Tuesday, March 28, 2017

मोठा कादंबरीकार व्हायचंय .....


सध्या सौम्या भट्टाचार्य ह्याची ' इफ आय कूड टेल यु 'ही कादंबरी वाचायला घेतली . त्यात खालील वाक्ये वाचण्यात आली आणि विचारचक्र सुरु झालं .
It is said that 'Fiction is the higher autobiography'. Most of the fiction writers had used large part of their lives as the material for their body work.
Most of the famous novelists draw their material from their own life.
All fictions are edited experiences. When it comes to recollection, the writer is a past master. Since narrative is what he writes, he has been trained in craft. Recollection is his quarry , his compost heap, his archive. He nurtures it as carefully as if it were a second crop.( If i could tell you - Soumya Bhattacharya )
खरं आहे . कादंबरी म्हणजे दुसरं काय ? तशी ती आत्मचरित्रात्मकच असते . कादंबरीकार हा त्यातून डोकावत असतो. त्यांनी वर्णन केलेली पात्रे , परिसर , आजूबाजूची सामाजिक - राजकीय परिस्थिती त्याच्या परिघाचीच असते. त्याच्याच आजूबाजूचे विश्व असते. कादंबरीकार गोष्टीवेल्हाळ असला की तो ते खुलवून सांगत असतो आणि आपल्याला खिळवून टाकतो . त्यातच त्याची कारागिरी असते.  तसं पाहिलं तर प्रत्येक माणसाचं आयुष्य हे छोट्या मोठ्या कादंबरी सारखंच किंवा दीर्घ कथेसारखं असतं . सर्वांना ते लिहिता येत नाही म्हणून लेखक मोठा. श्री ना पेंडसे असो का चि त्र्यं खानोलकर , भालचंद्र नेमाडे असो का भाऊ पाध्ये , ह्यांच्या कादंबर्यांचा विचार केला तर वाचकांना हा अनुभव येतो. एवढेच काय, जयवंत दळवी असो का पु ल देशपांडे , ह्यांच्या लिखाणातील माणसं त्यांच्या आजूबाजूच्या जीवनातीलच दिसून येतात .
राहता राहिला प्रश्न तो ह्या लेखकांच्या कारगिरीचा. प्रत्येकाची शैली निराळी . प्रतिभा निराळी. खूप वर्षांपूर्वी पेंडसे ह्याची ' लव्हाळी ' ही कादंबरी वाचली होती . त्या कादंबरीचा नायक रोजनिशी लिहीत असतो. त्या रोजनिशीतून कादंबरी आकार घेते. तो त्यावेळी नवा फॉर्म होता . सौम्या भट्टाचार्य ह्यांची ही कादंबरी वाचताना एक नवा फॉर्म पहावयास मिळाला. ह्या आत्मचरित्रात्मक कादंबरीचा नायक आपल्या छोट्या मुलीला पत्रें लिहितो . तिने ती पत्रें मोठी झाल्यावर वाचायची असतात . त्यात तो आपले जीवन उलगडत जातो. ह्या कादंबरीतील एकाही पात्राला नाव दिलेले नाही. नायक आपल्या अपयशाची गाथा जशी सांगत जातो तसे  जगण्यातले ताणतणाव सांगत जातो. चुका सांगतो तसे आनंदाची क्षणचित्रे सांगतो. ह्या नायकाचा एकच ध्यास. मोठा कादंबरीकार/ लेखक व्हायचे. भरपूर पैसे कमवायचे . मोठ्या गाजलेल्या इंग्रजी लेखकासारखे लेखक व्हायचे. काहीतरी वेगळ्या फॉर्ममध्ये फिक्शन लिहायचे. सुरुवातीला जे नमूद केलं ते सार. अशी ही कादंबरी वेगळ्या वळणाची . कलकत्ता , मुंबई , लंडन आणि पुन्हा मुंबई ह्या शहरात राहणाऱ्या व लेखकू होऊ इच्छिणाऱ्या नायकाची .  ही तशी शोकांतिका आहे.नव्या भारतातील नव्या पिढीच्या तरुणाची .
तशी माणसं आपण आजूबाजूला पहात असतोच . प्रत्येकाचं आत्मचरित्र थोडंफार कादंबरीसारखं असतं. ज्याला शक्य आहे त्याने लिहीत जावं. त्यातूनच सकस कादंबरी जन्माला येईल . आपण लिहीत नाही म्हणून अशी आयुष्ये वाचायला मिळत नाहीत . ज्याच्याकडे सांगण्यासाखे खूप आहे त्याने लिहीत रहावे . म्हणून हा लिहिण्याचा खटाटोप .

Thursday, March 2, 2017

फेसबुक लेखनपुराणम


पाच सहा वर्षे झाली असतील . फेसबुकवर स्टेटस टाकण्यासाठी लिखाण करायचे किंवा कंमेंट्स टाकायचं . दिसलं काही किंवा वाचलं काही की हा व्यक्त होण्याचा खेळ सुरु झाला. फेबु उघडलं की कुणी काय लिहिलंय हे वाचलं की मनात सुरु होतं विचारचक्र. मग टाकली प्रतिक्रिया . तितक्याच वेगाने येते तिकडून प्रतिक्रिया आणि पुन्हा सुरु होतो नवा विचार . पुन्हा लिहायचे की सोडून पुढे जायचे हा एक प्रश्न . मला वाटतं लेखकाचं असंच होत असावे. विचारचक्रातील क्रिया- प्रतिक्रिया. तशी ती एक प्रकारची विकृती. फेसबुक ही एक विकृती की व्यक्त होण्याची प्रकृती. नव्हे आजची एक संस्कृती. एक व्यासपीठ. गप्पा मारण्याचं . एकटेपणा घालवायला फिरायला जाण्याचे ठिकाण.
मित्र मिळवण्याचे ठिकाण. तसे हे मित्र प्रत्यक्ष जीवनात भेटलेले असतातच असे नाही .मी तर अनेकांना एकदाही भेटलो नाही. असेच मित्र करीत गेलो. त्यात लेखक , पत्रकार, नाटककार , सामाजिक कार्यकर्ते , राजकीय व्यक्ती , विविध क्षेत्रातील मंडळी आहेत. थोडे नातेवाईक आणि ओळखीची मंडळी आहेतच . 'वाढता वाढता वाढे ',असा हा फेबु मित्रपरिवार . ह्या परिवारात मोदी भक्त आहेत तसेच मोदी द्वेषी आहेत. हा नवा क्लासिफाईड वर्ग मजा आणतो . रोज नवे खाद्य असते.वाचायला , कंमेंट्स मारायला मजा येते. इथे रागलोभ भरपूर . फ्रेंड -अनफ्रेंड करणे चालूच असते. कडाक्याने भांडण झाले की ब्लॉक करणे चालूच असते. काहीजण उपद्रवी असतातच. चालायचंच .
बहुतेक जणांना Like  किंवा कंमेंट करण्याची सवय असतेच .Like हे प्रकरण मोठे गंमतीचे आहे. Like म्हणजे दाद. पण ही दाद कुणाकडून मिळाली हे फार महत्वाचे असते. असे दाद देणारे तसे खरे मित्र असतातच असे नव्हे. दोन दिवसांनी ते कडाडून भांडायला येतात ,एखादी तिरकस कंमेंट टाकून. काही जणांना आपल्याला किती Likes मिळाले ह्याचे कौतुक . तसा एक कंपू असतोच . काहीही न वाचता Like  करून पुढे जाणाऱ्या मित्रांचा.
माझ्या दृष्टीने व्यक्त होणं , इतरांना आपले मत सांगणे , आपला आऊट ऑफ बॉक्स विचार काय आहे , हे सांगणे महत्वाचे आहे.ही सहजप्रवृत्ती .
आपल्या अनुभवात इतरांना सहभागी करून घेणाऱ्या मित्रांचे लिखाण खूप आनंद देऊन जाते . प्रवास , प्रवासातील गंमती जमती , फोटो - स्वतःचे, कार्यक्रमाचे , सामाजिक कार्याचे , भेटीगाठींचे , प्रवासाचे वगैरे . हे फोटो लिखाणापेक्षा खूप काही सांगून जातात.
काहीजण सहानुभूती मिळवण्यासाठी लिहितात तर काही जण अगदी खोल , खाजगी व्यक्तिगत अनुभव सांगून स्वतःचे मन मोकळे करीत असतात. असंख्य व्यक्ती. असंख्य प्रकृती. असंख्य स्वभावाचे नमुने .ही माणसं प्रत्यक्ष पाहिलेली नसतात पण ती कशी आहेत?, ह्याचा थोडा अंदाज येतो. १५ - २० स्टेटसवरून ह्या माणसाचा थोडासा अंदाज येतो.
अपरिचितातून परिचितांची प्रचिती किंवा परिचितातून अपरिचितांची प्रचिती म्हणजे हे फेसबुक विश्व्. तसं अनोखे विश्व्.इथे सगळेच लेखक- वाचक . काहीजण नुसतेच like करून पुढे जाणारे. काही जण किती Like मिळाले हे मोजण्यासाठी पुन्हापुन्हा येणारे. काहीजण पिंक टाकतात तशी कंमेंट टाकून पुढे जाणारे.
फेसबुकवरचे लिखाण म्हणजे मुक्तछंद .नुसते शब्द. लिखाण कधी त्रोटक तर कधी विस्तारित . कधी कट्ट्यावरच्या गप्पा. कधी एखादा परिसंवाद. फेसबुक उघडलं की क्षणाक्षणाला ताजेपणा जाणवतो . त्याचे कारण काही मित्र आपले अनुभव फार छान व्यक्त करतात .ते आपल्याशीच बोलतात असे वाटू लागते. काही जण भांडतात , पुन्हा मित्र होतात . जुन्या कंमेंट्स विसरून जातात. फेसबुकवर आपण एकमेकांना किती जाणून घेणार ? तसं ते आभासी जग . माणूस तसा असतोच असे नाही. असा हा मनोव्यापार येथे चालत असतो.
मला अनेकदा वाटतं ,' मी फेसबुकवर का लिहितो ?' . लक्षात येतं . इथे काही मित्र आहेत. त्यांच्याशी बोलावे. जमलं तर चर्चा करावी . त्यांची नवी बाजू समजून घ्यावी . आपले विचार तपासून बघावे. लोकांचा कल समजून घ्यावा . हे एक चांगलं माध्यम आहे. नव्या युगाचं . जोडणारं . म्हंटलं तर मीटिंग ऑफ माईंड्स. गावगप्पा करण्याचे ठिकाण. राजकारणाची चावडी . एक विरंगुळा .