मोदीना गांधी जवळचे तर नेहरू दूरचे
मोदी पंतप्रधान झाल्यापासून गांधीजींचे नाव सतत घेत असतात. कॉंग्रसचे लोक गांधीजींना केव्हाच विसरून गेले आहेत. त्यांच्या तोंडात नेहरू, इंदिरा , राजीव आणि राहुल ह्यांचेच नाव असते.
गांधीजी आणि नेहरू ह्यांच्यात वैचारिक मतभेद होते. त्यांच्या दोघांमध्ये झालेला पत्र व्यवहार खूप काही सांगून जातो. एम जे अकबर ( अलीकडे भाजपकडे वळलेले ) ह्यांनी नेहरूवर एक पुस्तक लिहिले आहे. त्यात गांधी- नेहरू ह्यांच्यातील मतभेदावर चांगला प्रकाश पडतो.
नेहरू १९२७ साली रशियाला जाऊन आले आणि समाजवादी / साम्यवादी विचारसरणीमुळे खूप प्रभावित झाले. ते भारतात परतले ते क्रांतिकारी बदलाच्या स्फूर्तीने फुद्फुदतच. ते इतके उत्तेजित झाले की गांधीजींना त्यांच्या पोरकटपणाकडे दुर्लक्ष करावे लागले असे म्हणतात .
त्याचवेळी राष्ट्रीय नियोजन समिती स्थापित झाली. नेहरू त्याचे अध्यक्ष होते. गांधीजींना ते फारसे आवडले नसावे. 'नेहरुंना आकाशात उंच भरार्या घ्यायला आवडते. मला नाही. ' अशी त्यांची धारणा होती.
मोदीनी नियोजन आयोग रद्द केला त्यावर किती टीका होते आहे. गांधीजींना नियोजन आयोगाची साम्यवादी विचारांनी प्रेरित झालेली संकल्पना आवडली नव्हती. मोदीनी गांधीजींच्या विचारांनाच पुढे नेले , असे म्हंटले तर चुकीचे नाही.
मोदींना नेहरूसारखे उंच भरार्या मारणे आवडते हे ही लक्षात घेण्यासारखे आहे. नेहरू रशियाला गेले आणि समाजवादी विचारांनी प्रभावित झाले तर मोदी गेल्या अनेक वर्षात माओनंतरच्या चीनला अनेकदा भेटी देऊन प्रभावित झाले आणि ' मेक इन इंडिया ' चे स्वप्न घेऊन आले .
गांधीजी म्हणत , 'मला जो भारत अभिप्रेत आहे , त्यात मी राजे महाराजे , संस्थानिक आणि जमीनदार या सर्वाना जागा ठेवली आहे '
मोदींना अदानी- अंबानी हवे आहेत असा आरोप केला जातो. कारण ते समाजवादी विचारसरणीचे नाहीत म्हणून ते गांधीजीच्या विचारांशी जवळचे आहेत. म्हणूनच ते बोलताना गांधी - लोहिया - दिनदयाळ उपाध्याय ह्यांचा उल्लेख करतात. ते गांधीजींच्या विचारांशी जवळचे पण कृती करताना त्यांची बाह्य वागणूक ही नेहरू सारखी दिसते. नेहरूंचे शेरवानीवरचे गुलाब पुष्प जसे प्रसिद्ध तसे मोदींचे सेल्फी फोटो घेणे लोकांना माहित झाले आहे. नेहरूंचे कपडे इंग्लंडला धुण्यासाठी जात असत असे म्हणतात तर मोदींचा डिझायनर त्यांच्यासाठी खास खास कपडे शिवत असतो. त्यामुळे मोदी सरकार म्हणजे सूटबूट सरकार असे त्यांचे विरोधक म्हणतात. तरी बरं , मणीशंकर अय्यर त्यांना कॉंग्रेस अधिवेशनात 'चाय की दुकान' साठी stall देण्यास तयार झाला.
गांधी 'खेड्यात चला ' म्हणत असत तर नेहरू शहरी विकासाकडे लक्ष केंद्रीय करीत. मोदी स्मार्ट सिटीचा विचार करतात. त्यांना खेड्यात किंवा शहरात न जाता मध्यम असलेल्या छोट्या शहरांचा विकास करावयाचा आहे . खेड्यांना शहरी सोयी सुविधा मिळवून द्यावयाच्या आहेत.
गांधी खेड्यात वास्तव्य करा असे म्हणत तर मोदी मोठ्या खेड्यांना स्मार्ट शहर बनवा असे म्हणतात.
गांधीजी म्हणत , ' मला आधुनिक विज्ञानाविषयी आदर असला तरी जुनेच आधुनिक विज्ञानाच्या उजेडात तपासून योग्य पद्धतीने पुनरुज्जीवित करायला हवे ' . मोदी एका बाजूने ' डिजिटल इंडिया ' हा विज्ञानवादी दृष्टीकोन मांडतात तर जुन्या संस्कृतीला चिकटून राहतात.
नेहरुंना वाटते खेडे हे वैचारिक व सांस्कृतिक दृष्ट्या मागासलेले असते व मागासलेल्या भोवताल मधून प्रगती साधने अशक्य असते . कारण संकुचित वृत्तीचे लोकच खोटारडे असण्याची शक्यता असते. ह्याउलट मोदींना दिनदयाळ उपाध्याय व नानाजी देशमुख ह्यांची ग्रामविकास योजना अधिक आवडते म्हणून ते प्रत्येक खासदाराला एक गाव विकसित करण्यासाठी पैसे देण्याची योजना आखतात . ही योजना गांधीजींच्या खेड्याकडे चला ह्या विचारांशी जुळती आहे. विकसित खेडे असेल तर शहरात कोण येईल ?
गांधीजींची ' हिंद स्वराज ' ही संकल्पनाच नेहरुंना ६०-७० वर्षापूर्वी जुनाट वाटली होती.
आतातर जग खूप बदलले आहे. मोदींना त्याची जाणीव आहे. ह्या बदललेल्या जगात भारताला टिकायचे असेल तर ' मेक इन इंडिया , डिजिटल इंडिया , स्मार्ट सिटी , स्किल इंडिया , बुलेट ट्रेन, स्वच्छ भारत ' ह्या नव्या योजना त्यांनी पुढे आणल्या आहेत.
नेहरू - गांधी ह्यांच्यात भारत विकासाच्या कल्पना फार भिन्न होत्या . गेल्या अनेक वर्षात नेहरू नंतर नरसिंह राव आणि अटलजी ह्यांनीच विकासाच्या दिशा बदलून वेगळा मार्ग निवडला. आता मोदीनी नेहरूंच्या विचारापासून दूर जावून गांधी विचारातील काही संकल्पना समोर ठेऊन नव्या भारताची नवी स्वप्ने दाखविली आहेत.