Monday, September 12, 2016

डिजिटल क्रांती : साक्षरता अभियान आणि ई-लर्निंग


४० तासात साक्षर व्हा

मरोल येथील साक्षरता केंद्रात शिकणारया स्त्रिया – उर्दू , तमिळ ,हिंदी आणि मराठी भाषेतून शिक्षण उपलब्ध
भारतात ३५ कोटी लोक निरक्षर आहेत . त्यांना साक्षर करण्याचे काम अतिशय अवघड आहे. त्यात निरनिराळे वयोगट आहेत . स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे. आपल्या देशाच्या विकासाच्या वाटचालीत निरक्षर प्रौढाना साक्षर करणे अत्यंत आवश्यक आहे. गरिबी आणि निरक्षरता ह्या दोन कारणामुळे विकासाची गती खुंटली आहे. त्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे . १५ ते ३० वयोगटातील हे निरक्षर लोक शाळेत जाण्यासाठी तयार नसतात. वृद्धाना त्यांच्या मुला-मुलीकडून शिकायचे नसते . पोटापाण्यासाठी त्यांना छोटीमोठी कामे करावी लागतात. त्यातून त्यांना वेळ मिळू शकत नाही. त्यांची इच्छा ही नसते. आता ह्या वयात शिकून काय करायचे ?,  असा त्यांचा मूळ प्रश्न. एकदा वय वाढल्यानंतर साक्षर करणे फार कठीण असते. त्यांना विकासात सहभागी करून घ्यायचे असेल तर त्यांना किमान लिहिणे – वाचणे आले पाहिजे . साक्षर असलेल्या व्यक्तीलाच  अधिक चांगल्या प्रकारचे काम  मिळू शकते . त्या व्यक्ती  समाजात इतरांशी अधिक चांगला संवाद साधू शकतात आणि चांगला व्यवहार करू शकतात. त्यांना  स्वतःची स्वाक्षरी करता आली पाहिजे . निरनिराळे फॉर्म भरता आले पाहिजेत. हिशोब समजला पाहिजे आणि किमान दोन अंकी  आकडेमोड आली पाहिजे.  ह्या लोकांना साक्षर करण्यासाठी नवे डिजिटल तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे . प्रौढ शिक्षण सहज शक्य आहे . नव्या डिजिटल क्रांतीमुळे ४० तासात निरक्षर लोकांना साक्षर करणे सहज शक्य आहे . या . वर्गात बसा .एक तास टीव्ही पहात असतात तसे स्क्रीनवर बघा आणि हसत खेळत शिका . टीव्हीवर जशी सिरीयल नेमाने बघतात तसे हे ४०- ५० धडे नुसते मन लावून ऐका .३०० ते ५०० शब्दांची ओळख होईल आणि हे निरक्षर लोक वर्तमानपत्र वाचू लागतील .हे शक्य झाले आहे .ह्या योजनेत २ लाख निरक्षर लोक साक्षर झाले आहेत.
साक्षरता केंद्र , जोगेश्वरी
ह्या साक्षरता अभियानासाठी टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस ( टीसीएस )चे पूर्वीचे संचालक फकीरचंद कोहली ह्यांनी संगणकीय तंत्रज्ञानाच्या आधारे एक योजना राबवली . त्यासाठी विशेष संगणकीय प्रणाली तयार केली . प्रौढ शिक्षणतज्ञाचा सल्ला घेऊन एक अतिशय सोपी प्रणाली तयार केली. Audio-Visual तंत्र असल्यामुळे प्रौढ निरक्षर लोक ऐकत–पहात शिकतात . कोणत्याही शिक्षकाची  गरज नसते . क्लिक करा आणि कार्यक्रम बघा . Animation तंत्र वापरून वर्गपाठ  आखलेला असतो.  ह्या प्रणालीमुळे रोज नवे शिकता येते .रोज थोडी थोडी शब्दांची ओळख होत जाते . शिकण्याचा उत्साह वाढत जातो. रोज वर्गावर यावेसे वाटते. आधी शब्द समजू लागतात आणि मग अक्षरओळख होते . निरक्षर व्यक्तीला शब्द माहित असतातच. त्यांना अक्षरओळख नसते. 'शब्दातून अक्षराकडे', असा हा प्रवास आहे. शब्द ओळखू लागले की अक्षरांची ओळख होत जाते . रोज ३० शब्द समजतात .पाच शब्द एका मिनिटात लिहिता येतात .१ ते १०० आकडे मोजता-लिहिता येतात. तीन आकडी बेरीज–वजाबाकी करता येते. दोन आकडी गुणाकार-भागाकार करता येतो. असे हे सोपे तंत्रज्ञान आहे .
‘पोलियो मुक्त जग’ हे स्वप्न साकार झाल्यानंतर रोटरी ( Rotary International) ह्या जागतिक संस्थेने TEACH हा कार्यक्रम हाती घेतला आहे.
T  - Teacher Support
E   - e-Learning
A   - Adult Literacy
C   - Child Development
H   - Happy School
हे उद्देश समोर ठेऊन आमच्या रोटरी क्लब ऑफ मुंबई अंधेरी ह्या संस्थेने ह्या क्षेत्रात काम् सुरु केले व गेल्या दोन वर्षात अंधेरी आणि आजूबाजूच्या भागात ८ साक्षरता केंद्र आणि ८ e-Learning ( ५ वी ते १०वी साठी ) केंद्र सुरु केली आहेत.
 डॉ नरेंद्र गंगाखेडकर ‘साक्षरतेसाठी डिजिटल तंत्रज्ञान’ ह्या विषयावर बोलताना .जकॉब कोशी , अध्यक्ष , रोटरी क्लब ऑफ मुंबई अंधेरी अध्यक्षस्थानी . 
ह्या केंद्रात संगणक किंवा Laptop , प्रोजेक्टर , स्क्रीन , संगणक प्रणाली ( अभ्यासक्रम + टीसीएस साक्षरता अभ्यासक्रम ) देण्यात आले आहेत . शिक्षकांना प्रशिक्षित केले आहे . साक्षरतेच्या वर्गात प्रत्येक विद्यार्थ्याला एक पाटी आणि खडू दिला की काम झाले . ऐकणे आणि पाहणे ह्या दोन प्रक्रियेतून शब्दांची ओळख होते व त्यांना अक्षरे  लिहिणे जमू लागते.
Eduprojector with Pen Drive and Speaker Connection :  कोलडोंगरी साक्षरता वर्ग उद्घाटन
अलीकडे संगणकाची आवश्यकता नसते . एक LED Projector ( Tirubaa Eduprojector)  असतो. त्यात पेन drive असतो . तेथे प्रणाली असते. त्याला स्पीकर जोडलेला असतो. स्क्रीनवर सर्व दिसते व ऐकता येते. क्लिक केले की यंत्र सुरु होते. बटन दाबा. पडद्यावर  बघा आणि शिक्षित व्हा . असा हा प्रयोग. खरी डिजिटल क्रांती. तिचा संबंध साक्षरतेशी जोडण्यात यश आले आहे.
प्लग आणि प्ले – बटन दाबा आणि चालू करा . शिक्षक , विद्यार्थी आणि शाळेतील सहाय्यक सहज ह्याचा वापर करू शकतात . ह्यासाठी संगणकाची आवश्यकता नाही. 
कोलडोंगरी रात्रशाळा : ई-लर्निंग ९ वी-१० वीचे विद्यार्थी
रात्रशाळा , दीक्षित रोड , विलेपार्ले , समर्थ रात्रशाळा ,कोलडोंगरी, शामनगर जोगेश्वरी , रात्रशाळा , जोगेश्वरी पूर्व , मरोल येथे केवळ स्त्रीयांच्यासाठी ( तमिळ , उर्दू , हिंदी आणि मराठी ) केंद्र , श्रमिक विद्यालय , जोगेश्वरी, गुरु नानक विद्यालय , महाकाली , ह्या ठिकाणी ही केंद्रे आमच्या रोटरी क्लब तर्फे चालू आहेत.
Wow!!! Just Click and Learn. Very useful technology for learning , improving and understanding. It is a self-learning coaching class for students who can't afford to go for commercial coaching class. 
 “ वाह SS , बटन दाबा , टीव्ही बघा. ४० इपिसोड बघा आणि साक्षर व्हा” , अशी प्रतिक्रिया जोगेश्वरीच्या केंद्र संचालकाची. काही महाविद्यालयीन मुले आणि मुली हे केंद्र चालविण्यासाठी मदत करतात. निरक्षरांना मार्गदर्शन करतात.
कोलडोंगरीचे पोरटेकर सर म्हणाले , ‘ हा संगणक म्हणजे शिक्षकांचा सहाय्यक आहे. रात्रशाळेतील विद्यार्थ्यासाठी पैसे न भरता ट्युशन क्लास आहे . परीक्षेत गुण नक्कीच वाढणार . तो खरा टयूटर आहे.”
जनता रात्रशाळा, विलेपार्लेचे मुख्याध्यापक ह्यांना प्रौढ साक्षरता अभ्यासक्रम खूप वेगळा वाटतो. हे प्रौढ सहसा शिकायला तयार नसतात . त्यांना थोडा न्यूनगंड असतो. शिकण्याची भीती वाटत असते. नवीन तंत्रांचा वापर करून चांगला  प्रयोग केला आहे , असे मत त्यांनी व्यक्त केले.
कोलडोंगरीचे पाटील सर म्हणाले , ‘ सोपे करून कसे शिकवावे , हे आम्हा शिक्षकांना आता चांगले समजले आहे . प्रशिक्षित शिक्षक असण्याची गरज नाही .संगणक हाच एक शिक्षक . तो अभ्यास करून घेतो. प्रश्नाचे उत्तर बरोबर का चूक, हे ही सांगतो . त्यांच्या शाळेत मुलांची गुणवत्ता ५० टक्क्यांनी वाढली आहे. मुले आवडीने वर्गात बसू लागली आहेत.Animation तंत्रामुळे मुले हसतखेळत शिकतात. शिक्षक कार्यक्रम सुरु करून इतर कामे पूर्ण करतात .” ई–लर्निंगसाठी बाजारात विविध प्रकारच्या प्रणाली उपलब्ध आहेत. अभ्यासक्रमाप्रमाणे ह्या प्रणाली तयार केल्या जातात. त्यासाठी अनेक कंपन्या कार्यरत आहेत.
ह्या दोन मुलांची शाळा सुटली होती. लिहिता – वाचता येत नव्हते . ४० तासात त्यांना लोकसत्ता हे वर्तमानपत्र वाचता येऊ लागले.
मी कोलडोंगरीच्या रात्रशाळेत गेलो. केंद्र प्रमुखांनी दोन १६-१८ वयाची मुले माझ्यासमोर उभी केली. त्यांना लिहिता वाचता येत नव्हते . शाळा सोडून बरीच वर्षे झाली होती. एक झिरोक्स मशीन चालवीत असे तर एक वायरमन होता . अशाच एका वायरमनचा सहाय्यक असताना थोडेसे वायरिंग शिकलेला . ते दोघे ४० तास क्लासला आले .  त्यांना किती लिहिता–वाचतां येते हे पहावे म्हणून मी त्यांची छोटी परीक्षा घेतली. मी समोरचा लोकसत्ता त्यांना वाचायला दिला . एका मुलाने अग्रलेख भरभर वाचून दाखविला तर दुसरा थोडे अडखळत वाचत होता . जोडाक्षरे थोडी चुकत होती. त्या मुलांना खूप आनंद झाला होता . त्यांना शिकण्याची गोडी निर्माण झाली . वायरमनला आम्ही एक वायरिंगचे पुस्तक भेट दिले . त्याला ते वाचता येऊ लागले. त्याला अर्थ समजल्यामुळे त्याला त्याच्या कामात अधिक गोडी निर्माण झाली.
महाकालीच्या वृद्ध आजीना आपल्याला वाचता येते ह्याचा इतका आनंद झाला की त्या नातवाबरोबर अभ्यास करू लागल्यात. आपल्याला बसचा नंबर वाचता येतो , स्टेशन कोणते आले हे नाव वाचून समजते ,बँकेत सही करता येते आणि वर्तमानपत्रातील ठळक बातम्या सहज वाचता येतात ह्याचा आनंद अधिक झाला.
सर्वच मोठ्या खाजगी शाळातून संगणक आणि ई-लर्निंग उपलब्ध असतेच. त्यांच्याकडून पैसेही तसेच घेतात. ती मुले संगणक चांगले वापरतात. रात्रशाळा आणि महापालिकेच्या शाळेतील मुलांना ई-लर्निंग माहित नसतेच. ट्युशन क्लास माहित नसतो. अभ्यासात मदत करणारा हा संगणक आणि ही नवी संगणक अभ्यासप्रणाली त्यांच्यात बदल घडवून आणीत आहे.
आमचा रोटरी क्लब आणि मुंबईतील १२० इतर रोटरी क्लब TEACH ह्या प्रकल्पात रमलो आहोत. त्यासाठीचे आर्थिक सहाय्य आम्ही करीतच असतो. अनेक रात्रशाळा आणि प्रौढ शिक्षण वर्ग आम्ही दत्तक घेतले आहेत. हा खारीचा वाटा उचलताना आम्हाला आनंद तर मिळतोच. पण साक्षर झालेल्या प्रौढांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून आम्हाला अधिक आनंद होतो .

       1)The CBFL is developed and implemented by: TCS Corporate Adult Literacy Program (ALP) Group Tata Consultancy Services Ltd. 11th Floor, Air India Building, Nariman Point, Mumbai 400 021, Maharashtra, India Tel : (022) 6778 9393, (022) 6778 9378 (Direct) Fax : (022) 6778 9344 Email : Corporate.CBFL@tcs.com  For more details visit : www.tcs.com/cs 
      2)Contact for e-learning programs and Edu-projector. Sanjiv Kadam, Chief Operating Officer, Tirubaa Technologies Pvt Ltd , Mobile:+91 8805373500, Mail ID:sanjivk@tirubaa.co

     डॉ. नरेंद्र गंगाखेडकर (narendra.gangakhedkar@gmail.com)