Monday, February 27, 2017

रास्वसं , हिंदुत्व , सावरकर आणि इतर काही ......


प्राचार्य राम शेवाळकर हे ख्यातकीर्त वक्ते , साहित्यिक आणि आचार्यकुलाचे शिक्षक. त्यांचे ' ध्यास शिखरे ' हे २८ व्यक्तीवर लिहिलेले नितांत सुंदर पुस्तक हातात घेतले आणि एका दमात वाचून टाकले. 
सध्या रास्वसं, हिंदुत्व आणि सावरकर ह्या विषयावर उलटसुलट चर्चा चालू असते. आजचे राजकारण त्या भोवतीच फिरत असते. राम शेवाळकरांच्या ह्या पुस्तकात दोन सुंदर लेख आहेत. एका मार्क्सवादी कार्यकर्त्याची ' बालाजीची विचारयात्रा ' आणि सावरकरभक्त सुधीर फडक्यावर ' बाबूजींचे ध्यासपूर्व ' असे ते दोन लक्षवेधी लेख. शेवाळकर हे गांधीवादी आणि आचार्य विनोबांच्या जवळचे. त्यांचा सावरकर संप्रदाय किंवा रास्वसं ह्यांच्याशी सुतराम संबंध नव्हता. गांधी - विनोबा पंथातील असूनही सावरकरांच्या अनेक पैलू असणाऱ्या विभूतिमत्वाकडे ते आकर्षित का झाले?, हे वाचण्यासारखे आहे व समजून घेण्यासारखे आहे. बाळाजींच्या लेखात रास्वसं , काँग्रेसचे रास्वसंशी जवळीक असलेले त्यावेळचे नेते आणि डॉ हेडगेवार ह्यांच्यासंबंधी बरीच माहिती मिळते.
गंमत म्हणजे शेवाळकरानी नागपुरात बरीच वर्षे काढली आहेत त्यामुळे त्यांना नागपूरच्या हिंदुत्ववादी नेत्यांची खूप जवळून माहिती आहे. आर एस एस., डॉ हेडगेवार , डॉ मुंजे ही सारी हिंदुत्ववादी मंडळी नागपूरची. बाळाजीच्या लेखात आर एस एस संबंधी नवी माहिती समोर येते.
बाळाजी एक प्रखर बुद्धिमत्ता असलेले व्यक्तिमत्व. चौरस अभ्यासूवृत्ती असलेला माणूस.हिंदी-मराठी –इंग्रजी वक्तृत्व  गाजवलेला क्रांतिकारी विचारसरणीचा नागपुरी माणूस.’रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले’ असं समजून दशहतवादी साहस करणारा त्यावेळचा स्वातंत्र्य सैनिक. अशा बाळाजीनी डॉ ल.वा. परांजपे ,धुंडिराजपंत ठेंगडी व डॉ हेडगेवार ह्यांच्याबरोबर १९२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनेत पुढाकार घेतला होता. पहिले सरसंघचालक म्हणून डॉ हेडगेवारांच्या नावाची सूचना त्यांनीच केली होती व ते स्वतः पहिले सरकार्यवाह झाले होते. डॉ मुंजे ह्यांनी त्याच काळात हिंदू महासभेची स्थापना केली. ही सर्व मंडळी त्यापूर्वी कॉंग्रेसमध्येच होती. कॉंग्रेसच्या नागपूर अधिवेशनाचे डॉ मुंजे हे स्वागताध्यक्ष होते व स्वयंसेवक समितीचे प्रमुख डॉ हेडगेवार होते. पुढे कानपूरच्या अधिवेशनात कॉंग्रेसच्याच मंडपात भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली.त्या अधिवेशनास बाळाजी हे डॉ हेडगेवार ह्यांच्या प्रेरणेनेच तेथे गेले होते. त्या अधिवेशनात बाळाजीना हजरत मोहनींची भेट घेण्यास डॉ हेडगेवार ह्यानीच सांगितले होते.
संघातील राष्ट्रभक्तीने भारावलेल्या युवाशक्तीचा उपयोग आपल्याला स्वातंत्र्यासाठी करता येईल अशी बाळाजी आणि इतर नेत्यांची समजूत होती पण डॉ हेडगेवार ह्यांनी आपली संघटना राजकारणाच्या उपसर्गापासून दूर ठेवण्याचे ठरविले होते. वैयक्तिक पातळीवर डॉ हेडगेवार ह्यांनी जंगल सत्याग्रहात भाग घेतला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धुंडिराज ठेंगडी ह्यांचा कम्युनिस्ट नेते कॉ डांगे ह्यांच्याबरोबर मीरत कटात सहभाग होता.त्यावेळी सावरकरानीही मार्क्सवादाला मान्यता दिली होती. सर्व जगानेच ऐहिक वृत्तीला अग्रक्रम देण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादिली होती. प्रेषिताचा आव आणून व जनतेला अजाण कोकरू समजून तलवारीच्या जोरावर सक्तीने केलेल्या धर्मांतराची कळा मार्क्सला अभिप्रेत नव्हती , असे त्यांचे पतीपाद्न होते.
ठेंगडी व बाळाजी हुद्दार वर्तुळापलीकडचा विचार करणारे संघ स्वयंसेवक होते.त्रिपुरा कॉंग्रेस नंतर नेताजी सुभाष आणि डॉ हेडगेवार ह्यांची मुंबईत भेट घालून देण्याचे काम बाळाजीकडेच होते पण ती भेट झालीच नाही.
हेच बाळाजी पुढे कट्टर मार्क्सवादी झाले.स्पेनच्या जनतंत्रवादी तरुणांची एक इंटरन्याशनल ब्रिगेड होती .त्यात त्यांनी भाग घेतला .ते युद्ध कैदी झाले. तेथून सुटून आल्यावर कॉ डांगे ह्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचा मुंबई येथे सत्कार झाला तर नागपूरला स्वा.सावरकराच्या हस्ते मोठा सत्कार झाला . पंडित नेहरूंनी त्यांचे अभिनंदन केले तर डॉ हेडगेवार ह्यांनी संघ शिबिरात त्यांचे भाषण ठेवले होते. जे बाळाजी एक संघसंस्थापक होते तेच नंतर कट्टर मार्क्सवादी नेते झाले.
नागपुरातील बहुसंख्य कॉंग्रेस नेते हे संघाशी खूप जवळचे होते. विचारभिन्नतेची कुंपणे आजच्याएव्हढी काटेकोर झाली नव्हती.


टिळकांच्या नेतृत्वामुळे राष्ट्रव्यापी पक्ष म्हणून सर्वच कॉंग्रेसशी आस्था बाळगून होते.
खिलाफतीच्या चळवळीनंतर महात्माजींच्या स्वप्नातील हिंदू-मुस्लिम ऐक्य धृड होण्याऐवजी फुटीरता फोफाऊ लागली .विशेषतः ‘ सच्चा मुसलमान हा गांधीपेक्षा आपल्याला जवळचा असल्याचा‘ महमदअली जीनांच्या दर्पोक्तीमुळे भविष्याचा सुगावा लागून हिंदू हितासाठी स्वतंत्र पक्ष स्थापनेची निकड भाई परमानंद व डॉ मुंज्याना जाणवली व त्यातून  हिंदू महासभेची स्थापना झाली. जीनांनी गांधीजींना हिंदूंचाच नेता मानले व कॉंग्रेसला हिंदुंचीच संघटना मानले .हिदू समाज आत्मविस्मृत झाल्यामुळे आलेल्या दौर्बल्यापोटी त्याला पारतंत्र्यशरण व्हावे लागते . हा इतिहास आठवून त्याचा स्वाभिमान जागृत करण्यासाठीच डॉ हेडगेवार ह्यांनी संघाची स्थापना केली व योजनापूर्वक इष्ट ते वळण दिले. हा ह्या संघटनेच्या स्थापनेचा खरा इतिहास आहे.
त्याचवेळी धर्म , संस्कृती , परंपरा , तत्वज्ञान याचे अनुसरण करून माणसाचे मुलभूत प्रश्न सुटत नसतात . त्यासाठी भुकेचा व समतेचा प्रश्न घेऊन कम्युनिस्ट विचारसरणी वाढू लागली होती.
डॉ मुंजे आणि इतरांनी रास्वसंच्या शाखा गावागावात उघडल्या. अनेक जुन्या कॉंग्रेस नेत्यांनी आपापल्या भागात संघाच्या प्रसारास सहकार्य केले , ही त्यावेळची वस्तुस्थिती. असा संघ आणि कॉंग्रेस ह्यांचा संबंध होता. हिंदू महासभा का स्थापन झाली हे ही लक्षात घेणे आवश्यक आहे . कॉंग्रेसमध्ये हिंदुत्ववादी विचाराचे अनेक नेते होते तसेच कम्युनिस्ट व समाजवादी विचारांची मंडळी होती. पुढे नेहरूंच्याबरोबर मतभेद झाले म्हणून समाजवादी गट बाहेर पडला हे सर्वाना माहीतच आहे. हिंदुत्ववादी गट त्यापूर्वीच बाहेर पडला होता.     
सावरकरांच्या यज्ञमय चिथरारक जीवनाचा व अनेकांगी साहित्यकृतीचा पगडा उमलत्या वयापासून त्यांच्यावर झाला हे ते स्पष्टपणे सांगतात. त्यांनी सावरकरकरावर अनेक व्याख्याने दिली आहेत. ते सावरकर भक्त नसले तरी सावरकरांच्या साहित्याचे अभ्यासक आहेत. हे समजून घेताना आज जे जाणवते ते सध्याचे सावरकरद्वेषी वातावरण. त्याबद्दल खंत वाटू लागते.
सुधीर फडके आणि राम शेवाळकर ह्यांचा विशेष ऋणानुबंध होता. त्याचा धागा म्हणजे दोघांना वाटणारे सावरकरांचे प्रेम. सावरकरांच्या पहिल्या श्राद्धदिनी सावरकरप्रेमींनी दादरला सावरकर स्मारकाच्या जागेवर राम शेवाळकरांची चार व्याख्याने आयोजित केली होती. सुधीर फडके त्या व्याख्यानांना आवर्जून उपस्थित होते. सावरकर साहित्याचा त्यांचा अभ्यास सर्वाना माहित आहेच. सावरकरावर सुधीर फडके ह्यांनी जो चित्रपट काढला होता त्यावर शेवाळकरानी एक दिर्घ लेख लिहिला आहे तो मुळातून वाचण्यासारखा आहे. गांधीवादी आणि विनोबांचे शिष्य असलेले शेवाळकर सावरकरांना का मानतात हे समजून घेतले पाहिजे.
त्यात ते लिहितात ....
सुधीर फडक्यांचा सावरकरावरील चित्रपट पूर्ण झाला तेव्हा
तुजसाठी मरण ते जनन
तुजसाठी जनन ते मरण
असे म्हणणाऱ्या सावरकरांचे तेज:पुंज राष्ट्रसमर्पित जीवन युवापिढीसमोर येणार व त्यांच्या आत्मसंतुष्ट आयुष्यावर शहारे येणार ह्या बद्दलचा आनंद मला झाला . तसे ते स्पष्टपणे नमूद करतात.
राम शेवाळकर लिहितात ---“ सावरकरांच्या आयुष्यातील नाट्यपूर्ण क्षण म्हणजे गांधीहत्येचा अभियोग व त्यावरील सावरकरांची जबानी “.
आजही ह्या प्रश्नावर वादळ चालूच आहे.

शेवाळकर पुढे लिहितात ... “ १९४४ च्या नेताजी सुभाषबाबूंच्या आकाशभाषितातातील सावरकरांच्या सैनिकीकरणाच्या संदेशाचे ऋण मान्य केल्याचा किंवा न्या. आत्मचरण यांच्या निकालपत्रातील सावरकरविषयक उल्लेख फार महत्वाचा आहे “ .
आजही ह्या संबंधी पुरेशी स्पष्टता नाही आणि चर्चा चालूच असते.

शेवाळकरांचे सावरकर चित्रपटाचे समीक्षण आणि त्यांनी सुधीर फडके ह्यांना लिहिलेले पत्र मुळात वाचण्यासारखे आहे. दुर्दैवाने सावरकरांच्या जीवितकार्यावर पुरेसे विचारमंथन झालेले नाही असे त्यांना वाटते, ते खरेच आहे. आजही हेच प्रश्न प्रकर्षाने जाणवतात. हिंदुत्व , हिंदुत्ववादी , सावरकरवाद ,गांधीहत्या ह्या भोवतीच राजकारण फिरते आहे व गैरसमज चालूच आहेत. हा लेख अवश्य वाचवा. तसे हे पुस्तकच वाचनीय आहे.



No comments:

Post a Comment