Sunday, June 21, 2015

तदा बापाचे हृदय कसे असते .......


माझे वडील श्रीनिवासराव गंगाखेडकर. आम्ही त्यांना दादा असेच म्हणत असू. आज जर ते जिवंत असते तर आम्ही त्यांची शताब्दी साजरी केली असती.
Shriniwasrao Gangakhedkar
आज सकाळी माझ्या दोन्ही मुलीनी Father’s Day च्या शुभेच्छा दिल्या आणि मला माझ्या वडिलांची आठवण झाली. मन भूतकाळात रमले.
“गोड झाले पारणे” ही दादांची आत्मकहाणी मी इ.स. २००० साली प्रसिद्ध केली होती. दादा मुंबईला माझ्या घरी आले की जुन्या आठवणी सांगत असत. तेंव्हा मी त्यांना आठवणी लिहून काढा असा आग्रह धरला. त्यांना खूप काही सांगावेसे वाटे , ते त्यांनी त्यांच्या आत्मकहाणीतून व्यक्त केले. दादा काही लेखक नव्हते. आयुष्यामध्ये रोजच्या जगण्यातून आपण जे अनुभवतो , पाहतो , तेच तर साहित्यातून व्यक्त होते. प्रत्येकाचे जगण्याचे अनुभव निराळे असतात . अनुभवातून तावून-सुलाखून निघाल्यावर सांगावेसे वाटते. अनुभवातून आलेले शहाणपण खूप मोलाचे असते. दादा खूप वाचत असत . त्यांनी त्यांच्या आठवणी लिहायला सुरवात केली आणि मला वाचायला दिल्या. त्यांना आलेले अनुभव विलक्षण होते. त्यातून बरेच काही शिकण्यासारखे होते.त्यांना ज्यांचा सहवास लाभला त्या व्यक्तींची चित्रे ते उभी करीत होते . त्या आठवणी वाचताना त्यांना भेटलेली माणसे आपल्यालाही भेटतात.
सामान्य माणसांचे जीवन म्हणजे सतत चालू असलेला झगडा.व्यथा वेदनांचा इतिहास. अनेक छोटे मोठे प्रश्न. नेहमीच्या आर्थिक अडचणीमुळे होणारी ससेहोलपट .कौटुंबिक जीवनातील विलक्षण ताणतणाव व त्यामुळे होणारा मनाचा कोंडमारा. जीवन समृद्ध करण्यासाठी चाललेली विलक्षण धडपड . कनिष्ठ मध्यमवर्गीय माणसांचे प्रश्न तसे थोडे फार सारखेच असतात. प्रत्येकाची जिद्द निराळी असते. जगण्यासाठी करावे लागणारे झगडे वेगळे असतात. शासकीय नोकराच्या जीवनाला काही मर्यादा असतात. कुसुमाग्रजांनी एकदा म्हंटले होते की मुंबई ह्या महानगरात जगणारा मुंबईकर हा सतत युद्ध करीत असतो. त्याचे जगणे हे युद्धावरच्या सैनिकासारखे असते. सगळ्याच शहरातील मध्यवर्गीय मंडळीना हे जगणे असह्य होते आहे. दादा हैद्राबाद – औरंगाबाद ह्या शहरात अधिक काळ राहिले. हैद्राबादच्या निझामी राजवटीतील दादांची शासकीय सेवा वेगळी होती. राज्यपुनर्रचना झाल्यानंतरची औरंगाबाद- परभणी येथील शासकीय सेवा पूर्णपणे निराळी होती . या दोन जगण्यात फार अंतर होते
निझामी राजवटीतील मुसलमान अधिकारी असलेल्या माणसाबरोबर नोकरी करणाऱ्या त्या वेळच्या कर्मचार्याची काय अवस्था होती ह्याचे सुरेख चित्रण दादांच्या आठवणीतून दिसून येते. दिलदार व्यक्तिमत्वाचे मुसलमान अधिकरी आणि रझाकारी वृत्तीचे इतर सहकारी ह्यांच्या बरोबरचा तो काळ त्या वेळच्या मराठवाडी लोकांचे जीवन कसे होते ह्याचे चित्रण करते.
      आई-वडिलांचा आधार नसताना मामा-मामीच्या सहवासात जीवनाचे प्रारंभीचे धडे त्यांनी घेतले.
          ना कुठे आधार आणिक ना गतीला अंत होता
          मात्र पायीच्या बळाला जागता आवेग होता
एकट्या मामा-मामीचा आधार सोडला तर दादा तसे निराधारच होते. जगण्याची जिद्द आणि पायातले बळ या जोरावर त्यांनी अनेक दु:खे पचविली .समोर आलेल्या अडचणीवर मात केली.
          मज कळेना चालताना दु:ख कसे फुल झाले
          अन कुणाचे दिव्य आशीर्वाद मज देऊन गेले
दादांना त्यांच्या आईचा आशीर्वाद हेच देऊन गेला. हे त्यांनी त्यांच्या आईच्या आठवणी सांगतना व्यक्त केले आहे.
      स्वतःच्या पायावर उभे राहून आर्थिक संकटावर मात करण्यासाठी चाललेली दादांची धडपड आणि होरपळ आत्मकहाणीतून वाचताना त्यांचे कष्टकरी जीवन जाणवू लागते.  
रझाकारी जमान्यात उर्दू येत नसल्यामुळे नोकरीचा शोध घेताना आलेले त्यांचे विलक्षण अनुभव चटका लावून जातात. नोकरी करीत असताना भेटलेले सहकारी आणि त्या काळचे मानवतावादी मुसलमान अधिकारी ह्यांची व्यक्तिचित्रे त्यांनी उभी केली आहेत. मी त्या आठवणी ऐकल्या आहेत. त्यांना त्या काळात लाभलेली मित्रमंडळी विलक्षणच आहेत. “ मित्र कसे मिळवावेत” या विषयावर अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. पण त्यांचा प्रत्यक्ष अनुभव खूप काही सांगून जातो. त्यांना खूप चांगली मित्रमंडळी भेटली. पुरोहित बुक डेपोचे प्रकाशक पुरोहित काका , बनियनचा कारखाना चालविणारे पानसरे काका , प्रसिद्ध वकील गोपाळराव जोशी , चंदुकाका कुलकर्णी ही त्यांची मित्रमंडळी म्हणजे “ मित्र कसे जोडावेत “ याची सुंदर उदाहरणे होत. आजही मला ती मित्रमंडळी आठवतात.
 आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी दादा १८/१८ तास काम करीत असत. सकाळी ४ ते ६ पुस्तकांचे टायपिंगचे काम , सकाळी ८ ते १० पानसरे काकांच्या कारखान्यात हिशोब लिहिण्याचे काम , ११ ते ५ निझाम सरकारची नोकरी , ती ही रझाकारी जमान्यातील, संध्याकाळी ७ ते ९ हायकोर्ट वकील गोपाळराव जोशी ह्यांच्या कार्यालयात टायपिंगचे काम , रात्री ११ते १ पुरोहित प्रकाशनाचे इंग्रजी पुस्तकांचे टायपिंगचे काम . त्यांनी सगळ्यात जास्त वेळ Typewriter बरोबरच घालविला असेल.
      त्यांना बायको-मुलांच्यासाठी फारसा वेळच मिळाला नाही. सायकलवर एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत प्रवास करणे आणि तीन-चार ठिकाणी काम  करून अर्थार्जन करण्याचे त्यांचे कष्ट पाहिले म्हणजे त्यांच्या कामाचा आवाका लक्षात येतो. या कष्टमय जीवनामुळे त्यांना ‘ कारकुनी’ जीवनाचा विलक्षण तिटकारा . माणसाने खूप शिकावे . कारकुनी आणि खर्डेघाशी कधी करू नये असे त्यांचे नेहमीचे सांगणे असे. कारकुनाच्या जीवनात फारसे काही घडू शकत नाही .जगण्याचा आटापिटा फारच क्लेशदायक. ब्राम्हण माणूस केवळ शिक्षणाच्या शिदोरीवरच आपली उन्नती करू शकतो असे त्यांचे ठाम मत होते. मुलांनी पदव्या मिळवाव्यात. पदव्युत्तर शिक्षण घ्यावे ही त्यांची दुर्दम्य इच्छा. आपल्या मुलांनी खूप शिकावे . ‘ कारकून ‘ कधीच होऊ नये , हे ते नेहमीच सांगत असत. त्यामुळे मी जेव्हा पदवी मिळवली , पदव्युत्तर शिक्षण  घेतले आणि पुढे Ph.D. झालो त्यामुळे त्यांना विलक्षण आनंद झाला. खरं म्हणजे माझ्यात शिक्षणाविषयीची जी जिद्द निर्माण झाली ती त्यांच्यामुळेच. आम्ही सारे ६ भाऊ शिक्षित झालो ते त्यांच्यामुळेच.
      आमची काही नातेवाईक मंडळी बर्यापैकी श्रीमंत होती. शेतीवाडी बाळगून होती. काही जणांच्याकडे तर खूप शेती होती. वाडे होते. बंगले होते. पैसाअडका होता. ही नातेवाईक मंडळी खूप अपमानास्पद बोलत असत. दादांना ते आवडत नसे. “ माझा बंगला नाही पण माझी सहा मुले म्हणजे माझे सहा बंगले “ असे ते अभिमानाने म्हणत असत. त्यात त्यांची खंत होती. नातेवाईक मंडळींच्या अशा बोलण्यामुळे त्यांचे मन दुखावले जात असे. त्या नंतर काळ खरोखरच बदलला . त्यांच्या प्रयत्नामुळे आम्ही सर्व मुले शिकलो . जीवनात स्थिरस्थावर झालो . आज बर्यापैकी आर्थिक सुबत्ता आहे आणि त्यांच्या सर्व मुलांच्याकडे स्वतःची बंगलेवजा घरे आहेत. ते सर्व त्यांना त्यांच्या जीवनात पाहण्यास मिळाले. दादांनी अपार कष्ट उपसले नसते  तर हे सर्व जमून आले नसते.
      लहानपणीची माझी एक आठवण. मी सकाळी चार वाजताच उठून अभ्यास करीत असे. त्यावेळी आमच्या मराठीच्या पुस्तकात एक धडा होता, “ दादांना माया नाही “ . मी सकाळी उठून तो धडा मोठ्याने वाचत असे. मला मोठ्याने वाचण्याची सवयच होती. त्यामुळे झोप येत नसे. दोन खोल्यांचे चाळीतील अंधारे घर. मी हा धडा वाचताना मुद्दामच मोठ्याने धड्याचे नाव वाचत असे. मला असे वाटत असे की दादांनी ते ऐकावे. दादा आम्हा मुलांना कधीच वेळ देत नसत. त्यांच्याकडे तो वेळच नसे. त्यांचे आमच्याशी फारसे बोलणेच होत नसे. त्यांचे बोलणे म्हणजे रागावणेच .

आर्थिक विवंचनेमुळे ते सतत कामाच्या शोधात असत. दिवस –रात्र काम करीत असत. आम्हाला फारशी समज नव्हती. आम्हाला फक्त आईचाच सहवास लाभत असे. त्यामुळे दादा आमच्यावर आणि आईवर अन्याय करतात असे आमच्या बालमनाला वाटत अये. त्यामुळे “ दादांना माया नाही “ हे त्या धड्याचे नाव माझी भावनाच व्यक्त करते असे वाटे. खरं म्हणजे हे काही खरं नव्हते , बालमनाला मात्र तेच खरे वाटत असे. दादांची धडपड त्यावेळी समजली नव्हती. पुढे आई गेल्यानंतर म्हणजे ३६ वर्षे आमचे दादा आम्हाला दोन भूमिका एकाच वेळी करणारे आई-वडील होते. त्यांनी ३६ वर्षे एकलेपणातच काढली. आज आम्ही स्थिर-स्थावर आहोत . मुला बाळात – नातवंडात रमलो आहोत आम्ही बरेच काही मिळवले आहे . दादांनी मात्र अनेक वर्षे एकलेपन भोगले. आज ते आमच्यात नाहीत पण त्यांनी त्या काळात सहन केलेल्या हाल –अपेष्ट आठवल्या म्हणजे जगण्याचे वेगळे अर्थ जाणवू लागतात. 
                  तदा बापाचे हृदय कसे होते
                  न येता अनुभवी जाणती ते
आई सगळ्यांनाच समजते. मातृप्रेमाचे मंगलस्त्रोत्र सगळेच गात असतो आणि गायलाच हवे. वडील म्हणजे बापाचे हृदय समजणे कठीण . वर दिलेल्या ओळी मला नेहमीच आठवतात. बाप झाल्यानंतर “पितृहृदय” समजू लागते . तो पर्यंत नाही.
      डॉ नरेंद्र जाधव यांचे “ आमचा बाप आणि आम्ही “ हे पुस्तक वाचताना मला अनेक वेळा “ माझा बाप – म्हणजे दादा “ समजू लागले. दादांच्या आठवणी म्हणजे एका गरीब ब्राम्हणाची म्हणजे खर्या अर्थाने दलित ब्राम्हणाची कष्टकहाणी आहे. महाराष्ट्रातील अनेक घराघरातून ही कहाणी बघावयास मिळेल.
      तळेगाव-दाभाडे येथील इंदुमती सिनकर ह्यानी हे पुस्तक वाचल्यानंतर मला आवर्जून एक पत्र लिहिलं . त्यात त्या लिहितात , “ तुमच्या वडिलांची आत्मजीवनाची यशस्वी गाथाच वाचावयास मिळाली.त्यांचा जीवन प्रवास अतिशय बिकट व खडतर होता. अगदी बालपणीच मातृसुखाला ते पारखे झाले , पितृछायाही दुरावली. पण वडिलांच्या मामा-मामीचे विशेषतः मामीचे खूप कौतुक वाटले. आपल्या अपत्य निधनाचे दु:ख बाजूला करून मोठ्या मनाने तिनं आपल्या दादांना पुत्रवत प्रेम दिलं . अगदी अखेर पर्यंत. खरंच खूप कौतुकास्पद. या मायेच्या ओलाव्यामुळेच दादा पुढील जीवनात खडतर प्रसंगांना सामोरे गेले.जीवनाशी झुंजताना अनेकांचे मोलाचे सहकार्य लाभले . तसेच अनेकांना नि:स्वार्थीपणाने मदत केली. पुष्पा आणि लीला ह्या मुलींचे स्वतःच्या मुलीसारखे सारं केलं . उमाबाई व दादांचे प्रेम हे बहिण-भावासारखं  अतुलनीय. मोलकरणीला कामवाली न मानता घराचाच अविभाज्य घटक मानून तिच्या करिता जे करता येईल ते सारं त्यांनी केलं . एका पोलीस अधिकार्याच्या विधवेच्या पेन्शनचे काम करून त्यांचा दुवा मिळविला. तुम्ही सहाही मुलं शिकून मोठी झालात . हे छोटेसे आत्मचरित्र बरंच काही शिकवून गेलं “ . हे त्यांनी मला लिहिलेलं बोलकं पत्र खूप काही सांगून जातं.
      दादांची ही आत्मकहाणी तशी प्रातिनिधिकच आहे. ह्या आत्मकहाणीतून “ तदा बापाचे हृदय कसे होते “ हे जसं जाणवते तसं त्यांच्या व्यथांची जाणीव होते. कवीच्या शब्दात सांगायचे तर.....
सांगता आता व्यथांची 
गोड झाले पारणे



Friday, June 5, 2015

आजचे बंगलोर

आजचे बंगलोर 
२०-२५ वर्षापूर्वीचे बंगलोर आणि आताचे बंगलोर . किती फरक झाला आहे. 
१९७३-७४ साल असेल . मी पहिल्यांदा बंगलोरला गेलो होतो. निमित्त होते दर वर्षी भरणारी पदार्थविज्ञान परिषद. स्थळ : Indian Institute of Science . जाण्यासाठी प्रचंड उत्साह. सर सी व्ही रामन ह्यांची संस्था. संशोधक सुद्धा भाऊक होऊन जातात. प्रतिभावंत शास्त्रज्ञाचा प्रभावच असतो तसा. त्या निसर्गरम्य परिसरात प्रवेश केला आणि संस्थेचा अभिमान वाटू लागला. रामननंतरचे  अनेक संशोधक आठवू लागले. ही संस्था त्या काळात उभी केली ती टाटांनी. किती दूरदर्शी माणूस. त्याच परिसरातील वसतिगृहात तीन दिवस वास्तव्य. अनेक जेष्ठ आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञासमोर संशोधन पेपर वाचल्यानंतर आपली मान न कळत ताठ झाली. त्यांच्यासमोर आपण तर टिल्लू पिल्लू. तो अनुभव खूप आत्मविश्वास देऊन गेला. 
त्याच परिषदेत यु आर राव ह्या अवकाश संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञाचे भाषण ऐकले. आर्यभट ह्या उपग्रहासंबंधीचे.  अजून तो अवकाशात सोडला नव्हता. त्यावेळी खूप प्रभावी झालो होतो. भारतीय शास्त्रज्ञ इतक्या कठीण परस्थितीत कसे संशोधन करीत असत ह्याची पूर्ण जाणीव झाली . आज आपण मंगळापर्यंत मजल मारलीय आणि काही लोक चेष्टा करीत बोलत असतात . ' कशाला हवी मंगळ स्वारी ? आधी शुद्ध पाणी द्या ' . असे बोलणार्या लोकांची कीव करावीशी वाटते. शास्त्रज्ञांची चेष्टा करणारे महाभाग ह्या देशात आहेत. ते लोकांना भडकावत असतात. 
बंगलोरला हल्ली IT  सिटी म्हणतात . म्हणजे Information  Technology शहर.अमेरिकेत एखादा प्रोजेक्ट बंगलोरच्या कंपनीला दिला तर ' Bangalored ' असे म्हणतात .  एका अमेरिकनवारीत ज्या सोसायटीत राहत होतो तेथे सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडत असे. एके दिवशी एक अमेरिकन माझ्याशी बोलण्यासाठी पुढे आला. मी इंडियन आहे हे त्याने ओळखले होते. तो होता मूळचा ब्रिटीश. सध्या अमेरिकेत स्थाईक . एक पेन्शनर. त्याला भारताबद्दल खूप आपुलकी होती . त्याचे कारण म्हणजे त्याचे आजोबा महायुद्धात कोहिमा येथे मारले गेले होते  . तो त्या दफनभूमीला भेट देऊन गेला होता. बोलता बोलता तो Infosys आणि नारायण मूर्ती ह्यांच्याबद्दल बोलू लागला. मला थोडे आश्चर्य वाटले. Infosys मुळे अमेरिकन जॉब कमी झाले अशी तक्रार केली जाते ह्याचे त्यालाच आश्चर्य वाटत होते. ही Infosys ची मूले खूप कष्टाळू आणि चांगली काम करतात. अमेरिकन मागे आहेत असे त्याचे मत होते. त्याला बंगलोर शहराबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती. असे हे आपले जागतिक शहर बंगलोर. 
पूर्वीही ते IT शहर होते. म्हणजे Indian Textiles साठी प्रसिद्ध शहर. सिल्कसाठी प्रसिद्ध. परदेशात १३०-१४० डॉलर प्रती मीटर दराने सिल्क कापड विकले जाते .आजही दोन तीन मोठ्या कंपन्या असे कापड तयार करतात. ते कारखाने अत्यंत आधुनिक आहेत. पूर्णपणे गणक यंत्रावर चालतात . मायक्रोप्रोसेसर टेक्नोलॉजी वापरली जाते. 
पूर्वी बिन्नी ही मोठी कापड कंपनी येथे होती. दहा हजार  कामगार कामाला होते. ती बंद पडली. त्यानंतर येथे गारमेंट इंडस्ट्री सुरु झाल्या. आजही सर्वात मोठा व्यवसाय हा गारमेंट इंडस्ट्रीचा आहे हे अनेकांना माहित नाही . आय टी पेक्षा गारमेंट इंडस्ट्रीत जास्त माणसे कामाला आहेत हे सांगितले तर विश्वास बसणार नाही. 
बंगलोरचा विकास केंद्रीय सरकारच्या विविध आस्थापनामुळेच झाला. HAL , NAL , ISRO आणि मिलिटरी बेस वगैरे . 
शेजारच्या तामिळनाडू राज्याने होसूरला Industrial वसाहत विकसित केली आणि बंगलोरच्या विकासाला वेग आला. काम मिळणार होसूरला आणि राहणार बंगलोरमध्ये . विमानतळ आणि इतर सोयीसुविधा बंगलोरच्या. पण कारखाने मात्र तामिळनाडूचे . अगदी असेच नोईडाचे झाले. 
बंगलोर मध्ये खूप काही आहे आणि खूप काही नाही. सर्वात जास्त सिनेमा घरे ह्या एकाच शहरात होती. शास्त्रीय संशोधन , संगीत मैफली आणि शिक्षणाच्यासाठी विविध संस्था हे बंगलोरचे वैशिष्ट्य. पेन्शनर शहर म्हणून प्रसिद्ध . 
कर्नाटकात दुसरी कोणतीही शहरे एवढी विकसित झाली नाहीत . सुरुवातीला केंद्र सरकारच्या प्रयत्नामुळेच हे शहर विकसित झाले. 
येथे कानडी येत नसलेतरी रोजचा व्यवहार हिंदीतून करता येतो. लोक आळशी. कामावर येतीलच ह्याचा भरवसा नाही. वृत्तीने भांडकुदळ. आवाज फार मोठा. 
लाचलुचपत जोरात. पैसे देऊनच कामे होतात. ट्राफिक सेन्स शून्य. 
अलिकडे येथील जीवनमान मुंबईपेक्षा महागडे. सुधा मूर्तीचा लेख आठवतो. त्या एकदा बाजारात गेल्या होत्या.  सोबत त्यांचा ड्रायव्हर होता.त्याच्या टी शर्टवर इन्फोसिसचा लोगो होता. त्या भाजीची / फळांची चौकशी करतात. त्यांना भाव जास्त वाटतो . त्या घासाघीस करतात. तो फळवाला त्यांना म्हणतो , ' कशाला एवढी भावाबद्दल घासाघीस करीत आहात. घ्यायचे नसेल तर गुपचूप जा .ते बघा आयटीवाले काहीही कटकट न करता विकत घेतात '. त्या भाजीवाल्याचे लक्ष त्यांच्या ड्रायव्हरकडे असते कारण तो इन्फोसिसचाटी शर्ट घालून आलेला असतो. महागाई ही अशी वाढत असते. लोक असे लुबाडत असतात. 
आयटी संस्कृतीमूळे महागाई अशी वाढली आहे. 



Thursday, June 4, 2015

कलकत्त्याच्या आठवणी

कलकत्त्याच्या आठवणी 

मी कलकत्त्याला अनेकदा व्यवसायानिमित्त गेलो होतो. पहिल्यांदा गेलो होतो तेव्हा ठरविले होते की पुन्हा येथे येणे नको. पहिल्यांदा एका सेमिनारसाठी गेलो होतो. मुक्काम महाराष्ट निवास. कलकत्त्याचे महाराष्ट्र मंडळ सर्वात छान आहे . सुरुवातीला अनेकदा मी तेथेच वास्तव्य केले. तेथून सेमिनार जेथे होता ती जागा जवळ होती. बाहेर पडलो  आणि थोड्याच अंतरावर धूम धडाड. गावठी बॉंब स्फोट. सरकार कॉंग्रेसचे. स्फोट करणारे कम्युनिस्ट. सगळे जीव मुठीत जगणे. केव्हा कुठे बॉंब स्फोट होतील हे काही सांगणे कठीण . त्या दोन- तीन दिवसात ४-५ बॉंब स्फोट ऐकू आले. एकदा तर ८-१० फुटावर स्फोट झाला. पुढे मार्क्सवादी मंडळी राज्यावर आली आणि ही मालिका बंद झाली. 

एकदा एक जर्मन माझ्याबरोबर प्रवास करीत होता. मुंबई - दिल्ली - बंगलोरला अनेकदा माझ्याबरोबर आला होता. कलकत्याला पहिल्यांदाच बरोबर आला होता. दिवसभर प्रवास आणि मिटींग्स चालूच होत्या. रात्री जेवताना मला म्हणाला, ' घरी गेल्यावर माझे काही खरे नाही. माझ्या पांढर्या शुभ्र शर्टची कॉलर इतकी काळी झाली आहे की घरी गेल्यावर माझी बायको  तो शर्ट ती फेकून देईल कारण ती वॉशिंग मशीनमध्ये तो शर्ट टाकणार नाही. ' मी त्याला म्हंटले , ' मग तू पुन्हा येथे येणार नाहीस ? ' . तो लगेच म्हणाला, ' त्यात काय ? येथे ऑर्डर मिळत असतील तर मी कितीही वेळा येईल. फारतर काय ? प्रत्येक वेळी नवा शर्ट विकत घ्यावा लागेल. ते सोपे आहे. पक्का सेल्समन होता . 

सर्व कारखाने हावड्याला आणि रीशर्याला. खूप मोठ्या कंपन्या . बर्याचशा खूप जुन्या. आजूबाजूचा परिसर मुंबईच्या धारावी सारखाच. कामगार वस्त्या. बकाल . काही सोयी सुविधा नसलेल्या. रस्ते वाईटच. प्रवास तसा कठीणच. नदीच्या पलीकडे जे कारखाने असत त्यांच्या स्वतःच्या बोटी असत. त्यांचे बोटीचे धक्के असत. त्या जर्मन मित्राला तो प्रवास खूप आवडायचा. संध्याकाळी कलकत्त्याला परतताना बोट प्रवासात खूप मजा वाटायची. 
काही सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बोटी असत. एकदा चार आणे वाढ करण्यात आली तर मोठा संप झाला व वाढ रद्द करून घेण्यात आली. संप , मोर्चे आणि मारामारी म्हणजे कलकत्ता असे समीकरण. 
आज विद्यासागर सेतू वाहतुकीस चालू आहे. बांधण्यासाठी किती तरी वर्षे लागली. मंद गती. 


कम्युनिस्ट राजवटीत थोडी स्थिरता आली. पण पैसे उकळण्याचे तंत्र पुढे आले. कलकत्त्याची सुती साडी प्रसिद्ध . मी बाजारात गेलो . हावडा ब्रिजच्या जवळचा बाजार. सकाळी साडे नऊ दहाचा सुमार असेल . दोन तीन जण मागे लागले. ' काय खरेदी करायचे आहे ? चला तुम्हाला दुकान दाखवितो ? ' असे म्हणून मागेच लागले. दुकाने उशीराच उघडतात. नुकतीच उघडत होती. एका दुकानात शिरलो. ती मंडळीसुद्धा दुकानात शिरली . त्यांची दुकानदाराबरोबर बातचीत सुरु झाली . त्यांनी त्याच्याकडून खंडणी वसूल केली. ते निघून गेले. दुकानदार सांगत होता हे कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते असेच खंडणी वसूल करीत असतात. मुंबईत अशीच खंडणी वसूल करतात असे बोलले जात असे. पण कलकत्त्यात हे नेहमीचेच असे. असे होते ज्योती बसूचे त्या वेळचे सरकार.

कलकत्ता मेट्रो झाली. अनेकदा प्रवास केला. लोकांनी ती स्वच्छ आणि सुंदर ठेवली हे आश्चर्यच. नाहीतर अजूनही चालणारी ती ट्राम बघवत नाही. काय डबे ? काय प्रवास . सगळाच आनंद. 
कलकत्त्यात कोणीही काम करीत नाही. पोस्ट ऑफिसमध्ये खिडकीपाशी कोणीही भेटत नाही. माणूस आळशी. चर्चा करण्यात रमलेला. 

कलकत्त्यात इंग्रजी कंपन्या खूप होत्या. त्यांचे अधिकारी दिमाखात राहत असत. त्यामुळे क्लब संस्कृती जोरात. आजही संध्याकाळी मोठ्या कंपन्याचे अधिकारी क्लब मध्ये भेटतात. तेथेच अनेक व्यवहार ठरतात. चौरंघी रोडवरील मोठ्या हॉटेलमधील अशाच एक दोन क्लबात काहीजणांची भेट घेतली होती. तेव्हा इंग्लंडमध्येच आहोत असा भास झाला. इंग्रज गेले पण इंडियन इंग्रज झालेले पाहिले ते कलकत्त्यात. 


कलकत्त्याचा एक मित्र . त्याने कलकत्त्यातील लोक सुखी कसे ? ह्या प्रश्नाचे उत्तर दिले. त्यावेळी एक रुपया कमावणारा येथील माणूस सुखी असायचा . दोन आण्यात  दोनदा चहा . आठ आण्यात दोनदा जेवण. चार आण्यात एक सिनेमा. सिनेमा पाहणारच आणि मिळेल तेव्हा,  भेटेल त्या माणसाशी चर्चा करत बसणार . कोणत्याही विषयावर. 

गेल्या तीन - चार वर्षात कलकत्ता शहरात गेलो नाही. थोडा बदल झाला असेल . पण मी पाहिलेला कलकत्ता असाच होता. जायचे नाही असे ठरविले पण अनेकदा गेलो. आता बहुतेक कंपन्या बंदच झाल्या आहेत. कम्युनिस्ट राजवटीत सर्वांनी आपला धंदा दुसर्या ठिकाणी हलविला आहे. नाही म्हणायला कार्यालय मात्र चौरंघीवर दिमाखात चालू आहेत .