सध्या मी माझी धाकटी मुलगी ऋतूगंधा हिच्याकडे अमेरिकेत आलो आहे. काल बंगलोरहून माझी मोठी मुलगी क्षितिजाचा फोन आला . रवी माझा मोठा भाऊ गेला हे कळले. एक महिन्यापूर्वीच त्याच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आम्ही औरंगाबादला गेलो होतो. ती शेवटची भेट. ह्या वेळी त्याची अवस्था फारच वाईट होती. प्रकृती खूपच बिघडलेली होती. Progressive Supranuclear Palsy असा असाध्य रोग गेल्या ५-७ वर्षापासून खूपच बळावला होता. वाचा जाऊन ३-४ वर्षे होऊन गेली. डोळे ताठरले होते. पापण्यांची उघडझाप होत नसे. चालणे – उठून बसणे केंव्हाच बंद झाले होते. जेवणही घेता येत नसे. ८-महिन्यापूर्वी भेटलो तेंव्हा प्रकृती तेवढी वाईट नव्हती. त्याची जीवनेच्छाच नाहीशी झाली होती. असे जगणे नकोच असे त्याला वाटू लागले. फक्त समोरचा माणूस ओळखत असे. त्याला आपले बोलणे समजत असे. प्रतिसाद देता येत नसे. घशातून Humming Sound बाहेर पडे. गेले कित्येक दिवस तो असाच बिछान्यावर पडून होता. वैद्यकीय उपचार करून उपयोग झालाच नाही. अशी ही अवस्था पाहून मन उदास होत असे. कुणालाच त्याच्यासाठी काहीच करता येत नसे. असे हे दुखणे आणि परावलंबित्व फार कठीण. उर्मिला वहिनीनी त्याचे सर्व केले. ते फारच कठीण जगणे होते. मी औरंगाबादला गेलो की आवर्जून भेटण्यासाठी जात असे.त्याची अशी अवस्था पाहिलीकी मन फार उदास होत असे. माणसाचे असे जगणे खरोखरच कठीण असते. काय करावे , काहीच सुचत नाही.माणूस हतबल होतो. निराश होतो. नातेवाईक दु:खी कष्टी होतात. पण सह्धर्मचारीणीला सगळे करावे लागते. सहन करावे लागते. शारीरिक आणि मानसिक त्रास होतो.
आज सारेच संपले. मन उदास झाले. काहीच सुचत नाही. दिवसभर जुन्या आठवणी समोर येतात. ते लहानपणीचे दिवस आठवतात. आमच्या दोघात अडीच तीन वर्षाचे अंतर असेल. आम्हाला नवल्या-दहील्याची जोडी असेच म्हणायचे . आम्ही दोघे नेहमी एकत्रच असू. शाळा- कॉलेज एकच होते. नेहमी एकत्रच फिरणे. दोघानाही वाचनाची – लिहिण्याची खूप आवड. मराठी साहित्याची खूप आवड. दर उन्हाळयाच्या सुट्टीत आम्ही दोघे मिळून 'ज्ञानदीप' नावाचे हस्तलिखित मासिक काढीत असू. आमचेच लेख. आमचेच संपादकीय. आमचीच सजावट. मराठवाड्यातील साहित्यिक मंडळींचे अभिप्राय मिळवीत असू. न शे पोहनेरकर , वसंत कुंभोजकर ह्यांनी आमचे खूप कौतुक केले होते . ते आठवते. एकमेकामुळे वाचन चालूच असे. त्याने पुढे पत्रकारितेचा व्यवसाय स्वीकारला तो ह्या आवडीमुळेच.
आम्ही सहा भाऊ. माझे वडील हैद्राबादला स्थाईक झालेले. १९५६ नंतर राज्यपुनर्रचना झाली आणि आम्ही औरंगाबादला स्थाईक झालो. त्यामुळे बालपणाचा काही काल हैद्राबादेतच गेला.. रवी आमच्या प्रयाग मावशीचा खूप लाडका. तिला अनेक वर्षे मूल नव्हते. त्यामुळे ती रवीला आपला मुलगाच समजत असे. त्याचे बालपण तिच्याकडेच गेले. तो तिचा खूप लाडका होता. लोहगावकर काका त्याचे खूप लाड करीत असत. त्यामुळे त्याने लहानपणीचा बराचसा काळ परभणीला मावशीच्याकडेच काढला होता. तो त्यांच्याकडेच राहिला होता. त्यानंतर जेव्हा आम्ही औरंगाबादला आलो त्यावेळेपासून एकत्रच होतो. शाळा – कॉलेज मध्ये एकत्रच जात होतो.
आम्ही दोघेही विज्ञानाचे विद्यार्थी. एकाच महाविद्यालयात पुढे मागे. औरंगाबादच्या शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयात शिकत होतो. रवी विज्ञान मंडळावर निवडून आला होता. त्याने विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकांचे राजकारण खूप खेळले. त्याचा संपर्क आणि मित्र परिवार खूप होता. बालाजी भोसकर आणि ललित पाठक हे त्याचे खास मित्र.त्यामुळे ते माझेही चांगले मित्र. भोसकर आणि रवी दोघेही कॉलेजच्या मंडळावर निवडून आले.त्यांनी महाविद्यालयात अनेक कार्यक्रम घडवून आणले. कॉलेज खूप गाजवले. त्याचे एक व्हायचे. परीक्षेच्या काळात तो रात्ररात्र अभ्यास करीत असे आणि त्याच काळात आजारी पडे. त्यामुळे पदवी परीक्षेच्या तिसऱ्या वर्षी तो नेमका खूप आजारी पडला आणि त्यामुळे परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला नाही.निराश होऊन त्याने शिक्षण तसेच अर्धवट सोडून दिले आणि तो परभणीला एका शाळेत शिक्षक झाला. त्याचे परभणीला असे निघून जाणे माझ्या वडिलांना मुळीच आवडले नव्हते. दोन- तीन वर्षांनी खाजगीरित्या परीक्षेला बसून तो बी.ए .झाला . पदवी मिळवली. शिक्षकी पेशा स्विकारला. परभणी हेच क्षेत्र निवडले.नंतर बी. एड . केले. आणि मराठवाडा हायस्कूल ह्या शाळेत स्थिरस्थावर झाला. पण शाळेत त्याचे पूर्ण लक्ष लागत नसे. त्याला पत्रकारितेत विशेष आवड होती. औरंगाबादला असताना तो ज. प. मुळे ह्यांच्या संपर्कात होताच. ‘रामराज्य’ आणि ‘पंचशील’ ह्या साप्ताहिकामध्ये त्याची उमेदवारी चालूच असे. साहित्य आणि राजकारण हे त्याचे आवडीचे विषय होते. त्यात त्याला विशेष रस होता. मुलाखती घेणे , संपादन करणे हा त्याचा आवडीचा विषय होता. राजकीय मंडळींच्या गोटातून बातम्या कशा मिळवायच्या हे त्याला अवगत होते. नुकताच ‘दैनिक मराठवाडा’ सुरु झाला होता. परभणी जिल्ह्याचा वार्ताहर म्हणून त्याची नेमणूक झाली. सकाळची शाळा संपलीकी हा दुपारपासून रात्री पर्यंत बातम्यासाठी फिरत असे. सामाजिक आणि राजकीय मंडळीत त्याची उठबस असे. तोच त्याचा प्रमुख व्यवसाय झाला होता. त्याची परभणी जिल्ह्याची वार्तापत्रे दर आठवड्याला प्रसिद्ध होत असत. ती खूप गाजली. मानवत खून खटला उजेडात आणण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली. ते प्रकरण खूपच गाजले. त्यावेळी तो अनेकदा जीव धोक्यात घालून खूप हिंडला. स्थानिक राजकारणाची त्याला चांगलीच जाणीव होती. त्याने अनेक गोष्टी उजेडात आणल्या. भ्रष्टाचार शोधून काढले. 'शोध पत्रकारिता 'असे ज्याला म्हणतात ते त्याने २०-२५ वर्षापूर्वी प्रस्थापित केले. अनंत भालेराव ह्यांचा त्याच्यावर खूप विश्वास होता. त्यांच्या पठडीतच तो पत्रकार म्हणून तयार झाला. आठवड्यातून एकदा तो औरंगाबादला येत असे आणि त्याची अनंतरावांशी भेट होत असे. चर्चा होत असे. तो लोकसत्ता आणि नवाकाळचा ही अनेक वर्षे वार्ताहर होता. पण मराठवाडा दैनिकाला त्याचे प्राधान्य असे. महत्वाच्या विशेष बातम्या पहिल्यांदा दैनिक मराठवाड्यातच येत असत . मग इतरत्र जात असत. पत्रकारिता हा त्याचा आवडीचा विषय होता. त्याला कसलेही व्यसन नव्हते. कोणाकडून कधीही एक पैसा घेतला नाही. स्वच्छ चारित्र्य हेच त्याचे वैशिष्ट्य. त्यामुळेच अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर आली. त्यामुळे कोर्टात खटले झाले. अनंतराव व गोविंदभाई ह्यांचे मार्गदर्शन आणि पाठिंबा होता . त्यामुळे असे लढणे त्याला शक्य झाले. परभणी जिल्हा पत्रकार संघाचा तो अध्यक्ष होता. राज्य पातळीवर नाना मोने ह्यांच्याबरोबर त्याने काम केले होते. मराठवाड्यात अनेकदा दौरे केले होते.
पत्रकारिता चालूच होती. त्याच वेळी शिक्षण क्षेत्रात त्याचे विशेष प्रयत्न चालू होते. शिक्षक मतदार संघातून मराठवाड्यातील शिक्षक निवडून येण्यासाठी तो प्रयत्नशील होता.त्यासाठी त्याने शिक्षक उमेदवारांना खूप मदत करून निवडून आणले. मराठवाडा हायस्कूलमध्ये अनेक वर्षे शिक्षक म्हणून काम केले होते. इतर सहकारी मिळाले आणि त्याने 'ज्ञानदीप विद्यालय ' ही नवीन शाळा काढण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि मराठवाडा हायस्कूलचा राजीनामा दिला. खूप मेहनत घेऊन नवी शाळा उभी केली . त्या शाळेला शासकीय मान्यता मिळवून दिली. त्या शाळेचा मुख्याध्यापक आणि संस्थेचा सचिव म्हणून दुहेरी कामाचा बोजा त्याच्यावर होता. ज्ञानदीप विद्यालय ही शाळा नावारूपाला आली. पण संस्थेचे काही पदाधिकारी आणि त्याचे जमले नसावे. स्वतःच उभी केलेली शाळा असताना इतर पदाधिकारी मंडळीमुळे त्याला स्वेच्छा निवृत्ती घ्यावी लागली असावी आणि त्याने परभणी सोडले व औरंगाबादला उर्वरित जीवन घालवावे असा विचार करून औरंगाबादेत स्थाईक व्हायचे ठरवले असावे. हा त्याचा निर्णय तसा आश्चर्यकारकच होता. त्याने औरंगाबाद सोडून परभणी निवडले होते. तेथे तो स्थिरस्थावर झाला होता.तेथे त्याची मित्रमंडळी होती. तेथील सार्वजनिक आणि राजकीय कार्यकर्त्यात त्याची उठबस होती. त्याने स्वतः काढलेली शिक्षण संस्था होती. नातेवाईक मंडळी होती, तो परभणीत रमलेला होता. त्याला औरंगाबादचे आकर्षण कधीच नव्हते. 'मराठवाडा' बंद पडल्यानंतर तो 'गोदातीर समाचार' मध्ये स्तंभ लेखन करीत असे. तो संपादकीय लिहित असे.
तो औरंगाबादेत आला खरा. पण येथे रमला नाही आणि प्रकृतीने त्याला साथ दिली नाही. एक लाखात एखाद्या व्यक्तीला होतो असा असाध्य रोग त्याच्या साथीला आला आणि हळूहळू त्याची प्रकृती बिघडतच गेली. परावलंबित्व आले. आत्मविश्वास गेला. जगण्याची इच्छा कमी कमी होत गेली आणि असा शेवट झाला.
आज असंख्य आठवणी जाग्या होत आहेत. खरं म्हणजे १९६९ नंतर मी औरंगाबाद सोडले आणि मुंबईला शिक्षणासाठी गेलो आणि नंतर मुंबईकर झालो. फार क्वचित वेळा मी परभणीला गेलो असेन. आमच्या भेटी मी औरंगाबादला आलो तरच होत असत. लग्नकार्यात किंवा कौटुंबिक कार्यक्रमात भेट होत असे. वेळ मिळाला तर खूप गप्पा होत असत. सुरुवातीच्या काळात आमचा पत्रव्यवहार होत असे. रवी मुंबईला क्वचितच येत असे तेंव्हा भेट होईच. मुंबईला माझ्याकडे 'मराठवाडा' वर्तमान पत्र येत असे त्यामुळे त्याची परभणी जिल्ह्याची वार्तापत्रे माझ्या वाचनात येत असत.
मी अनंतराव भालेराव ह्यांचे ‘कावड’ हे पुस्तक प्रकाशित केले होते. त्या पुस्तकांचा प्रकाशन समारंभ आम्ही परभणीला ठरविला होता. तो देखणा समारंभ तेथे आयोजित केला त्याचे प्रमुख कारण म्हणजे त्या कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी त्याने घेतली होती. अनंतराव ह्यांच्यावरील प्रेमामुळे सर्व मराठवाड्यातून लोक आले होते. बी रघुनाथ सभागृह संपूर्ण भरले होते . मंडळी बाहेर उभी होती. विजय तेंडूलकर ह्यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन झाले होते. दोन दिवस परभणी शहरात रवीने ३ कार्यक्रम ठेवले होते.कार्यक्रमाच्या आयोजनावर अनंतराव खूष होते. आजही परभणीकर त्या कार्यक्रमाची आठवण काढतात.
रवीने कौटुंबिक जबादारीत विशेष लक्ष दिले . माझा धाकटे भाऊ राम आणि शरद ह्यांना जीवनात स्थिरस्थावर होण्यासाठी त्याने खूप मोलाची मदत केली . शरद परभणीतच स्थाईक झाला. रवीला मुलबाळ नव्हते. शरदचा मोठा मुलगा शैलेंद्रला त्याने मुलासारखे प्रेम दिले. त्याच्या शिक्षणासाठी मदत केली. पुण्याला Law कॉलेज मध्ये शिक्षणासाठी पाठविले. माझे मोठे मामा वकील होते. माझा धाकटा भाऊ सुभाष सुरुवातीला परभणीला माझ्या मोठ्या मामांच्या हाताखाली वकिली करीत असे. पुढे तो न्यायाधीश झाला. त्याचा मुलगा राहूल ह्याच्यावारही रवीने पुत्रवत प्रेम केले.
परभणीला आमचे असंख्य नातेवाईक. अनेकांना त्याने निरनिराळ्या प्रकाराने खूप मदत केली. शिक्षणासाठी , नोकरीसाठी आणि कौटुंबिक अडचणी सोडवण्यासाठी तो नेहमीच पुढे होता. त्यामुळे अनेकांना तो आधारस्तंभ वाटत असे.
गेल्या ५-६ वर्षात त्याच्या आजारपणात उर्मिला वहिनीनी त्याची जी सेवा केली ती शब्दात वर्णन करणे कठीण आहे . एकाच महिन्यापूर्वी त्यांनी त्याचे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी जो समारंभ आयोजित केला होता तो पाहून त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक जेवढे करावे तेवढे थोडेच आहे. त्या निमित्ताने आम्ही सारे आप्तस्वकीय तर जमलो होतोच पण रवीचे मित्र आणि विद्यार्थीही आवर्जून आले होते. त्याची प्रकृती खूपच खालावलेली होती. एक महिन्यानंतर त्याने हे जग सोडले. ‘पराधीन आहे पुत्र मानवाचा ‘ हे खरे आहे. आजारामुळे माणूस पराधीन होतो. त्याला आपला जीव नकोसा होतो. हतबलता येते. ते सारे कठीण आहे. पण स्वतःलाच ते भोगावे लागते. ते भोगणे आज संपले. ‘ ‘शोध पत्रकारिता’ करणारा , शिक्षक , मुख्याध्यापक आणि आदर्श शिक्षण संस्था उभी करणारा , अनेकांना विविध प्रकारची मदत करणारा , स्वच्छ चारित्र्याचा व कुटुंबातील भावंडाना आणि त्यांच्या मुलांना भरीव मदत करणारा रवी आज जरी नसला तरी तो आमच्या कायम आठवणीत असेल.
( ६ ऑगस्ट , २०१५)