औरंगाबाद - गुलमंडी , शहराचे मध्यवर्ती ठिकाण . पहिले नगराध्यक्ष द्वारकादास पटेल ह्यांचा पुतळा ..ह्या ठिकाणी फार मोठा हौद होता . नंतर तो हौद लहान करण्यात आला . आज तेथे हौद नाही. |
१९५६ ला राज्य पुनर्रचनेनंतर आम्ही हैद्राबाद सोडले . मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाला . वडिलांनी मुंबई ऐवजी औरंगाबादला बदली करून घेतली . मी ४ थ्या इयत्यत्तेत प्रथम क्रमांकाने पास झालो . ५वीला एक वर्षं परभणीला आजोळी होतो . वडील औरंगाबादला होते . ते नोकरीत स्थिरस्थावर झाल्यावर म्हणजे मी ६ वीत गेल्यावर १९५७ साली आम्ही औरंगाबादेत रहावयास आलो . औरंगपुऱ्याच्या शेवटी असलेल्या न्यू मिडल स्कुल ( फोकानिया ) मध्ये मी प्रवेश केला . आमची सरकारी शाळा . तेव्हाची दिमाखदार इमारत . नंतर त्याच इमारतीत मराठवाडा विद्यापीठ सुरु झाले होते . . १९६७ साली एम. एससी . चे एक वर्ष त्याच इमारतीत काढले . नंतर सोनेरी महालच्या विदयापीठ परिसरात शिक्षण पूर्ण केले . त्या वेळच्या आठवणींनी मन भरून येते . औरंगाबाद आजच्यासारखे मोठे नव्हते . मी ५० वर्षापासून मुंबईत रहातो . औरंगाबादला वर्षातून १-२ वेळा येतो. आणि १ -२ दिवसात परततो . जुन्या शहरात जात नाही . ह्यावेळी थोडेसे फिरलो . जुन्या आठवणी जाग्या झाल्या . काही भागात पायी फिरलो . आठवणीचे तरंग मनात उमटले . त्यासाठी हा लेखन प्रपंच.
आम्ही सुपारी मारुतीजवळील नगारखाना गल्लीत रहात होतो . केळीबाजारकडे जाणाऱ्या रस्त्यावर हुंडेकरांची चाळवजा इमारत होती . तेथे दोन वर्षे राहिलो . आज सगळे रूप बदलले आहे . तेथे नवी इमारत दिसते .
येथे हुंडेकरांचा वाडा होता . ह्या चाळीत आम्ही १९५६-५७ साली रहात होतो. मोहित ज्वेलरचा मालक तेथे भेटला . त्याचे घर तेथेच आहे . |
नगारखाना गल्ली : मुळे मास्तरांचा वाडा येथेच होता . १७ भाडेकरूंची चाळ येथे होती . आम्ही येथे ४-५ वर्षे रहात होतो. आज गल्लीमध्ये नव्या इमारती झाल्या आहेत . पण गल्ली फारशी सुधारली नाही. |
तेथे आमचे वास्तव्य चार-पांच वर्षे होते .
हुंडेकरी वाड्यातील आमचे घर दीड खोलीचे . अंधारे . कसे रहात होतो देव जाणे ! तुटपुंज्या पगारात वडील घर कसे चालवीत असत ते देव जाणे !
नगारखाना गल्लीत मुळे मास्तरांनी १७ भाडेकरूंची चाळ बांधली होती . हुंडेकरांच्या चाळीपेक्षा थोडी बरी . दोन खोल्यांचे घर . मागच्या बाजूला . अंधारे स्वयंपाकघर . आम्ही पहिल्या मजल्यावर रहात होतो . घरात जाताना कॉमन गॅलरी ओलांडून जावे लागे . त्यामुळे बाजूच्या बिऱ्हाडात डोकावून त्यांचे उघडे संसार बघत पुढे जावे लागे .रात्री बरेच जण गॅलरीतच झोपत असत . त्यांना ओलांडून न तुडवता घराकडे चालत जाणे म्हणजे एक कसरतच होती .
मुळेच्या वाड्यासमोरील हे जुने मंदिर . |
व्यंकटेश ट्रेडरचे दुकान. ह्या मालकाचे घर मुळे वाड्यासमोरच आहे . त्याने झालेले बदल समजावून सांगितले . |
आम्ही त्या चाळीत रहात होतो . १९६९ ला मी मुंबईला गेलो . तेथील चाळी पाहिल्या . श्री ना पेंडसे ह्यांचे ' संभुसाची चाळ ' हे नाटक शिवाजी मंदिराला पाहिलं होतं . मला नाटक पहाताना मुळे मास्तरांची चाळ आठवली . तशीच पात्रे . तशीच भांडणे . फारसा फरक नव्हता . नळावरची भांडणे होती . कॉमन संडासला लोकांची रांग होती . गाणारी माणसे होती . प्रेम करणारी पोरं- पोरी होत्या .टापटीप राहणारे काही लोक होते . ब्रम्हचारी मुलं एका खोलीत राहणारे होते . खोकलणारे आजोबा होते . दुसऱ्याच्या घरात डोकावणारी माणसे होती . दीड खोलीची ती घरे . स्वयंपाक खोलीत मोरी म्हणजे स्नानगृह . पडदा लावलेला . मुलांचा नुसता आरडाओरडा .
ह्या वाड्यात गुलबर्गा - बिदर कडील कानडी- मराठी कुटुंबे होती . महाराष्ट्रातच स्थायिक झालेली . ही चाळवजा वस्ती म्हणजे अल्पमध्यम वर्गीय - मध्यमवर्गीय कारकून - मास्तरांची वस्ती . चाळीत बेरकी माणसे खूप होती .
मुळेच्या वाड्यात ३ - ४ कुटुंबे हैद्राबाद सोडून आलेली होती . उमा आत्या गुलगर्ब्याच्या होत्या . त्याचे पती भाऊराव कुलकर्णी सरकारी नोकरीत होते . माझ्या वडिलांना भाऊ - बहीण कोणीच नव्हते . माझे वडील उमा आत्याना त्यांची बहीण मानत असत . आमच्या सहा भावांच्या लग्नात त्या आमच्या घरातील मोठ्या व्यक्ती होत्या . त्यांची दोन मुले .शाम आणि श्रीकांत . त्यांच्या दोन मुली -निर्मला आणि लता . खूप घरोबा असलेले त्यांचे घर .
आमच्या बाजूलाच अंबादास काका रहात होते . ते वडिलांचे हैद्राबादपासूनचे मित्र . अंबादास काकांचे भाऊ चंदू काका . ते वडिलांचे खूप जवळचे चांगले मित्र . चंदूकाका सरकारी नोकरीत असताना दौऱ्यावर गेले आणि त्यांना अचानक मृत्यू आला . त्यांना ६ मुली . त्यांच्या बायकोला आणि ६ मुलींना अंबादास काकांनी सहाय्य केले . आधार दिला . मुलींना वाढविले .त्यांना शिक्षण दिले . त्यांची लग्नें करून दिली . त्यांच्या ६ मुली आणि आम्ही ६ भाऊ . सर्व बरोबरीचे . आम्ही एकत्र वाढलो. दोन्ही कुटुंबे खूप जवळची .
अशीच दोन - तीन कुटुंबे खूप स्नेहाची होती .
आम्ही पहिल्या मजल्यावर रहात होतो . पाणी खालून भरावे लागत असे . आम्ही भाऊ ठराविक अंतरावर उभे राहून पाण्याची भरलेली घागर एकमेकांकडे पास करीत असू . पाणी भरणे हा मोठाच कार्यक्रम असे . त्यासाठी आमची खूप भांडणे होत . नळावरची भांडणे नेहमीचीच असत . ते विसरून आमची पुन्हा मैत्री होत असे .आज गंमत वाटते .
आमच्या बाजूला एका खोलीत एक ब्रम्हचारी पत्रकार रहात होता . त्याचे नांव कल्याणकर. तो दै. अजिंठ्यात होता . रात्रपाळीची नोकरी असल्यामुळे त्याची खोली रात्री रिकामी असे . मी आणि माझा भाऊ त्या जागेचा अभ्यासाची खोली म्हणून वापर करीत असू .नाहीतर गच्चीवर जाऊन अभ्यास करावा लागे . ते दिवस फार त्रासदायक होते .३ - ४ वर्षे काढली . नंतर गावाच्या बाहेर रोकडीया हनुमान कॉलनीत स्वतःच्या छोट्या घरात रहावयास गेलो आणि चाळीतले आयुष्य संपले .
आजची ही नगारखाना गल्ली . काही पडकी जुनी घरे आणि आजूबाजूला जमलेला कचरा . |
मुळे मास्तरांची हीच ती १७ भाडेकरूंची चाळ |
आज नगारखाना गल्ली बदलली आहे . पण परिसर सुंदर आणि स्वच्छ नाही . काही जुनी पडकी घरे दिसतात .
मृण्मयी - ज्योती नगर .माझ्या बायकोचे माहेर , |
सुपारी मारुती - औरंगाबादची ग्रामदेवता |
कसुपारक गल्ली - गुजराती समाज वस्ती |
रमणलाल चे ३ माजली लाकडी घर - आता पडायला आले . फार सुंदर हवेली होती . |
वाटेत रणछोडदास नावाचे वृद्ध गृहस्थ भेटले . त्यांना रमणलालच्या घरासंबंधी विचारले . त्यांनी सर्व माहिती दिली . मला घेऊन ते रमणलालजींच्या मुलाच्या नवीन घरी घेऊन गेले . तेथे तळमजल्यावर प्रकाश फोटो स्टुडिओ होता . प्रकाशचाचा मुलगा काउंटर बसला होता . मी माझी ओळख सांगितली .त्याला आश्चर्यच वाटत होते . प्रकाश दुकानात नव्हता . इतक्यात त्याचा धाकटा भाऊ दीपक आला . त्याने मला 'सर' म्हणून ओळखले . त्याला खूप आनंद झाला . तो मला वरच्या मजल्यावर असलेल्या त्यांच्या घरी घेऊन गेला . त्याची ८७ वर्षांची आई मला भेटली .५० - ६० वर्षांनी आमची भेट झाली . आमच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या . मी त्यांच्या मुलांना शिकवीत असे म्हणून त्यांना माझे खूप कौतुक वाटत असे .आज दीपकचा मुलगा सीए झाला आहे .त्याची फर्म आहे .सर्वाना अचानक भेट झाल्यामुळे खूप आनंद झाला . आम्ही फोटो काढले . जुन्या आठवणीत रमलो . माझे पहिले विद्यार्थी भेटले . मी त्यांचा शिक्षक . माझी त्यावेळची ट्युशनची कमाई आठवली . इकडच्या-तिकडच्या गप्पा झाल्या .आज ते दिवस आठवले की मोठी गंमत वाटते .
रमणलालचा धाकटा मुलगा दीपक आणि त्याची ८७ वर्षाची आई . दीपक आणि प्रकाश माझे विद्यार्थी . त्यांच्या आईला जुने र्दिवस आठवले .५५ वर्षानंतर झालेली आमची ही भेट . खूप गप्पा मारल्या . |
माझी पुढची भटकंती सुरु झाली .केळीबाजारातून गुलजार टॉकीजकडे गेलो . त्या जुन्या टॉकीजमध्ये काही चित्रपट पाहिले होते . त्या टॉकीजसमोर माझा मित्र अविनाश महाजन रहात होता . शाळेत आम्ही बरोबर . तो M.Sc ( जीवशास्त्र ) झाला .मी फिजिक्समध्ये M Sc. झालो . तो परभणीला प्राध्यापक झाला . दोन वर्षांपूर्वी तो गेला . आम्ही शाळेत एकमेकांचे स्पर्धक होतो . वादविवाद स्पर्धेत आलटूनपालटून आम्हाला बक्षिसे मिळत असत . तो माझा अगदी जवळचा मित्र . आज त्याचे घर तेथे नाही . चालत थोडे पुढे गेलो . कोपऱ्यावर नाईक वकिलांचे घर होते . त्यांची दोन मुले . बाळ आणि शाम . बाळ अमेरिकेला शिकायला गेला होता .तेथून परत आल्यावर आरएसएसचे काम करण्यासाठी बंगाल - आसाममध्ये गेला . त्याची नंतर भेट झालीच नाही . आज त्याच्या घराच्या जागी एक काचेची मोठी इमारत उभी दिसते . बाळच्या अनेक आठवणी आहेत .तो अतिशय हुशार मुलगा . त्यावेळचा आमचा रोल मॉडेल.
गुलजार सिनेमा - आज जुनी इमारत .केळीबाजारकडून वळल्यावर . |
गुलमंडी ते खडकेश्वर व्हाया औरंगपुरा . एवढीच वस्ती होती. औरंगपुर्यातून जाताना अनेक मंदिरे होती . एकनाथ महाराज जेथे रहात होते त्या ठिकाणी नाथ मंदिर होते . मी त्या ठिकाणी अनेक कीर्तनकारांची किर्तने ऐकली आहेत . पाचलेगावकर महाराज , आफळे गुरुजी , सिन्नरकर महाराज इत्यादी प्रसिद्ध किर्तनकार औरंगाबादला येत असत . त्याच रस्त्यावर दत्तमंदिरआहे .बाळकृष्ण महाराजांची समाधी आहे .नागेश्वर मंदिर आणि खडकेश्वर आहे . औरंगपुर्यातून डावीकडे गेल्यावर स .भु. शिक्षण संस्थेची सुंदर इमारत आणि मुलींचे शारदा मंदिर आहे . तेथेच औरंगाबादचे पहिले Montessori सुरु झाले होते . ती एक टुमदार इमारत होती. सभु च्या खूप आठवणी आहेत . स. भु .च्या सभागृहात आणि पटांगणात अनेक राजकीय - सामाजिक नेत्यांना ऐकले आहे . मोठ्या सभा पाहिल्या आहेत . अनंत काणेकर मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते , ते संमेलन आठवते . तेंव्हा स्वयंसेवकाचे काम केले होते त्यामुळे त्यावेळचे अनेक साहित्यिक जवळून पाहिले होते . औरंगाबादच्या त्यावेळच्या राजकीय - सामाजिक घटनाबद्दल खूप आठवणी आहेत . त्यावर कधीतरी लिहीन.
ह्यावेळी त्या भागात गेलो नाही . मछलीखडक - सिटी चौकात मात्र फिरून आलो.
.
सिटी पोलीस चौक - ह्या रस्त्यावरूनच शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाकडे मी सायकलवरून जात असे . भडकल गेट ते शहागंज असा एक मोठा रस्ता ह्या पोलीस चौकीवरून जातो . मच्छलीखडक येथेच येऊन मिळतो . |
अप्पा हलवाई - उत्तम मिठाई भंडारला भेट दिली .
सिटी पोलीस चौकाकडे जातानाची मच्छलीखडकाला समांतर गल्ली . |
पद्मविभूषण डॉ गोविंदभाई श्रॉफ ह्यांचे मच्छलीखडकला जाताना सुपारी मारुतीच्या जवळ असलेले घर .त्यांची पत्नी डॉक्टर होती. मुलगाही डॉक्टर आहे . त्यांच्या हॉस्पिटलच्या नावाची पाटी आजही दिसते . |
गुलमंडीवर पोहोचलो . आता तेथे हौद नाही . घड्याळ आहे .द्वारकादास पटेल ह्यांचा पुतळा त्यांची आठवण करून देत होता . हा नगराध्यक्ष रोज सकाळी शहरात फेरफटका मारीत असे व शहर स्वच्छ ठेवत असे . आजही त्यांची ती मूर्ती आठवते .
गुलमंडीवर गेलेकी आठवण येते ती कामाक्षी आणि मेवाड ह्या हॉटेलची . कामाक्षीचा डोसा फार आवडत असे . आता ते हॉटेल नाही . मेवाड आहे . तेथे गेलो . चहा पिला . मालकाशी बोललो . हॉटेल पहिल्यासारखे राहिले नाही .
गुलमंडीवर मेवाड हॉटेल होते . आजही आहे . पाहिल्यासारखे राहिले नाही . |
गुलमंडीचा चौक - आता नव्या इमारती उभ्या आहेत |
पुढील चौकात नवीन दुकाने झाली आहेत . एका कोपऱ्यावर सुरळे कटिंग सलून होते . त्यावरच्या मजल्यावर मधुकर दंडारे रहात असे . तो माझा वर्गमित्र . तो डॉक्टर झाला . आज तो माझा साडू आहे . तेथील नवी इमारत पाहून माझ्या जुन्या आठवणी मात्र जाग्या झाल्या . त्याच्या घरासमोर आमचे गणिताचे प्राध्यापक यशवंत देव सर रहात होते . तेथे आता मोठा मॉल झाला आहे . पुढे चालत पैठण गेटकडे निघालो .
सादिया सिनेमा . औरंगाबादला गुलजार , मोहन आणि सादिया ही ३ सिनेमागृहे होती . त्यापैकी हे एक . |
पैठण गेट |
आता पैठण गेटच्या दुसर्या बाजूला गोविंदभाईचा पुतळा दिसला . त्यांनी मराठवाड्यासाठी - विकासासाठी आयुष्य दिले . नरसिंहराव पंतप्रधान असताना त्यांनी गोविंदभाईंना पदमविभूषण देऊन गौरव केला . औरंगाबादला पैठण गेट - दिल्ली गेट - भडकलं गेट - मकई गेट असे अनेक दरवाजे आहेत . जुन्या शहराचे हे राहिलेले अवशेष . इतिहासाचे साक्षीदार आहेत . तसे औरंगाबाद म्हंटले की बिबीचा मुकबरा , पाणचक्की , अजिंठा-वेरूळ ह्याचीच लोकांना माहिती असते . घरी आलेल्या प्रत्येक पाहुण्याबरोबर मी ही प्रेक्षणीय स्थळे अनेकदा पाहिली आहेत . अलीकडे गेल्या कित्येक वर्षात तिकडे जाणे झाले नाही .
पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ ह्यांचा पैठण गेटवर असलेला हा पुतळा . ते शहराकडे तोंड करून उभे आहेत . शहराची वाईट अवस्था पाहून त्यांना काय वाटत असेल ? असा विचार माझ्या मनात डोकावून गेला |
पैठणगेटकडून गुलमंडीकडे जाणारा हा रस्ता . कोपर्यावर बस थांबा होता . ही दुकाने त्यावेळी नव्हती. |
भडकल गेट जवळ मल्टीपर्पज हायस्कूल होते . दिल्ली गेटजवळ शासकीय महाविद्यालय आणि सरकारी गेस्ट हाउस होते . आमच्या शासकीय महाविद्यालयाच्या मागे हिमायत बाग होती .किलेअर्क , जनाना महल ,मर्दाना महल अशा इमारती होत्या . त्यासंबंधी खूप लिहिण्यासारखे आहे . पुढच्या औरंगाबाद भेटीत फोटो काढून त्यावर लिहीन.
आज उत्तम मिठाई भांडार प्रसिद्ध आहे .त्यावेळी अप्पा हलवाई खूप प्रसिद्ध होता . |
असे हे जुने औरंगाबाद |