Thursday, November 14, 2013

सरदार ,नेहरू आणि गांधी

Pandit Nehru , Gandhiji and Sardar Patel

मी जेंव्हा ह्या तीन उत्तुंग व्यक्तीमत्वांचा विचार करू लागतो तेंव्हा मला त्यांच्यातील “ माणूसपण “ अधिक मोहक वाटते. हे तिघेही भिन्न –भिन्न विचारांचे.  तिघांनीही देशासाठी योगदान दिले. तिघांचीही देशाला गरज होती. तिघांनीही आपापल्या परीने योग्य तेच केले. तिघांचाही दृष्टीकोन एखाद्या राजकीय – सामाजिक प्रश्नासंबंधी पूर्णपणे वेगळा होता. तिघेही एकमेकावर विलक्षण प्रेम करणारे होते. तिघांच्याही विचारात मतभेदांची वादळे होती. प्रत्येकजण आपल्या विचारांशी एकनिष्ठ होते.  एक मात्र खरे की गांधीजींच्या प्रेमाखातर नेहरू-सरदारांनी अनेकदा नमते घेतले.  गांधीजींच्या प्रभावामुळे जसे सरदार बदलले तसेच नेहरूही बदलले. भारतीय ह्या तिन्ही व्यक्तिमत्वावर संमोहित ( Hypnotised ) होते . त्यांच्यातील परस्पर विरोधी व्यक्तिमत्वाचे कंगोरे शोधताना आपणास थोडासा त्रास होतो.

नेहृरुना गांधीजींचे सर्वच विचार मान्य नव्हते. त्यांची आधुनिकतेकडे झुकलेली विचारसरणी गांधीजींच्या विचारसरणीपेक्षा वेगळी होती. ते गांधीजींच्या अगदी जवळचे असले तरी विचारांनी फार दूर होते. नेहरुंना गांधीजींचे विचार पूर्णपणे कधीच पटले नाहीत. पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी त्यांचे आधुनिक विचार अमंलात आणले. पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे सुरु केली. सार्वजनिक क्षेत्रात अनेक मोठे उद्योग उभारणे , खाजगी उद्योगांना प्रोत्साहन देणे , मोठ मोठी धरणे बांधणे, जलविद्युत प्रकल्पांची उभारणी करणे , विज्ञान आणि तंत्रज्ञान आधारित उद्योगांची उभारणी करणे , अणु संशोधन आणि वीज निर्मिती , आय. आय. टी.ची स्थापना करणे , आय. ए. आर. आय. आणि सी. एस. आर. आय . ची स्थापना, अशा अनेक संस्था उभ्या करून तंत्रज्ञानाचा भक्कम पाया घातला. गांधीजींचे विचार ह्या बाबतीत पुरोगामी नव्हते. त्यामुळे नेहरूंचे हे योगदान फार महत्वाचे आहे. हे लक्षात घ्यावयास हवे. ह्या मुळे मला नेहरूवादी विचार अधिक जवळचे वाटतात.      

सरदार ह्यांचे सुरुवातीचे व्यक्तिमत्व पूर्णपणे निराळेच होते. सरदार श्रीमंत आणि उच्चविद्याविभूषित होते . ते प्रख्यात कायदेपंडित होऊन नुकतेच भारतात आले होते. तेंव्हा गांधीजींच्या सुतकताई  व सफाई करण्याच्या चळवळीला उद्देशून ते म्हणाले होते , “ सुतकताई व साफसफाई करून काय स्वातंत्र्य मिळणार आहे ? हे एक फ्याड आहे . त्यापेक्षा एखाद्या क्लबमध्ये चांगला खेळ खेळण्यात जास्त मजा आहे . अधिक गंमत आहे. “ गांधीजींच्या चळवळीकडे इतक्या हेटाळणीने पाहणारे हेच सरदार पुढे गांधीजींचे खरे शिष्य झाले.

नेहरू गांधीजींचे म्हणणे ऐकून घेत असत पण त्यांच्याशी असहमती बोलून दाखवीत नसत. ह्या उलट,सरदार. ते गांधीजींना आपले विचार अगदी रोखटोक पद्धतीने सांगत असत.  

नेहरू-सरदार ह्या दोघांच्या व्यक्तीमत्वांचा केवढा कायापालट झाला. गांधीजीनी किती प्रभावित केले ह्या दोन व्यक्तींना. नेहरू आणि सरदार अशी भिन्न स्वभावाची माणसे गांधीजीकडे एवढी आकृष्ट कशी झाली असतील? दोघेही पूर्णपणे बदलले ते गांधीजींच्या सहवासात आल्यावर. त्यांचे मोठेपण जेंव्हा संपते तेंव्हा आपणास जाणवते ते त्यांचे “ माणूसपण “. थोडेसे वेगळे. ते त्यांचे छोटेपण नसते. गांधीजी हे नं कळत हुकुमशहा होते. त्यांचीच हुकुमत ह्या दोघावर आणि इतरावर चालत असे.नेहरू गांधीजींना घाबरत असत. परंतु सरदार गांधीजींशी अगदी स्पष्टपणे आणि निर्भीडपणे बोलत असत. गांधीजी सरदारांची खिल्ली उडवीत असत. सरदार शांतपणे ऐकून घेत असत. परंतु बोलण्यामध्ये गांधीजींची फजितीच करीत असत. त्यामुळे सरदारांची चेष्टा करणारे गांधीजी सर्वात शेवटी खजील होऊन जात असत. असे अनेक नाट्यपूर्ण प्रसंग “ सरदार” ह्या विजय तेंडूलकरांच्या पुस्तकात आढळून येतात. “ सरदार “ ह्या चित्रपटात हे सारे प्रसंग आलेले नाहीत. पण त्यांच्या पटकथेत ( पुस्तकात ) ते दिसून येतात.

गांधीजी आणि सरदार 

सिमल्याला व्हाईसरॉय ह्यांनी एक परिषद बोलावली होती. सर्व नेते उपस्थित होते. गांधीजी परिषदेला आले नव्हते. त्यांना प्रत्यक्ष परिषदेत भाग घ्यावयाचा नव्हता. तसे त्यांनी ठरविले होते. “ कॉंग्रेसचा अध्यक्ष उपस्थित असतानां मी कशाला तेथे यावयास हवे “ असे त्यांनी कळविले. तेंव्हा सरदार असे म्हणाले , “अनुपस्थित राहून आपल्याकडे लक्ष कसे वेधून घ्यावे हे गांधीजी चांगले जाणतात. “ हे सरदारांचे सूचक बोलणे गांधीजीचे वेगळे व्यक्तिमत्व उभे करते. सरदारांना गांधीजींचे मन समजत होते.

गांधीजी आणि सरदार ह्यांच्यात नेहमीच जुगलबंदी चालत असे. गांधीजी मिश्कील होते .ते सरदार पटेलांची अनेक वेळा चेष्टा करीत असत.गांधीजी सरदारांची नेहमीच फिरकी घेत असत. “ तुरुंगात राहून तुझी प्रकृती जास्तच सुधारलेली दिसते “ असा विनोद सरदारांच्याकडे बघून गांधीजीनी केला .सरदार मात्र चेष्टा टाळून गंभीर प्रश्नाकडे वळून गांधीजींना सांगत होते की महायुद्धाच्या परिस्थितीमुळे इंग्रजांनी गाशा गुंडाळण्याचे ठरविले आहे . स्वातंत्र्य टप्प्यात दिसते आहे, असे काहीतरी प्रतिपादन ते करीत होते. तेंव्हा पुन्हा गांधीजी चेष्टेने सरदाराना म्हणाले, “ तुरुंगात राहून तुझी मानसिक आणि बौद्धिक अवस्था बदललेली दिसते. तेंव्हा गांधीजींची खिल्ली उडविताना सरदार म्हणाले , “ माझा आतला आवाज ( Inner voice ) मला सांगतो आहे “ . ही गांधीजींची फिरकीच नव्हे कां ? पुढे अधिक गंभीर होऊन सरदारांनी गांधीजींना इशारा दिला – ह्यापुढे लढा द्यावयाचा आहे तो आपल्या लोकांच्या बरोबर – फुटीरतेचा विचार पसरविणाऱ्या लोकांच्या बरोबर.सरदाराना अशी दूरदृष्टी होती.

असाच एक प्रसंग.
गांधी हा एक हट्टी माणूस.अतिशय आग्रही.कुणाचेही सहजा सहजी नं ऐकणारा. सरदारही तसेच आग्रही.
देशात जातीय दंगलीचा वणवा पेटलेला असतो. सरदार काळजीत असतात. गृहमंत्री असतात. सरदार – गांधी भेट होते.गांधीजी सहज विचारणा करतात.
गांधी : काय म्हणतात  नेहरू ? राजागोपालाचारी ? आजकाल सत्तेच्या खुर्चीत बसल्यापासून तुम्ही मंडळी दिसेनासे झाले आहात ? भेटी गाठी होत नाहीत. अर्थात शासकीय जबाबदारीतून तुम्हाला वेळच मिळत नसेल.
अशी फिरकी चालू असते. सरदार चिंतीत असतात .
सरदार : बापू , एक विनंती.
गांधी : विनंती ? कसली विनंती ? तू तर सरकारात आहेस. तू एक हुकुमशहा. लोकांना आज्ञा देत सुटला आहेस . मी एक साधा नागरिक. गरीब. मला कसली विनंती करतोस ?
सरदार ( गांधीना ): तुम्ही आकाशवाणीवर भाषण करा.
गांधी : नेहरूंना सांग. तो चांगला वक्ता आहे. मी भाषण करणार नाही. तो लोकप्रिय आहे.
सरदार : नेहरू करतीलच. पण तुमचे भाषण महत्वाचे आहे. मी व्यवस्था करतो. सुरक्षा व्यवस्था ही ठेवतो.
गांधी : सुरक्षा कोणाची ? मी सुरक्षित आहे. मला त्याची आवश्यकता नाही.
सरदार : कोण हुकुमशहा ?
गांधी (मिस्कीलपणे हसत): “ तूच ‘
दोघेही हसतात.
किती बोलका प्रसंग. सरदार – गांधी ह्यांच्या संबंधावर चांगलाच प्रकाश टाकतो.


मी मराठवाड्याचा. मराठवाडा हा पूर्वीच्या हैद्राबाद संस्थानाचा भाग. निझामाचे राज्य. रझाकारांचा जमाना. निझाम हा इंग्रजांचा गुलाम. आम्ही निझामाचे गुलाम. म्हणजे गुलामांचे गुलाम. हैद्राबाद मुक्ती संग्रामाचा लढा माझ्या आधीच्या पिढीने लढलेला.सरदार पटेलांनी खंबीरपणे पावले उचलली आणि निझामाचे संस्थान भारतात विलीन करून घेतले ही खरी वस्तुस्थिती. नाहीतर निझामाने तिसरे पाकिस्तान निर्माण केले असते ह्यात वाद नाही. निझामाच्या कारवायांचा वेळीच बंदोबस्त केला म्हणून बरे झाले.नाहीतर कश्मिर प्रश्नासारखा आणखी एक प्रश्न उभा राहिला असता.आजही रझाकार प्रवृतीची माणसे आणि चळवळ ह्या भागात कार्यरत आहेत ही वस्तुस्थिती आहे. सरदार पटेलांची भूमिका महत्वपूर्ण होती. हे लक्षात घेणे आवश्यक आहे.     

नेहरू आणि सरदार 
मंत्री परिषदेची मिटिंग संपलेली असते. सरदार आणि नेहरू दोघेच असतात. सरदार मोटारीकडे वळतात.
नेहरू अगदी जवळीकपणे सरदाराना विचारतात, “ प्रकृती काय म्हणते ? फारशी चांगली दिसत नाही .’
सरदार उत्तरतात, ‘ खरे आहे . मी तुझ्यासारखा तरुण नाही ‘
नेहरू हसतात आणि म्हणतात, ‘ मी तरुण ! हां ! खरेच आहे. मी स्वतःला तरुणच समजतो. आपण म्हातारे आहोत किंवा वयस्कर आहोत ही कल्पनाच माझ्या मनाला पटत नाही. “
सरदार मोटारीत बसताना म्हणतात  ,” परमेश्वर करो आणि तू म्हातारा नं होवो .’
नेहरू विचारतात , “ कां ? एक दिवस म्हातारा होणारच “
सरदार म्हणतात , “ तू फार कठीण म्हातारा असशील.”
नेहरू , “ हो. मला ही तसेच वाटते .”
चिरतरुण नेहरूंचे हे चित्र आपल्या डोळ्यासमोरून पुढे सरकत नाही. नेहरू असेच चिरतरुण व्यक्तिमत्वाचे होते. त्यामुळेच ते लोकप्रिय होते. मी शाळेत असताना नेहरू औरंगाबादेत आले होते. tyaveli    मी त्यांना जवळून पाहिले होते. ते चिरतरुण प्रवृत्तीचे नेहरू आजही आठवतात.

असाच एक प्रसंग.
सरदार गृहमंत्री झाल्यावर नव्या घरात रहावयास येतात. नवे घर. डागडुजी चालू असते. रंगकाम चालू असते. सर्वत्र पसारा. कामगार कामात गर्क. नेहरू सरदारांच्या बरोबर घरात प्रवेश करतात. काम करणारे कामगार बाहेर निघून जातात. फर्निचर अस्ताव्यस्त पसरलेले असते. नेहरू तावातावाने बोलत असतात. नौखालीच्या जातीय दंगलीबद्दल. सरदार शांतपणे ऐकत असतात.
एका टी-पॉयवर कडेला बसून नेहरू सरदारांशी चर्चा करीत असतात . आपला मुद्दा ठासून मांडीत असतात.उत्तेजित झालेले असतात. मणीबेन ह्यांची धावपळ चालू असते. अचानक पाहुणा घरी आलेला असतो.
नेहरू संतप्त झालेले असतात. बंगालचा ब्रिटीश गव्हर्नर कलकत्ता जळत असताना दार्जीलिंगमध्ये मद्याची पेये रिझवीत असतो. ह्याचाच पंडितजींना राग आलेला असतो. नेहरू भडकलेलेच असतात. व्हाईसरॉय आणि लीगच्या कारस्थानाची चर्चा चालू असते. इतक्यात मणीबेन प्रवेश करतात. चहा घेऊन आलेल्या असतात. नेहरूंच्या समोर चहाचा कप घेऊन उभ्या असतात." साखर किती टाकू ?", असा प्रश्न करतात . नेहरूंचे त्यांच्याकडे लक्षच नसते.ते मणीबेनकडे नं बघताच साखर नं घालतां चमच्याने चहा ढवळण्यास सुरुवात करतात.
नेहरू सरदाराना म्हणतात , “ तुम्ही इतके शांत कसे ? मी असा शांत राहू शकत नाही. माझा हा व्यक्तिदोष आहे.”
नेहरूंचे लक्ष घड्याळाकडे जाते. त्यांना आठवण येते. एका इटालियन पत्रकाराला / फोटोग्राफरला मुलाखतीची वेळ दिलेली असते. ते सरदाराना तसे सांगतात आणि निघून जातात.
मणीबेन नेहरूंनी न घेतलेल्या चहाच्या कपाकडे बघत राहतात. साखरेसंबंधी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर नं देणारे नेहरू, , करून आणलेल्या चहाचा अव्हेर करणारे नेहरू, साहजिकच  मणीबेनला मनातून राग आलेला असतो. त्या सरदाराना म्हणतात , “ नेहरू . असे चहा न पिता कां निघून गेले ? “
सरदार शांतपणे सांगतात , “ तुला कसे समजत नाही . चहापेक्षाही अधिक महत्वाच्या गोष्टी असतात. एवढ्या क्षुल्लक गोष्टींचा कसला विचार करतेस ? “
मणीबेन : “ तुम्ही असे वागला नसता ? “
सरदार हसत हसत म्हण्तात , “ खरे आहे . माझा फोटो काढण्यासाठी कोणी इटालियन फोटोग्राफर थोडाच येणार आहे ? ‘

किती सूचक प्रसंग. परदेशी पत्रकाराला दिलेली वेळ पाळणारे व आंतरराष्ट्रीय प्रसिद्धीसाठी उत्सुक असलेले नेहरू. मणीबेन ह्यांनी अगत्यानी करून आणलेला चहा नं पिताच निघून जाणारे नेहरू. मणीबेनला नं कळत दुखावणारे नेहरू. नेहरू खूप मोठे आहेत ह्यात वाद नाही पण ते तुमच्या आमच्यासारखे साधे माणूसच आहेत.अर्थात महामानव ही शेवटी साधा माणूसच असतो. अशा छोट्याशा चुका होतच असतात. त्यामुळे मोठेपण कमी होत नाही. 

आजच ( १४ ११ २०१३ ) हिंदू दैनिकात विद्या सुब्रह्मनियम ह्यांचा " The divide that never was " हा लेख वाचला.त्यांत " Nehru Abhinandan Granth ह्या नेहरूंच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त काढण्यात आलेल्या स्मरणिकेत सरदारांनी नेहरूसंबंधी जे लिहिले आहे ते समजून घेणे आवश्यक आहे. 
सरदार लिहितात, " Our mutual affection that has increased as years have advanced .... it is difficult for people to imagine how much we miss each other when we are apart and unable to take counsel together in order to resolve our problems and difficulties. This familiarity ,nearness , intimacy and brotherly affection make it difficult for me to sum him up for public appreciation , but, then the idol of the nation , the leader of the people , the Prime Minister of the country , and the hero of the masses , whose noble record and great achievements are an open book, hardly needs any commendation from me ..... "
किती समर्पक शब्दात सरदारांनी नेहरूबद्दल लिहिले आहे. 

त्या दोघात मतभेद होते. विचारात मतभिन्नता होती. हे काहीं गुपित नव्हते.  परंतु त्यांचे एकमेकाचे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे होते. ते एकमेकांशी संवाद साधत असत. एकमेकांना जवळजवळ एक दिवसाआड पत्र लिहित असत. त्यांत आपल्या शंका व्यक्त करीत असत. एकमेकांचे विचार व्यक्त करीत असत. त्यांत प्रामाणिकपणा असे. समस्यांना उत्तरे शोधण्याचा त्यांचा प्रयत्न असे. राजकारणात अशा प्रकारची दुर्मिळ मैत्री विरळीच. ते एकमेकांचे नुसते मित्रच नव्हते तर मार्गदर्शक होते. अर्थात हे सारे शक्य झाले ते गांधीजींचा दोघावर असणारया प्रभावामुळे. गांधी - नेहरू - सरदार ही त्रिमूर्ती विलक्षण होती.   
  



  

Monday, November 11, 2013

सरदार पटेल हिंदुत्ववादी होते का?

सरदार पटेल हिंदुत्ववादी होते का?

कॉंग्रेसला हिंदू कॉंग्रेस असेच जीना संबोधित असत. सर्वधर्मसमभावाच्या गोष्टी सांगूनही मुसलमानांनी गांधीजींना खऱ्या अर्थाने निधर्मीवादी ( Secular ) असे मानलेच नाही. मुस्लीम लीगच्या लोकांनी गांधीजींना हिंदूंचेच नेते म्हणूनच मानले. गांधीजींची दैनंदिन जीवनातील आचारसरणी एका हिंदू संताची होती. ह्या उलट सरदार पटेलाना नेहमीच कडवे हिंदुत्ववादी समजले गेले. ते हिंदुत्ववादी होते कां? आजच्या हिंदुत्ववाद्यांना ते एवढे जवळचे कां वाटतात ?ह्या प्रश्नाचे उत्तर शोधणे आवश्यक आहे.
सरदार पटेल 

मीरतच्या कॉंग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते आचार्य कृपलानी. पंडीत नेहरू , सरदार पटेल आणि मौलाना आझाद व्यासपीठावर बसलेले होते. एका समाजवादी महिलेने सरदाराना हिंदुत्ववादी विचारांचा प्रभाव असलेले असल्यामुळे आम्हाला ते नको आहेत असे त्यांना उद्देशून भाषण केले. तेंव्हा प्रत्युत्तर देताना सरदारांनी ठासून सांगितले , “ Yes, sword will be met by the sword if the Muslim League so desires. About Hindu communalist language, I do not think my language was unparliamentary.  But even if it is thought to be so, I will not change it one bit when I have to deal with those rank communalist actions do not seem to bother our young friends even half as much as my language  does …….” जर  मुस्लीम लीगला “ तलवारीला तलवारीची भाषा समजत असेल तर मी त्याचा वापर करीन “ असे सरदारांनी ठणकावून सांगितले तेंव्हा लोकांनी सरदाराना उचलून धरले. नेहरू मात्र अस्वस्थ झाले. गांधीजींना हे जेंव्हा कळले तेंव्हा फारसे आवडले नाही  गांधीजींना मृदुलाबेन ह्यांनी वरील तपशील सांगितला असावा. नेहरू आणि गांधीना वरील विचार हिंदुत्ववादीच वाटत असावा. गांधीजीनी सरदाराना आपली नापसंती दर्शविणारे पत्र लिहिले. सरदारांनी गांधीजींना जे उत्तर दिले होते ते इतके रोखटोक होते की सरदार हिंदुत्ववादी आहेत असा समज व्हावा. सरदार लिहितात ,” मला स्पष्टपणे बोलण्याची  व कटू सत्य सांगण्याची सवय आहे . सगळीच सत्ये सहज पचू शकत नाहीत. माझ्या बोलण्याचा खरा मतितार्थ समजून नं घेता माझ्यावर टीका होत आहे . हे लक्षात असू द्यावे.. बहुधा मृदुलाने तुमच्याकडे माझ्यासंबंधी तक्रार केलेली दिसते.कारण जवाहरच्या विरोधी भूमिका घेतलेली तिला आवडत नसते हे मला माहीत आहे .... “
सरदार व्हाईसराय वेव्हेल ह्याच्याबरोबर जेवणाच्यावेळी बातचीत करताना वेव्हेल ह्यांनी सरदारांच्या पुढे अल्पसंख्य मुसलमानांना वाटणारी भीती व्यक्त केली. तेंव्हा सरदार स्पष्टपणे सांगतात , “ भारताचा इतिहास बघितला तर अल्पसंख्य असलेल्या मुसलमानांनी हिंदुवरच असंख्य अत्याचार केले आहेत. हिंदुनी ते सहनही केले आहेत. हिंदुनी सहिष्णुता दाखविली आहे. त्यांना आपल्यात सामावून घेतले आहे. त्यांच्या सांस्कृतिक गोष्टीही मान्य केल्या आहेत. तेंव्हा अल्पसंख्य मुसलमानांना बहुसंख्य हिंदूंच्याकडून कोणताही धोका नाही.” सरदारांचा हा दृष्टीकोन वेगळा होता  त्यामुळे ते हिंदुत्ववादी आहेत असा भास निर्माण करतो. परंतु त्यांना हे स्पष्टपणे सांगावयाचे आहे की अल्पसंख्य मुसलमानांना हिंदुपासून कसलाच धोका नाही. तेच त्यांनी वेव्हेल ह्यांना स्पष्ट शब्दात सांगितले होते. मुस्लीम लीग बरोबर सहकार्याची कल्पना सरदाराना पसंत पडणे कधीच शक्य नव्हते. क्याबिनेट मिशनला स्पष्टपणे सांगण्याची हिम्मत फक्त सरदारानीच दाखविली, हे वेव्हेल ह्यांच्या बरोबर झालेल्या संवादावरून सहज दिसून येते. जीना आणि वेव्हेल ह्यांच्या कटकारस्थानाला शह दिला तो सरदारानीच..  .
पंडित नेहरू आणि  मौलाना आझाद ह्यांचे काही पाठीराखे सरदाराना मुस्लीम विरोधी  व हिंदुत्ववादी समजत असत.ते सर्वस्वी चुकीचे होते. ५ जून १९४७ रोजी बी एम बिर्ला ह्यांनी सरदाराना असे सुचविले की त्यांनी भारताला हिंदुराष्ट्र म्हणून जाहीर करावे आणि हिंदू धर्म राष्ट्रधर्म म्हणून जाहीर करावा. सरदारांनी ह्या सूचनेला तीव्र विरोध केला. भारत हे निधर्मी राज्य असेल आणि अल्पसंख्य मुसलमानांना त्यांत दुय्यम स्थान नसेल . ते त्यांचेही तितकेच राष्ट्र असेल. त्यांचा मुस्लीम लीगच्या कारवायांना विरोध होता. परंतु भारतीय मुसलमानांना त्यांनी आपलेच मानले.

सरदार पटेल पंतप्रधान झाले असते कां ?.

स्वातंत्र्य दृष्टीपथात होते .कॉंग्रेसचा जो अध्यक्ष असेल तोच  भारताचा पंतप्रधान असावा असे गांधीजींना वाटत होते. गांधीजीनी नेहृरुना कॉंग्रेसचा अध्यक्ष होण्याचे सुचविले. प्रांतिक कॉंग्रेस समित्यांचा सरदार पटेलांच्या नावाला पाठिंबा होता. एक नव्हे तेरा प्रांतिक समित्यांनी सरदारांचे नांव सुचविले होते. नेहरूंचे नांव एकाही प्रांतिक समितीकडून सुचविले गेले नव्हते. गांधीजींना ह्याची पूर्ण कल्पना होती. त्यांना नेहरुच हवे होते. सरदार नको होते. गांधीजीनी स्पष्ट शब्दात नेहरुना आपले वारस म्हणून जाहीर केले. हा गांधीजीनी सरदारांच्यावर केलेला सगळ्यात मोठा अन्याय होता. त्यांनी ज्या पद्धतीने सरदाराना डावलले ते निश्चितच योग्य नव्हते.
नेहरू गांधीना म्हणाले , “ तुम्ही माझे नांव सुचविता , परंतु सरदारांना काय वाटेल ? “
गांधी म्हणाले , “ त्यांना वाईट वाटू दे. माझी इच्छा म्हणून तो मान्यता देईल . तू काळजी करू नकोस. “
सरदार आपले ऐकतील ह्यावर त्यांचा विश्वास होता. सरदारही पंतप्रधानपदासाठी हपापलेले नव्हते.
नंतर काहीं वर्षांनी ले. ज. थोरांताच्याबरोबर गप्पा मारीत असताना सरदारांनी आपले मन उघडे करून दाखविले.
थोरांतानी त्यांना प्रश्न केला . “ पंतप्रधान होण्याची संधी मिळत असताना तुम्ही ती संधी कां घालविली ? “
सरदार म्हणाले , “ मी पंतप्रधान झालो असतो तर नेहरूंना मरण आले असते. ( He would have died ) .
थोरात म्हणाले , “ त्यांत काय ? तुम्ही पंतप्रधान झाला असता ?”
सरदार म्हणाले, “ नेहरू गेले असते तर पंतप्रधानपद मिळवून मी काय केले असते. ?
सरदाराना नेहृरुबद्द्ल  काय वाटत होते हे सांगणारा हा संवाद खूप बोलका आहे आणि सरदारांच्या व्यक्तिमत्वाची उंचीच सांगतो.

 “पंतप्रधान कोण होणार हे भारतामध्ये अल्पसंख्यांक मतदार ठरवतात.

अलिकडेच “महाराष्ट्र टाईम्स” मध्ये खालील बातमी वाचली .
. “पंतप्रधान कोण होणार हे भारतामध्ये अल्पसंख्यांक मतदार ठरवतात.” भारतात अल्पसंख्यांक असलेल्या मुस्लिमांना खूष करणारे वक्तव्य काँग्रेस नेते मणीशंकर अय्यर यांनी दुबईमध्ये केले.
हे वक्तव्य काहीसे खरे आहे. त्यांत आश्च्यर्य वाटण्यासारखे काहींच  नाही.कॉंग्रसचे नेतेच अशी वक्तव्ये करू शकतात.
कॉंग्रसच्या लोकांना सरदार पटेल हिंदुत्वादी कां वाटतात,  हे खालील गोष्टीवरून सहज कळेल.
जेंव्हा गांधीजीनी माउंटब्याटनकडे जीनांनाच पंतप्रधान करा पण देशाची फाळणी करु  नका असा प्रस्ताव मांडला तेंव्हा सरदार पटेल गांधीजींना भेटण्यासाठी गेले आणि त्यांनी गांधीजींचा हा सल्ला कॉंग्रस कार्यकारिणीस मान्य नाही हे स्पष्ट शब्दात सांगितले. तेंव्हा सरदार गांधीजींना जे बोलले ते लक्षात घेणे फार म्हत्वाचे आहे .
सरदार म्हणतात , “ बापू , तुम्ही तुम्हीच आहात आणि तुम्हीच ह्या प्रश्नाला अशी उत्तरे शोधून काढू शकतात. जीनांना प्रधानमंत्रीपद द्यावे हे कार्यकारिणीला मान्य नाही. आम्ही सामान्य व साध्या व्यक्ती आहोत. आम्ही आमच्या देशाचे प्रधानमंत्रीपद मुस्लीम लीगला किंवा जीनांना देण्याचा विचारही करू शकत नाही. आम्हाला त्यांचा खूप अनुभव आहे. आम्ही त्यांना पुरते ओळखतो. आम्ही असे होऊ देणार नाही. “
एवढ्या स्पष्ट शब्दात गांधीजींना सांगणारे सरदार हे विलक्षण व्यक्तिमत्व आहे. त्यावर गांधीजी जे बोलले ते महत्वाचे आहे. “ तुम्ही देशाचा कारभार हाकित असतां त्यामुळे तुम्हाला जे दिसते ते मला दिसत नाही. कदाचित मी जर तुमच्या जागी असतो तर असाच विचार केला असतां . आपले मतभेद आहेत . तुम्हीच काय ते ठरवा. मी पाटण्याला निघालो आहे .”
गांधीजींची त्यावेळची भारताची फाळणी होऊ नं देण्याची भूमिका समजण्यासारखी आहे. पण कॉंग्रेस नेत्यांची आजची भूमिका ही समजण्याच्या पलिकडील आहे. कारण त्यांना अल्पसंख्याकाच्या मतावर लोकसभेत बहुमत मिळवायचे आहे आणि त्यानां हाच एक सोपा मार्ग दिसतो आहे. 

( संदर्भ :१. “ सरदार “ – विजय तेंडूलकर / प्रस्तावना : मधु लिमये - २.  " सरदार " हा चित्रपट  )