Wednesday, February 10, 2016

वृद्धाश्रम


एकदा जॉर्डनहून मुंबईकडे परतताना विमानात माझ्या शेजारी एक मुंबईतील तरुण होता. तो इस्रालयमध्ये काम करीत होता. सहज गप्पा मारताना मी त्याची माहिती काढत होतो . 'काय करतोस ? घरी कोण कोण आहेत ? ',वगैरे. लग्न झालेला , एक ३-४ वर्षाचा मुलगा असलेला , मुंबईतील कमी पगाराची नोकरी सोडून इस्रालायला एकटाच गेलेला. 'काय करतोस ? इस्रालयमध्ये ? '.तो म्हणाला,'एका वृद्ध कुटुंबाची देखभाल करतो . त्यांच्याच घरात राहतो . त्यांचे सर्व काम करतो. I am their Assistant . पगार खूप मिळतो . घरी पैसे पाठवितो'. इस्रालयमध्ये वयस्कर मंडळी खूप आहेत. त्यांचे पाहण्यासाठी घरात कोणी नसते. त्याच्यासारखी ४० भारतीय मुलं हे काम करतात. मी त्याला सहज विचारलं , 'तुझे आई - वडील , त्यांचे वय , त्यांच्याकडे कोण पाहतं ?'. त्याचे वृद्ध आई- वडील कोकणातील एका खेड्यात रहातात . तो म्हणाला , ' मी त्यांच्याकरिता काही करू शकत नाही ' आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं .
मी अंधेरीत राहतो. आम्ही रोटरीच्या कामानिमित्त अनेक वृद्धाश्रमाना भेटी देत असतो . अंधेरीत होली फ्यामिली चर्चचे अनेक सामाजिक उपक्रम चालू आहेत. त्यापैकी एक Old Age Home . अतिशय चांगला वृद्धाश्रम. वृद्धांच्यासाठी इतके चांगले वृद्धाश्रम माझ्या पाहण्यात नाही. चर्चकडे खूप पैसा असतो. मिशनरीवृत्तीने काम करणारी ही मंडळी. हिंदूंची अनेक श्रीमंत देवळे आहेत. पण कोणीही अशी वृद्धाश्रमे चालवीत नाहीत . बदललेल्या जगात अशी वृद्धाश्रमांची गरज आहे . हे अजून त्यांच्या लक्षात येऊ नये ह्याचेच वाईट वाटते.
वृद्धाश्रमातील वृद्धांशी बोलताना एक वृद्ध म्हणाले , ' आम्हाला तशी कसलीही गरज नसते. आठवड्यातून एखादा तास काढून आमच्याशी गप्पा मारायला येत जा . तरुण मुलं आमच्याशी बोलायलाच येत नाहीत '. एक वृद्ध आजी म्हणाल्या , ' काही नको , लहान मुला- मुलीबरोबर गोष्टी करायच्या असतात , खेळायचे असते ' . आमच्या बरोबर आम्ही एका शाळेतील काही मुलं- मुली घेऊन गेलो होतो. त्या मुलांनी आजोबा - आजी दत्तक घेतले आणि दर रविवारी एक तास ते त्यांना भेटायला जाऊ लागले .