Thursday, April 21, 2022
मधु मंगेश कर्णिकांची 'प्राप्तकाल' ही नवी कादंबरी
माहिमच्या खाडी' नंतर कायम लक्षात राहील अशी मधु मंगेश कर्णिकांची 'प्राप्तकाल' ही नवी कादंबरी.
तीस चाळीस वर्षापूर्वी महाविद्यालयात असताना परिघाबाहेरचे जग चित्रीत करणारी मधु मंगेश कर्णिक ह्यांची 'माहिमची खाडी' ही कादंबरी वाचली होती. त्यानंतर त्यांच्या अनेक कथा वाचत गेलो. मुंबईला १९६९साली आलो तेंव्हा माहिमच्या खाडीतील परिसरात मुद्दाम गेलो आणि तेथील जीवन जवळून पाहिले. त्याच काळात वासूनाका परिसरातही फिरून आलो होतो. माहिमची खाडी आता विशाल धारावी झाली आहे तर मुंबईच्या अनेक भागात मानखुर्द-चेंबुर सारख्या अशाच वस्त्या आणि माणसं दिसून येतात. हे आपले आजचे विकासचित्र.
एकविसाव्या शतकाच्या पहिल्या वीस वर्षाच्या अनुभवावरून मधु मंगेश कर्णिकांनी वयाच्या ९०व्या वर्षी 'प्राप्तकाल" ही कादंबरी लिहून कोकणवासीयांचे सध्याचे जीवन चित्रीत करून महाराष्ट्रातील एक प्रादेशिक चित्र उभे केले आहे. त्यामुळे नकळत मला आजचा मराठवाडा आणि विदर्भही समोर दिसू लागतो. त्याचे प्रमुख कारण म्हणजे ही कादंबरी राजकीय आणि सामाजिक स्थित्यंतरे चित्रीत करते. कॉंग्रेसची झालेली पडझड, जनता राजवट, समाजवाद्यांची शोकांतिका आणि हिंदुत्वामुळे झालेला शिवसेना- भाजपचा उदय. ह्या राजकीय पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात होवू घातलेला राजकीय आणि सामाजिक बदल ह्या कादंबरीत चित्रीत झाला आहे. ह्या कादंबरीचा नायक प्रसाद हा आर.एस.एस.च्या पठडीत वाढलेला. विवेकानंद ह्यांच्या विवेकप्रणित, पुरोगामी, सर्वसमावेशक हिदुत्ववादी विचाराने प्रभावित झालेला हा युवक. कोकणातील आवळसगांवी वाढलेला. हूशार म्हणून नावाजलेला. गरिबीचे चटके सहन करणारा. एका शिक्षिकेचा मुलगा. त्याच्याच गावातील समाजसेवी असलेला आर.एस. एसचा एक कार्यकर्ता त्याच्या पुढील शिक्षणाची व्यवस्था पुण्याच्या अप्पा खाडीलकरांच्या वाड्यात करतो आणि तेथील संघ शाखेचा तो स्वयंसेवक होवून पुढील शिक्षण घेत असतांना हिंदुत्ववादी होतो.
ह्या हुशार मुलाचे शिक्षण पूर्ण झाल्यावर आर. एस. एस. ची मंडळी त्याला भाजपच्या खासदारपदाच्या निवडणूकीस उभे करण्याचा प्रयत्न करतात. धर्मकारणावर आधारित राजकारण करणारा भाजप त्याला मान्य नसतो. त्याचे वडील समाजवादी चळवळीशी संबंधित होते आणि सर्व प्रमुख समाजवादी नेत्यांशी त्यांचे संबंध होते: पण ते प्रसाद लहान असतानाच गेलेले असतात. त्याच्या आईनेच त्याला वाढविलेले असते. ती त्याला शिकविते. नियती म्हणतात ती अशी. संघाच्या कार्यकर्त्यांनी त्याला शिक्षणासाठी मदत केली आणि त्याच्यावर हिंदुत्ववादी संस्कार केले. कार्यकर्ता घडविला जातो तो असा. त्यानी प्रसादला राजकारणात ओढण्याचा प्रयत्न केला. कर्णिकांनी कादंबरीत अशी वीण तयार करून ही राजकीय कादंबरी लिहिली आहे. त्यांनी संघकार्य आणि संघकार्यकर्ते ह्यांना जवळून पाहिले आहे,असे दिसते. ज्यांनी संघ कार्यकर्त्यांना जवळून पाहिले आहे, त्यांना हे माहित आहे. संघाच्या भाऊराव खाडीलकरांनी प्रसाद सारखी तरुण पिढी कशी उभी केली आणि हिंदुत्ववादी भाजपला कार्यकर्ते कसे मिळतात हे कर्णिकांनी कादंबरीतून छान चित्रीत केलं आहे.
हिंदू आणि हिंदुत्व ह्या भोवती फिरणारे आजचे राजकारण, त्या विचारसरणीकडे काहीशी आकर्षित झालेली आजची तरुण पिढी, कॉंग्रेसला पर्याय शोधणारी कोकणातील माणसे ह्याचा वेध घेतलाय कर्णिकांनी.
कोकणातील ग्रामपंचायती पासून जिल्हा स्तरावरील असलेला भ्रष्टाचार आणि विवेकशून्य राजकारणी लोकांचे धंदे ह्या कादंबरीत चित्रीत केले आहेत. कादंबरीतील ही पात्रे कर्णिकांनी खुप सुंदर पध्दतीने चित्रीत केली आहेत. आवळसगावातील राजकारणी मंडळींची खाबूगिरी ह्या कादंबरीतून दिसून येते. ते चित्र सर्वच खेड्यातून दिसून येते. प्रसादसारख्या नव्या तरुणांना राजकारणाचे हे रंगढंग मान्य नसतात. त्यामुळे विवेकानंद ह्याच्या पुरोगामी हिंदुत्वाने प्रभावीत झालेला प्रसाद ह्या प्रमुख पात्राच्या माध्यमातून कर्णिक आपल्याला त्यांची भूमिका सांगत राहतात. अर्थात हे सारे संयमाने. आर.एस.एस. ही संस्था कार्यकर्ते कशी तयार करते, हे कर्णिकांनी छान चित्रीत केले आहे. नेहरु-गांधींच्या कॉंग्रेसची पडझड का झाली, ह्यावर नकळत भाष्य करण्यात कर्णिक यशस्वी झाले आहेत. तसा हा ह्या शतकातील वीस वर्षाचा काळ आहे. असा हा "प्राप्तकाळ". राजकारणाचा मूल्यर्हास सर्वांनाच खटकणारा आहे. ह.ना.आपटे ह्यांच्या "काळ तर मोठा कठिण आला आहे", ह्या जुन्या कादंबरीची आठवण करून देणारा. शंभर वर्षांपूर्वी केशवसूत लिहून गेले ...
प्राप्तकाल हा विशाल भूधर
सुंदर लेणी तयात खोदा....
ह्या काव्यपंक्तीवरूनच हे नाव ह्या कादंबरीला सूचले असावे.
कादंबरी रुक्ष वाटू नये म्हणून त्यात प्रेमकथा ही हवीच. 'काढ सखे, गळ्यातील तुझे चांदण्याचे हात' असं विवेकानंद ह्यांच्या तत्वज्ञाने भारून गेलेल्या प्रसादला जाईला पाहून वाटू लागते आणि त्यांची एक प्रेमकहाणी फुलू लागते; पण ती एक शोकांतिका होते. ही प्रेमकथा आपल्याला कादंबरी पुढे वाचण्यासाठी मदत करते. नाही तर आपण हीक्षराजकीय कादंबरी अर्धवट वाचून सोडून दिली असती. ह्या कादंबरीतील प्रेमपत्रे ह्या तशा प्रेमकविताच आहेत. त्या वाचताना आपण रमून जातो.
राजकारणापासून अलिप्त राहून वैद्यकीय क्षेत्रातील कोकणातील आरस कुटुंबिय समाजसेवा कशी करतात, हा ही या कादंबरीचा विषय आहे. आपण खूप काही मिळवलं आहे. आता कोकणवासीयांसाठी म्हणजे आपल्या गावासाठी काही तरी केलं पाहिजे, ह्या विचारांनी भारावलेली ही माणसं. त्यांच्यापुढे उभ्या राहतात त्या असंख्य राजकीय आणि सामाजिक अडचणी आणि कोकणातील भ्रष्ट राजकारण. ह्या किडलेल्या समाजव्यवस्थेमुळे हतबल झालेली ही माणसं पाहिली की वाटतं,' नको ती समाजसेवा'. असा विचार आपल्या मनात डोकावतो.
ह्या कादंबरीत काय आहे? प्रेमाची गोष्ट आहे, हिंदुत्ववादी विचार सांगणारी ही एक राजकीय कादंबरी आहे, शहरातील समाजसेवी लोकांनी आपल्या गावच्या लोकांच्यासाठी उभे केलेले प्रकल्प आहेत. कोकणी माणूस आणि त्याचा निसर्ग आहे, माणूस आणि नियती ह्यांची ही कथा आहे. अशा विविध रंगांनी 'माणूस शोध' घेणारी मधु मंगेश कर्णिक ह्यांची ही कादंबरी सुंदर आहे. मन वेधून घेणारी आहे. नव्वदीचा हा लेखक आणि त्यांचा हा लेखनउत्साह पाहिला म्हणजे "जीवन ह्यांना कळले हो", ह्या ओळींची मला आठवण येते. कर्णिक, असेच लिहित रहा.
'माहिमच्या खाडी' नंतर कायम लक्षात राहील अशी मधु मंगेश कर्णिकांची 'प्राप्तकाल' ही कादंबरी.
Subscribe to:
Posts (Atom)