केदारनाथ |
उत्तराखंडात झालेल्या जलप्रलयामुळे तीर्थक्षेत्र असलेल्या केदारनाथाचे रूपांतर अक्षरशः स्मशानात झाले आहे.मंदिराचा बाह्यभाग सुरक्षित दिसत असला, तरी प्रवेशद्वारापुढे पार्थिवांची जणू रांग लागली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरामागे असलेल्या डोंगरावरून आलेल्या पाण्याने सोबत प्रचंड आकाराचे दगड वाहून आणले आणि त्यांच्या मार्गात येणारी प्रत्येक वस्तू उद्ध्वस्त झाली.
हे परमेश्वराचे प्रतिक असणार्या केदारनाथा , तुझ्या गाभार्यात आणि देवालयाच्या परिसरात असंख्य भक्तांच्या प्रेतांचा सडा पडलेले दृश्य पाहून मन विषण्ण झाले. हे कसे झाले? " देव तरी त्याला कोण मारी ?" असे म्हणतात. तुझ्यावर असीम भक्ती असणारी ही मंडळी तुला भेटण्यासाठी देशातून निरनिराळ्या ठिकाणाहून हालअपेष्टा सहन करत तेथे आली आणि नाहीशी झाली. हे असे कसे झाले ? तुझा त्यांच्यावर एवढा राग का? तेंव्हा तू ह्या ठिकाणाहून कुठे निघून गेलास ? तुझे अस्तित्व आहे का? ह्यावरच लोकांचा विश्वास उडाला आहे. तुला भेटायला येणारी असंख्य माणसे ह्यापूर्वी ही नाहीशी झाली आहेत . ती घरी परतली नाही. असे अनेकदा ऐकले होते. जे सुखरूप परत येत ते केदारनाथाची कृपाच समजत असत . पण तो काळ वेगळा होता. त्यावेळी प्रवास अधिक कठीण होता. आज तो थोडासा सुखकर तरी आहे.रस्ते आहेत. चांगली वाहने आहेत . ही माणसे तुझ्या मंदिराच्या परिसरातच गेली. तेंव्हा तूच त्या ठिकाणाहून निघून कसा गेलास? तुझे निवास तसेच उभे आहे."देव नाही देव्हार्यात" असे कसे झाले? आजूबाजूचे सर्वच नाहीसे झालेले दिसते.
जे देव नाही असे मानतात ते म्हणतात "तुमचा देव कुठे गेला?ह्या देव भक्तांना देव दिसला कां ?,असे विचा रतात ."जे देव आहे असे मानतात ते तर गेले. पण त्यांचे जवळचे नातेवाईक विचारतात ," देवा , असे कां केलेस ? त्यांना आमच्यापासून कां हिरावून नेलेस? तुझ्या वरची असीम भक्ती फारशी उपयोगी पडली नाही ?".
आता प्रश्न पडतो देवा, तुझे अस्तित्व आहे कां ? असेल तर तू कुठे आणि कसा आहेस? ह्या प्रश्नाचा जेंव्हा विचार करू लागतो तेंव्हा " निसर्ग हाच देवाचे रूप आहे ,असे म्हणतात ते खरे आहे पण हा निसर्ग ही फार लहरी आहे आणि रौद्र रूप धारण करून अनेकांचा विनाश करतो.त्यालाच लोक देवाचा कोप म्हणतात.
" पृथ्वी आप तसे तेज वायू आकाश पाचवे" असे म्हणून आम्ही निसर्गाला म्हणजे ह्या पंचमहाभूताना देव मानतो. अशा निसर्गाची आम्ही प्रतीकात्मक पूजा करतो.ह्या विश्वाचा निर्माता म्हणून तुझ्याकडे पहातो.आता तर विज्ञानाने ह्या विश्वाच्या पलिकडेही अनेक विश्वे आहेत असे शोधून काढले आहे. मग ह्या विश्वातील होणार्या घडामोडीस कोण जबाबदार आहे? ब्रम्हा,विष्णू आणि महेश ह्या त्रि-मूर्ती पैकी तू एक म्हणून केदारनाथला महेशा. तुझ्या दर्शनासाठी ही भक्त मंडळी आली आणि तुझ्याच प्रांगणात नाहीशी झाली. हे असे कसे झाले? ह्याचेच उत्तर शोधायचे आहे.
पंचमहाभूतांची महायुती झाली की महाप्रलय होतो हे ह्या घटनेवरून सिद्ध होते. हिमालयाच्या रांगा( पृथ्वी ) , बर्फाच्छादित हिमशिखरे आणि ओसंडून वाहणाऱ्या नद्या ( आप) , सूर्याची उष्णता ( तेज ), सोसाट्याचा वारा ( वायू )आणि ढगफुटी मुळे ( आकाश ) येणारा पाऊस ह्या पंचमहाभूतानीच हा प्रलय घडवून आणला हे खरे आहे .दरडी र्कोसळणे , नद्यांना पूर येणे , रस्ते वाहून जाणे हे हिमालयात नवीन नाहीच. हा निसर्ग तसाच आहे .
हा निसर्ग विविध रूपे घेतो. तो अतिशय सुंदर आहे . शांत आहे. प्रसन्न आहे. मनाला विलक्षण शांती देतो. हिमालयाचा हा परिसर ही देव भूमीच आहे. त्यामुळेच आदी शंकराचार्य येथे आले. १००० वर्षापूर्वी त्यांनीच येथे तुझी प्रतिष्ठापना केली. गुरु गोविद सिंगजिना इथेच यावेसे वाटले. जवळच असलेल्या हेमकुंड येथे त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झाली. हिमालयाचे हे अध्यात्मिक वेड बर्याच जणांना लागले. सर्वच मोठ्या विभूती हिमालयात जावून दिव्य दृष्टी प्राप्त करून घेतात. वानप्रस्थाश्रमात गेलेले आमच्यासारखे सारेच सामान्य लोक चारधाम यात्रा करून आनंद आणि समाधान मिळवत घरी परततात. मानसिक समाधान आणि अध्यात्मिक आनंद मिळवण्यासाठी ही सारी मंडळी चारधाम यात्रा करतात .ते चारधाम आज मृत्यूधाम झाले. चारधामचा हा निसर्ग मन:शांती देतो. जेंव्हा निसर्ग शांत असतो तेंव्हाच ते येथे येण्याची हिम्मत करतात. निसर्गाचे अक्राळविक्राळ रूप त्यांना माहीत नसते असे नाही . त्यांनी फक्त ऐकलेले असते. असा हा अक्राळविक्राळ निसर्गही तुझेच एक रूप आहे "शंकराचा रुद्रावतार काय असतो? हे आम्ही डोळ्यांनी पाहिले, पन्नास फूट उंच उसळणाऱ्या लाटा, काड्या आणि डब्याप्रमाणे वाहणारे लोक आणि त्यांची वाहने. जणू महादेवाने आपला तिसरा डोळाच उघडला असावा. ज्यांना सामावून घ्यायचे होते , त्यांना सामावून घेतले, मात्र आम्ही शंकराच्या इच्छेमुळेच वर जाऊ शकलो नाही. केदारनाथला गेलो असतो तर आज आम्ही जिवंत राहिलो नसतो," अशा शब्दांत या केदारनाथ यात्रेतील संकटातून सुखरुप परतलेल्या यात्रेकरूंनी आपल्या भावनांना वाट करून दिली.
"केदारनाथ दर्शनासाठी
आलो, मात्र मंदिरावर गेलो नाही. घोडेवाल्यांनी
जाण्यास नकार दिला. तेवढ्यातच जोरात आवाज आला. अन् पाण्याचा प्रचंड प्रवाह येत असल्याचे
काही लोकांनी सांगितले. आम्ही लॉजमध्ये थांबलो होतो. पाण्याचा डॅम फुटला की काय असे वाटले , पाण्याचा प्रवाह वाढलयाने आम्ही लॉजच्या तिसऱ्या
मजल्यावर चढलो. आम्ही आणि आमचा ग्रुप वर चढण्यात यशस्वी झाला, मात्र जे लोक तिसऱ्या मजल्यावर चढू शकले नाहीत.
ते पाणी आणि गाळाच्या प्रवाहात हरवून गेले. हे दृष्य आम्ही आमच्या डोळ्यांनी
पाहिले." असे वर्णन तुझ्या भक्तांनी केले. तुझ्या प्रांगणातच जन्म आणि मृत्यू
यामध्ये किती सूक्ष्म सीमारेषा आहे त्याचं भयाण दर्शन मन सुन्न करून टाकत
होतं. असं हे यात्रेकरू सांगत होते." मृत्यू आमचा
पाठलाग करीत होता. आम्ही केदारनाथ सोडले व काही वेळातच महाप्रलयाला सुरुवात झाली.
हा प्रलय आमचा पाठलाग करीत होता व आम्ही पुढे-पुढे पळत होतो. पाण्याने रौद्ररूप
घेतले होते. वाटेत येणारी घरे, झाडे, टेकडय़ा सर्वकाही बाजूला सारून पाणी पुढे जात
होते. जाताना आम्ही तेथील निसर्गाचा आनंद घेतला, पण परतताना
त्याच निसर्गाचे भयावह रूप पाहिले." ढगफुटी हेच प्रमुख कारण असले तरी येथील निसर्ग असाच आहे. केदारनाथ मंदिर हे बर्फाच्छादित हिमालयात आहे.फक्त चार महिने त्या ठिकाणी जाता येते. मंदिराच्या मागे ज्या हिमालयाच्या रांगा आहेत त्यामध्ये तीन ग्लेसिअर आहेत. ह्या पैकी एखादी ग्लेसिअर फुटली की प्रंचंड वेगाने पाण्याचा प्रवाह सुरु होतो , नद्या दुथड्या भरून वाहू लागतात. पाण्याने झिजलेला डोंगर कोसळू लागतो आणि असा महाप्रलय होतो. अशा ह्या निसर्गाचा तू निर्माता , संरक्षण कर्ता आणि विनाश कर्ता. बद्रीनाथचा संरक्षक देव विष्णूही हताश झालेला दिसला. गन्गौत्रीची गंगा माय ही अशीच रुसली. भागीरथी आणि अलकनंदा ह्यांनी रौद्र रूप धारण केले. अभूतपूर्व
महाप्रलयाने अनेकांचे जीव घेतले. मृत्यू सातत्याने पाठलाग करीत असताना त्याच्या
दाढेतून काही जण सुखरूप परतले, त्यामुळे त्यांचा नवा जन्मच झाला , अशी भावना उत्तराखंडमधून परतलेल्या
अनेक यात्रेकरूंनी व्यक्त केली. तू सुखकर्ता,दुखहर्ता असूनही विघ्नकर्ता कसा झालास ? त्यामुळेच तुझे अस्तित्व आहे का? असा प्रश्न काही जण विचारतात तेंव्हा तू नसावास असेच काही जणांना वाटते ते स्वाभाविकच आहे.
श्रीकृष्णाने अर्जुनाला तुझी निरनिराळी रूपे समजावून सांगितली. नव्हे तुझे अक्राळविक्राळ रूपच प्रत्यक्ष अर्जुनास दाखविले. विनोबांनी "गीताई" मध्ये तुझ्या त्या भयानक रूपाचे जे वर्णन केले तेच आज माझ्या डोळ्यासमोर उभे राहते आणि हे पटते की तू विश्वनिर्माता असल्यामुळेच ही वेगळी वेगळी रूपे घेतो.
आज जे केदारनाथच्या आणि हिमालयाच्या ह्या परिसरात घडले आहे ते घडविणारा तूच आहे. तूच निर्माता आणि तूच नष्ट करणारा.
श्रीकृष्णाने अर्जुनाला तुझी निरनिराळी रूपे समजावून सांगितली. नव्हे तुझे अक्राळविक्राळ रूपच प्रत्यक्ष अर्जुनास दाखविले. विनोबांनी "गीताई" मध्ये तुझ्या त्या भयानक रूपाचे जे वर्णन केले तेच आज माझ्या डोळ्यासमोर उभे राहते आणि हे पटते की तू विश्वनिर्माता असल्यामुळेच ही वेगळी वेगळी रूपे घेतो.
आज जे केदारनाथच्या आणि हिमालयाच्या ह्या परिसरात घडले आहे ते घडविणारा तूच आहे. तूच निर्माता आणि तूच नष्ट करणारा.
"गीताई"तील
तुझे वर्णन असे आहे ……
'उत्पत्ती-नाश भूतांचे ऐकले मी " नाश करण्याचा हा तुझाच महिमा विलक्षण विषण्ण करून गेला
"पहा दिव्य तशी माझी रूपे शत- सहत्र तू" हे खरे असले तरी " पहा अनेक आश्चर्ये कधी कोणी नं पाहीली ".असे हे अघटीत घडले तुझ्या दारी असे म्हणण्याची वेळ आली.
हिमालयाच्या परिसरातील हा निसर्ग म्हणजे ,"
दिव्य वस्त्रे फुले गंध लेउनी सर्वतोपरी ,
आश्चर्ये भरला देव विश्व-व्यापी अनंत तो "
म्हणूनच सारेजण चारधाम यात्रा करतात.
जिथे जिथे तू चि अनंत-रूपे ", म्हणूनच सारे तुझी विविध रूपे ह्या निसर्गात बघत असतात...
भागीरथी , मंदाकिनी , पुष्पावती , अलकनंदा. गंगा, यमुना ह्या सर्व नद्यांचे प्रवाह नुसते अवखळ झाले नाही तर त्यांनी आजूबाजूच्या परिसरातील अनेकांना मुखात घेतले. एवढेच काय शिवाची प्रचंड मूर्ती ही वाहून गेली.
जिथे जिथे तू चि अनंत-रूपे ", म्हणूनच सारे तुझी विविध रूपे ह्या निसर्गात बघत असतात...
भागीरथी , मंदाकिनी , पुष्पावती , अलकनंदा. गंगा, यमुना ह्या सर्व नद्यांचे प्रवाह नुसते अवखळ झाले नाही तर त्यांनी आजूबाजूच्या परिसरातील अनेकांना मुखात घेतले. एवढेच काय शिवाची प्रचंड मूर्ती ही वाहून गेली.
तुझ्या समोर तर अनेकांनी जीव सोडला. मंदाकिनीने सर्वाना गिळंकृत केले.
तसे चि लोक तुझ्या मुखात
घेती उद्या वेग-भरे माराया
दाही दिशा विस्तृत अंतराळ
व्यापुनी तू एक चि राहिलासी
पाहुनी हे अद्भुत उग्र रूप
तिन्हीजगे व्याकुळली उदारा
असे हे तुझे उग्र आणि अक्राळविक्राळ रूप पाहून मन विषण्ण आणि दिग्मूढ होते आणि तुझ्यावरचा विश्वास उडू लागतो. तुझे हे उग्र आणि रौद्र रूप फार भयानक असे दिसून आले. पर्जन्य ही सुद्धा देवता म्हणून पूजिली जाते त्या पर्जन्याने ही हा हाहा:कार केला. आणि मग असा प्रश पडतो की
सांगा असा कोण तुम्ही भयाण
नमूं तुम्हां देव-वर न कोपा
जाणाव्या उत्सुक आदि देवा
ध्यानी न ये की करणी कशी ही
नमूं तुम्हां देव-वर न कोपा
जाणाव्या उत्सुक आदि देवा
ध्यानी न ये की करणी कशी ही
मनाने सर्वस्वी तुझा ध्यास असलेले , बुद्धीने तुझे श्रेष्ठत्व मान्य केलेले आणि आपला अहंकार गुंडाळून तुझ्यापुढे नतमस्तक होण्यासाठी हे सारे भक्तगण तुझ्या दर्शनासाठी शारीरिक पीडा सहन करीत मोठा दीर्घ प्रवास करून तुझ्या मंदिरात प्रवेश करण्यासाठी आले आणि तेथेच हे जग सोडून गेले हे पाहून तुझ्या अस्तित्वाची शंका येणार नाहीतर काय? तुझ्या देखत हे घडलेच कसे असा प्रश्न मनाला भेडसावीत रहातो." देव नाही देव्हार्यात" असेच वाटू लागते.
डॉ नरेंद्र गंगाखेडकर
drnsg@rediffmail.com
महाप्रलयानंतरचे केदारनाथ |
डॉ नरेंद्र गंगाखेडकर
drnsg@rediffmail.com