयांची स्वप्नगाथा आहे. डॉ.आंबेडकरांचा लेख हा भारतीयांचा स्वप्नभंग करतो.
     श्रेष्ठ पुराणकथा म्हणजे महाकाव्य. रामायण आणि महाभारत ही महाकाव्ये आहेत. सामान्य भारतीयांची समर्थ सांस्कृतीक शक्तीकेंद्रे म्हणजे पुराणकथा.
भारतीय स्वप्नांचे द्योतक
राम.कृष्ण आणि शिव या महान व्यक्ती काही एका दिवसात घडलेल्या नाहीत. हजारो वर्षे हिंदी माणसे त्या व्यक्तींच्या काल्पनिक मूर्ती घडवीत आली आहेत. सामान्यपणे आपण जसे समजतो की , राम ,कृष्ण आणि शिव यांनी हिंदुस्तान बनविला आहे . एका मर्यादेपुरते हे खरे आहे. गंमत बघा, डॉ.आंबेडकरांचे नाव – डॉ. भीमराव रामजी आंबेडकर – त्यांनी ‘राम’ ह्या नावाचा त्याग केला नाही. डॉ. लोहिया यांच्या नावातही ‘राम’ आहे. दोघांच्या आई-वडिलांनी व पूर्वजांनी ‘राम’या नावात ‘स्वप्न’ बघितले. ते भारतीय ‘स्वप्न’ होते.
डॉ. लोहिया लिहितात ....
राम व कृष्ण ही विष्णूची रूपे आहेत , तर शिव हे महेशाचे. भारतीयांच्या कल्पनेप्रमाणे राम व कृष्ण हे , जे जे चांगले व मंगल आहे त्याच्या रक्षणाचे व पोषणाचे प्रतीक आहे , तर शिव हे वाईटाच्या व अमंगलाच्या विनाशाचे , संहाराचे चिन्ह आहे. हास्य व स्वप्ने अर्थशून्यच असतात; परंतु तरीदेखील माणसाच्या मनावर त्यांचा केवढा प्रभाव असतो ! त्याने माणसाचे अंत:करण विशाल बनते.
सामान्यांना न रुचणारा
डॉ. आंबेडकरांचा लेख सामान्य भारतीयांना रुचणारा नाही. अरुण कांबळे आणि इतर दलित पुढार्यांना डॉ. आंबेडकर हे दैवतासारखे आहेत व त्यानाही डॉ. आंबेडकरांच्या विरुद्ध जर काही लिहिले तर ते रुचण्यासारखे नाही.
डॉ.लोहिया सांगतात ......
“भागवतातील कथा वेधक आहेत. सीता हरवल्यानंतर रामाला अत्यंत दु:ख झाले. जरा प्रमाणाबाहेर अधिक दु:ख झाले. प्रमाणात झाले असते तर समजण्याजोगे होते. त्याप्रसंगी लक्ष्मण सारे पाहत होता. रामाने उघडपणे अश्रू ढाळावे व वृक्षाशी बोलावे हे जरा विचित्र वाटते. राम एकांतात रडला असता तर ती गोष्ट वेगळी होती; पण लक्ष्मणाच्या देखत झाडांशी बोलणे आणि रडणे जरा अधिकच वाटते.....
कोणाला माहीत? कदाचित वाल्मिकी व तुलसीदास यांना रामाच्या कृतीद्वारे त्याचे थोरपण दाखवायचे असेल. वाल्मिकी व तुलसीदास ह्यांच्यात दोन ध्रुवाइतके अंतर आहे. गेल्या तीन चार हजार वर्षात सीतेचे व्यक्तिमत्व आपल्या साहित्यात बदलत गेले आहे ......”
डॉ.आंबेडकरांच्या लेखात त्यांनी रामाला गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. आंबेडकराना वाल्मिकीचा राम – महाकाव्यातील राम – समजलाच नाही असे म्हणावे लागेल.
डॉ लोहिया लिहितात –
“ राम म्हणजे मर्यादित व्यक्तिमत्व पूर्णत्वास पोचल्याचे प्रतीक आहे. नियोजन ,व्यवस्था व बाह्याचारावर  कायदेकानुनचे बंधन आणि अंतर्राचारावर स्वविवेक बुद्धीचे नियंत्रण याचे राम प्रतीक आहे. त्याच्या व्यक्तिमत्वाचे , ही उभय नियंत्रणे हे व्यवच्छेदक लक्षण आहे. राम हा उत्कृष्ट श्रोता होता. थोर माणसाने असेच असले पाहिजे. रामाला मौनातील जादू माहीत होती. रामाचे व्यक्तिमत्व म्हणजे दुसर्याला आपल्यात सामावून घेण्यापेक्षा आपल्या मर्यादित व संयत व्यक्तिमत्वाची दुसर्यावर छाप पाडण्याची आणि विस्तारापेक्षा ऐक्यावर भर देणारी महान कथा आहे .....’

डॉ लोहियांच हे विचार व डॉ आंबेडकरांचे विचार यात मोठे अंतर आहे. लोहियांच्या मते –
“ मर्यादापुरुषोत्तम राम म्हणजे एक अदभूत राजकीय व्यक्तिमत्व होते. रामराज्यातील कायदे व नियम यांचा आदर करण्याच्या हेतूने त्याने सीतेचा त्याग केला – अर्थात कायद्याच्या , नीतीबंधनाच्या मर्यादा सांभाळण्याचा आणखीही एक मार्ग त्याला उपलब्ध होता. राज्यत्याग करून सीतेसह पुन: वनवास पत्करावयाचा ; परंतु पुराणातील काय किंवा इतिहासातील घटनाविषयी काय , अशी जर – तरची भाषा निरर्थक होय. अनिर्बंध व असयंत वर्तणुकीपेक्षा मर्यादांचे बंधन पाळणारे वर्तन हे नेतृत्वाच्या दृष्टीने कधीही श्रेष्ठ होय .”
विचारपूर्वकता हवी होती
याउलट घटनाकार आंबेडकर रामाला दोषी ठरवितात. आंबेडकरानी अधिक विचारपूर्वक लेखाची मांडणी करावयास हवी होती व त्याला तर्काचा आधार द्यावयास हवा होता ! देव बनविण्याचा सतत प्रयत्न करणारा माणूस म्हणजे त्रेता युगातला राम होय आणि त्यामुळेच त्याच्यात आकाशस्थ देवांचा काहीसा अधिक अंश आहे म्हणून रामाची देवळे झाली.
रामाने माणसासारखे प्रेम केले. राम हा मर्यादापूर्ण अवतार होता. आपल्या शक्तीवरील मर्यादांचे त्याने कधी उल्लंघन केले नाही.
गांधीजींचा आदर्श
डॉ लोहिया पुढे लिहितात –
‘आजकालच्या थोर व्यक्तीकडे पाहूनदेखील राम-कृष्णाची आठवण आपणास होत असेल. तशा कोणी व्यक्ती आज दिसत नसतील , तर भावी काळात दिसतील. गांधीजींच्या मृत्युनंतर एकदा एक मित्र लोहियाना म्हणाला – ‘ साबरमती किंवा काठेवाडातील नद्यांच्या पुत्राचे यमुनेच्या किनारी दहन झाले आणि यमुनेच्या बालकाचे काठेवाडमधील नदीच्या किनारी दहन झाले .....’
या दोन्ही प्रसंगाच्या काळात हजारो वर्षाचे अंतर आहे. काठेवाड नदीचा पुत्र व यमुनेचा पुत्र ह्या दोहोंमध्ये साम्य नसेलही. काहीं वर्षापर्यंत माझ्याही हे लक्षात आले नव्हते. कारण गांधीजीनी निरंतर रामालाच पूजिले. मृत्युसमयीही ‘ हे राम' च म्हंटले. गांधीजीना  हिंदुस्तानपुढे महानतेचे एक सीमित चित्र ठेवायचे होते म्हणून त्यांनी मर्यादापुरुषोत्तमाचा आदर्श ठेवला. मर्यादापुरुषोत्तम राम म्हणजे स्वतःवर नीती ,धर्म , व्यवहाराचे बंधन घालून देणारी शक्ती होय !
    
रामाच्या लोकप्रियतेसंबंधी लिहिताना डॉ. लोहिया म्हणतात – “ राम हा मधुर ,शांत व सुसंकृत अशा त्रेतायुगाचा देव आहे. बिचाऱ्या कृष्णाने इतके निस्वार्थ परिश्रम केले , पण जनमानसात रामच वरचढ ठरला. म्हणजे साऱ्या हिंदुस्तानात दक्षिणेतील काही भाग सोडल्यास ‘राम नाम सत्य है’ म्हणतच प्रेत यात्रा काढतात. भारतात ‘जय रामजी’ म्हणून नमस्कार करतात . रस्त्यावरून जाणाऱ्या अपरिचित लोकांनादेखील ‘जय राम’ मोठे गोड वाटते”             

*****
     

    


Sunday, April 6, 2014

वैज्ञानिक आणि कलावंताचे अंतरंग


विज्ञान आणि कला : काही भेद – काही साम्य

क्वचित आढळून येणारे परिपूर्ण सौंदर्य, हे डोळे दिपविणारे ,आश्चर्यचकित करणारे व घायाळ करणारे असते. ह्या सौंदर्याला एक अदृश्य अशी अपूर्व शक्ती असते.
विज्ञान ही तसेच आहे .......
क्वचित आढळून येणाऱ्या
परिपूर्ण सौंदर्यासारखे
आश्चर्यचकित करणारे .....
डोळे दिपविणारे ......
अदृश्य – अपूर्व .... शक्तीसारखे .
    एक सुंदर पुस्तक किंवा एखादी अप्रतिम कलाकृती एखाद्या व्यक्तीच्या जीवनाचा कसा काय कायापालट करू शकते , त्याची जीवन दृष्टी कशी बदलून टाकते , त्याचे बोलणे , त्याचे हसणे ,त्याचे हाव-भाव , त्याचे भावनाविश्व , त्याची जीवनदृष्टी – सारे काही बदलून जाते. इतकी परिणामकारकता कशामुळे निर्माण होते? मानवाच्या प्रतिभेमध्ये हळूहळू होणारे बदल कसे होतात , हे सांगणे खरोखर कठीण आहे. अशी परिणामकारक  अप्रतिम अशी कलाकृती ( साहित्य , शिल्प , चित्र ....इत्यादी ) जेव्हा बघावयास मिळते तेव्हा आपणास कलेचे श्रेष्ठत्व जाणवते, आणि ज्या वेळेस कलेचे श्रेष्ठत्व जाणवते, तेव्हाच विज्ञानाच्या मर्यादा लक्षात येतात.
Picasso

    सतारीचे बोल आपणांस मंत्रमुग्ध करतात. परंतु मंत्रमुग्ध करणाऱ्या या सतारीच्या ध्वनीचेही ‘विज्ञान’ आहे. ध्वनि-विज्ञान सतारीसंबंधी सर्व काही सांगू शकते. पदार्थविज्ञान शास्त्रज्ञाने समजावून सांगितलेले ध्वनिविज्ञानातील सिद्धांत एक वेळ समजून घेणे सहज शक्य आहे , परंतु एखादा कलावंत जेव्हा त्या सतारीच्या तारा झंकारून जो नादब्रम्ह निर्माण करतो आणि एक प्रकारची ‘गानसमाधी”लागते ती अनाकलनीय आहे. आणि कलेचे गूढ त्यात आहे. इथेच कलेचे श्रेष्ठत्व जाणवते.मग ती कलाकृती कोणतीही असू शकते. एखादे सुंदर पुस्तक , एखादी चित्ररेखाकृती किंवा एखादे शिल्प सौंदर्य . ह्या साऱ्याच कलाकृती मंत्रमुग्ध करणाऱ्या असू शकतात. परंतु इथेही हे लक्षात ठेवावयास हवे की , एखाद्या सौंदर्याचा आस्वाद घेणे तितकेसे सोपे नाही. जेव्हा सौंदर्यासंबंधी चिकित्सा करणारा एखादा टीकालेख किंवा सौंदर्य समीक्षेचे जाडेजुडे पुस्तक , एखाद्या कलाकृतीच्या सौंदर्याचे बारकाईने स्पष्टीकरण करून ‘सौंदर्यस्वाद-रस’ निर्माण करण्याचा प्रयत्न करते तेव्हा सुद्धा कलेचा आस्वाद जाणून घेणे कठीण आहे. 
Picasso - Paul-Frank Paintings
केव्हा केव्हा कलाकृतीमधील सौंदर्य पाहिल्याबरोबर लगेच जाणवते असेही नाही. तर कधी कधी एखाद्या कलाकृतीचे सौंदर्य जाणून घेण्यासाठी फार परिश्रम घ्यावे लागतात. याची प्रचीती बघावयाची असेल तर अजिंठा- वेरूळच्या लेण्या पुनः पुन्हा बघा. नित्य नवे सौंदर्य जाणवेल. रामायण- महाभारत हे ग्रंथ तर अनेकांच्या सौंदर्यचिंतनाचे विषय होऊन बसले आहेत. कालिदासाचे शाकुंतल अजूनही अनेकांना मोहित करते आहे.जर्मन ( आणि आता रशियन) लोकही ह्या साहित्यकृतीवर प्रभावित होताना दिसतात.
     इथेच कलेचे वेगळेपण जाणवते. जाणवावयास हवे. कलेचे हे सौंदर्य आणि श्रेष्ठत्व विज्ञानाला हिरावून घेता येणे शक्य नाही, ते यामुळेच.
     कोणत्याही व्यक्तीला , त्याला जर खरोखर आवड असेल, जाणून घेण्याची इच्छा असेल, विज्ञानाची ओढ असेल , तर अणुभट्टीची रचना समजून घेणे फारसे अवघड नाही. विज्ञान हे समजून घेता येऊ शकते. पण त्याउलट एखाद्या सुंदर कलाकृतीच्या सौंदर्याचा आस्वाद घेताना मिळणाऱ्या आनंदाचे वर्णन करणे अवघड आहे. ते कसे करणार? तो सौन्दर्यानंद अनुभवावा लागतो. संगीताच्या मैफलीचा आनंद उपभोगावा लागतो. तो सांगता येऊ शकत नाही. सांगून समजू शकत नाही. हेच कलेचे वैशिष्ट्य आहे.

Newton and Prism
Poetry in Science 

     त्याउलट विज्ञानाची श्रेष्ठता त्याच्या विश्वसमावेशकतेमध्ये ( Universality) आहे. विज्ञानाचे नियम व्यक्ति-व्यक्तीवर अवलंबून नसतात. विज्ञानातील नियम किंवा सिद्धांत हे प्रयोगसिद्ध सत्य असते. विज्ञानातील सिद्धांताना सामुहिक प्रयोगसिद्ध ‘सत्यता’ असते. हे प्रयोगसिध्द सत्यतेचे प्रमुख अंग असते. विज्ञान हे कोणत्याही व्यक्तीच्या मर्जीवर , त्याच्या वयावर , त्याच्या देशावर किंवा त्याच्या मानसिक अवस्थेवर अवलंबून नसते. याउलट कला किंवा कलावंताची श्रेष्ठ कलाकृती ही व्यक्तीसापेक्ष असते. कलेची परिणामकारकता ही अनेक गोष्टीवर अवलंबून असते. कलेचा स्वाद घेणाऱ्या व्यक्तीच्या मानसिक अवस्थेवर , त्या व्यक्तीच्या पूर्व अनुभवावर , त्याच्या सांपत्तिक स्थितीशी संबंधित ,त्याच्या वैयक्तिक मूडवर , त्याच्या बघण्याच्या दृष्टिकोनावर , स्पर्शावर ,...... सारांश त्याच्या स्वतःच्या ‘जाणीवेवर’ हे सारे अवलंबून असते. कलेचा आस्वाद वैयक्तिक ‘रसिक’तेशी संबंधित असतो. विज्ञानाच्या सिद्धांताना ह्या मर्यादा नसतात. न्युटनचे गतीविषयक सिद्धांत हे विश्वसमावेशक ( Universal ) सत्य आहे. विज्ञानाचे श्रेष्ठत्व इथे आहे.
How Newton planed his experiment on prism.
ART OF SCIENTIFIC INVESTIGATION 

      कोणत्याही शास्त्रज्ञाने समोर ठेवलेला सिद्धांत प्रयोगाच्या साह्याने सिद्ध करता येतो तेव्हा ते विश्वसमावेशक सत्य मान्यता पावते. शोध प्रक्रियेतील ‘प्रयोगसिद्ध सत्यता’ हा एक अत्युच्च क्षण असतो. कोणताही शास्त्रीय शोध लागल्यानंतर तो पुनः पुन्हा प्रयोगाच्या रूपाने सिद्ध होणे आवश्यक असते. रीपिटीशन ( पुनरनिर्मिती) हे शास्त्रीय शोधात आवश्यक असते. तर याउलट पुनर्रावृत्ती हा कलेचा मृत्यू ठरतो. त्यामुळे कलावंताला प्रत्येक कलाप्रयोगाच्या वेळी काही तरी नाविन्य प्रदर्शित करावे लागते.
      विज्ञान हे ‘सत्य’ सिद्ध करण्यासाठी ‘प्रयोग’क्षम असते. गुढतेचे विवेचन करते. कला इंटरप्रीट करण्याचा प्रयत्न करते. तर्कसंगततेचा ( Logical Reasoning ) आधार कलेला आवश्यक असतो. तर विज्ञानाला तर्कसुसंगत आधार ( Logical Proof )आवश्यक असतो.
Einstein
Creator : Image-Concept-Formula

विज्ञान हे सिद्धान्तासंबंधी विवेचन करणारे असते. एखादा सिद्धांत चांगला किंवा वाईट , सत्य किंवा असत्य , हे स्पष्टपणे विषद करून सांगणे हे विज्ञानाला सहज शक्य असते. कलेच्या बाबतीत असे नसते. कलाकृती भावानिकतेशी संबंधित असते. भावनिकता ( Involvement ) ही कलेची गरज आहे. विज्ञानामध्ये भावनिकतेला थारा नसतो.
      हे जरी खरे असले तरी एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे ती ही की ,निरनिराळ्या प्रायोगिक सत्यसिध्द माहितीच्या आधारावर रचलेला शास्त्रीय सिद्धांत आणि अनेक दिवसाच्या चिंतनातून निर्माण झालेली सुंदर कलाकृती ह्यामध्ये तसा फारसा फरक नाही. विलक्षण साम्य आहे. बारीक भेद आहे. हे साम्य व भेद जाणून घेणे आवश्यक आहे.
POETRY OF THOUGHT 

      विज्ञानाचे नियम कधीच घाईघाईने मिळवलेल्या माहितीच्या आधारावर रचलेले नसतात. अनेक दिवसाच्या परिश्रमाने मिळवलेले प्रयोगसिद्ध ज्ञान हा एक महत्वाचा आधार असतो. विज्ञानामध्ये एखाद्या सिद्धांताचा अभ्यास वर्षानुवर्षे चालू असतो, कधी कधी तर एखादा सिद्धांत हा पिढ्यानपिढ्या अभ्यासाचा विषय बनतो.याचे प्रमुख कारण म्हणजे विज्ञानाची पद्धती ( Scientific Method) . विज्ञानपद्धती ही कलेच्या अविष्कारासारखी नसते. कलेचा चमत्कार आणि विज्ञानाचा चमंत्कार हे परस्पर विरोधी असतात.
       होमरचे काव्य आजही आपणास प्रभावित करते. कारण ह्या कलाकृतीचे वैशिष्ट्य असे आहे की 'Involvement' ची प्रक्रिया लगेच सुरु होते. मानवी मन हेलावून सोडणारी कलाकृती म्हणूनच ‘अमर’ कलाकृती ठरते.
       विज्ञानामध्ये कालचे ‘ज्ञान’ आजचे ‘अज्ञान’ ठरते. तीस-चाळीस वर्षापूर्वी लिहिलेले पदार्थविज्ञानशास्त्राचे पुस्तक आज वाचणे किंवा अभ्यासणे शक्य नाही. कारण त्या पुस्तकातील विज्ञान-विचार आज टाकाऊ झालेले असतात. विज्ञानातील शोध किती जुना आहे हे फारसे उपयोगाचे नाही. तर तो आज किती बदलला आहे ,उपयुक्त आहे , यावर त्या शोधाची श्रेष्ठता ठरु शकते. उदाहरणार्थ, पूर्वीचा रामन इफेक्ट समजून घेऊन नुसते भागणार नाही . तर आजचा लेझर-रामन इफेक्ट समजून घेणे आवश्यक होऊन बसले आहे. न्युटनचा गति विषयक सिद्धांत मात्र आजही बदललेला नाही. ही ह्या शोधाची श्रेष्ठता.
       अशा प्रकारे विज्ञान आणि कला ह्यातील भेद शोधण्याचा बारकाईने प्रयत्न केला तर आपणास अनेक भेद आणि बारकावे सहजपणे जाणवू शकतील. हा एक नं संपणारा प्रचंड विषय आहे.फक्त एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवणे आवश्यक आहे की कला आणि विज्ञान यांचा मूळ उद्देश असतो ‘ज्ञानसाधना’ . अर्थात मार्ग भिन्न असतात. पद्धती वेगळ्या असतात. Approach निराळा असतो. कलावंत आणि वैज्ञानिक दोघेही विश्वाचा आणि मानवी मनाचा वेध घेण्याचा प्रयत्न करताना दिसतात. तसे पाहता ‘स्कील’ , ‘टेकनिक’ , ‘क्राफ्ट’ ,’आर्ट’, ‘ रिफाईनमेंट’, हे  सारे समानार्थी शब्द आहेत, हे लक्षात ठेवावयास हवे.
      अनेक शतकापासून कविवर्ग शोधतो आहे ‘विचारातील काव्य’ ( Poetry of Thought ).त्यांना नुसते ट ला ट, र ला री लावणारे काव्य अभिप्रेत नाही. नाद ,लय आणि अर्थ या त्रयींचा सूर जेथे लागतो तेथे काव्य जाणवते. याउलट वैज्ञानिकांचा प्रयत्न आहे की , ‘विज्ञानातील काव्यमय’तेची ( Poetry in Science ) जाणीव सर्वाना कशी करून देता येईल ? ‘मंगळा’चा किंवा ‘चंद्रा’चा शोध घेणारे शास्त्रज्ञ ‘विज्ञानकाव्या’चे जनक नव्हेत काय ? तेव्हा कला आणि विज्ञान ह्यातील भेद जाणून घेताना साम्यस्थळेही शोधली पाहिजेत.
      आज ‘कले’चेही ‘विज्ञान’ झाले आहे. उदारणार्थ नाट्यकलावंताला नाट्य ‘शास्त्रा’चा पद्धतशीर अभ्यास करणे आवश्यक होऊन बसले आहे.तेव्हा आज नाट्य-कलावंताला आवश्यक असलेले शास्त्र हे ‘नाट्य-विज्ञान’च नव्हे काय?
      त्याच प्रमाणे ‘विज्ञाना’चीही ‘कला’ झाली आहे. ‘Art of Scientific Investigation”. हा विचार आता पूर्णपणे मान्य झाला आहे. केवळ सूत्र ( Formula )आणि तर्कशास्त्राचा आधार घेणारा पदार्थवैज्ञानिक , त्यालाही कलेची समर्थकता आवश्यक वाटू लागली आहे.
      सुंदर कलेचा उगम विज्ञानाशिवाय शक्य नाही. त्याचप्रमाणे वैज्ञानिक सत्य सिद्ध करणे  कलेशिवाय शक्य नाही. Scientific Analysis of Art and Art of Scientific Investigation या दोन्ही विचारांची आवश्यकता आता सर्वांनाच मान्य होत आहे. अर्थात कलेला आणि विज्ञानाला स्वतःच्या अशा काही मर्यादा आहेत, हेही लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
      प्रयोगसिद्ध माहितीचे पृथक्करण करणारा आणि ‘कारणां’चा शोध घेणारा वैज्ञानिक आणि ‘प्रतिभा’वंत कलावंत किंवा कवी यांच्यामध्ये असणारा भेद समजून घेणे आवश्यक आहे.(असं नेहमीच म्हंटले जातं की विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्यामुळे आजच्या या आधुनिक युगात कला आणि कलेसंबंधीची ‘रसिकता’ लोप पावत चालली आहे , हळूहळू नष्ट होते आहे . तर याउलट कलेची जाणीव असलेले कलावंत विज्ञानाकडे डोळेझाक करताना दिसून येतात.हे बर्याच अंशी सत्य आहे)
Goethe - Painting
ART - CRAFT- SKILL-TECHNIQUE 
      
वैज्ञानिक आणि कवी किंवा कोणताही कलावंत हे निर्मिती करणारे ( Creative work ) निर्माते असतात. दोघेही निर्मितीच्या प्रक्रियेत गुंतलेले असतात, ( निर्मिती हा त्यांचा धंदा नसतो). विज्ञानातील किंवा कलाप्रांतातील ( Creative Work ) निर्मितीमध्ये तसा मूलतः फारसा भेद असू शकत नाही. नव्हे , तसा तो नाहीच. दोघेही एकाच प्रक्रियेत गुंतलेले असतात.
       कवीला निर्मितीपूर्वी अस्पष्टपणे काही वेदनांची-संवेदनांची जाणीव होते.ह्या त्याच्या स्वतःच्या वेदना आणि संवेदनांना तो जेव्हा काव्यरूप देण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याला अस्पष्ट अशी जी काव्यानुभूती जाणवते , तिला तो शब्दात व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला तो मनातल्यामनात काही तरी गुणगुणत असतो, झपाटलेला असतो, हे गुणगुणनेच नंतर शब्दरूपी साकार होते. त्याचप्रमाणे वैज्ञानिक त्याच्या प्रयोगसिद्ध माहितीच्या आधारावर काही संकल्पना तयार करण्याचा प्रयत्न करतो. तर्कशास्त्र, तर्कसुसंगत प्रयोगसिद्ध आधार , गणित शास्त्राचा उपयोग या सर्वांच्या आधारे तो संकल्पनेचे परिपूर्ण चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. तर्कशास्त्रीय विवेचन , सूत्रबद्ध विचार , प्रयोगसिद्ध सत्यता पडताळून पाहणे , या सर्वांचा एकत्रित (Integrated )विचार केल्यानंतर शास्त्रीय संकल्पना ( Concept ) साकार होते. तेव्हा ही सुद्धा Creative Process नव्हे काय?
      प्रतिमा , संकल्पना आणि सूत्र ( Image – Concept – Formula ) यांना एका साखळीमध्ये गोवणे , हे वैज्ञानिकाचे संकल्पना निर्मितीचे कार्य. अर्थात प्रत्येक वैज्ञानिकाची स्वतःची अशी स्वतंत्र शैली आणि पद्धती असते. शीघ्रता ( Rapidity ) ,सामर्थ्य , आकलन शक्ती आणि कल्पनाविलास हे प्रत्येक वैज्ञानिकाचे वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म. ही संकल्पना निर्मितीची प्रक्रिया इतर गोष्टीवरही अवलंबून असते. वैज्ञानिकाचा स्वतःचा अनुभव , त्याचा अंदाज ( Guess Work ) , त्याच्या चुका , त्याने संपादित केलेले विषयासंबंधीचे पूर्व ज्ञान ,त्याचे स्वतःचे भाषा वैभव , त्याची विचारपद्धती , त्याचा स्वतःचा विशिष्ट दृष्टीकोन आणि त्याची समरसता. या सर्वावर त्याच्या शोधसंकल्पनेची श्रेष्ठता अवलंबून असते. तेव्हा कवी /कलावंत आणि शास्त्रज्ञ ह्यांच्या नवनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये तसा मुलभूत असा फरक नाही. शास्त्रज्ञ हा कवीच असतो. कलावंत असतो. वेगळ्या पद्धतीचा अवलंब करून निर्मिती करणारा तो ‘वैज्ञानिक कलावंत’ असतो. निर्मिती मग ती कलेच्या क्षेत्रात असो किंवा विज्ञानाच्या क्षेत्रात असो – त्यात फारसा फरक असू शकत नाही. एखादे सुंदर संगमरवरी शिल्प , एखादी अप्रतिम कलाकृती ( साहित्यिक किंवा कला ) किंवा सूत्रमय प्रयोगसिद्ध सिद्धांत  - ह्या साऱ्यांची निर्मिती एकाच विशिष्ट्य पद्धतीने होत असते. ह्या ‘निर्मिती’चा आनंद सारखाच असतो. वेगळा कसा असू शकेल? प्रयोगाने सिद्ध झालेली शास्त्रीय संकल्पना आणि अमर अशी अप्रतिम कलाकृती ह्या दोन्ही सारख्याच असतात.त्यांच्या निर्मितीच्या आनंदाच्या ऊर्मी तशाच असतात. त्यात फरक असूच शकत नाही. म्हणूनच शास्त्रज्ञ आणि कलावंत दोघेही सारखेच.

( प्रसिद्ध रशियन लेखक एल. पोनोमारेव्ह ह्यांच्या “ In Quest of the Quantum” ह्या पुस्तकातील एका लेखावर आधारित )
I acknowledge with thanks for Images taken from "Google Images" available in public domain. 

पूर्व प्रसिद्धी : दै. मराठवाडा , ३० जानेवारी ,१९७७