Sunday, June 21, 2015

तदा बापाचे हृदय कसे असते .......


माझे वडील श्रीनिवासराव गंगाखेडकर. आम्ही त्यांना दादा असेच म्हणत असू. आज जर ते जिवंत असते तर आम्ही त्यांची शताब्दी साजरी केली असती.
Shriniwasrao Gangakhedkar
आज सकाळी माझ्या दोन्ही मुलीनी Father’s Day च्या शुभेच्छा दिल्या आणि मला माझ्या वडिलांची आठवण झाली. मन भूतकाळात रमले.
“गोड झाले पारणे” ही दादांची आत्मकहाणी मी इ.स. २००० साली प्रसिद्ध केली होती. दादा मुंबईला माझ्या घरी आले की जुन्या आठवणी सांगत असत. तेंव्हा मी त्यांना आठवणी लिहून काढा असा आग्रह धरला. त्यांना खूप काही सांगावेसे वाटे , ते त्यांनी त्यांच्या आत्मकहाणीतून व्यक्त केले. दादा काही लेखक नव्हते. आयुष्यामध्ये रोजच्या जगण्यातून आपण जे अनुभवतो , पाहतो , तेच तर साहित्यातून व्यक्त होते. प्रत्येकाचे जगण्याचे अनुभव निराळे असतात . अनुभवातून तावून-सुलाखून निघाल्यावर सांगावेसे वाटते. अनुभवातून आलेले शहाणपण खूप मोलाचे असते. दादा खूप वाचत असत . त्यांनी त्यांच्या आठवणी लिहायला सुरवात केली आणि मला वाचायला दिल्या. त्यांना आलेले अनुभव विलक्षण होते. त्यातून बरेच काही शिकण्यासारखे होते.त्यांना ज्यांचा सहवास लाभला त्या व्यक्तींची चित्रे ते उभी करीत होते . त्या आठवणी वाचताना त्यांना भेटलेली माणसे आपल्यालाही भेटतात.
सामान्य माणसांचे जीवन म्हणजे सतत चालू असलेला झगडा.व्यथा वेदनांचा इतिहास. अनेक छोटे मोठे प्रश्न. नेहमीच्या आर्थिक अडचणीमुळे होणारी ससेहोलपट .कौटुंबिक जीवनातील विलक्षण ताणतणाव व त्यामुळे होणारा मनाचा कोंडमारा. जीवन समृद्ध करण्यासाठी चाललेली विलक्षण धडपड . कनिष्ठ मध्यमवर्गीय माणसांचे प्रश्न तसे थोडे फार सारखेच असतात. प्रत्येकाची जिद्द निराळी असते. जगण्यासाठी करावे लागणारे झगडे वेगळे असतात. शासकीय नोकराच्या जीवनाला काही मर्यादा असतात. कुसुमाग्रजांनी एकदा म्हंटले होते की मुंबई ह्या महानगरात जगणारा मुंबईकर हा सतत युद्ध करीत असतो. त्याचे जगणे हे युद्धावरच्या सैनिकासारखे असते. सगळ्याच शहरातील मध्यवर्गीय मंडळीना हे जगणे असह्य होते आहे. दादा हैद्राबाद – औरंगाबाद ह्या शहरात अधिक काळ राहिले. हैद्राबादच्या निझामी राजवटीतील दादांची शासकीय सेवा वेगळी होती. राज्यपुनर्रचना झाल्यानंतरची औरंगाबाद- परभणी येथील शासकीय सेवा पूर्णपणे निराळी होती . या दोन जगण्यात फार अंतर होते
निझामी राजवटीतील मुसलमान अधिकारी असलेल्या माणसाबरोबर नोकरी करणाऱ्या त्या वेळच्या कर्मचार्याची काय अवस्था होती ह्याचे सुरेख चित्रण दादांच्या आठवणीतून दिसून येते. दिलदार व्यक्तिमत्वाचे मुसलमान अधिकरी आणि रझाकारी वृत्तीचे इतर सहकारी ह्यांच्या बरोबरचा तो काळ त्या वेळच्या मराठवाडी लोकांचे जीवन कसे होते ह्याचे चित्रण करते.
      आई-वडिलांचा आधार नसताना मामा-मामीच्या सहवासात जीवनाचे प्रारंभीचे धडे त्यांनी घेतले.
          ना कुठे आधार आणिक ना गतीला अंत होता
          मात्र पायीच्या बळाला जागता आवेग होता
एकट्या मामा-मामीचा आधार सोडला तर दादा तसे निराधारच होते. जगण्याची जिद्द आणि पायातले बळ या जोरावर त्यांनी अनेक दु:खे पचविली .समोर आलेल्या अडचणीवर मात केली.
          मज कळेना चालताना दु:ख कसे फुल झाले
          अन कुणाचे दिव्य आशीर्वाद मज देऊन गेले
दादांना त्यांच्या आईचा आशीर्वाद हेच देऊन गेला. हे त्यांनी त्यांच्या आईच्या आठवणी सांगतना व्यक्त केले आहे.
      स्वतःच्या पायावर उभे राहून आर्थिक संकटावर मात करण्यासाठी चाललेली दादांची धडपड आणि होरपळ आत्मकहाणीतून वाचताना त्यांचे कष्टकरी जीवन जाणवू लागते.  
रझाकारी जमान्यात उर्दू येत नसल्यामुळे नोकरीचा शोध घेताना आलेले त्यांचे विलक्षण अनुभव चटका लावून जातात. नोकरी करीत असताना भेटलेले सहकारी आणि त्या काळचे मानवतावादी मुसलमान अधिकारी ह्यांची व्यक्तिचित्रे त्यांनी उभी केली आहेत. मी त्या आठवणी ऐकल्या आहेत. त्यांना त्या काळात लाभलेली मित्रमंडळी विलक्षणच आहेत. “ मित्र कसे मिळवावेत” या विषयावर अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. पण त्यांचा प्रत्यक्ष अनुभव खूप काही सांगून जातो. त्यांना खूप चांगली मित्रमंडळी भेटली. पुरोहित बुक डेपोचे प्रकाशक पुरोहित काका , बनियनचा कारखाना चालविणारे पानसरे काका , प्रसिद्ध वकील गोपाळराव जोशी , चंदुकाका कुलकर्णी ही त्यांची मित्रमंडळी म्हणजे “ मित्र कसे जोडावेत “ याची सुंदर उदाहरणे होत. आजही मला ती मित्रमंडळी आठवतात.
 आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी दादा १८/१८ तास काम करीत असत. सकाळी ४ ते ६ पुस्तकांचे टायपिंगचे काम , सकाळी ८ ते १० पानसरे काकांच्या कारखान्यात हिशोब लिहिण्याचे काम , ११ ते ५ निझाम सरकारची नोकरी , ती ही रझाकारी जमान्यातील, संध्याकाळी ७ ते ९ हायकोर्ट वकील गोपाळराव जोशी ह्यांच्या कार्यालयात टायपिंगचे काम , रात्री ११ते १ पुरोहित प्रकाशनाचे इंग्रजी पुस्तकांचे टायपिंगचे काम . त्यांनी सगळ्यात जास्त वेळ Typewriter बरोबरच घालविला असेल.
      त्यांना बायको-मुलांच्यासाठी फारसा वेळच मिळाला नाही. सायकलवर एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत प्रवास करणे आणि तीन-चार ठिकाणी काम  करून अर्थार्जन करण्याचे त्यांचे कष्ट पाहिले म्हणजे त्यांच्या कामाचा आवाका लक्षात येतो. या कष्टमय जीवनामुळे त्यांना ‘ कारकुनी’ जीवनाचा विलक्षण तिटकारा . माणसाने खूप शिकावे . कारकुनी आणि खर्डेघाशी कधी करू नये असे त्यांचे नेहमीचे सांगणे असे. कारकुनाच्या जीवनात फारसे काही घडू शकत नाही .जगण्याचा आटापिटा फारच क्लेशदायक. ब्राम्हण माणूस केवळ शिक्षणाच्या शिदोरीवरच आपली उन्नती करू शकतो असे त्यांचे ठाम मत होते. मुलांनी पदव्या मिळवाव्यात. पदव्युत्तर शिक्षण घ्यावे ही त्यांची दुर्दम्य इच्छा. आपल्या मुलांनी खूप शिकावे . ‘ कारकून ‘ कधीच होऊ नये , हे ते नेहमीच सांगत असत. त्यामुळे मी जेव्हा पदवी मिळवली , पदव्युत्तर शिक्षण  घेतले आणि पुढे Ph.D. झालो त्यामुळे त्यांना विलक्षण आनंद झाला. खरं म्हणजे माझ्यात शिक्षणाविषयीची जी जिद्द निर्माण झाली ती त्यांच्यामुळेच. आम्ही सारे ६ भाऊ शिक्षित झालो ते त्यांच्यामुळेच.
      आमची काही नातेवाईक मंडळी बर्यापैकी श्रीमंत होती. शेतीवाडी बाळगून होती. काही जणांच्याकडे तर खूप शेती होती. वाडे होते. बंगले होते. पैसाअडका होता. ही नातेवाईक मंडळी खूप अपमानास्पद बोलत असत. दादांना ते आवडत नसे. “ माझा बंगला नाही पण माझी सहा मुले म्हणजे माझे सहा बंगले “ असे ते अभिमानाने म्हणत असत. त्यात त्यांची खंत होती. नातेवाईक मंडळींच्या अशा बोलण्यामुळे त्यांचे मन दुखावले जात असे. त्या नंतर काळ खरोखरच बदलला . त्यांच्या प्रयत्नामुळे आम्ही सर्व मुले शिकलो . जीवनात स्थिरस्थावर झालो . आज बर्यापैकी आर्थिक सुबत्ता आहे आणि त्यांच्या सर्व मुलांच्याकडे स्वतःची बंगलेवजा घरे आहेत. ते सर्व त्यांना त्यांच्या जीवनात पाहण्यास मिळाले. दादांनी अपार कष्ट उपसले नसते  तर हे सर्व जमून आले नसते.
      लहानपणीची माझी एक आठवण. मी सकाळी चार वाजताच उठून अभ्यास करीत असे. त्यावेळी आमच्या मराठीच्या पुस्तकात एक धडा होता, “ दादांना माया नाही “ . मी सकाळी उठून तो धडा मोठ्याने वाचत असे. मला मोठ्याने वाचण्याची सवयच होती. त्यामुळे झोप येत नसे. दोन खोल्यांचे चाळीतील अंधारे घर. मी हा धडा वाचताना मुद्दामच मोठ्याने धड्याचे नाव वाचत असे. मला असे वाटत असे की दादांनी ते ऐकावे. दादा आम्हा मुलांना कधीच वेळ देत नसत. त्यांच्याकडे तो वेळच नसे. त्यांचे आमच्याशी फारसे बोलणेच होत नसे. त्यांचे बोलणे म्हणजे रागावणेच .

आर्थिक विवंचनेमुळे ते सतत कामाच्या शोधात असत. दिवस –रात्र काम करीत असत. आम्हाला फारशी समज नव्हती. आम्हाला फक्त आईचाच सहवास लाभत असे. त्यामुळे दादा आमच्यावर आणि आईवर अन्याय करतात असे आमच्या बालमनाला वाटत अये. त्यामुळे “ दादांना माया नाही “ हे त्या धड्याचे नाव माझी भावनाच व्यक्त करते असे वाटे. खरं म्हणजे हे काही खरं नव्हते , बालमनाला मात्र तेच खरे वाटत असे. दादांची धडपड त्यावेळी समजली नव्हती. पुढे आई गेल्यानंतर म्हणजे ३६ वर्षे आमचे दादा आम्हाला दोन भूमिका एकाच वेळी करणारे आई-वडील होते. त्यांनी ३६ वर्षे एकलेपणातच काढली. आज आम्ही स्थिर-स्थावर आहोत . मुला बाळात – नातवंडात रमलो आहोत आम्ही बरेच काही मिळवले आहे . दादांनी मात्र अनेक वर्षे एकलेपन भोगले. आज ते आमच्यात नाहीत पण त्यांनी त्या काळात सहन केलेल्या हाल –अपेष्ट आठवल्या म्हणजे जगण्याचे वेगळे अर्थ जाणवू लागतात. 
                  तदा बापाचे हृदय कसे होते
                  न येता अनुभवी जाणती ते
आई सगळ्यांनाच समजते. मातृप्रेमाचे मंगलस्त्रोत्र सगळेच गात असतो आणि गायलाच हवे. वडील म्हणजे बापाचे हृदय समजणे कठीण . वर दिलेल्या ओळी मला नेहमीच आठवतात. बाप झाल्यानंतर “पितृहृदय” समजू लागते . तो पर्यंत नाही.
      डॉ नरेंद्र जाधव यांचे “ आमचा बाप आणि आम्ही “ हे पुस्तक वाचताना मला अनेक वेळा “ माझा बाप – म्हणजे दादा “ समजू लागले. दादांच्या आठवणी म्हणजे एका गरीब ब्राम्हणाची म्हणजे खर्या अर्थाने दलित ब्राम्हणाची कष्टकहाणी आहे. महाराष्ट्रातील अनेक घराघरातून ही कहाणी बघावयास मिळेल.
      तळेगाव-दाभाडे येथील इंदुमती सिनकर ह्यानी हे पुस्तक वाचल्यानंतर मला आवर्जून एक पत्र लिहिलं . त्यात त्या लिहितात , “ तुमच्या वडिलांची आत्मजीवनाची यशस्वी गाथाच वाचावयास मिळाली.त्यांचा जीवन प्रवास अतिशय बिकट व खडतर होता. अगदी बालपणीच मातृसुखाला ते पारखे झाले , पितृछायाही दुरावली. पण वडिलांच्या मामा-मामीचे विशेषतः मामीचे खूप कौतुक वाटले. आपल्या अपत्य निधनाचे दु:ख बाजूला करून मोठ्या मनाने तिनं आपल्या दादांना पुत्रवत प्रेम दिलं . अगदी अखेर पर्यंत. खरंच खूप कौतुकास्पद. या मायेच्या ओलाव्यामुळेच दादा पुढील जीवनात खडतर प्रसंगांना सामोरे गेले.जीवनाशी झुंजताना अनेकांचे मोलाचे सहकार्य लाभले . तसेच अनेकांना नि:स्वार्थीपणाने मदत केली. पुष्पा आणि लीला ह्या मुलींचे स्वतःच्या मुलीसारखे सारं केलं . उमाबाई व दादांचे प्रेम हे बहिण-भावासारखं  अतुलनीय. मोलकरणीला कामवाली न मानता घराचाच अविभाज्य घटक मानून तिच्या करिता जे करता येईल ते सारं त्यांनी केलं . एका पोलीस अधिकार्याच्या विधवेच्या पेन्शनचे काम करून त्यांचा दुवा मिळविला. तुम्ही सहाही मुलं शिकून मोठी झालात . हे छोटेसे आत्मचरित्र बरंच काही शिकवून गेलं “ . हे त्यांनी मला लिहिलेलं बोलकं पत्र खूप काही सांगून जातं.
      दादांची ही आत्मकहाणी तशी प्रातिनिधिकच आहे. ह्या आत्मकहाणीतून “ तदा बापाचे हृदय कसे होते “ हे जसं जाणवते तसं त्यांच्या व्यथांची जाणीव होते. कवीच्या शब्दात सांगायचे तर.....
सांगता आता व्यथांची 
गोड झाले पारणे



1 comment:

  1. Thanks for sharing the story.. truly inspiring to see the efforts earlier generation took for our well being..

    ReplyDelete