Sunday, May 26, 2013

यशाचे रहस्य - तडजोड वृत्ती


तडजोड करणे हेच यशाचे रहस्य आहे असे काहींना वाटत असते. ते काहीं अंशी खरे आहे असे वाटते. नेहमीच ते बरोबर असते असे नाही. तडजोड वृत्ती ( compromising attitude ) असावी कां नसावी? , असा प्रश्न मला नेहमीच पडतो. ह्या वरून मला माझ्या संशोधन गुरूंची आठवण झाली. माझे सर डॉ एन के चौधरी हे पदार्थविज्ञान शास्त्रात डॉक्टर ऑफ सायन्स ( D.Sc,) होते.पदवी मिळवण्यापूर्वीच त्यांचे १८ पेपर्स जगातल्या ख्यातनाम संशोधन मासिकातून प्रसिद्ध झाले होते. त्यांचे नाव सर्वत्र झाले होते. मी त्यांच्या मार्गदर्शनाखालीच संशोधन केले आणि त्यानंतर मला पदवी मिळाली. ते निवृत्त झाले तेंव्हा त्यांच्या करिता आम्ही एक निरोप समारंभ आयोजित केला होता .त्या समारंभात त्यांच्या विषयी बोलतांना एक जेष्ठ प्राध्यापक म्हणाले," डॉ . चौधरींचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यात नसलेली तडजोड वृत्ती.संशोधकाजवळ तडजोड वृत्ती नसावी. NON - COMPROMISING  ATTITUDE  हा संशोधकाचा मोठा गुण असतो ".माझ्या हे चटकण लक्षात आले. विज्ञानात प्रयोग करताना तो वारंवार करावा लागतो. अनेक वेळा पडताळूण पहावा लागतो .मी सात आठ वेळा प्रयोग करून तोच निष्कर्ष काढला तरी त्यांचे समाधान होत नसे .ते स्वतः प्रयोग करताना समोर उभे रहात असत आणि त्यांची खात्री झाली तरच ते मान्यता देत असत. त्यावेळी मला असे वाटत असे की त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास नाही. पण ते खरे नव्हते .अचूकता आणि परिपूर्णता हवी असेल तर तडजोड करता कामा नये हे मी त्यांच्याकडूनच शिकलो.
विज्ञानाचा विद्यार्थी असल्यामुळे आणि गुरूंच्या हाताखालीच संशोधन केल्यामुळे माझी तडजोड नं करण्याची वृत्ती होत गेली. तो माझ्या स्वभावाचा एक अंगभूत गुण होत गेला. त्यामुळे माझे बरेचसे नुकसान होत आहे हे मला समजत होते. ते होणारच असे ही माहित होते. पण माणसाचा तो पिंड एकदा तयार झाला की त्याला त्याचे काहीही वाटत नाही . माझेही तसेच झाले .
त्यानंतर मी एका मोठ्या कंपनी मध्ये संशोधन आणि व्यवस्थापन ह्या दोन्ही विभागात काम करू लागलो.मला दोन बॉस होते. एक तंत्रशास्त्र प्रमुख तर दुसरे गणकशास्त्र विभाग प्रमुख.दुसरे बॉस व्यवस्थापन शास्त्रातील विशेष तज्ञ म्हणजे एम .बी ए. होते आणि त्यांचा कोणत्याही प्रश्नाकडे किंव्हा समस्येकडे बघण्याचा दृष्टीकोन सर्वस्वी वेगळा होता. व्यवस्थापन शास्त्र हे तसे विज्ञान नाही .ती एक कलाच आहे असे मला वाटत असे. त्यामुळे आमचे अनेक वेळा वाद होत असत. नंतर मला कळले की शास्त्र किंवा तंत्र ह्या मध्ये जे तज्ञ असतात त्यांना व्यवस्थापन तितकेसे जमत नाही. माझेही तसे होऊ लागले, हे माझ्या लक्षात येऊ लागले.तेंव्हा मी व्यवस्थापन तज्ञ बॉस कडून बरेच काहीं शिकण्याचा प्रयत्न करू लागलो आणि थोडा शिकलोही. त्यांनी मला तडजोड का आणि कशी करावी लागते हे अनेक वेळा सांगितले.व्यवस्थापनामध्ये तडजोड करावीच लागते.ते चांगले जमले पाहिजे.त्यामुळे व्यवस्थापनामध्ये अनेक समस्या समोर येतात तेंव्हा तडजोडीनेच मार्ग काढावा लागतो हे माझ्या लक्षात येऊ लागले.

पुढे स्वतःच्या हाय टेक टेक्नोलोजीच्या  विक्री व्यवसायात काम करताना विली कॉर्नेलीअस ह्या जर्मन व्यक्ती बरोबर अनेक वर्ष काम करण्याची संधी मला मिळाली .त्याची सेल्समन म्हणून इतकी ख्याती होती की एस्किमोलाही फ्रीज किती आवश्यक आहे ,हे तो नुसते पटवून देणार नाही तर विकून येईल इतके त्याचे व्यक्तिमत्व प्रभावी होते. हाय टेक्नो वस्तू कशी विकावी हे त्याला चांगलेच अवगत होते .एकदा असेच भारताच्या दौर्यावर असताना तो मला म्हणाला," मला माहित आहे की आपल्या स्पर्धकापेक्षा आपली टेक्नोलॉजी थोडी कमी आहे परंतु आपण तरीही ती विकली पाहिजे .जगतविख्यात गणकयंत्र बनविणाऱ्या कंपनीचेचे गणक यंत्र सुरवातीला दुय्यम दर्जाचे होते पण त्यांनी खूप विक्री करून भरपूर पैसा कमविला आणि नंतर नवी वेगळी टेक्नोलॉजी बाजारात आणली. आपणही असेच करणार आहोत. विक्री व्यवसायात असेच करावे लागते .थोडे अधिक तिखट मीठ लावून सांगावेच लागते .हा काहीं शोध निबंध नाही की गहण चर्चा नाही". त्यावेळी मला हे पटले नाही .माझी वृत्ती वेगळी होती . मी तंत्रज्ञ होतो. माझी शास्त्रीय वृत्ती होती. आहे हे असे आहे . आमचे तंत्रज्ञान असे आहे .त्याची किमंत ही आहे. घ्यायचे असेल तर घ्या.त्यावर कोणताही डिस्काऊन्ट मिळणार नाही .त्यावर विलीचे उत्तर असे ," तुम्ही कितीही मोठे तंत्रज्ञ असाल ते फारसे महत्वाचे नाही तर ग्राहक आणि विक्रेता ह्यांच्यात संवाद चालू असताना दोघांनाही Win- Win असे वाटले पाहिजे व शेवटचा सौदा पटवता आला पाहिजे. माणसाने प्रथम स्वतःचे व्यक्तिमत्व विकले पाहिजे. First, you must sell yourself. ह्याचा अर्थ तुम्ही विकले जाऊ नका पण स्वतःचे व्यक्तिमत्व विका असा आहे.हे लक्षात घेणे म्हत्वाचे आहे. एकदा तुमच्याबद्दल चांगले मत झाले की पुढचा मार्ग सुकर होत जातो.म्हणजे तडजोड कशी असावी तर दोघांनाही विन- विन ( Win-Win) असे वाटणारी .
जगण्यामध्ये उठतां बसतां तडजोड ही करावीच लागते. वैवाहिक जीवन सुखी करावयाचे असेल तर नवरा-बायकोला तडजोड करणे आवश्यक आहे,  हे सर्वांनाच माहित आहे.कौटुंबिक जीवनात कलह नको असेल तर इतर कुटुंबियांचे म्हणणे ऐकणे भागच असते. म्हणजे तडजोड ही आलीच .
राजकारणाचे तर सोडाच. ते तर तडजोडीचे राजकारण असते.राजकारणातील काहीं उदाहरणे सहज देता येतील. इंदिरा गांधींनी युद्ध जिंकले पण भुत्तो ह्यांच्या बरोबर सिमला करार करून युद्धात जे मिळवले ते घालवले."आम्ही जिंकलो, आम्ही हरलो" अशी आपली अवस्था झाली. आज ही पाकिस्तानची भूमिका फारशी बदललेली नाही. वाजपेयी- मुशर्र्फ बोलणी फिसकटली कारण वाजपेयी ठाम होते म्हणून.पण त्या वेळी सर्वाना,विशेषतः मिडियातील मंडळीना मुशर्रफ ह्यांनी प्रभावित केले होते.मिडियाने वेगळेच चित्र उभे केले होते. राजकारणात असे नेहमीच प्रभावित करावे लागते. बिल क्लिंटन आणि ओबामा हे दोन्ही अमेरिकन राष्ट्राध्यक्ष सर्वाना असेच प्रभावित करून त्यांना हवे ते करून घेतात.
१ ९ ६ २ चे चीनशी झालेले युद्ध घ्या. पंडितजींनी चीनशी झालेल्या बोलणींमध्ये "पंचशील" तत्वाचा जयघोष केला तर चीनने पाठीत खंजीर खुपसला आणि आपला प्रदेश बळकावून बसले.पंडितजींना मात्र घाव जिव्हारी बसला. तडजोड ही  विन- विन असावी लागते. "तुम्ही जिंकला, मी हरलो" अशी नसावी, हेच ह्यावरून सिद्ध होते. समाजकारणात ही तसेच असते. संस्था चालवायची असेल तर अनेक तडजोडी कराव्या लागतात. अनेकांशी तडजोड करावीच लागते.ज्या व्यक्तींना तडजोड करावयाची नसते त्या व्यक्ती " हा मार्ग माझा एकला " असे धोरण अवलंबताना दिसतात. कधी कधी ते यशस्वी होतानां दिसतात. पण त्यांचा मार्ग कठीण असतो.काहीं व्यक्तींना सर्वाना समाविष्ट करून घेण्याची कला अवगत असते आणि त्यात ते यशस्वी होतात. अशी माणसे फार थोडी असतात.
म्हणजे काही गोष्टी मिळवण्यासाठी तडजोडीला पर्याय नसतो. तडजोड करावी पण ज्याच्याशी ही तडजोड करीत असतो त्याला आपण जिंकलो असे वाटले पाहिजे व आपल्याला आपण हरलो नाही असे वाटले पाहिजे. जो अशा तडजोडी करण्यात यशस्वी होतो त्याला जगणे कळले असे समजावयास हरकत नाही .
शास्त्रज्ञ , तंत्रज्ञ असलेली माणसे uncompromising attitude असलेल्या वृत्तीची असतात त्यामुळे ती व्यवस्थापनात कमी पडतात हे बहुतांशी खरे आहे. त्यांनी इतर क्षेत्रात ही वृत्ती नं ठेवता वावरले पाहिजे तरच ते यशस्वी होतील. व्यवस्थापन अभ्यासक्रमात हे शिकवले जाते म्हणूनच ती मंडळी यशस्वी होतांना दिसतात.
मी व्यवसायात पार्टनरशिपचा प्रयोग करून बघितला.पार्टनर अतिशय हुशार असा तंत्रज्ञ होता. परंतु औद्योगिक ग्राहक त्वरीत सेवा मागतात हे त्याला कितीही सांगितले तरी पटत नसे व तो त्याच्या तंत्र पद्धतीनेच काम करीत असे. त्यामुळे नुकसान तर होतच होते पण ग्राहक ही नाराज होऊ लागले. कसली तडजोड करणार.पार्टनरशिप गुंडाळावी लागली.
मध्यम मार्ग अवलंबणे सगळ्यांनाच जमते असे नाही.पण असेच करावे लागते . ,
तडजोड हवी पण कोणीही हरू नये अशी ."मी जिंकलो , तुम्हीही जिंकलात."हे तत्व समोर ठेवोन केलेली. हे रोजच्या जीवनात लागू आहे पण शास्त्रीय आणि तांत्रिक क्षेत्रात काम करतांना मात्र अशी तडजोड चालत नाही. जेंव्हा सत्य आणि अचूकतेचा शोध घ्यावयाचा असतो तेंव्हा कोणतीही तडजोड करता येत नाही.व्यवस्थापन तज्ञ असलेल्या आणि संशोधक.असलेल्या दोन व्यक्तीमध्ये मुलभूत हा फरक असतो की एकजण तडजोडीचा मार्ग मान्य करून व्यवसायात यश मिळवतो त्याला Negotiating skill असे म्हंटले जाते  तर दुसरा कसलाही तडजोडीचा मार्ग मान्य नं करता आपले काम करीत असतो. त्यात यश नाही मिळाले तरी चालेल पण अचूकता आणि परिपूर्णता फार महत्वाची असते. त्यामुळेच फारच थोडे शास्त्रज्ञ किंवा तंत्रज्ञ हे चांगले व्यवस्थापक होतात. अगदी अलिकडले उदाहरण द्यावयाचे झाले तर स्टीव जॉबचे देता येईल. तो चांगला तंत्रज्ञ होता पण उत्तम व्यवस्थापक नव्हता.अचूकता आणि परिपूर्णतेचा त्याला ध्यास होता,पण तो आपल्या काहीं सहकार्याशी फार चांगल्या पद्धतीने वागत नसे. कारण एक तर त्याला कसलीही तडजोड करणे जमत नसे आणि त्याचा स्वभावही तसा कारणीभूत होता. ह्याउलट डॉ होमी भाभा हे शास्त्रज्ञ उत्तम व्यवस्थापक होते.त्यांनी संशोधन संस्था उभी करण्यासाठी शासनाबरोबर काहीं तडजोडी केल्या असतील पण विज्ञानाच्या संशोधनात कसलीही तडजोड केली नाही. ह्याउलट प्रो. मेघनाद सहा. त्यांचे केंद्रीय नेत्यांशी पटले नाही म्हणून त्यांनी स्वताचा वेगळा मार्ग स्वीकारला आणि आपली स्वतःची संस्था उभी केली.
काहीं क्षेत्रे अशी असतात की तडजोड करताच येत नाही. तर काही क्षेत्रात कोणतीही तडजोड चालतच नाही. त्यामुळे तुमचा पिंड तडजोड करण्याचा नसेल तर तुम्ही अस्वस्थ होणारच. रोजच्या जीवनात मात्र आपल्याला मान्य नसतानाही तडजोड करावीच लागते. तेंव्हा "मी जिंकलो, तुम्हीही जिंकलात" असे सूत्र समोर ठेवून निर्णय घेणे अधिक शहाणपणाचे ठरते.