Sunday, April 21, 2013

काझीरंगाचा रोमांचक फेरफटका


असाम मध्ये बघण्यासारखी तीन महत्वाची ठिकाणे.१)सागरासारखी दिसणारी ब्रम्हपुत्रा , २.)चहाचे मळे आणि ३) काझीरंगा राष्ट्रीय उद्यान . अरुणाचलहून तेजपूरमार्गे परत निघालो.रात्री भालूकपांगला मुक्काम केला.प्रशांती कॉटेज मध्ये विश्रांती घेतली. एक सुंदर ठिकाण. काझीरंगा तेजपूरहून ७५ कि. मी. भालुकपांगहून थोडे कमी अन्तर. रस्ता थोडासा चांगला. दोन्ही बाजूला चहाचे मळे. हिरवागार परिसर.
काझीरंगा राष्ट्रीय उद्यान

दूरवर हिमालयाच्या रांगा . ब्रम्हपुत्रेच्या उपनद्या. मध्येच दाट जंगल. काहीसा भाग दलदलीचा. ब्रम्ह्पुत्रेमुळे तयार झालेली छोटी मोठी तळी.प्रवास एकदम सुन्दर. निसर्गाच्या सानिध्यात. मी निसर्ग प्रेमी आहे. पण पक्षी प्रेमी , वनस्पती प्रेमी किंवा वन्य प्राणी प्रेमी होऊ शकलो नाही. ह्याचे प्रमुख कारण म्हणजे वनस्पती शास्त्र आणि जीवशास्त्राचे अत्यंत अल्पज्ञान. त्यामुळे ह्या विषयाचे आकलन तसे कमीच. परंतु जेंव्हा मी एखाद्या पक्षी प्रेमी किंवा वन्य प्राणी प्रेमी तज्ञाबरोबर प्रवास करतो तेंव्हा मला त्याचा खूप हेवा वाटतो. त्यांना ह्या विषयाची प्रचंड माहिती असते. ते पक्षी सहज शोधून काढतात. त्यांचे आवाज ओळखतात. त्यांच्या आवाजावरून ते झाडाच्या कोणत्या फांदीवर बसले आहेत हे अचूक ओळखतात. मी मात्र शोधूनही ते पक्षी दिसत नाहीत. फक्त पक्षी तज्ञांच्या मदतीने  जेंव्हा ते दिसतात तेंव्हा वेगळा आनंद मिळतो. अशा पर्यटनामध्ये असे तज्ञ बरोबर असणे फार गरजेचे आहे.काझीरंगा गुवाहाटीपासून  २१७ कि. मी. तर जोरहाट पासून ९८ कि. मी. तेजपूर पासून तसे अंतर जवळ. गोलाघाट आणि नागोन जिल्हयात पसरलेले हे राष्ट्रीय उद्यान ४३० चौ. कि . मी. क्षेत्रफळ असलेले.. ( ४ ० कि . मी . लांब आणि १ ३ कि. मी. रुंद ) . जैविक विविधतेसाठी (बायोडायव्हरसीटीसाठी) जगप्रसिद्ध. ४२ प्रकारचे मासे२ ७ प्रकारचे सरपटणारे प्राणी ४ ९ १ प्रकारचे पक्षी३ ५ प्रकारचे सस्तन प्राणी वाघ ( ८ ६ - १ वाघ प्रती कि . मी.) १ ० ४ ८ हत्ती २ ० ४ ८ Rhinoceros , १ ४ ३ १ वाटर बफेलोज ४ ८ ६ स्वाम्प हरीण ७ प्रकारची गिधाडेदोन प्रकारचे सर्वात मोठ्या लांबीचे अजगर आणि अनेक प्रकारचे विषारी सर्प ,  १५ प्रकारची कासवे५ ४ ६ प्रकारची वनस्पती  , हत्तीभर उंचीचे गवतह्या सर्वांचे वसतीस्थान म्हणजे काझीरंगा.
काझी हा कर्बी जमातीचा तरूण आणि रंगा ही ह्या भागातील तरुणी. त्यांचे एकमेकावरती ,खूप प्रेम. स्थानिक लोकांचा लग्नाला खूप विरोध. हे प्रेमी युगुल ह्या जंगलात गायब होतात आणि परत येतच नाहीत. नंतर ते स्थानिक लोकांना सापडतच नाहीत त्यामुळे ह्या जंगलाला काझीरंगा हे नाव दिले गेले आहे अशी एक दंत कथा.

Land of Red Goat
सहाव्या शतकातील श्रीमंत संकरदेव ह्या वैष्णव संताने काझी आणि रंगाई ह्या अपत्यहीन दांपत्यास अपत्य प्राप्तीसाठी आशीर्वाद दिला आणि ह्या भागात खूप मोठे तळे निर्माण करण्यासाठी खोदकाम करावयास सांगितले म्हणून ह्या भागाला काझीरंगा असे नाव पडले अशी दुसरी कथा सांगण्यात येते.
काझीरंगा म्हणजे Land of red goats ( Deer ) असा ही एक प्रवाद. कर्बी भाषेत काझी म्हणजे Goat , तर रंगाई म्हणजे RED .
काझीरंगा -दूरवर दिसणाऱ्या हिमालयाच्या पर्वत रांगा -४३० चौ कि.मी.
KAJIR -a - RANG म्हणजे The village of KAJIR असे ही सांगतात .
काझी हे नाव येथील मुलीना देण्यात येणारे  आवडते नाव.  काझी नावाची स्त्री ह्या भागावर अनेक वर्ष राज्य करीत होती म्हणून ह्या भागाला काझीरंगा असेही म्हणतात .
असा हा ह्या नावाचा मनोरंजक इतिहास .
काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान झाले ह्याचे सारे श्रेय द्यावे लागते ते मेरी व्हिक्टोरिया लायटर कर्झन ह्या व्होईसरॉय लॉर्ड कर्झन ह्यांच्या पत्नीला.मेरी विक्टोरिया ह्यांना Rhinoceros  बघायचे होते. त्यासाठी त्यांनी ह्या भागाचा दौरा केला. त्या फ़ेरफटक्यात त्यांना एकही Rhino बघावयास मिळाला नाही. त्यामुळे त्यांची खूप निराशा झाली. त्यांनी आपल्या नवऱ्याकडे म्हणजे लॉर्ड कर्झन ह्यांच्याकडे हट्ट धरला की लवकरच एक कायदा करा आणि हा भाग वन्यप्राणी संरक्षित म्हणून जाहीर करा आणि कोणत्याही प्रकारच्या प्राण्याची शिकार करण्यास बंदी घाला .
Real Star of Kaziranga - RHINO

 १ ९ ० ५ मध्ये हा भाग वन्यप्राणी संरक्षित म्हणून घोषित करण्याचा आदेश लॉर्ड कर्झन ह्यांनी काढला. लॉर्ड कर्झन ह्यांची कारकीर्द फारशी नावं घेण्यासारखी नव्ह्ती .पण हे एव्हढे चांगले काम मात्र त्यानी केले. १ ९ ३ ८ पासून प्राण्यांची शिकार करण्यास ह्या भागात बंदी आहे त्यामुळे आज आपण Rhinos  आणि हत्तीचे कळप सहज बघू शकतो . त्यासाठी तरी आपण इंग्रजांचे आभार मानले पाहिजेत.
१ ९ ५ ४ मध्ये त्यावेळच्या असाम सरकारने नवा कायदा केला. १ ९ ६ ८ मध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले तर 
१ ९ ८ ५ मध्ये युनेस्कोने वर्ल्ड हेरीटेज साईटचा विशेष दर्जा दिला.
हिमालयाच्या पूर्वेकडील रांगा , ब्रम्ह्पुत्रेच्या आसपासचा भाग  ह्यामुळे हा परिसर खूप  हिरवागार आहे. विविध वनस्पतींनी नटलेला आहे. बराचसा भाग दलदलीचा आहे. हत्तीभर उंचीचे दाट गवत सर्वत्र असल्यामुळे हत्तीकरिता हे मोकळे रान आहे. त्यांच्या खाण्यासाठी हे खूप मोठे कुरण आहे. येथे छोटी मोठी तळी ( Beels) दिसून येतात. आजूबाजूचा  भाग खूप दलदलीचा असतो. ब्रम्ह्पुत्रेला पूर आला की ही तळी भरून जातात.
काझीरंगा - जंगल - दलदलीचा भाग - छोटी मोठी तळी 

Bird's Paradise म्हणता येईल असा हा परिसर सुंदर आहे. ब्रम्ह्पुत्रेला पूर आला की ह्या भागाचे खुप नुकसान होते. ह्या वर्षी आलेल्या पुरात शेकडो Rhino वाहून गेले. तसा हा खूपच दुर्लक्षित भाग आहे. सर्व जगातील पर्यटकांना आकर्षित करण्यासारखे हे सुंदर राष्ट्रीय उद्यान आहे. पर्यटकासाठी विशेष सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी चांगल्या सोयीची खूपच कमतरता आहे.
भालूकपांगहून सकाळी निघालो आणि दुपारी जेवणाच्या वेळेपर्यंत मुक्कामाच्या हॉटेल वर पोहोचलो. अरण्य लॉज हे ए टी डी सी चे हॉटेल होते . हॉटेल शासकीय होते म्हणजे आपल्या एम टी डी सी सारखे. ह्यापेक्षा चांगले हॉटेल कोहोरा  येथे  नव्ह्तेच.  सरकारी असल्यामुळे काझीरंगा पार्क मध्येच असलेले हे लॉज तसे बरे  होते. दुपारचे जेवण करून थोडी विश्रांती घेतली.
Bird's Paradise
सेव्हन सिस्टरचा दौरा असल्यामुळे तसा वेळ कमीच होता.त्यामुळे लगेच दुपारी ३ वाजता जीप सफारी वर निघालो. काझीरंगाची दोन मुख्य आकर्षणे. १) जीप सफारी आणि २) हत्तीवरून रपेट. प्रत्येकी एकदीड तासाच्या ह्या सफारीत आपण हत्ती आणि Rhinos  अगदी जवळून बघू शकतो. आपली जीप अगदी जवळ जाते व आपण ह्या प्राण्यांना थोड्याशा अंतरावरून पाहू शकतो. हत्ती सफारीत तर आपण उंच अंबारीत बसलेलो असतो आणि प्राणी विशेषतः Rhinos जास्त जवळून पहावयास मिळतात . हत्ती आपली वाट दाट आणि उंच अशा वाढलेल्या गवतातून काढत पुढे जात असतो आणि त्यामुळे गवतात लपलेले वन्यप्राणी आपल्याला सहज दिसतात . हरीण आणि सांबार ही पहावयास मिळतात. वेगवेगळे पक्षीही दिसतात . आपण सारखे शोधत राहायचे. पक्षी तज्ञांना ते सहज सापडतात. आपल्याजवळ तशी दृष्टी नसते. त्यांची मदत घ्यावी लागते.
जीप सफारी 
जीप सफारीचा अनुभव घेऊन संध्याकाळी हॉटेलवर परतलो. थोडीशी विश्रांती घेतली. रात्रीच्या जेवणापूर्वी हॉटेलच्या कर्मचार्यानी हॉटेलच्याच हिरवळीवर असामचे लोकनृत्य म्हणजे " बिहू " डान्स सादर केला. पाऊस झाल्यानंतर पीकपाणी आल्यावर सर्वलोक आनंदात असतात तेंव्हा जे सामुहिक नृत्य करतात ते त्यांनी सादर केले. हा तेथील लोकनृत्याचा आणि गाण्याचा सुंदर कार्यक्रम पहावयास मिळाला. असामचे लोकसंगीत अत्यंत गोड  आणि श्रवणीय. बंगाली संगीताशी  थोडेसे साधर्म्य. भूपेन हजारिका ह्यांची सहज आठवण झाली . त्यांना मुंबईत असाम मित्र मंडळामध्ये एका कार्यक्रमात अगदी जवळून पाहिले होते. माझ्या असामी मित्राचे ते ओळखीचे आणि जवळचे होते.  कार्यक्रम सादर करणारे हॉटेलचे कामगार  हे  मन लावून कला सादर  करणारे स्थानिक कलाकार  होते.  त्यामुळे हा कार्यक्रम बघून दिवसभराचा प्रवासाचा शीण तर गेलाच पण खूप उत्साही वाटू लागले.
हत्तीवरून रोमांचक रपेट
दुसऱ्या दिवशी हत्ती सफारीतून काझीरंगाचा पुनः  फेरफटका केला. हत्तीवरून रपेट हा एक रोमांचकारी अनुभव म्हणावा लागेल. तो ही जंगलातून. हत्ती एवढ्या उंच अशा दाट गवतातून.  सकाळीच उठून त्यासाठी नंबर लावावा लागतो.बरीच गर्दी असते. बुकिंग आधीच करावे लागते . एलिफंट सफारीचा अनुभव हा एक आगळा -वेगळा अनुभव आहे. दाट आणि उंचच उंच गवतातून आपण हत्तीवरून फिरत असतो. आणि इतर वन्यप्राणी अगदी जवळून बघू शकतो. उद्यानात एका उंच अशा मचानावर चढून आपण अनेक किलोमीटर दूरवर पसरलेले पार्क पाहतो आणि आपल्याला दूरवर असलेले हत्तीचे कळप , हरणे ,सांबर आणि असंख्य पक्षी दिसू लागतात. बराच वेळ आपण तेथून हलतच नाहीं ,तेथेच रेंगाळतो.
 दोन दिवसात फक्त एवढेच पाहता येते. ज्यांना पक्षी निरीक्षण करावयाचे आहे व दाट जंगलात जाऊन पशु जीवन जवळून पहावयाचे आहे त्यांना काही दिवस मुक्काम करणे आवश्यक आहे व त्यासाठी स्पेशल परमिट घेणे आवश्यक आहे.

हत्तीवरून रपेट
काझीरंगाची ही छोटीशी सफर फक्त एक  झलक आहे. प्रत्येकाने ह्या  भारतीय राष्ट्रीय उद्यान भेटीचा अनुभव घेण्यासारखा आहे. दुपारी जेवणानंतर नागाल्यान्डला जाण्यासाठी निघालो तेंव्हा काझीरंगाच्या आठवणी बरोबर सोबत करीत होत्या. पुन्हा तेथे जाणे जमेल असे आज तरी वाटत नाही. काझीरंगाच्या आठवणी काढलेले  फोटो आणि केलेले  चित्रीकरण बरोबर आहेतच .
डॉ नरेंद्र गंगाखेडकर


काझीरांगाचे प्रमुक आकर्षण : एसिअन हत्तीचे कळप
हत्तीवरून रपेट चालू असताना हत्तीचे खाणे चालूच असते. त्याकरीताच हा राखीव भाग. हत्ती पोसणे फार खर्चिक