Thursday, October 6, 2016

आनंदाचे झाड कुठे असते ?


एक जीवनप्रवास ....... सुखाचा .........दु:खाचा .........वेदनेचा........निखळ आनंदाचा........... सुखद सहवासाचा.......... हव्या हव्याशा वाटणाऱ्या कोमल तरल भावनांचा ....... नको असणाऱ्या आठवणींचा ......... यशाच्या ध्येयत्ताऱ्याकडे झेपावणारा ......कधी कधी अगतिकतेचा ......अनेकदा विलक्षण निसर्ग सौंदर्यात हरवलेला ....... तर कधी कधी निसर्गातील भीषण वादळासारखा – नको असणारा – सर्व संपवणारा ..... कधी अंतर्मुखतेकडून अध्यात्माकडे नेणारा .......तर कधी भौतिक सुखाची उधळण करणारा ...... कधी स्वतःला विसरणारा .......तर कधी कधी फक्त स्वतःचाच विचार करणारा ...... मनस्वी ......
आपल्याला सूर्य उर्जा देतो. न चुकता ,नियमितपणे तो त्याचे काम बिनभोबाट खंडही न होऊ देता अविरतपणे चालू ठेवतो. तो रोज सकाळी आपल्याला जागा करतो व जगण्याची नवी आशा निर्माण करून जगण्याचे नवे सामर्थ्य देतो. संध्याकाळी तो मावळल्यानंतर एक उदास अंधार निर्माण करतो. त्या रात्रीच्या गर्भातच असतो उद्याचा उष:काल.
आपलं आयुष्य वाहत राहते ...एखाद्या नदीसारखे – अखंड – न संपणारं ... आपण अनेक अडचणींना तोंड देत पुढे जात असतो . यश-अपयश सामोरे येत असते. नैराश्य आणि आशावाद ह्यांच्या दोन टोकावर आपण झोके घेत असतो. आनंद – सुख , आशा – निराशा ह्यांच्या हिंदोळ्यावर आपण रमतो , दमतो आणि विसावतो.
अगदी छोट्या छोट्या गोष्टीमुळे आपले मन आपला आनंद गमावून बसते . त्याचा शोध घेणे तसे कठीणच असते. साधं बघा . आपला शेजारी , मित्र किंवा नातेवाईक जर आनंदी असेल तर आपणही त्याच्या आनंदात सामील व्हावयास हवं . त्यावेळी आपल्याला दु:ख का बरे वाटावे ? आपण कोणताही पाश न स्वीकारता इतरांच्या सुखदु:खात सामील कां होऊ शकत नाही ?
कोणत्याही दु:खाच्या क्षणी आपण हे लक्षात घेतले पाहिजे की “ हे ही दिवस जातील “. तसेच सुखाचे दिवस येतात नि जातात. ते ही असेच येतील आणि जातील.
हे जग बदलतंय . बदलणारच. बदलत राहणं ( Change ) हा एक स्थायीभाव आहे, हे आपल्या लक्षात असावयास हवं .
आपण आणि आपले जीवन इतक्या विविध गोष्टीवर अवलंबून असतं. अनेक बाह्य घडामोडीमुळे आपल्या जीवनावर सतत परिणाम होत असतो. ‘Expect the Unexpected’, हेच आपल्या लक्षात येत नाही.
आपण आपल्या स्वतःला घडवीत गेले पाहिजे. आपला ‘ आत्मानंद ‘ हेच खरे आनंदाचे स्वरूप आहे . मन:शांती ( Inward Peace ) फार महत्वाची असते. आपल्याला जर खरा आत्मिक आनंद हवा असेल तर आपल्याला जे हवे ( श्रेयस किंवा प्रेयस ) त्याचा आपण त्याग करावयास हवा. आपण आपल्याला विसरायला हवं .चित्रकाराला चित्रातून मिळणारा आनंद , शिल्पकाराला शिल्पकृती पूर्ण झाल्याचा आनंद हे आनंदाचे खरे रूप. तेच आपण शोधले पाहिजे.
प्रत्येकाला आनंदी असावे असेच वाटत असते. कोणालाही दु:ख नकोच असते. दु:ख हे आयुष्याच्या जगण्याच्या अवस्थेशी निगडीत आहे. दु:ख आणि त्रास हा जगण्याचा अविभाज्य भाग आहे . आशा – आकांक्षा हे दु:खाचे मूळ आहे असे गौतम बुद्धाला जाणवले म्हणून तो हिमालयात निघून गेला. जगातला कोणताही माणूस मरेपर्यंत आनंदी राहू शकत नाही. माणूस हा आनंद त्याच्या स्मशान यात्रेलाच घेऊन जातो. जगनं म्हणजे जन्मल्यापासून वेदनेला घेऊन राहणं. आपण म्हणूनच निवृत्त होण्याचा प्रयत्न करावयास हवा. आशेपासून दूर जावयास हवे. निवृत्त होणं व राजीनामा देऊन अलिप्त राहणे म्हणजेच जगण्याच्या हव्यासातून बाहेर पडणे . ते जमलं पाहिजे.
जीवनपूर्तता कशी प्राप्त होईल ? मन खरे कसे समाधानी असेल? ज्याच्याजवळ आपल्यापेक्षा खूप काही आहे ,त्याच्याकडे न बघता आपल्यापेक्षा ज्यांच्याकडे खूप काही नाही व आपल्याकडे इतरांच्यापेक्षा खूप जास्त आहे , असा विचार केला तरच आपण समाधानी होऊ शकू.
एका ख्रिस्त धर्मगुरुनी म्हंटले आहे की , ‘ मी लहान असताना पायातल्या बुटासाठी रडत होतो पण जेव्हा एका व्यक्तीला पायच नाहीत  हे दिसले तेंव्हा मी बुटासाठी रडणे सोडून दिले ‘. आपल्याला अनेक गोष्टी हव्याहव्याशा वाटतात व त्या मिळवण्यासाठी आपण जीवापाड कष्ट करून मिळवतो. परंतु ह्या मिळवलेल्या गोष्टीच अनेक दु:खे निर्माण करीत असतात. अशा मिळवलेल्या वस्तूतून आनंदाच्याऐवजी अनेक दु:खे निर्माण होताना दिसतात आणि आपला भ्रमनिरास होतो. कित्येक लोकांना जगण्यासाठी आवश्यक असलेल्या किमान गरजा उपलब्ध नसतात . तरीही ही मंडळी सुखी-समाधानी कशी असतात ? आनंद ही मनाची एक अवस्था आहे . ही अवस्था आपण कशी प्राप्त करून घ्यायची हे आपण ठरवले पाहिजे .
आपण आत्मकेंद्रित असावयास नको. आपण आत्मप्रौढीपासून दूर असावयास हवे. आपण हे जर करू शकलो तर छोट्या छोट्या गोष्टीमुळे आपले मन दुभंगणार नाही. आपण बौद्धिक आणि आत्मिक  आनंद मिळवू शकू. भौतिक सुखे व पारमार्थिक सुखे ह्याच्याबरोबर आत्मिक सुख ही फारच महत्वाचे आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
भौतिक सुखे मिळाली तरी मन पूर्णपणे समाधानी होईल ह्याची शक्यता नाही. आपण फार छोट्या छोट्या कारणामुळे आनंद गमावून बसत असतो. जर एखाद्याने आपणास जेवणाचे आमंत्रण दिले नाही म्हणून आपण त्याच्यावर राग धरतो. एखाद्या सहकार्याला जास्त पगाराची बढती मिळाली म्हणून आपण चिडतो. आपला सहकारी परदेश प्रवासाला गेला म्हणून आपण जळफळतो. आपल्या मनात नकळत अशा असूया निर्माण होत असतात. त्यामुळे आपण दुसर्यांच्या आनंदात सहभागी होऊ शकत नाहीत.
जगातली सगळीच माणसे खूप छान किंवा खूप वाईट असू शकत नाहीत. अशी एका टोकाची माणसे असू शकत नाहीत. आज चांगली असलेली माणसे उद्याही चांगली असतीलच असे नाही. ती बदलत असतात. जर आपला मित्र किंवा शेजारी त्याला मिळालेल्या यशामुळे आनंदी झाला असेल तर आपणही त्याच्या आनंदात सहभागी व्हावयास हवे.
आपण आपल्या जवळच्या माणसात गुंतणे स्वाभाविक आहे .परंतु न गुंतता गुंतले पाहिजे. आपण एकरूप असून वेगळे असावयास हवे ( Detached Attachment ). कोणत्याही सुखदु:खाच्या क्षणी हे लक्षात ठेवावयास हवे की ‘ हे ही दिवस जातील ‘. नेहमीच सुखाचे किंवा दु:खाचे दिवस नसतात. ते येतात आणि जातात. सुख हे दिवसासारखे असते. रात्र त्या नंतर येतेच. रात्रीच्या गर्भातच उद्याचा उष:काल असतो. ‘ होता होता काळ रात्र झाली ..... ‘ हे लक्षात घेतले पाहिजे. आनंद शोधला पाहिजे . आनंदाच्या झाडाखाली विसावले पाहिजे.


Saturday, October 1, 2016

‘ललित लेणी' तील विचार –सौंदर्य


काही पुस्तके अशी असतात की जी पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटतात . प्रत्येक वेळी मनाला वेगळाच आनंद मिळत असतो. काहीतरी वेगळं सांगितलेले असते. पुस्तकाने मनाची पकड घेतलेली असते. एकदम नवा विचार असतो. अशा पुस्तकापैकी एक मनाची पकड घेणारे पुस्तक म्हणजे डॉ राम मनोहर लोहिया ह्यांच्या हिंदी आणि इंग्रजी लेखांचे मराठीत अनुवाद केलेले पुस्तक ‘ललित लेणी’ . हे साहित्यातले एक सुंदर लेणं आहे एव्हढं नक्की. डॉ राम मनोहर लोहिया हे  एक राजकारणातील वादळी व्यक्तिमत्व. हा एक मोठा माणूस .पण आम्हाला ह्या माणसाचं मोठेपण समजलेच नाही. ह्याचे कारण असे की आम्ही छोटी माणसं एवढी छोटी आहोत की ह्या माणसाचे मोठेपण आपल्याला समजलेच नाही.
डॉ राम मनोहर लोहिया 
लोहियांच्या बाबतीत नेमकं उलटं घडलं. त्याच्याबद्दल अनेक  गैरसमज. लोहिया हे गांधीजींचे शिष्य. तरीही त्यांच्या नशिबी सगळेच उलटे होते. इंग्रजी व पोटभरू वृत्तपत्रांनी लोहियांचे विकृत स्वरूप जनतेसमोर मांडले . ह्या माणसाचे मोठेपण कोणालाच समजले नाही . लोहिया समाजाला पचविता आले नाही.
लोहियांचे राजकारणातील स्थान जरी बाजूला ठेवले तर एक समाजसुधारक , एक अर्थशास्त्रज्ञ , एक सौन्दार्यपूजक असे लोहिया अधिक आकर्षक आहेत. बंडखोर लोहिया त्या वेळच्या तरुणांना समजलेच नाहीत. भारतीय समाजाला लोहिया हा हे समजलेच नाहीत. असे हे लोहिया समजून घ्यायचे असतील तर ‘ललित लेणी ‘ हे त्यांचे पुस्तक वाचलेच पाहिजे. त्यामुळेच हा माणूस अधिक चांगला समजू शकेल . पु ल देशपांडे ह्यांच्यासारख्या मराठी साहित्यिकाने ह्या पुस्तकाला लिहिलेली प्रस्तावना अप्रतिम आहे. ती लोहियांचे खरे व्यक्तिमत्व उभी करते. ह्या पुस्तकातील त्यांचे सर्व लेख अनेक नवे विचार सांगून जातात आणि आपल्याला अधिक विचारप्रवृत्त करतात,
भारतीय संस्कृतीच्या लंब्याचवड्या गप्पा मारणारे आणि तथाकथित राष्ट्रवादाच्या गप्पा मारणार्यांनी   लोहिया विचार समजून घेणे आवश्यक आहेत. लोहिया हे खरे भारतीय संस्कृतीचे पुरस्कर्ते होत. लोहियांनी सुद्धा इतिहास आणि पुराणाचा सखोल अभ्यास केला होता.त्यांनी ह्या देशातील शिल्पसौंदर्याचा व ऐतिहासिक स्थळांचा संपूर्ण अभ्यास केला होता. लोहियांच्या लेखातील काही विचारसौंदर्य वेचून मी येथे सादर करीत आहे.
भारतीय संस्कृती
‘ राम , कृष्ण आणि शिव ही भारतीयांना पडलेली परिपूर्णतेची सुंदर स्वप्ने आहेत. भारतमाते आम्हाला शिवाची मती दे, कृष्णाचे अंत:करण दे व रामाची कृती दे . अपरिमित मन देऊन आमची घडण कर ‘ . असे लिहिणारा हा माणूस भारतीय संस्कृतीचा खरा उपासक नव्हे काय ?
लोहिया म्हणतात , “ जे मन भयहीन , वासनाहीन आणि नैराश्यहीन आहे तेच योग्य विचार करू शकते”. निर्भयता , आशावादी , व निरिच्छता ह्या गुणावरच आपण विचारवंत होऊ शकतो. 
'शिल्प' ह्या लेखात ते म्हणतात इतिहासाचे ग्रंथ कधीतरी नाश पावतात म्हणूनच की काय भारतीय जनतेने अनंत काळ प्रचलित राहणाऱ्या कथा अनेक कहाण्याद्वारे लोकांना सांगून ठेवल्या आहेत. इतिहास संतापला . त्याने आपल्यावर सूड घेतला, असे असले तरी भारतीय धर्माने आपली कथा म्हणूनच पाषाणावर चितारली. त्यामुळे हजारो वर्षाची ही संस्कृती शिल्लक राहिली . वाढली .विकसित झाली.
आपल्या कलाकारांनी शिल्पातून बुद्धाचे निरनिराळे रूप दाखविले आहे . त्याबद्दल ते लिहितात ,’ क्रॉसवर हातापायांना खिळे ठोकलेले जसे ख्रिस्ताचे एकच रूप दिसते पण बुद्ध व महावीर ह्यांची निरनिराळी रूपे दिसतात. कोठे चिंतामग्न , कोठे दया किंवा अभय दाखविणारे तर कोठे विकारावर विजय मिळवणारे योगी दिसतात.' आपले भारतीय शिल्पकार हे संपूर्णपणे स्वतंत्र होते आणि त्यांच्या प्रतिभा शैलीला पूर्ण स्वातंत्र्य होते. ' हेच ते वेगळेपण सहज दिसून येते. श्रवणबेळगोळाची महावीराची मूर्ती पाहून लोहीयाना वाटले , ‘ माणसाला आपल्यावर कधीच विजय मिळविता येत नसतो. मनाच्या बैलाला पकडण्यात यश मिळवले तरी त्याला मोकळे सोडता कामा नये "
शिवाचे पुराणातील व्यक्तिमत्व पाहताना त्यांना वाटले,"पुढच्या क्षणाविषयी माणसाची उत्सुकता कदाचित संपूर्णतया कधीच नाहीशी होणार नाही, परंतु वर्तमानकाळात स्वतः बरेचसे गुंतवून घेऊन त्यातून अधिक फलप्राप्ती करणे त्याला शक्य आहे"
अर्ध्या बाजूने स्त्री आणि अर्ध्या बाजूने पुरुष असलेल्या अर्धनारी नतेशेअरच्य मूर्तीकडे पाहून त्यांना वाटते "अर्धागाने पार्वती आणि अर्धागाने शंकर असलेले अर्धनारी नटेश्वराचे रूप म्हणजे एक सर्वोच्च आणि सजीव असे सारे भेद मिटविणारे सृजन आहे ".
भारतीय कलाकेंद्रे प्रमुख शहरापासून दूर आहेत. का ? तर भारतीय इतिहासाचा आत्मा परक्यांच्या नजरेचे , जिच्यावर सतत आघात होत असतात अशी एक नाजूक सुंदरी आहे म्हणून येणाऱ्या –जाणार्यांची आकस्मिक नजर जाणार नाही अशा दूरच्या व निर्जन ठिकाणी ही सुंदरी शिल्पे लपून राहिली आहेत. त्यांची निर्मिती म्हणूनच अशा दूर ठिकाणी केलेली आहे. संस्कृती जपण्याचा हा प्रयत्न दिसतोय.
प्रेम हे सौंदर्याचे जुळे भावंड
सांची , अजिंठा , वेरूळ , नालंदा व चितोड ही भारतीय अवशेशाची व कलाकृतींची चार महत्वाची केंद्रे. ती केंद्रे म्हणजे एक प्रकारे संस्थाच होत. अजंठाबद्दल ते म्हणतात , ‘ ही लेणी म्हणजे भारतीय माणसाचा इतिहास’ आहे' .वेरूळचा विजयस्तंभ पाहून त्यांना वाटते ,’ महान वस्तूतील सौंदर्य समजायला थोडा वेळ लागतो. म्हणून पुन्हा पुन्हा पाहिल्या म्हणजे त्याचा अर्थ उलगडू लागतो’. तर चितोडचा विजयस्तंभ हा ‘ जीव कासावीस करणारे सौंदर्य आहे ‘ , असे त्यांना वाटते. हा मनोहर विजयस्तंभ उभा करून आपला जणू विजयच झाला असे पराभूत रजपुताना तर वाटलं नसावं ? ,असा विचार ते व्यक्त करतात.
दौलताबादचा छोटा स्तंभ पाहून त्यांना वाटते , ‘ ध्येय उच्च पण त्या मानाने साध्य करण्याचे  प्रयत्न छोटे’. असे हे प्रतिक. आपल्या संस्कृतीच्या अपयशाचे द्योतक.
पाषाणातील सुंदर युवती सर्वाना का आकर्षित करतात ? एखादी प्रिय व्यक्ती सुंदर वाटणे किंवा पूर्णत्वाने दिसणे ही गोष्ट योगायोगावर किंवा पाहणार्याच्या वयावर अवलंबून असते'. शिसवीच्या लाकडासारख्या काळ्या अथवा हस्तीदन्तासारखा फिकट पिवळ्या रंगाचा किंवा रागीट अथवा मट्ठ अथवा कुरूप चेहराही कधी कधी कोणाकोणाला मोहक दिसतो. सयामी जुळ्याप्रमाणे प्रेम हे देखील सौंदर्याचे जुळे भावंड आहे. एखाद्या व्यक्तीवर प्रेम असले म्हणजे ती सुंदर दिसू लागते. ते खरेच आहे.
भरवेगाने धावणारी गंगा व संथ वाहणारी यमुना हे भारतीय शिल्पकारांचे दोन अत्यंत प्रिय विषय. गंगा ही विवाहित प्रौढ स्त्री तर अवखळ असणारी यमुना ही नवजात बालिकाच आहे , असे त्यांना वाटते.
लोहिया ब्रम्हचारी होते तरी ते स्त्री सौंदर्याचे पूजक होते . ते कोणार्क बद्दल सांगतात ..
कोणार्क इतका ठसकेदार स्त्री सौंदर्याचा अविष्कार जगात कोठेही सापडणार नाही. कोणार्क येथील शिल्पात संगीत गाणार्या अनेक युवतींची सुंदर चित्रे आहेत. ते तेथे चढून त्या युवतीचे डोळे ,  ओठ नि शरीराची सुंदर वक्राकार वळणे ह्यावर हात फिरवून पाहतात व त्यांना वाटते ..’ ह्या मानवी युवती नसून पाषाण रूप घेतलेल्या अदृश्य स्वर्गीय आकृती आहेत' – असा हा खरा सौंदर्यपूजक माणूस.
शिल्पकृती विध्वंसक व नष्ट करणाऱ्या रोगट मनोवृत्तीबद्दल त्यांना अतिशय राग आहे. ते म्हणतात –‘ खेड्यातील मूर्ख विध्वंसक व षंढ सुसंकृत लोक आपल्या पूर्वजांनी निर्मिलेल्या कलाकृतीचे जतन तर करू शकले नाहीतच पण नवनिर्मितीही करू शकले नाहीत हेच आपले दुर्दैव.
ते पुढे म्हणतात ,"‘नवनिर्मिती हे स्वतंत्र व सार्थ जीवनाचे प्रतिक होय".
शबरीच्या लोककथेबद्दल सांगताना ते लिहितात.......
‘ काहीतरी असामान्य बंधनाने बांधले गेल्याशिवाय कोणीही स्त्री-पुरुष एकमेकाचे उच्छिष्ट खात नाहीत’. मागास जाती आणि आदिवासी जमाती यांच्या संशोधनाकडे आपण पुरेसे लक्ष दिले पाहिजे . हे संशोधन एका सोन्याच्या खाणीचे संशोधन आहे,असे त्यांना वाटते व त्यांची बघण्याची दृष्टी सर्वस्वी वेगळी आहे.
एके ठिकाणी ते लिहितात ,'हिंदुस्तानच्या भूतकाळाचा शोध हेच त्याचे भविष्यकालीन पुनरज्जीवनही आहे'.
भारतीय लिप्याबद्दल ते म्हणतात , ‘ भारतातील लिप्या या देखील भारतीयांची सारभूत एकता सिद्ध करतात. भारतीय लिप्या ही नागरी लिपिचीच अदलतीबदलती स्वरूपे आहेत.  प्रत्येक गोष्टीवर सुंदरतेचा साज चढविण्याची वृत्ती त्यांच्या लिप्यामध्ये प्रगट झाली आहे. उर्दू व्यतिरिक्त सर्व लिप्या या ध्वनी व आकार या दृष्टीने ९९ % सारख्या आहेत. ९० अंशाच्या कोनाने नागरी लिपी वळविल्यास कानडी अक्षर तयार होते. तमिळ आणि बंगाली लिप्यात दावा कल आणि दोन रेषांनी जोडणे हा प्रकार आहे. असा त्यांचा पाहण्याचा वेगळा भारतीय दृष्टीकोन दिसून येतो. 
महान मानवतेची गाथा
बुभुक्षित माणसाला धर्माचे बंधन नसते , हे खरे नव्हे काय ? उदात्त आशा ,आकांक्षा ,जीवन शक्ती असलेल्या अदम्य कथा , देशाचा प्रादेशिक आणि दैवी इतिहास ह्यां सर्वांची नोंदवही म्हणजे आपली पुराणे. पुराणांचा हेतू सर्वसमावेशक आहे. श्रेष्ठ पुराणकथा म्हणजे सुंदर महाकाव्य व मन र्माव्नार्या लोककथा . पुराणं म्हणजे अनेक लघुकथा किंवा कादंबरया. त्यात अनेक नाट्य विषय आहेत. नाट्य , शास्त्र , काव्य , वेधक कथा , मनोरंजन ह्यांचा मनोहर संगम म्हणजे आपली पुराणं . पूरक म्हणजे कधीच अंत नसलेली कादंबरी. त्यात असतात जनतेच्या रक्तमांसाच्या पेशी. आपली पुराणे ही महान मानवतेची  गाथा आहे. असाही एक बघण्याचा वेगळा दृष्टीकोन.
एके ठिकाणी ते लिहितात ,'हास्य व स्वप्ने अर्थशून्यच असतात पण माणसावर त्याचा विलक्षण प्रभाव पडत असतो. कारण ती माणसाचे अंत: करण विशाल बनवतात. राम म्हणजे मर्यादित व्यक्तित्व पूर्णत्वास पोचल्याचे प्रतिक आहे म्हणून तो सर्व भारतीयांच्या मनात वसलेला आहे – नियोजन व्यवस्था व बाह्याचारावर कायदेकानूनचे बंधन व अंतरीच्या स्वविवेक बुद्धीवर नियंत्रण या दोन गुणांचा  राम हा खरा प्रतिक आहे. धर्माच्या विजयासाठी अधर्माबरोबर वागले पाहिजे ह्याचे प्रतिक म्हणजे कृष्ण.  म्हणूनच राम आणि कृष्ण ही भारतीयांना पडलेली सुंदर स्वप्ने आहेत,

असे एक ना अनेक उतारे त्यांच्या लेखातून देता येतील. खरं म्हणजे हे पुस्तक अप्रतिम आहे. नव्या विचारांनी नटलेले आहे.विचार करावयास लावणारे आहे. संग्रही ठेवण्यासारखे आहे. लोहियांचे खरं भारतीय व्यक्तिमत्व ह्या पुस्तकातून प्रकट होतं . लोहिया ह्यांचे इंग्रजीवर विलाक्ष्ण प्रभुत्व होते. ते हिंदीचे कट्टर पुरस्कर्ते होते. अस्सल इंग्रजी बोलणार्यास लाजवील असा त्यांचा इंग्रजी भाषेचा अभ्यास होता. मुळातच त्यांचे इंग्रजी लिखाण वाचणे अधिक आनंद देणारे आहे. पण मराठीतले हे ‘ ललित लेणं ‘ मला तर मराठी साहित्यातील ‘ वेरुळचे कैलास लेणं ‘ असल्यासारखं वाटते. मला लोहिया जे काही थोडे बहुत समजले ते त्यांच्या ह्या पुस्तकातून. म्हणून हे ‘ ललित लेणं ‘ मला अधिक मोलाचं व जवळचं वाटते. 
( हा लेख १९६९ साली दैनिक मराठवाडा ह्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला होता. )